|| श्री ||
कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या प.पू.सद्गुरु मातुःश्री पार्वतीदेवी पुण्यतिथी महोत्सवाचा वृत्तांत
प्रतिवर्षीप्रमाणे प.पू.सद्गुरु मातुःश्री पार्वतीदेवी यांचा पुण्यतिथी महोत्सव मार्गशीर्ष शु.८, रविवार दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी कोल्हापूर येथे मोठ्या हर्षोल्लासाने साजरा करण्यात आला.
संक्षिप्त चलतचित्र
या वर्षी महोत्सवाचे आयोजन ‘जय पॅलेस’ या प्रशस्त सभागृहात करण्यात आले होते. सभागृहातील व्यासपीठावर विराजमान असणाऱ्या अनंतकोटिब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज, प.पू.सद्गुरु मातुःश्री पार्वतीदेवी, प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज, प.पू.सद्गुरु सौ.ताई व श्रीसद्गुरु परंपरेच्या प्रतिमा त्यांच्या भव्यतेमुळे लक्ष वेधून घेत होत्या. साधक भगिनींनी सभागृहाच्या दर्शनी भागात रेखाटलेली फुलांची अत्यंत सुंदर रांगोळी आणि व्यासपीठावर केलेली आकर्षक पुष्पसजावट यांमुळे वातावरण अधिकच प्रसन्न झाले होते.
प.पू. सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या उपस्थितीत सकाळी ठीक ७ वाजता सामुदायिक साधनेने महोत्सवास प्रारंभ झाला. श्रीसद्गुरुसान्निध्यात घडलेली ही सामुदायिक साधना म्हणजे सर्व उपस्थितांसाठी मोठी पर्वणीच होती. साधनेनंतर सर्व उपस्थितांनी अल्पोपाहाराचा लाभ घेतला.
त्यानंतर ठीक ८.३० ते १०.३० या वेळेत आपले साधकबंधू कीर्तनरत्न ह.भ.प.श्री.चिन्मय देशपांडे यांनी श्रीसद्गुरुचरणीं कीर्तनसेवा रुजू केली. त्यांनी निरूपणासाठी ‘हरिसी सतत भजावे’ हा अभंग घेतला होता. या अभंगाच्या अनुषंगाने त्यांनी प.पू.सद्गुरु मातुःश्री पार्वतीदेवींच्या पुण्यपावन चरित्रातील महत्त्वपूर्ण कथाभाग सादर करीत त्यांची थोरवी वर्णन केली. सतत साधनारत राहण्याची मातुःश्रींची शिकवण त्यांनी आपल्या कीर्तनसेवेतून श्रोत्यांपर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोहोचवली. या प्रसंगी त्यांना श्री.चैतन्य देशपांडे यांनी तबल्याची तर श्री.श्रेयस पाटील यांनी संवादिनीची अतिशय उत्तम साथ केली. श्रीसद्गुरुचरणीं सेवा रुजू केल्याबद्दल श्री.चिन्मय देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांचा मानधन, शाल व श्रीफळ प्रसाद देऊन प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यानंतर कोल्हापूर केंद्राचे प्रमुख श्री.धनंजय राजहंस काका यांच्या वतीने, साधकबंधू श्री.शिरीष गाडगीळ यांनी त्यांच्या काही आठवणी निवेदन केल्या. त्यामध्ये प.पू.सद्गुरु मातुःश्री पार्वतीदेवी यांचा पुण्यतिथी महोत्सव कोल्हापूर येथे साजरा करण्यासंदर्भातील पार्श्र्वभूमी सांगून, ‘यापुढेही हा महोत्सव कोल्हापूर येथेच साजरा व्हावा’, अशी प्रार्थना त्यांनी श्रीसद्गुरुचरणीं केली.
