प.पू.श्री.मामांच्या संकल्पित प्रकल्पांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प म्हणजे ‘कै.श्री.आबासाहेब देशपांडे स्मृती श्रीदत्तमंदिर, श्रीक्षेत्र जळगांव (जामोद)’ हा होय. हे श्रीदत्तमंदिर प.पू.श्री.मामा आणि प.पू.श्री.दादा या गुरुशिष्यांच्या प्रेमाचे व कौतुकपूर्तीचे एक अद्वितीय उदाहरण आहे. प.पू.श्री.मामांनी प.पू.श्री.दादांच्या मातु:श्रींना प्रथम भेटीत दिलेल्या आशीर्वादांपैकी एक आशीर्वाद म्हणजे “मी तुझ्या आईला अक्षय माहेर देईन.” कालांतराने प.पू.श्री.दादांच्या मातुःश्री आणि त्यांच्या बहीणभावंडांनी जळगांव (जामोद) येथील त्यांच्या आजोळचा वाडा ‘श्रीपाद सेवा मंडळा’ला श्रीदत्त मंदिर बांधण्यासाठी समर्पित केला. अशाप्रकारे प.पू.श्री.मामांचा आशीर्वाद सत्यात आला. ‘श्रीपाद सेवा मंडळा’चे हे प्रकल्पस्थान अत्यंत पवित्र, शांत ठिकाणी असून श्रीभगवंतांच्या जागृत अधिष्ठानाची सतत प्रचिती तेथे येत असते.
या प्रकल्प स्थानाची दोन अत्यंत आगळी वैशिष्ट्ये आहेत. या मंदिरातील गर्भगृहात जिथे भगवान श्रीपाद श्री श्रीवल्लभ स्वामी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापित केली आहे; त्याच ठिकाणी श्रीदत्तसंप्रदायातील थोर अधिकारी विभूतिमत्व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांचा जन्म झालेला आहे. याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, श्रीदत्तसंप्रदाय व श्रीनृसिंह भगवंतांचा जो अन्योन्य संबंध आहे, त्या अनुबंधाचे जळगांव (जामोद) हे जागृत प्रतीक आहे.
या सुंदर मंदिराच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा झालेल्या दत्तमूर्तीचीही हकीकत मोठी विलक्षण आहे. प.पू.श्री.मामांचे एक अनुगृहित साधक श्री.वसंतराव क्षोत्रीय यांचा मुलगा जयपूरला राहत असे. १९८७ च्या दरम्यान प.पू.श्री.मामांनी श्री.वसंतराव यांच्या मुलाला भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभांचा फोटो पाठवून त्याप्रमाणे श्रींची मूर्ती राजस्थानी कारागिराकडून बनवून घेतली. पुण्याला आणल्यानंतर प.पू.श्री.मामांनी मूर्ती बघून अतिशय समाधान व्यक्त केले. या मूर्तीच्या स्थापनेबद्दल विचारले असता प.पू.श्री.मामांनी ‘पुढे पाहू’ असे म्हणून विषय टाळला. पुढे जळगांव (जामोद) येथील मंदिराचे बांधकाम सुरु असतानाच नेमके श्री.वसंतरावांनी प.पू.श्री.दादांना फोन करून ‘मूर्ती हवी आहे का ?’ असे विचारले. त्याप्रमाणे प.पू.श्री.दादांनी स्वतः पाहून ही मूर्ती पसंत केली. अशाप्रकारे प.पू.श्री.मामांनी दिव्यदृष्टीने हा प्रकल्प सुरु होण्यापूर्वी दहा वर्षे आधीच ही प्रसन्न, सुहास्यवदनी श्रीमूर्ती तयार करवून घेतली होती. या मंदिराचे खोदकाम करताना श्रीदत्त आणि श्रीनाथ संप्रदायातील महासिद्धांचे तपस्थान असलेली बांधीव गुंफा सापडली होती. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या बालरूपातील मूर्तीचा आणि हनुमान मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा प.पू.श्री.दादांच्या हस्ते वैशाख शु. पंचमी दिनांक ११ मे १९९७ रोजी संपन्न झाला. मुख्य मंदिराचा गाभारा अष्टकोनी असून त्यात भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापित केली आहे. श्रीमूर्तीच्या पुढे श्रींच्या प्रासादिक पादुका स्थापन केलेल्या आहेत. गाभाऱ्यात श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज व प.पू.श्री.मामा महाराज यांची भव्य तैलचित्रे असून, मंदिराच्या दर्शनी भागात श्री अक्कलकोट स्वामी महाराजांची प्रतिमा लावलेली आहे.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या मंदिरात सकाळी सूर्योदयाला काकडेआरती करण्यात येते. नंतर भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची षोडशोपचार पूजा होते. दररोज भगवान श्रीनृसिंहाची व श्री हनुमंतांची पंचोपचार पूजा असते; तर दर शनिवारी षोडशोपचार पूजा केली जाते. महानैवेद्यानंतर दुपारी १२.३० वाजता मंदिर बंद करण्यात येते. संध्याकाळच्या सत्रात ४ वाजता मंदिर पुन्हा उघडले जाते. संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत नित्योपासना होऊन, रात्री ८.३० वाजता शेजारती झाल्यानंतर मंदिर बंद करण्यात येते.
या प्रकल्पस्थानी साजरा करण्यात येणारा मुख्य महोत्सव हा भाद्रपद शुद्ध चतुर्थी रोजी येणारा भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा जयंती महोत्सव हा होय. महोत्सवाच्या दिवशी जन्मकालाचे कीर्तन, पवमान अभिषेक पूजा, प.पू.श्री.दादांची प्रवचनसेवा आणि संध्याकाळच्या सत्रात पालखी सोहळा असे भरगच्च कार्यक्रम संपन्न होत असतात.
श्रीक्षेत्र जळगांव (जामोद) येथील वातावरण वैराग्याला वाढविणारे आहे. मनाला अपार शांती प्रदान करणारे आहे. प्राचीन काळापासून थोर महात्म्यांनी तप केल्याने ही भूमी पवित्र झालेली आहे. त्यामुळे येथे दर्शन घेतले की आपल्या सर्व चंचल वृत्ती आपोआप शांत होऊ लागतात. या स्थानी भगवान श्रीदत्तप्रभूंचे आणि भगवान श्रीनृसिंहाचे प्रकट अधिष्ठान आहेच. त्यामुळे हे स्थान विशेष महत्वपूर्ण म्हणायला हवे. एकवेळ आवर्जून भेट द्यावी व हे दर्शनसुख अनुभवावे, असाच हा ‘श्रीपाद सेवा मंडळा’चा भव्य-दिव्य प्रकल्प आहे.