माउली आश्रम:
पुण्यातील पूर्वीच्या सुप्रसिध्द विठ्ठलवाडीजवळ पूर्वी फार सुंदर वनराई होती. सिंहगड रस्त्याच्या दुतर्फा तेव्हा छान सावली देणारे आंबा , वड, पिंपळ , औदुंबर हे वृक्ष होते.
परमपूज्य सद्गुरु श्री. वामनराव गुळवणी महाराजांनी १९७३ साली आर्त, मुमुक्षू जनांचा उध्दार करण्यासाठी, त्यांना शक्तिपात दीक्षा देण्यासाठी आणि देवसेवा करण्यासाठी स्वतंत्र आश्रम, पीठ स्थापन करण्याची आज्ञा परमपूज्य सद्गुरु श्री. मामा महाराजांना केली. त्या आज्ञेनुसार सद्गुरु श्री. मामा महाराजांनी आनंदनगर, हिंगणे येथील रम्य , निसर्गसंपन्न व गावाबाहेरील परिसरात ( ज्याला आज लौकिक अर्थाने आनंदनगर म्हणून ओळखतात) एक छोटी जागा विकत घेतली. तिथे एक टुमदार आश्रम बांधला आणि आपले आराध्य दैवत संतश्री ज्ञानेश्वर महाराज व परमपूज्य मातोश्री पार्वतीदेवी आणि प.पू. सद्गुरू श्री. गुळवणी महाराज यांच्या स्मृती जपण्यासाठी या आश्रमाचे ‘माउली’ असे सार्थ असे नामकरण केले.
माउली मंदिर:
दि. २६ डिसेंबर १९७३ रोजीखरे तर परमपूज्य सद्गुरु श्री. गुळवणी महाराज यांचे हस्ते माउलीची वास्तुशांत होणार होती. पण त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्या पादुकांचे अधिष्ठान ठेऊन व पूजन करून त्याकाळातील साधक बंधू कै. श्री. राजू वैद्य यांचे हस्ते ‘माउली’ वास्तुशांत सोहळा साजरा झाला. त्याकाळचे पुण्यातील समस्त साधक भक्त गण याप्रसंगी उपस्थित होते.
प.पू. श्री. मामांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पवित्र माउली मंदिरामधील गर्भगृहात गेले की अनुभवाला येणारी शांततेची अनुभूती केवळ अनिर्वचनीय आहे. पाय धुवून आपण आत गेलो की समोर प्रमुख देवघर आहे. डावीकडे श्री. नर्मद्या गणपती विराजमान आहेत. तेथे परमपूज्य सद्गुरु श्री. मामा व त्यांचे कुटुंब असा चित्तवेधक फोटो आहे. उजव्या बाजूस दक्षिणाभिमुखी मारुतीराय आहेत. तसेच जिथे परमपूज्य सद्गुरु श्री. मामासाहेब नेहमी खांबाला टेकून बसायचे आणि आलेल्या भक्तगणांना त्यांच्या पृच्छेनुसार मार्गदर्शन करायचे, अगदी तिथेच त्यांची प्रसन्न प्रतिमा आता विराजमान आहे. त्यामागे परमपूज्य मामा महाराज जिथे विश्रांती घेत असत, तिथे त्यांच्या व परमपूज्य सद्गुरु सौ. शकुंतलाताईंच्या परमपवित्र पादुकांचे महन्मंगल दर्शन होते.
मुख्य मंदिराच्या उजवीकडे श्री. नर्मदेश्वर / शिवलिंग असून त्यांच्यामागे एक आरसा आहे. त्यात अनेक कोनांतून या शिवलिंगाच्या प्रतिमा दिसतात. त्यामागे श्री. स्वामी समर्थ महाराजांची अतिशय लोभस, नयनमनोहर प्रतिमा आहे. मुख्य मंदिराच्या डावीकडे छोट्या मंदिरात परमपूज्य सद्गुरु श्री. शिरीषदादा महाराज यांनी मुद्दाम घडवून घेतलेले श्रीयंत्र व भगवती श्रीत्रिपुरसुंदरी देवींची अति दुर्मिळ प्रतिमा आहे. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात शिसम लाकडामध्ये कमानीवजा देवघराची रचना अतिशय कल्पकतेने केलेली असून, त्यामध्ये मुख्य देवांची मांडणी तीन भागात केलेली आहे.
