Parampara

भगवान श्रीदत्तात्रेय

   सत्ययुगात भगवान श्रीब्रह्मदेवांचे मानसपुत्र आणि सप्तर्षींमधील श्रेष्ठ अशा भगवान अत्रिमुनी व त्यांच्या पतिव्रता पत्नी भगवती अनसूयामातेच्या पोटी, त्यांच्या तपश्चर्येचे फळ देण्याच्या उद्देशाने श्रीभगवंतच स्वतः मार्गशीर्ष पौर्णिमेस “दत्त” रूपात प्रकटले. अनसूयामातेच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्यासाठी अतिथी रूपाने आलेल्या भगवान विष्णू, भगवान ब्रह्मदेव व भगवान शिवांचा त्रिगुणात्मक अवतार म्हणजे भगवान श्रीदत्तात्रेयप्रभू होत. भगवान श्रीदत्तात्रेयप्रभू हे प्रत्यक्ष जगद्गुरूच आहेत.
  भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या अवताराचे रहस्य सांगताना प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, “श्रीदत्तात्रेय अवतार” हा चिरंजीव का आहे? तर, “अज्ञान” नावाचा राक्षस मारल्याशिवाय श्रीदत्तगुरूंना जाता येणार नाही; व अज्ञान हे अनंत काळापर्यंत राहणार. म्हणून हा अवतार चिरंजीव आहे.”
  अज्ञान नष्ट करणे हेच श्रीगुरुतत्त्वाचे प्रधान कार्य आहे. या अज्ञानामुळेच जीव आपले मूळचे ब्रह्मस्वरूप विसरून, मायेच्या कचाट्यात सापडून अनेक प्रकारची दु:खे भोगत असतो. अशा दु:खी कष्टी जीवांचा कळवळा येऊन श्रीभगवंतच श्रीदत्तप्रभूंच्या रूपाने प्रकट होतात व योग्य वेळ आलेल्या, शरण आलेल्या जीवांवर कृपा करून त्यांना आत्मबोध करतात. या कार्यासाठी श्रीदत्तप्रभूंचेच अंश विविध गुरुपरंपरांच्या माध्यमातून श्रीगुरु म्हणून पुन्हा पुन्हा अवतरित होतात. ही परंपरा आजही अखंडितपणे चालूच आहे.

अधिक माहिती…

  आजमितीस प्रचलित प्रमुख उपासना संप्रदायांमध्ये श्रीदत्त संप्रदायाची गणना होते. वारकरी संप्रदायानेही श्रीमद् भागवतात कथन केलेल्या चोवीस अवतारांपैकी एक असणाऱ्या श्रीदत्तप्रभूंना मोठ्या प्रेमादराचे स्थान दिले आहे. श्रीनाथ संप्रदायात तर श्रीदत्तप्रभू हे नवनाथांचे गुरुस्वरूपच आहेत. अर्थातच, अगदी थोड्या उपासनेने प्रसन्न होणारे, स्मर्तृगामी (स्मरता क्षणी संतुष्ट होणारे) दैवत असल्यामुळेही श्रीदत्तप्रभूंची सेवा-उपासना करण्याकडे सर्वसामान्य जनांचा कल दिसून येतो. शिवाय असंख्य भक्तांना तसे अलौकिक अनुभव देखील आलेले आहेतच.
  श्रीपाद सेवा मंडळाच्या श्रीवामनराज प्रकाशनाने श्रीदत्तसंप्रदायाचे पुढील महत्त्वाचे वाङ्मय साधक सद्भक्तांसाठी उपलब्ध करून दिले आहे.
“श्रीगुरुचरित्र” – श्रीदत्तसंप्रदायात वेदतुल्य मानला जाणारा मूळ ओवीबद्ध ग्रंथ
“श्रीगुरुचरित्र कथासार” – मूळ ओवीबद्ध ग्रंथाचे सुलभ मराठी भाषांतर
“श्रीगुरुचरित्र नित्यपाठ” – सर्व स्तरांतील स्त्री-पुरुषांना थोडक्या वेळात पारायण करता येणारा मूळ ओव्यांचाच संपादित, संक्षिप्त ग्रंथ
“श्रीदत्तमाहात्म्य” – श्रीदत्तप्रभूंच्या लीलांचे सविस्तर वर्णन करणारा मूळ ओवीबद्ध ग्रंथ
“श्रीदत्तमाहात्म्य; सुबोध गद्य रूपांतर ” – मूळ ओवीबद्ध ग्रंथाचे सुलभ मराठी भाषांतर
जयंती : मार्गशीर्ष शुद्ध १५, मार्गशीर्ष पौर्णिमा
चिरंजीव अवतार
महत्त्वाची कार्यस्थाने : श्रीक्षेत्र गिरनार, श्रीक्षेत्र माहूर, श्रीक्षेत्र पांचाळेश्वर