या कार्यक्रमानंतर कोल्हापुरातील ज्येष्ठ साधक दांपत्य श्री.प्रफुल्ल व सौ.राजश्री गोटखिंडीकर यांच्या हस्ते कोल्हापूर केंद्राच्या वतीने प.पू.सद्गुरु श्री. शिरीषदादांचे पूजन करण्यात आले. तदनंतर अत्यल्प भाडे आकारून सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल ‘जय पॅलेस’ सभागृहाचे मालक श्री.जी.टी.पोवार व त्यांची पत्नी यांचा आणि कार्यक्रमातील अल्पोपाहार व महाप्रसाद यांची चोख व्यवस्था ठेवणारे आचारी श्री.राहुल चौधरी यांचा प.पू.सद्गुरु श्री. दादांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
ह्या सत्कारानंतर सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहात होते त्या प.पू सद्गुरु श्री. दादांच्या प्रवचन-सेवेला सुरुवात झाली. प.पू.सद्गुरु श्री. दादांनी सेवेसाठी श्री ज्ञानेश्वरीच्या चौदाव्या अध्यायातील सव्विसाव्या श्र्लोकावरील ‘ऐसेनि बा समरसें । दृष्टी जैं उल्लासे । भक्ति पैं ऐसें । आम्ही म्हणों ॥ ज्ञाने.१४.२६.३८८ ॥’ ही ओवी घेतली होती.
यासंदर्भात निरूपण करताना प.पू.श्री.दादांनी सांगितले की; “भक्ती म्हणजे नेमके काय ? ती कशी प्राप्त होते ? तिचा उत्कर्ष कसा होतो ? ती साधकांच्या ठिकाणी पूर्णपणे कशी प्रकट होते ? हे सांगणारी, भक्तीचा परमोत्कर्ष विदित करणारी, ही चौदाव्या अध्यायातील महत्त्वपूर्ण ओवी आहे. जेव्हा जिवाशिवाचे सामरस्य होते तेव्हा त्यांच्या एकीकरणाच्या दृढ अनुभवाने प्रेमदृष्टी निर्माण होऊन जीवाला प्रेमाचा अनुभव येतो. भगवत्स्वरूप होऊनही त्या प्रेमाचा आनंद तो भक्त म्हणून अनुभवतो. याला ‘भक्ती’ असे म्हणतात. ही भक्ती सद्गुरूंच्या कृपेनेच प्राप्त होऊ शकते. त्यासाठी सद्गुरुकृपा झाल्यावर न चुकता प्रेमाने आणि नियमाने साधना करत राहिले पाहिजे. ही भक्तियोगाची समस्त प्रक्रिया सद्गुरूंच्या कृपाशीर्वादानेच संपन्न होणारी असल्यामुळे त्यांची अखंड प्रसन्नता प्राप्त करून घेतली पाहिजे. त्यायोगे तो साधक अनायासे प्रेमरूप होतो. आपला ‘पंथराज’ हा भगवत्प्राप्ती करवून देणारा सर्वश्रेष्ठ मार्ग असून आपली मूळ दृष्टी परमार्थाकडेच असली पाहिजे. त्याबरोबरच साधनेला तत्त्वचिंतनाची म्हणजेच परंपरेच्या ग्रंथाभ्यासाची जोडही दिली पाहिजे. त्यामुळे या भक्तीची प्राप्ती सुकर होईल!”
प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या अत्यंत रसाळ व उद्बोधक प्रवचनाच्या श्रवणाने समस्त साधकजन अंतर्मुख झाले. त्यानंतर ‘श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।’ या राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या नामगजरात प.पू.सद्गुरु मातुःश्री पार्वतीदेवींच्या श्रीचरणीं पुष्पांजली अर्पण करून पुण्यकाल साजरा करण्यात आला. आरती, मंत्रपुष्प झाल्यानंतर श्रीसद्गुरुदर्शनाचा आनंदोत्सव सुरू झाला. सर्व साधक प.पू.श्री.सद्गुरु श्री.दादांचे प्रेममय दर्शन घेऊन अत्यंत समाधान पावत होते. सद्गुरुदर्शनानंतर सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
या महोत्सवासाठी, कोल्हापूरप्रमाणेच मंडळाच्या पुणे, मुंबई, सांगली, सातारा, चिपळूण, कऱ्हाड, गोवा अशा अनेक केंद्रांतून साधकजन बहुसंख्येने उपस्थित होते. उत्सवप्रसंगी उभारलेल्या ‘श्रीवामनराज प्रकाशना’च्या ग्रंथांच्या व ‘संस्कृती संवर्धिनी फाऊंडेशन’च्या ‘अमृतबोध’च्या स्टॉललाही साधकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. महाप्रसादानंतर या एक दिवसीय सोहळ्याची सांगता झाली. अंतःकरणात सद्गुरुप्रेम भरून घेऊन अत्यंत उल्हसित मनाने सर्व साधकजन आपापल्या मुक्कामी परतले.