परमार्थ मार्गात सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सद्गुरु श्री माउली सेवेचे महत्त्व विशद करताना श्री ज्ञानेश्वरीतील एका ओवीत म्हणतात, ‘जे ज्ञानाचा कुरुठा | तेथ सेवा हा दारिवंठा | (ज्ञाने.४.३४.१६६)’ सेवेमुळे आपल्यातील विकार-दोष निघून जाऊन त्या जागी परमार्थात अत्यावश्यक असणारी श्रीसद्गुरूंप्रति शरणागती येते आणि त्यापुढेच श्रीसद्गुरूंची खरी करुणाकृपा होऊन ज्ञानप्राप्ती होते. अशा अखंड सेवाव्रताचा ध्यास घेतलेल्या ‘श्रीपाद सेवा मंडळा’चे अनेक प्रकल्प आज महाराष्ट्रभर कार्यान्वित आहेत. त्यांतील अग्रगण्य स्थानी म्हटले जावे असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील ‘प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तपोवन’ हे होय.
भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंचे मंदिर :
प.पू.सद्गुरु योगिराज श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या उत्तराधिकारी प.पू.सद्गुरु सौ.शकुंतलाताई आगटे ह्यांनी आंबेरी ‘तपोवन’ उभारणीसाठी अहोरात्र परिश्रम घेतले आणि त्यांच्या संकल्पनेतून दि. २८ ऑक्टोबर २००५ रोजी प्रकल्पस्थानी भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंचे अतिशय सुंदर व भव्य असे मंदिर उभारले गेले. प.प. श्री. वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज ज्या स्थानी त्यांची साधना आणि तपाचरण करीत असत त्याच स्थानी आज हे मंदिर दिमाखात उभे आहे. मुख्य मंदिराच्या गर्भगृहातील भगवान श्रीराधावर श्रीकृष्णचंद्रप्रभूंची प्रसन्न मूर्ती आहे. त्यांचे विलोभनीय दर्शन घेताना देहभान विसरायला होते. या मुख्य मंदिरातच राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामीसमर्थ महाराज व प.प. श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांची उपमंदिरे आहेत. त्यामध्ये त्यांच्या रेखीव पूर्णाकृती मूर्ती व श्रीचरणपादुका प्रतिष्ठापित आहेत. ह्या सुरेख मंदिराच्या मुखमंडपातील जय-विजयांच्या देखण्या मूर्ती आणि रंगमंडपातील दशावतारांची अप्रतिम शिल्पे व ‘श्रीपाद सेवा मंडळा’चे बोधचिन्ह दर्शकांचे लक्ष वेधून घेतात. ह्या रंगमंडपात एक हजार माणसे आरामात बसू शकतात. मंदिरासमोरील भव्य दीपमाळ आपले लक्ष वेधून घेते.
श्रीचरणाधिष्ठान मंदिर :
मुख्य मंदिराच्या समोरच्या बाजूला असलेल्या एका छोट्याशा टेकडीवर सुमारे पाच हजार चौरस फुटांचे ‘श्रीचरणाधिष्ठान मंदिर’ उभे आहे. या ठिकाणी पूर्वी एक छोटे कौलारू शेतघर होते. प.पू. सद्गुरु सौ. शकुंतलाताई त्यांच्या या अत्यंत प्रिय स्थानाला ‘रास-निकुंज’ असे म्हणत. प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांच्या मार्गदर्शनाप्रमाणे दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी त्याच ठिकाणी प.पू. सद्गुरु सौ. शकुंतलाताई आगटे यांच्या ‘श्रीचरणाधिष्ठान मंदिरा’ची विधिवत् स्थापना करण्यात आली. अतिशय देखण्या व मनमोहक ‘श्रीचरणाधिष्ठान मंदिरा’च्या दर्शनी भागात श्रीराधाजींना प्रिय असणाऱ्या दोन मयूरांची पाषाण शिल्पे आहेत. मुख्य द्वाराच्या बाजूला जय-विजयांच्या सुबक पाषाणमूर्तींची स्थापना केली आहे. द्वाराच्या वरच्या बाजूला असणारे कीर्तिमुखही फार सुंदर आहे. या मंदिरामध्ये प.