मध्यभागी श्री गणेश, शंख, घंटा असून, देव्हाऱ्यात भगवान श्री. दत्तप्रभूंची अतिशय मनोहर मूर्ती व पादुका असून त्यामागे श्रीयंत्र आहे. त्याच्या उजव्या बाजूस देवी, श्री.अन्नपूर्णा, बाळकृष्ण, भगवान गोपाळकृष्ण यांची मूर्ती असून , पारद शिवलिंग व प.पू. श्री. गुळवणी महाराज यांनी दिलेले प्रासादिक श्रीदत्तयंत्र आहे. डाव्या बाजूस शके १८९३, सन १९८५ सालामध्ये झालेल्या प.पू. श्री.गुळवणी महाराज यांच्या रौद्र शांतीच्या वेळेची रौप्य मुद्रा, छोट्या डबीमध्ये भगवद्गीता, प्रासादिक नाणी, चांदीच्या आवरणातील श्रीफळ व गंगाजलाची बाटली असून प.पू. श्री. मामांच्या वाचनातील पवित्र ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी व गुरुचरित्र आहे. देवघराच्या मधील कप्प्यात प्रभू श्रीराम पंचायतन, श्री. विठ्ठल रुक्मिणी, श्री. राधाकृष्ण, श्रीसंतज्ञानेश्वर माउली, श्रीसंततुकाराम महाराज यांच्या मूर्ती आहेत. कमानीतील वेगवेगळ्या कप्प्यात भगवान श्रीश्रीपाद श्रीवल्लभ, श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, श्रीअक्कलकोट स्वामी महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य श्रीथोरले स्वामी महाराज, प.पू. श्रीगुळवणी महाराज यांच्या मूर्ती आहेत. आपली समग्र गुरुपरंपरा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिमांच्या स्वरूपात विराजमान आहे.
माउली आश्रमाच्या मागील बाजूस पूर्वापार एक सुंदर औदुंबर वृक्ष श्रीभगवंत व परमपूज्य सद्गुरु मामा महाराज यांच्या निवासस्थानी शीतल छाया सातत्याने देत आपली पण सेवा याठिकाणी रुजू करीत आहे.
परमपूज्य सद्गुरु श्री. मामा महाराजांनी पूर्वकल्पना देऊन दि. २१ मार्च १९९० रोजी फाल्गुन वद्य नवमी या तिथीला योगिक पध्दतीने ब्रह्मरंध्रातून प्राणोत्क्रमण करून आपल्या पांचभौतिक देहाची खोळ ‘माउली’ या ठिकाणी सोडली.
श्रीगुरुकृपा
माउली आश्रमात दर्शन घेऊन आपण ‘श्रीगुरुकृपा’ या परमपूज्य सद्गुरु तीर्थरूप श्रीशिरीषदादा यांचे निवासस्थानी आलो की तळमजल्यावर प.पू. सद्गुरु श्री.गुळवणी महाराज सभागृह आहे. येथे श्रीभगवंत तसेच परमपूज्य सद्गुरु श्री. वामनराव गुळवणी महाराज, परमपूज्य सद्गुरू श्री. मामा महाराज यांच्या विलोभनीय प्रतिमांचे दर्शन होते. याच ठिकाणी अनेक साधकांस शक्तिपात व नामदीक्षा प्राप्त झाल्या आहेत. श्रीगुरुपौर्णिमेस परमपूज्य सद्गुरु दर्शन सोहळा याच ठिकाणी संपन्न होतो. थोडे पुढे गेले की परमपूज्य सद्गुरूंचे अध्यक्षीय कार्यालय आहे. येथे श्रीविठ्ठलांची अतीव सुंदर तसेच श्रीगुरुपरंपरेची प्रतिमा आहे. याच कार्यालयात श्रीस्वामी महाराजांची उभी असलेली एक अतीव सुंदर प्रतिमा आहे. या प्रतिमेचे कोणत्याही कोनातून दर्शन घेतले तरी श्रीस्वामी महाराज आपल्याकडेच बघत आहेत असे जाणवते. आतल्या बाजूस प.पू. श्रीमामा महाराज यांचे शेजघर असून तिथे गेले की प.पू. मामा महाराज छानपणे पहुडलेले आहेत, असा भास होतो. तिथेच आपल्या आजतागायत प्रकाशित झालेल्या सर्व महत्वाच्या पुस्तकांच्या स्थळप्रती जिवापाड जपून ठेवल्या आहेत. सगळीकडे पावित्र्य व कमालीची स्वच्छता अनुभवायला मिळते.
या इमारतीच्या तळघरात श्रीदत्तकुटी ध्यानमंदिर असून येथे नीरव शांततेत साधकजन त्यांच्या सोईने साधनेस बसतात.
