श्रावणमास अनुष्ठान विशेष कार्यक्रम; पुणे केंद्र वृत्तांत
या वर्षी दिनांक ६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२४ म्हणजे श्रावण शु.२ ते श्रावण कृ.१४ श्रीशके १९४६ या काळात श्रावणमास अनुष्ठानानिमित्त पुणे केंद्रात प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या उपस्थितीत दोन विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजित केलेला पहिला उपक्रम म्हणजे दररोज रात्री ९ ते १० या वेळेत ‘श्रीपाद निवास’ येथे होणारे सामुदायिक स्तोत्रपठण! संस्कृत भाषेची ओळख नसलेल्या युवापिढीला आपल्याला परंपरेने लाभलेल्या या समृद्ध वारशाचा परिचय व्हावा या दृष्टीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवा साधकांनीही या उपक्रमाला अतिशय उत्साहाने प्रतिसाद दिला. ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र’, ‘श्रीकृष्णद्वयाष्टकम्’, ‘श्रीकृष्णाष्टकम् ‘श्रीगोविन्दाष्टकम्’, ‘श्रीअच्युताष्टकम्’, ‘श्रीमधुराष्टकम्’, ‘श्रीदत्तप्रार्थनास्तोत्रम्’, ‘श्रीदत्तस्तवराजस्तोत्रम्’ ‘अपराधक्षमापनस्तोत्रम्’, इत्यादी स्तोत्रांचे सामुदायिक पठण या उपक्रमांतर्गत करण्यात आले.
यातील दुसरा उपक्रम म्हणजे श्रावणातील रविवारी सकाळी साधना, पारायण-सेवा, नामजप असा सामुदायिक कार्यक्रम व त्यानंतर आरती आणि मंत्रपुष्प अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भगवान श्रीकृष्ण जयंतीच्या आधी येणारा रविवार वगळता दिनांक ११ ऑगस्टच्या रविवारी सकाळी सात वाजता ‘श्रीपाद निवास’ येथे साधना, ९.१५ ते १०.३० या वेळेत सामुदायिक पारायण-सेवा व त्यानंतर १०.४५ ते ११.४५ या वेळेत सामुदायिक नामजपाचे आयोजन करण्यात आले होते. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे…’, ‘श्रीस्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ’ व ‘॥ जयजय करुणामूर्ति दयाळा जयजय श्रीपादा । जयजय सद्गुरु अनाथनाथा जयजय श्रीपादा ॥’ या महामंत्रांचा प्रत्येकी पंधरा मिनिटे जप करण्यात आला व तदनंतर आरती व मंत्रपुष्प संपन्न झाले.
दिनांक १८ ऑगस्ट व १ सप्टेंबर या श्रावण महिन्यातील दोनही रविवारी कार्यक्रमांची सुरुवात नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता सामुदायिक साधनेने झाली. पुणे, मुंबई तसेच ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या अन्य केंद्रांमधील काही साधक बंधुभगिनी नावनोंदणी करून या पारायण-सेवेत सहभागी झाले होते. साधनेनंतर उपस्थित साधकांनी ९.१५ ते १०.४५ या वेळेत ‘श्रीगुरुसाहस्री’, ‘श्रीदत्तलीलामृताब्धिसार’, ‘श्रीदत्तभावांजली’, ‘श्रीस्वामीसमर्थ नामपाठ’ आणि ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र’ या वेगवेगळ्या ग्रंथांची यथाशक्य पारायण-सेवा केली.
दोन रविवारी विशेष पर्वणी म्हणजे प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांची प्रवचन-सेवाही संपन्न झाली. त्यांनी श्री ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायातील पुढील ओवी प्रवचन-सेवेकरिता घेतली होती;
दोन्ही प्रवचनांचा संक्षिप्त गोषवारा प्रस्तुत वृत्तांतात नोंदविलेला आहे. ही ओवी सेवेला घेण्यामागची भूमिका सांगताना प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी श्री ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, ‘‘प.पू.सद्गुरु श्री.मामा म्हणत की, ‘श्री ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाची सुरुवात तेराव्या अध्यायापासून करावी. कारण परमार्थातील अनेक मूलभूत संकल्पना व तत्त्वे सद्गुरु श्री माउलींनी या अध्यायात स्पष्ट करून सांगितलेली आहेत.’ हा अध्याय ज्ञानकांडातील एक महत्त्वाचा अध्याय आहे व यात श्री माउलींनी ‘क्षेत्र-क्षेत्रज्ञ योग’ सांगितला आहे !
पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त, दहा इंद्रिये, मन, दहा विषय, सुख, दुःख, संघात, इच्छा, द्वेष, चेतना व धृती अशी छत्तीस तत्त्वे जेथे एकत्र नांदतात त्याला ‘क्षेत्र’ (देह) असे म्हणतात. पंचमहाभूते, मन, बुद्धी आणि अहंकार मिळून होणाऱ्या अष्टधा प्रकृतीमध्ये जेव्हा परब्रह्माचे प्रतिबिंब पडते तेव्हा त्याला ‘जीवदशा प्राप्त होणे’ असे म्हणतात !’’
परब्रह्मापासून त्रिगुणात्मिका शक्तीद्वारे सृष्टीची निर्मिती कशी होते ? जीवदशा कशी प्राप्त होते ? ही छत्तीस तत्त्वे कशी उदयास आली ? याची मांडणी प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी व्यतिरेकाने केली. हा विषय स्पष्ट करताना ते म्हणाले की, ‘‘पिकलेला आंबा हे स्वतःच एक परिपूर्ण फल आहे, परिपूर्ण अन्न आहे. परंतु दूध, सब्जा, शेवया, सुका मेवा, रंग अशा अनेक गोष्टींची मिसळण केलेल्या फालुद्यामध्ये ज्याप्रमाणे आंबा घातला तर त्याचे स्वतंत्र अस्तित्व जाणवत नाही त्याचप्रमाणे आपल्या देहात या सर्व तत्त्वांची मिसळण असल्याने आत्म्याचे अस्तित्व जाणवत नाही. ‘मनाची चंचलता’ बुद्धीद्वारे सुख, दुःख, पुण्य, पाप, चांगले, वाईट यांत केला जाणारा निवाडा; तसेच बुद्धी व ज्ञानेंद्रियांची सांगड; अहंकाराचे प्रकार याविषयीही त्यांनी अतिशय सोप्या भाषेत उलगडा केला. ‘अव्यक्त’ ही संज्ञा त्यांनी प्रकृति व परमात्म्याच्या सापेक्ष समजावून सांगितली. परमार्थातील संकल्पनांचा विचार करताना सद्गुरूंनी सांगितलेला त्यांचा संदर्भही लक्षात घ्यावा; कारण तो अत्यंत महत्त्वाचा असतो. असे केल्याने वैचारिक गोंधळ होत नाहीत असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
इंद्रियांचे कार्य व त्यापरत्वे घडणारे विषयांचे भोग; परमार्थाच्या दृष्टीने सुख व दुःख यांच्या व्याख्या; मनात उत्पन्न होणारी इच्छा व त्यामुळे बुद्धीवर पडदा पडणे, इच्छापूर्ती न झाल्याने उत्पन्न होणारा द्वेष या संदर्भातही त्यांनी सर्वांनीच अनुभवलेले दाखले देऊन अतिशय रसपूर्ण विवरण केले. ‘चेतना’ म्हणजेच ‘चैतन्य’ हे परमात्म्याची सत्ता किंवा अस्तित्व अशा अर्थाने अभिप्रेत आहे. ‘धृती’ म्हणजेच ‘धैर्य’. एरवी जी पंचमहाभूते एकमेकांशी वैर करतात, तीच या देहामध्ये ज्यायोगे एकत्र नांदतात व एकमेकांना साह्य करतात; त्या तत्त्वाला ‘धृती’ असे म्हणतात. या तत्त्वांविषयी सांगतानाच त्यांनी, या देहरूपी क्षेत्राचा ‘क्षेत्रज्ञ’ म्हणजेच ‘परब्रह्म’, ‘परमात्मा’ होय असे सांगून, मन पंच प्राणांद्वारे इंद्रियांकरवी विषयभोग कसे घेते हे देखील सांगितले. या निरूपणाच्या ओघात त्यांनी ज्ञान तसेच अज्ञानाची काही लक्षणेही विशद केली.
दोन्ही रविवारी झालेल्या प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या या अत्यंत बोधप्रद, रसाळ प्रवचन-सेवेनंतर अतिशय भारावलेल्या वातावरणात नामजप, आरती व मंत्रपुष्पांजली संपन्न झाली. यानंतर सर्व साधकजन प.पू.सद्गुरु श्री. मामांचे व प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंचे दर्शन घेऊन स्वस्थानी परतले.