

|| श्री ||
महाशिवरात्री महोत्सवाचा वृत्तांत

संक्षिप्त चलतचित्र
महोत्सव स्थळ
बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ या दिवशी, रात्री ७.३० ते १०.३० या वेळेत ‘माउली’ आश्रम पुणे येथे प्रतिवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त भगवान श्रीनर्मदेश्वरनाथ महाराजांना अभिषेक व महापूजा अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा आणि प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या वेळी श्रीनर्मदेश्वरनाथ महाराजांना लघुरुद्राभिषेक करण्यात आला. प्रथम संकल्प होऊन तदनंतर श्रीगणेशपूजन झाले. पूर्वपूजेत श्रीनर्मदेश्वरनाथ महाराजांना पंचामृत स्नान, फलरस-स्नान व पुष्पोदक-स्नान घालून जलाभिषेक करण्यात आला. अभिषेकाच्या वेळी रुद्रचमक, पुरुषसूक्त, श्रीगणपती अथर्वशीर्ष यांचेही पठण करण्यात आले. तसेच या वेळी चि.शर्व देशपांडे या बालसाधकाने संपूर्ण ‘शिवमहिम्न स्तोत्रा’चे अस्खलित पठण केले. अभिषेकानंतर श्रीभगवंतांच्या अलंकार-सेवेच्या वेळी काही साधकबंधूंनी ‘श्रीचंद्रशेखराष्टकं स्तोत्र’, ‘श्रीलिंगाष्टकं स्तोत्र’, ‘श्रीशिवमानसपूजा स्तोत्र’ तसेच अभंगगायन-सेवा भगवच्चरणीं रुजू केली. या वेळी ‘आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा’, ‘सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी’, ‘त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी’ असे काही सुंदर अभंग म्हणण्यात आले.
या प्रसंगी ‘शिव अष्टोत्तरशतनामावली’ने भगवान श्रीनर्मदेश्वरनाथ महाराजांना बिल्वपत्रार्चन करण्यात आले व नैवेद्य अर्पण करून आरती करण्यात आली. मंत्रपुष्प झाल्यानंतर परंपरा-स्मरणाने या कार्यक्रमाची सांगता झाली. अनेक साधक-सद्भक्त या पर्वप्रसंगी उपस्थित होते. श्रीसद्गुरुवंदन करून व तीर्थप्रसाद घेऊन रात्री १०.३० च्या सुमारास कार्यक्रमास आलेले साधक-बंधुभगिनी आपापल्या गंतव्यस्थानी रवाना झाले.
सद्गुरुकृपेने साधलेल्या महाशिवरात्रीच्या परमपावन पर्वकाळी सद्गुरुरूपी भगवान श्रीनर्मदेश्वरनाथ महाराजांचे ‘माउली’पीठी घडलेले ध्यान, स्तोत्रपठण, अलंकारपूजन, नामजप, अभंग-गायन, तसेच सर्वांगसुंदर पूजन व पवित्र दर्शन सर्व साधकभक्तांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील.
दर महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला श्रीक्षेत्र दत्तधाम येथील प.पू.सद्गुरु श्री.मामामहाराजांच्या नामसमाधी मंदिरात स्थापन केलेल्या मरकत-मेरुपृष्ठ श्रीयंत्रावर महापूजा संपन्न होत असते. या महाशिवरात्रीला प्रदोषसमयी श्रीयंत्राची श्रीसूक्त व देव्यथर्वशीर्ष अभिषेकपूर्वक महापूजा तसेच सोनचाफा, गुलाब आदी पुष्पांद्वारे अर्चना संपन्न झाली.
बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ या दिवशी, प्रतिवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त रात्री १० वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत भगवान श्रीरामेश्वरनाथ महाराजांना तसेच भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या श्रीचरणपादुकांना श्रीगणेशअथर्वशीर्ष, श्रीसूक्त, द्वेविरूपे सूक्त, मन्युसूक्त, पुरुषसूक्त आदी सूक्तांनी प्रथम दुग्धाभिषेक व तदनंतर लघुरुद्रपूर्वक महाभिषेक संपन्न झाला. त्यानंतर बिल्व, सोनचाफा, मोगरा आदी फुलांनी अष्टोत्तरशतनामपूर्वक पुष्पार्चना संपन्न झाली. तसेच रुद्राक्षांनी विशेष अर्चन करण्यात आले. ‘चंद्रशेखराष्टकं स्तोत्र’, ‘दक्षिणामूर्त्यष्टकं स्तोत्र’, ‘मानसपूजा’ आदी शिवस्तोत्रांचे पठण आणि नामजप करण्यात आला. महापूजेनंतर दीपोत्सव होऊन श्रींची आरती संपन्न झाली.
या दोन्ही महापूजांमध्ये चिपळूणच्या साधक-ब्रह्मवृंदाने सहभाग घेतला. महापूजा-प्रसंगी चिपळूण तसेच विहे, कऱ्हाड येथील काही साधकजनही उपस्थित होते.
उत्सवातील काही क्षण चित्रे











