माघ कृष्ण प्रतिपदा, रविवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ या दिवशी, चिपळूण येथे ‘माटे सभागृहा’त भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा श्रीशैल्यगमन महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी पुणे, मुंबई, गोवा, नाशिक, नागपूर इत्यादी अनेक ठिकाणांहून साधक-बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सवासाठी व्यासपीठावर भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, प.पू.सद्गुरु श्री. मामा महाराज देशपांडे, प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे महाराज तसेच श्रीसद्गुरुपरंपरा यांच्या सुंदर प्रतिमा विराजमान होत्या. या प्रतिमांभोवतीची व व्यासपीठावरील फुलांनी केलेली सर्वच सजावट वातावरण प्रसन्न करीत होती.
श्री हरिपाठ-गायनसेवा
प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराजांच्या पादुकांचे षोडशोपचारे पूजन करून उत्सवास प्रारंभ झाला. सौ.शर्वरी आणि श्री.राहुल ओक यांच्या हस्ते पादुकापूजन करण्यात आले. तदनंतर प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या उपस्थितीत सामुदायिक-साधना संपन्न झाली.
अल्पोपाहारानंतर श्रीक्षेत्र आंबेरी तपोवनातील आणि गोवा केंद्रातील साधकांनी ‘श्री हरिपाठ-गायनसेवा’ सादर केली. तालासुरात गायलेल्या अभंगांबरोबरच त्यांनी केलेल्या सुंदर पावल्या पाहताना उपस्थित सर्व साधकजन रंगून गेले होते. त्यानंतर श्री.धनंजय चितळे यांनी ‘संस्कृती संवर्धिनी फाऊंडेशन’च्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा घेतला. फाऊंडेशनचे वाचनालय, ‘अमृतबोध मासिका’चे प्रकाशन याबरोबरच त्यांनी नियोजित ‘श्रीदत्तमंदिर प्रकल्प’ आणि सध्या ‘श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ, मार्कंडी’ येथे सुरू असलेले सेवाकार्य यांचीही उपस्थितांना माहिती दिली. श्री.मनोहर मोरे यांच्या हस्ते सर्व साधकांच्या वतीने प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांना भेटवस्तू अर्पण करण्यात आली.
तदनंतर प.पू.श्री.अनिरुद्धदादांची प्रवचन-सेवा संपन्न झाली. त्यांनी सेवेकरिता श्री ज्ञानेश्र्वरीच्या पाचव्या अध्यायातील,
ही ओवी घेतली होती. या वेळी निरूपणादरम्यान त्यांनी असे सांगितले की, ‘‘श्री ज्ञानेश्र्वरीच्या पाचव्या अध्यायात ‘संन्यासयोग’ आला आहे. पण या ओवीतील सर्व प्रक्रिया ‘अभ्यासयोगा’तीलच आहे !’’ श्रीभगवंतांनी श्रीमद् भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायातील २६, २७ व २८ या श्र्लोकांमध्ये ‘अभ्यासयोगा’ची पूर्वपीठिका कशी सांगितली आहे, याचेही त्यांनी विवरण केले. ‘रथ्योदक’ या शब्दाचा नेमका अर्थही त्यांनी उलगडून सांगितला आणि तो अर्थ नेमका लक्षात येण्यासाठी नेपाळ-यात्रेदरम्यान प.पू.सद्गुरु श्री. शिरीषदादांनी विटांच्या रस्त्यावर दाखविलेल्या रथांच्या धावांचाही संदर्भ त्यांनी दिला. आपल्या विवेचनात त्यांनी अमेरिकेतील काही साधकांना साधनेदरम्यान आलेले विलक्षण अनुभवही सांगितले. प्रवचन-सेवेच्या समारोपात त्यांनी साधकांनी साधना नियमाने, प्रेमाने करावी असा श्रीसद्गुरुपरंपरेचा निरोप कळकळीने दिला.
पुण्यकाळप्रसंगी, ‘श्रीगुरुचरित्रा’तील श्रीशैल्यगमन-अध्यायाचे वाचन, नामजप आणि आरती झाली. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सुयोग केळकर यांनी केले; तर पौरोहित्य वेदमूर्ती श्री.ध्रुव भोळे यांनी केले. उपस्थित सर्व साधक-बंधुभगिनींनी दर्शनानंतर भोजन-प्रसादाचा लाभ घेतला. सभागृहातील ‘श्रीवामनराज प्रकाशना’च्या स्टॉलला तसेच ‘अमृतबोध मासिका’च्या स्टॉललाही साधकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमस्थळीची सर्व व्यवस्था, पार्किंग व्यवस्था इत्यादींबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. काहीजणांनी नियोजित श्रीदत्तमंदिर प्रकल्पस्थानालाही भेट दिली. अनेक साधक-बंधुभगिनींनी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ मार्कंडी येथेही जाऊन दर्शन घेतले. येणेप्रकारे श्रीसद्गुरुकृपेने हा सर्व महोत्सव अत्यंत नेटकेपणाने व आनंदाने संपन्न झाला.
परमपूज्य सद्गुरु श्री. अनिरुद्धदादा आगटे