पू.सौ.ताईंच्या प्रसन्न भावमुद्रांची छायाचित्रे लावलेली आहेत. ही सर्वच छायाचित्रे खूप बोलकी आहेत; जणू त्यातून प.पू.सौ.ताई आपल्याशी आता संवाद साधतील असेच वाटत राहते. मंदिराच्या गाभाऱ्यात प.पू.सौ.ताईंच्या श्रीचरणांचे वृंदावन आहे. त्यामागे प.पू.सौ.ताईंची सुंदर प्रतिमा अप्रतिम नक्षीकामाच्या मखरात बसवलेली आहे. या प्रतिमेच्या मागे भगवान श्रीकृष्णांची सर्वांगसुंदर ध्यानस्थ मूर्ती आहे. ही मूर्ती कारकलमधील कृष्णशिळेतून साकारलेली आहे. वृंदावनाच्या दोन्ही बाजूंना प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज व राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामीसमर्थ महाराजांच्या सुंदर प्रतिमा बसवलेल्या आहेत. अतिशय मोहक हंड्या आणि झुंबरांनी हे मंदिर शोभून दिसते. ‘श्रीचरणाधिष्ठान मंदिर’ हा प.पू.सौ.ताईंचा वैभवसंपन्न राजवाडा आहे असेच वाटत राहते. दोन्ही मंदिरांत नित्य षोडशोपचार पूजा, आरती केली जाते तसेच ‘श्रीचरणाधिष्ठान मंदिरा’त दर रविवारी सामुदायिक साधना केली जाते. ह्या दोन मुख्य मंदिरांसोबतच ‘तपोवन’ परिसरात ‘श्रीनाथ मारुती मंदिर’ असून तेथे श्रीमारुतीरायांची अतिशय गोड मूर्ती आहे.
प्रकल्पावरील इतर उपक्रम :
आंबेरी ‘तपोवन’ प्रकल्पावर गोवंश पालन होते व प्रकल्पावरील सेवेकऱ्यांकडून नित्यशः गोसेवा साधली जाते. ‘तपोवना’तील निसर्ग सौंदर्य आणि वन्य जीवन वेधक आहे. अनेक दुर्मिळ पशु-पक्ष्यांचा येथे निवास असतो. परिसरातील नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहावे ह्यासाठी सेवेकऱ्यांमार्फत बागकामाचा एक नियमित परिपाठ पाळला जातो. प्रकल्पावर भातशेती व फळझाडे मोठ्या कष्टाने आणि विशेष प्रेमाने जोपासली जातात. खत, गोमूत्र, गांडूळखत इत्यादी सेंद्रिय खतांचा वापर करून ‘देवभूमीतले हे देणे’ देवांच्या नैवेद्यासाठी, उत्सवासाठी, तसेच स्वयंसेवक व साधकांसाठीच वापरले जाते. यासोबतच तुलसी अर्क, गोमूत्र अर्क, त्रिफळा चूर्ण ह्या सारखी औषधी उत्पादने, वैश्वदेव व इतर पूजा विधीसाठी लागणाऱ्या गोवऱ्या ह्या देखील प्रकल्पावरच तयार केल्या जातात. प्रकल्पावर पूर्णवेळ राहून सेवा करणारे साधक प्रकल्पाची नियमितपणे निगा राखतात. तसेच वर्षभरातून अनेक साधक-सद्भक्त येऊन आपापल्या सवडीनुसार सेवाकार्यास हातभार लावतात.
प्रकल्पावरील मुख्य उत्सव :
‘तपोवना’त मोठ्या प्रमाणावर साजरा केलेला जाणारा उत्सव म्हणजे श्रीगोकुळाष्टमी ! ह्या दिवशी भगवान श्रीकृष्णांची षोडशोपचार पूजा होऊन प.पू.सद्गुरु श्री.दादांची श्रीभगवंतांच्या जन्मकाळी प्रवचनसेवा व दुसऱ्या दिवशी काल्याचे कीर्तन होते. त्यात प.पू.श्री.दादा श्रीभगवंतांच्या गोकुळातील लीलांचे मनोहर वर्णन करतात. त्या लीलांच्या मागील गूढार्थ देखील उलगडून सांगतात. काल्याच्या प्रसंगी साधक मंडळी भगवान श्रीकृष्णांचे गोपांसह खेळल्या जाणाऱ्या खेळांचे अतिशय सुंदर सादरीकरण करतात. त्यावेळी ‘तपोवना’त गोकुळच अवतरल्याचा भास होतो.
या भव्य-दिव्य मंदिरात साधक-सद्भक्तांना नामस्मरण, उपासना, पारायण करण्यासाठी अत्यंत पवित्र आणि अनुकूल असेच वातावरण आहे. त्यामुळे येथे नित्यशः विविध प्रांतांतून अनेक भक्त भगवत्सेवेकरिता येतात आणि दर्शनमात्रे सुखावून धन्यता पावतात.