१९८६ साली कलियुगातील द्वितीय दत्तावतार नृसिंह सरस्वती स्वामींनी पूजनीय श्री मामासाहेब देशपांडे यांना आज्ञा केली की “आम्हाला राहण्यासाठी एक शांत स्थान निर्माण करा, जिथे वाडी-गाणगापूर सारखी गर्दी होणार नाही”.
प.पू.श्री.मामा अशा जागेच्या शोधार्थ असताना प.पू.श्री.मामांचे उत्तराधिकारी प.पू.श्री.शिरीषदादा कवडे कराडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना कोयना धरणावर अभ्यास दौऱ्यासाठी आले होते.तेव्हा तेथील रम्य परिसर पाहून पूजनीय श्री मामांना येथील एक जागा घेऊन अर्पण करूया, असा मनोदय त्यांनी मित्रांजवळ व्यक्त केला आणि हा विषय तेवढ्यावरच थांबला. कालांतराने परमपूज्य श्री शिरीषदादांचे मित्र या ठिकाणी आले असता “हीच ती जागा, हीच ती जागा” असे दोनदा कुणीतरी आपल्या कानात स्पष्ट म्हटल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी तत्काळ परमपूज्य श्री शिरीषदादांशी संपर्क केला. यानंतर पूजनीय श्री मामांसोबत ही जागा पाहिल्यावर प.पू.श्री.मामांनी साक्षात्कारानुसार या जागेचे महत्व कथन करून ही जागा विकत घेतली.
हे स्थान म्हणजे आजचे श्रीक्षेत्र दत्तधाम होय. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले हे अतिशय नयनरम्य परंतु पूर्णपणे अप्रसिद्ध असे क्षेत्र. चिपळूणमधून कुंभार्ली घाटमार्गे सुमारे बत्तीस किलोमीटर अंतरावर असलेले हे स्थान म्हणजे नाथ आणि दत्त संप्रदायाची प्राचीन तपोभूमी. श्री नाथ संप्रदायातील दुसरे नाथ आणि विलक्षण विभूतिमत्व गोरक्षनाथ यांचे या भूमीवर काही काळ वास्तव्य होते. त्यांना भगवान परशुरामांकडून याच पवित्र भूमीवर श्रीविद्येचा उपदेश झाला होता. त्यामुळे या क्षेत्राचे महत्व अनन्यसाधारण असेच आहे.
फाल्गुन शुद्ध द्वादशी, दिनांक ८ मार्च १९९० या दिवशी प.पू. श्री. मामासाहेबांच्या हस्ते भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पंचधातूच्या पूर्णाकृती श्रीमूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना झाली. त्याच वेळी भगवान श्रीश्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या अंदाजे दोन फूट उंचीच्या पंचधातूच्या मूर्तीचीही प्रतिष्ठापना झाली. भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामीमहाराजांची ही देखणी मूर्ती पावणे दोनशे किलो वजनाची आहे. ही मूर्ती सांगलीला एका मंदिरात बसविण्यासाठी तयार करण्यात आली होती. पुढे स्वप्नदृष्टांतानुसार ही मूर्ती प. पू. श्री. मामांना देण्यात आली. ही अत्यंत देखणी, प्रमाणबद्ध, प्रसन्न मूर्ती पाहताना साक्षात् भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामीमहाराजच समोर बसलेले आहेत, असे जाणवते.
श्रीक्षेत्र दत्तधाम येथील मुख्य मंदिरात भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची भव्य पंचधातूची मूर्ती आहे. ही मूर्ती ज्या जागी गोरक्षनाथ महाराजांना अनुग्रह झाला त्याच जागी प्रतिष्ठापित आहे. ही मूर्ती सांगलीतील एका कारखानदाराने आपल्यासाठी बनवून घेतली होती मात्र ही मूर्ती पुण्यातील प.पू.श्री.मामासाहेबांना देण्याविषयक त्यांना दृष्टांत झाला, त्याप्रमाणे ही मूर्ती मामासाहेबांनी, या मूर्तीची किंमत चुकती करून ती आपल्याकडे ठेवली. इथे असलेल्या शिवलिंगविषयकसुद्धा अद्भुत कथा ऐकावयास मिळते. हिमालयामध्ये १९८२ साली एका साधूला स्वत: भगवान श्रीशिवांनी हे शिवलिंग प्रसाद स्वरूपात देऊन ते पुण्यामध्ये प.पू.श्री.मामासाहेबांना देण्याविषयक आज्ञा केली. हे काम पू.श्री.साईरामबाबा यांनी केले आणि भगवान शिवांच्या आज्ञेप्रमाणे शिवलिंग प.पू.श्री.मामासाहेबांकडे पोचते केले. हे शिवलिंग अतिशय दिव्य असून त्यावर नैसर्गिकरीत्या भगवान शिवांचा तोंडावळा स्पष्ट दिसतो. श्रीक्षेत्र दत्तधाम येथील मुख्य मंदिरात देवांच्या डाव्या बाजूला संगमरवरी वेदीवर त्याची स्थापना करण्यात आली. दत्तधाम मधील देवदरबार असा अलौकिक आणि विलक्षण आहे. या स्थानास ‘प्रति गिरनार’ किंवा ‘दक्षिण गिरनार’ असेही म्हटले जाते.
