

|| श्री ||
श्रीहनुमान जयंती महोत्सवाचा वृत्तांत

शनिवार, दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी, प्रातःकाळी ६:०० ते ७:०० या दरम्यान ‘माउली’ आश्रम, पुणे येथे प्रतिवर्षीप्रमाणे श्रीहनुमान जयंतीचा महोत्सव प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांच्या मंगल उपस्थितीत अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला.
भक्तीचे श्रेष्ठ आचार्य असणाऱ्या श्रीमारुतिरायांच्या जन्मोत्सव प्रसंगी प्रारंभी त्यांचे यथासांग पूजन करण्यात आले. त्यानंतर ठीक ६:०० वाजता ‘श्री राम जय राम जय जय राम’ या नामजपाला सुरुवात झाली. सूर्योदयसमयी ठीक ६:२३ वाजता, विविध वाद्यांच्या गजरात आणि अंजनीसुत, पवनसुत हनुमान की जय अशा जयघोषात श्रीहनुमंतांचा जन्मकाळ साजरा करण्यात आला. उपस्थित साधकाजनांनी ‘मारुतिराया बलभीमा शरण आलो मज द्या प्रेमा’ हे भजन तसेच ‘मनोजवं मारुततुल्यवेगं’ हा श्लोक म्हटला. तदनंतर आरती, मंत्रपुष्पांजली आणि अभंगसेवा असा उपासनाक्रम या वेळी सेवेमध्ये रुजू करण्यात आला.
माउलीमध्ये झालेल्या उत्सवाबरोबरच, श्रीपाद सेवा मंडळाच्या इतर प्रकल्पांमध्येही हा उत्सव साजरा करण्यात आला. जळगाव जामोद येथील स्थानिक साधक, तसेच श्रीक्षेत्र दत्तधाम येथे हेळवाक व चिपळूण मधील साधक, तर श्रीक्षेत्र आंबेरी तपोवनातील साधकांनीही उत्साहात हा उत्सव साजरा केला.
संक्षिप्त चलतचित्र