श्रीअन्नपूर्णा:
प.पू.सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे पथालगतच्या प्रशस्त व डौलदार कमानीतून ’श्रीअन्नपूर्णा’ या इमारतीच्या प्रांगणात प्रवेश होतो. याठिकाणी रिसेप्शन, पब्लिक रिलेशन्स, वेटिंग लाउंज, टॉयलेट ब्लॉक तसेच ‘श्रीपाद सेवा मंडळ’ तसेच ‘श्रीज्ञानदेव सिध्दबेट तपोवन’ या ट्रस्टचे आर्थिक व्यवहारांची नोंद घेण्यासाठीचे कार्यालय आहे. अनेक गरजू साधक सद्भक्त येथून गरज पडली की श्रीवामनराज प्रकाशनाची पुस्तके व आयुर्वेदिक तेले, औषधे येथूनच घेऊन जातात.
पहिल्या मजल्यावर ‘श्रीमामासाहेब देशपांडे ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय’ आहे. कोणीही जिज्ञासू अभ्यासक नाममात्र फी भरून या ग्रंथालयाचे वाचक-सभासद-सदस्य होऊ शकतात. विविध विषयांवरील सुमारे ३०,००० पुस्तके येथे आहेत व ती आपण घरी नेऊन वाचू शकतो.
दुसऱ्या मजल्यावर ‘अन्नपूर्णा’ भोजनविभाग असून परमपूज्य मामा महाराज यांना रोज अर्पण करावयाचा नैवेद्य येथे तयार होतो. तसेच सेवेकरी मंडळी येथे भोजन घेतात. उत्सवप्रसंगी महाप्रसादाची व्यवस्था याच ठिकाणी केली जाते. तिसऱ्या मजल्यावर विशेष अतिथींसाठी तसेच पूर्ण वेळ सेवेकरी यांचेसाठी निवास व्यवस्था आहे.
चौथ्या मजल्यावर ऑडिटर्स व अकाउंट्स यासाठीचे कार्यालय आहे.आता उद्वाहकाची सोय पण या इमारतीत केली आहे. या पूर्ण इमारतीला लागणारा विद्युत पुरवठा हा सोलर संयंत्राद्वारे निर्मिती करून पुरविला जातो.
साधक सद्भक्तांच्या आठवणी :
माउली आश्रमात अनेक वर्षे परमपूज्य सद्गुरु श्री. मामासाहोबांच्या प्रेमळ सहवासात राहिलेले आपले साधक बंधू श्री. नारायणराव पानसे ‘माउली’ बाबतच्या आठवणी सांगताना म्हणतात की, “ माउली ही आमची कायम सावली राहिली आहे. परमपूज्य सद्गुरु श्री. मामा महाराज देहात असताना आणि आज नसताना सुध्दा. परमपूज्य सद्गुरु सौ. ताई यांच्या व परमपूज्य सद्गुरु श्री. शिरीषदादा यांचे व प.पू. सद्गुरु श्रीमामा महाराजांचे अनेक सुसंवाद आजही आठवले की मन भरून येते. प.पू. सद्गुरु श्री. मामामहाराज माउलीत देवांची पूजा करताना सुंदर सुगंध येत असे. सद्गुरु असोत वा बाहेरगावी असोत, येथे कायम प्रसन्न व शांत वाटत असे.”
एकदा परमपूज्य सौ. ताई आल्या व देवांची पूजा बघत बसल्या. मग घरी गेल्या. दुसऱ्या दिवशी प. पू. ताई मला म्हणाल्या, “ मला मामा महाराजांच्या जागी साक्षात भगवान श्री दत्तात्रेयांचे दर्शन झाले. मला ना सारखा ‘तीन शिरे सहा हात । त्या माझे दंडवत।।‘ हा अभंगच आठवत होता.”
असाच प्रसंग एका साधक सद्भक्तांना पण अनुभवास आला. दीक्षा झाली आणि तदनंतर त्यांना सगळीकडे स्वामी समर्थ महाराज दिसू लागले. परमपूज्य सद्गुरु म्हणाले की, “त्यांचे विपरित प्रारब्ध संपले. त्यांचे भाग्य व शुध्द पुण्यच उदयास आले. ते पण इतके प्रचंड की त्यामुळे साक्षात स्वामी महाराजांचे त्यांना दर्शन झाले.”
श्रीमती माई पेठे नावाच्या साधक भगिनींबरोबर प्रत्यक्ष श्रीभगवंत येत असत. त्यांनी माउलीत प्रवेश करताना बरोबरच्या बाळकृष्णांनी माउलीच्या पायरीस नमस्कार केला. माईंनी विचारले की आपण का नमस्कार केला? श्रीभगवंत म्हणाले, “ अगं इथे श्री. मामा महाराज देशपांडे नावाचे श्री दत्तगुरु राहतात.” हे अमृतबोल परमपूज्य मामा महाराज व माउलीची मोठी महतीच सांगतात!