मुख्य मंदिरामध्ये या मूर्तीच्या उजव्या बाजूला राजाधिराज सद्गुरु श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराज, श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज व प.पू. सद्गुरु श्री. मामांच्या प्रतिमा व पादुका आहेत. यांतील सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या पादुका, अक्कलकोटला ते ज्या वटवृक्षाखाली नेहमी बसत त्या पावन वृक्षाच्या काष्ठापासून बनविलेल्या आहेत.
मंदिरात श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर लगेचच काही दिवसांनी प.पू. श्री. मामा महाराजांनी यौगिक पद्धतीने नश्वर देहाचा त्याग केला. त्यांच्या संकल्पित कार्यांपैकी पूर्ण झालेले हे शेवटचे कार्य होते. त्यांच्या पश्चात त्यांचे उत्तराधिकारी दत्तलोकवासी प.पू.सौ.शकाताई आगटे आणि प.पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी या स्थानाचा सौंदर्यपूर्ण विकास केला.
प.पू. श्री. मामांचे नामसमाधी मंदिर :
मुख्य मंदिराच्या वरच्या बाजूला, प.पू. श्री. मामांनी एक खोली बांधायला घेतली होती. त्याला ते आपले ‘विश्रांतिस्थान’ म्हणत असत. कालांतराने याच जागेत त्यांच्या नामसमाधीची व भगवान श्रीपांडुरंग-रुक्मिणींच्या सुबक, सुहास्यवदन मूर्तीची स्थापना करण्यात आली. या मंदिरात केवळ श्रीदत्तजयंतीच्या दिवशीच भाविकांना दर्शनाची परवानगी असते.
श्रीगुरुपादुका मंदिर :
मुख्य मंदिराच्या पूर्वेला, महाद्वाराच्या समोर, औदुंबर वृक्षाखाली देखण्या देवळीमध्ये श्रींच्या चरणपादुकांची स्थापना करण्यात आली आहे. भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या स्वप्नदृष्टांतानुसार या पादुका स्थापन करण्यात आल्या आहेत. मुख्य मंदिर बंद असताना, भक्तगण याच स्थानी देवांचे दर्शन घेतात.
श्रीविश्रांतिशिला स्थान :
मुख्य मंदिराच्या दक्षिणेला, जंगलात एका ओढ्याच्या काठावर प.पू.श्री. मामांची निसर्गतःच आरामखुर्चीचा आकार असलेली विश्रांतिशिला आहे. त्यांच्या दिव्य स्पर्शाने पावन झालेल्या या शिलेचे दर्शनही अतिशय सुखावह असते.
श्रीकमंडलू तीर्थ :
मुख्य मंदिराच्या दक्षिणेला, कमंडलूच्या आकाराचा एक खड्डा होता. प.पू. श्री. मामांच्या कृपेने या ठिकाणी नैसर्गिक झरे सुरू होऊन काळ्या कातळातील हा खड्डा पाण्याने भरभरून वाहू लागला. आता पक्का कठडा बांधून येथे विहीर करण्यात आली आहे. श्रीदत्तधाम येथील सर्व प्रकारची पाण्याची गरज याच कुंडातील पाण्यापासून भागवली जाते. स्वच्छतेच्या व पावित्र्याच्या दृष्टीने हे कुंड पूर्णपणे बंदिस्त केलेले असून, कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही.
श्रीवरदविनायक मंदिर :
मुख्य मंदिरासमोरच भगवान श्रीवरदविनायकांच्या सुबक, रेखीव पाषाण मूर्तीची छोट्याशा देवळीमध्ये स्थापना करण्यात आली आहे. दररोज मुख्य पूजेपूर्वी श्रीवरदविनायकांची पूजा संपन्न होत असते.
श्रीरामदूत हनुमान मंदिर :
श्रीक्षेत्र दत्तधामच्या पायथ्याशी ‘श्रीरामदूत हनुमान मंदिर’ आहे. याच जागेवर प.पू. श्री. शिरीषदादांना श्रीमारुतिरायांचे प्रत्यक्ष दर्शन झाले होते. श्री मारुतिरायांचे हे स्थान देखील अतिशय जागृत असून, गड चढण्यापूर्वी त्यांची प्रार्थना केली असता, श्रीदत्तधामच्या पायऱ्या विनासायास चढून जाता येतात; असा भक्तांचा आजवरचा अनुभव आहे.
मुख्य उत्सव
- श्रीदत्तजयंती : या स्थानावरचा मुख्य उत्सव हा मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला; श्रीदत्तजयंतीला; संपन्न होतो. दूरदुरून भक्तगण दर्शनाला येतात. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी श्रींचा जन्मकाळ – सोहळा साजरा होऊन आरती संपन्न होते. त्या दिवशी मंदिर दिवसभर दर्शनासाठी उघडे असते.
- श्रीगुरुद्वादशी : श्रीगुरुद्वादशी महोत्सव आश्र्विन कृ.१२ यादिवशी श्रीक्षेत्र दत्तधाम येथे सूर्यास्त सामयानंतर शेकडो दीप प्रज्वलित करून संपन्न होतो.