एक भव्य स्मारक:
पुण्यात आनंदनगरात आपण प्रवेश केला की उजव्या बाजूस स्वरनगरीच्या डावीकडे ‘श्रीपादनिवास’ ही प्रशस्त वास्तू डौलाने उभी आहे.
परमपूज्य सद्गुरु श्री मामांचे हे पवित्र मंदिर असून दि. २७ मार्च २००० रोजी ‘श्रीपादनिवास’ या वास्तूची पूजा झाली. दत्तलोकनिवसिनी परमपूज्य सद्गुरु सौ. शकुंतलाताई आगटे व प.पू. सद्गुरु श्री. शिरीषदादा कवडे महाराज यांनी सद्गुरु परंपरेच्या व परमपूज्य सद्गुरु तीर्थरूप श्री. मामा महाराजांच्या प्रतिमांसह मंगल कलश घेऊन वास्तुप्रवेश केला. तदनंतर सुवासिनींनी पंचारतींनी सद्गुरूंना औक्षण केले व वास्तुशांतीचा कार्यक्रम परमपूज्य सद्गुरु श्री. शिरीषदादांचे मंगलहस्ते सुसंपन्न झाला. दुपारी ४ वाजता मंत्रजागर, सायंकाळी सामुदायिक साधना, आरती – करुणात्रिपदीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.
स्वरनगरी रस्त्यालगतच्या प्रशस्त व डौलदार कमानीतून या इमारतीच्या प्रांगणात प्रवेश करताच डाव्या बाजूस श्रीदत्तमहाराजांना परमप्रिय असलेला औदुंबर वृक्ष आपली प्रेमळ छाया सर्वांना देत उभा आहे.
प.पू. सद्गुरु श्रीमामामहाराजांचे स्मृतिमंदिर:
‘श्रीपादनिवास’ या इमारतीच्या तळमजल्यावर सुंदर व टुमदार अशा गाभाऱ्यात परमपूज्य सद्गुरु तीर्थरूप मामांच्या पंचधातूमध्ये घडविलेल्या ओतीव मूर्तीचे आपल्याला छान व निवांत दर्शन होते. या मूर्तीलगत अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु समर्थ श्री स्वामी महाराज यांची सोनेरी प्रभा असलेली नितांत सुंदर मूर्ती व श्रीभगवंतांच्या लोभस पादुकांचे तसेच कूर्म-दर्शन पण आपणांस होते. रोज या ठिकाणी सकाळी नित्य पंचामृत पूजा होते. सकाळी व सायंकाळी आरती होते. या ठिकाणी प.पू. सद्गुरु श्री. मामा महाराजांचे दर्शन घेऊन साधकांचे मन भावविभोर होते. परमपूज्य सद्गुरु श्री. मामा महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी इथेच श्री. राजोपचार पूजा संपन्न होते. काही वैयक्तिक विशेष प्रसंगी साधक सद्भक्त या ठिकाणी पूर्वसूचना देऊन परमपूज्य मामांच्या पादुकांवर अभिषेक पण करू शकतात. परमपूज्य मामांना वंदन करून गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा घालताना प्रदक्षिणा मार्गालगतच्या भिंतींवर आपल्या परंपरेतील सर्व महात्म्यांच्या अतीव सुंदर प्रतिमा असून भक्तजन त्यांचे दर्शन घेऊन सुखावतात.
‘श्रीपादनिवास’ इमारतीमध्ये वर जाण्यास उद्वाहनाची सोय करण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावर ‘श्रीवामनराज’ प्रकाशनाचे कार्यालय असून तेथे प्रकाशनाद्वारे प्रकाशित सर्व पुस्तके बघता येतात तसेच खरेदी करता येतात. आपल्याच साधक भगिनी कर्तव्य तत्परतेने आपल्याला हवी ती पुस्तके उपलब्ध करून देतात.
प.पू. श्रीमामासाहेब देशपांडे साधनागृह:
दुसऱ्या मजल्यावर परमपूज्य सद्गुरु श्रीमामा महाराज यांचे नामाभिधान असलेले प्रशस्त साधना-सभागृह आहे. परमपूज्य सद्गुरु श्रीमामा महाराज व श्रीस्वामी समर्थ महाराज याच्या सुंदर प्रतिमांचे तसेच परमपूज्य सद्गुरु तीर्थरूप मामामहाराजांच्या परम पवित्र पादुकांचे मंगल दर्शन येथे आपणांस होते. येथे दर रविवारी सकाळी ७ ते ८ सामुदायिक साधना होते. आपले परंपरेचे तसेच वाचनालयाचे अनेक कार्यक्रम पण येथे होतात. पूर्वी परमपूज्य सद्गुरु तीर्थरूप मामा महाराजांच्या पुण्यतिथीचे अनेक कार्यक्रम येथे संपन्न झाले आहेत.
प.पू. सद्गुरु सौ. शकुंतलाताई आगटे सभागृह:
तिसऱ्या मजल्यावर प.पू. सद्गुरु सौ. शकुंतलाताई आगटे सभागृह आहे. परमपूज्य सद्गुरु सौ. ताईमहाराज व श्रीभगवंत यांच्या प्रतिमा या ठिकाणी समोरासमोर आहेत. दर रविवारी सकाळी ७ ते ८ वाजताचे दरम्यान साधक भगिनी येथे सामुदायिक साधनेसाठी एकत्र येतात. या दोन्ही सभागृहांत परमपूज्य सद्गुरु श्रीदादामहाराजांची अनेक प्रवचने संपन्न झाली आहेत. आपल्या सर्वांसाठी ही वास्तू नितांत प्रसन्न आणि प्रेरणादायी आहे !