भगवान श्रीदत्तात्रेय

भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज

   कलियुगातील प्रथम श्रीदत्तावतार भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज हे परिपूर्ण परब्रह्मस्वरूप असे नित्य अवतार आहेत. त्यांचे वय कायमच सोळा वर्षांच्या किशोराएवढे असते. आंध्रप्रदेशातील पीठापूर या गांवी त्यांनी श्री.अपळराज व सौ.सुमतीमातेच्या पोटी जन्म घेतला. कृष्णा तीरावरील कुरवपूर या तीर्थक्षेत्री वास्तव्य करून अनेक लीला केल्या. ते ब्रह्मचारी होते, त्यांनी संन्यास घेतलेला नव्हता. ते अत्यंत देखणे व सुकुमार होते. भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या काही लीला “श्रीगुरुचरित्रा”त वर्णिलेल्या असून “श्रीपादचरित्रामृतम्” ग्रंथात त्यांचे सविस्तर चरित्र आले आहे. स्मरताक्षणी त्यांनी आपल्या भक्तांचे रक्षण करून सर्व मनोकामना पूर्ण केल्या आणि त्यांना भक्तिमार्गाला लावले अशा अनेक भावपूर्ण लीलांचे वर्णन त्यांत येते.
  भविष्यपुराणात, “कलियुगात अवधूत होतील”, असा जो उल्लेख येतो तो भगवान श्री श्रीपादांचाच आहे. म्हणूनच “कलौ श्रीपादवल्लभ: ।” असे मोठ्या प्रेमाने म्हटले जाते. श्रीदत्तसंप्रदायामध्ये मोठ्या श्रद्धेने जपला जाणारा “दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा” हा महामंत्र त्यांनीच प्रकट केलेला असून नंतर तो प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांनी सर्वदूर प्रचलित केला. पण याचा प्रथम उपदेश एकेदिवशी भगवान श्री श्रीपादांनीच भक्तांना पंचदेव पहाडी परिसरात केला होता.
  भगवान श्री श्रीपादांना, माठ/राजगिरा पालेभाजी, वांग्याची भाजी आणि साजुक तुपातला शिरा अत्यंत आवडत असे. त्यांना मनापासून आणि विशुद्ध प्रेमभावाने अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट आवडते. भक्ताचा निर्मळ प्रेमभाव हीच त्यांची आवड व तेच त्यांची कृपा प्राप्त करून घेण्याचे एकमात्र साधन आहे !

अधिक माहिती…

  त्यांचे बदरीनाथ आदि हिमालयातील तपस्थानांवर, गोकर्ण महाबळेश्वर, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी, तिरूपती बालाजी, विदर्भातील जळगांव (जामोद) अशा ठिकाणीही प्रकट अथवा गुप्त रूपाने वास्तव्य झालेले आहे. ‘श्रीपाद सेवा मंडळ’ या संस्थेने जळगांव (जामोद) येथे त्यांचे सुंदर मंदिर बांधलेले आहे. त्याबद्दलची अधिक माहिती या वेबसाईट वर प्रकल्प सदरात वाचायला मिळेल.
जयंती : भाद्रपद शुक्ल चतुर्थी, श्रीगणेशचतुर्थी
निजानंद गमन तिथी : आश्विन शुद्ध द्वादशी, श्रीगुरुद्वादशी (नित्य अवतार असल्याने त्यांनी आपला दिव्य देह कृष्णामाईत केवळ लौकिकदृष्ट्या अदृश्य केलेला आहे, त्यांनी देहत्याग केलेला नाही)
महत्त्वाची कार्यस्थाने : श्रीक्षेत्र पिठापूर, श्रीक्षेत्र कुरवपूर

भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज

भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज

   भगवान श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी महाराजांनी, कुरवपूरच्या कृष्णानदीत जीव द्यायला आलेल्या एका दुर्भागी स्त्रीला, पुढील जन्मी उत्तम पुत्र होण्यासाठी शनिप्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले होते. ती पुढच्या जन्मी अकोला जिल्ह्यातील कारंजा या गावी जन्माला आली. पुढे त्याच गावातील माधव ब्राह्मणाशी या अंबा नामक स्त्रीचा विवाह झाला. पूर्वावतारात दिलेल्या आशीर्वादानुसार, भगवान श्रीदत्तप्रभूंनी श्री नरहरी रूपाने या दांपत्याच्या पोटी, शके १३०० अर्थात् इ.स. १३७८ मध्ये पौष शुद्ध द्वितीयेला मध्यान्ही कलियुगातील आपला दुसरा अवतार घेतला.
  भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वयाची पहिली ८-१० वर्षे कारंज्याला राहिले. तेथे त्यांनी अलौकिक बाललीला केल्या. मौंजीबंधन होईपर्यंत ते फक्त ॐ एवढाच उच्चार करीत असत. पण त्यांनी मुंजीच्या भिक्षावळीत चारही वेदांचे पठण करून मौन सोडले. संन्यास धर्माचा उद्धार करण्यासाठी काशी येथे जाऊन त्यांनी श्रीमत् कृष्ण सरस्वती स्वामी यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली व भारतभर भ्रमण केले.
  भ्रमण करीत असताना कृष्णामाईच्या तीरावर औदुंबर क्षेत्री येऊन एक चातुर्मास्य राहिले. तेथे त्यांच्या स्मरणार्थ पुढे ‘विमल पादुका’ स्थापन करण्यात आलेल्या आहेत. पुढे ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे आले. तेथे त्यांचे बारा वर्षे वास्तव्य झाले. श्रींनी आपल्या ‘मनोहर पादुका’ व अन्नपूर्णामातेची स्थापन केली व मग ते गाणगापूर क्षेत्री आले. तेथे त्यांचे चोवीस वर्षे वास्तव्य झाले. त्यानंतर अंदाजे वयाच्या ऐंशीव्या वर्षी, गाणगापुरात ‘निर्गुण पादुका’ स्थापून ते श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे जाऊन योगमार्गाने शिवलिंगात अदृश्य झाले. त्यांनी लौकिक अर्थाने देहत्याग केलेला नाही.

अधिक माहिती…


  भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी त्याकाळात लोप पावत चाललेल्या वेदविहित धर्माची पुनर्स्थापना केली. लोकांमध्ये भक्तिमार्गाचा प्रसार केला. जसे चारही वेदांचे ज्ञानी ब्राह्मण, श्रेष्ठ संन्यासी त्यांचे शिष्य होते, तसेच भक्तराज तंतुक, पर्वतेश्वर शूद्र व बिदरचा मुसलमान बादशहा असे अनेक जाती-धर्मातील हजारो भक्तही त्यांच्या कृपेने धन्य झालेले होते. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या लाखो लीलांपैकी काही अद्भुत लीला ‘श्रीगुरुचरित्रा’त वर्णन केलेल्या आहेत.
  श्रीक्षेत्र नृसिंहवाडी ही श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी आहे. तेथे ते निरंतर राहून भक्तकल्याण करीत असतात. त्यांचेच प्रत्यक्ष अधिष्ठान श्रीपाद सेवा मंडळाच्या श्रीक्षेत्र दत्तधाम येथेही आहे. “वाडी-गाणगापूर प्रमाणे आम्ही दत्तधाम येथेही निरंतर वास्तव्य करू”, असा प्रेमळ आशीर्वाद त्यांनी स्वत: प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना दिला होता. या स्थानाला ‘दक्षिण गिरनार’ समजले जाते.
जयंती : पौष शुद्ध द्वितीया
श्रीशैल्यागमन तिथी : माघ कृष्ण प्रतिपदा, श्रीगुरुप्रतिपदा (नित्य अवतार असल्याने आपला दिव्य देह केवळ लौकिकदृष्ट्या अदृश्य केलेला आहे, त्यांनी देहत्याग केलेला नाही)
महत्त्वाची कार्यस्थाने : श्रीक्षेत्र औदुंबर , श्रीक्षेत्र नृसिंहवाडी, श्रीक्षेत्र गाणगापूर, श्रीक्षेत्र कारंजा

भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज

राजाधिराज सद्‌गुरु समर्थ श्रीअक्कलकोट स्वामी महाराज

   जगद्गुरु भगवान श्रीदत्तात्रेय प्रभूंनीच जगावर कृपा करण्यासाठी हा करुणावरुणालय श्रीस्वामी अवतार धारण केलेला आहे. शके १०७१ म्हणजेच इ.स.११४९ साली, हस्तिनापूर जवळील छेली या खेडेगांवी राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज प्रथम प्रकट झाले. आपल्या लाडक्या भक्तासाठी, लहानग्या विजयसिंग साठी ही आठ वर्षांची बटूमूर्ती धरणी दुभंगून प्रकट झाली व त्याच्याशी गोट्या खेळून पुन्हा अदृश्य झाली. हेच विजयसिंग पुढच्या जन्मी हरिभाऊ तावडे नावाने जन्माला आले. श्री स्वामी महाराजांच्या अमोघ कृपेने तेच पुढे श्रीस्वामी समर्थ महाराजांचे प्रधान लीलासहचर, श्री स्वामीसुत महाराज म्हणून विख्यात झाले.
  श्री स्वामी समर्थ महाराज उत्तरेतून परिभ्रमण करीत मंगळवेढा, मोहोळ, सोलापूर व शेवटी अक्कलकोट येथे येऊन राहिले. सलग तेवीस वर्षे अक्कलकोटात राहून त्यांनी अनेक दिव्य लीला केल्या. तेथील एका वटवृक्षाखाली नेहमी त्यांचे पावन वास्तव्य असे. याच वटवृक्षाजवळ आज त्यांचे भव्य मंदिर उभे आहे. शके १८०० च्या चैत्र कृष्ण त्रयोदशीला, मंगळवारी दि. ३० एप्रिल १८७८ रोजी अक्कलकोटी देहत्यागाची लीला केली. वटवृक्षाखाली बसून “अनन्याश्चिन्तयन्तो मां…” हे गीतावचन पुन्हा पुन्हा उच्चारून, भक्तांना अभयदान देऊन श्री स्वामी निजानंदी निमग्न झाले. भक्तांनी गहिवरल्या अंत:करणाने, स्वत: श्री स्वामींनी पूर्वीच बांधवून घेतलेल्या बुधवार पेठेतील ब्रह्मानंद गुंफेमध्ये श्री स्वामींचा पावन देह ठेवून त्याचे द्वार बंद केले.

अधिक माहिती…

  श्रीस्वामी महाराजांच्या प्रकटदिनाच्या चैत्र शुद्ध द्वितीयेच्या उत्सवाची परंपरा श्री स्वामीसुतांनीच प्रथम शके १७९२ म्हणजेच १८७० साली सुरू केली. अक्कलकोट येथे त्या पुढील वर्षीपासून श्रीस्वामींच्या समक्षच हा उत्सव होऊ लागला. स्वामीशिष्य श्रीसंत गोपाळबुवा केळकर यांनी लिहिलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बखरीमुळेच आजमितीस आपल्याला परमअद्भुत अशा असंख्य स्वामीलीलांचा सप्रेम आस्वाद घेता येतो आहे. ‘श्री स्वामी समर्थांची बखर’ वाचलेली नाही, असा एकही स्वामीभक्त शोधून सापडणार नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या त्रिभुवनपावन व अत्यंत अलौकिक लीलाकथांचे, प्रामाणिक व सर्वथा सत्य संकलन असणारी ही बखर, स्वामीभक्तांच्या गळ्यातला कंठमणीच आहे यात शंका नाही.
  श्रीस्वामी महाराजांचे “श्रीस्वामीसमर्थ जयजय स्वामीसमर्थ” हे पंचदशाक्षरी नाम प्रेमभराने जपल्यास आपला संसार तर सुखमय होतोच; परंतु अत्यंत अवघड म्हणून सांगितलेला परमार्थही आपल्याला अतिशय कमी कष्टात साध्य होतो. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा परंपरेतील थोर सत्पुरुष प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांनी श्रीस्वामी महाराजांचे अद्भुत स्वरूप, त्यांच्या अगाध लीला आणि त्यांच्या दिव्य-पावन नामाची शास्त्रोचित उपासना यांविषयी शुद्ध सांप्रदायिक दृष्टिकोनातून “श्रीस्वामी समर्थ नामपाठ” या सत्तावीस अभंग असलेल्या लघुग्रंथाची रचना केली आहे. या रचनेला प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचाच दिव्य आशीर्वादही लाभलेला असल्यामुळे, याचे पठण-चिंतन अतिशय वरदायक ठरणारे आहे.
प्रकटदिन : चैत्र शुद्ध द्वितीया, शके १०७१
पुण्यतिथी: चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १८००
महत्त्वाची कार्यस्थाने : श्रीक्षेत्र अक्कलकोट

राजाधिराज सद्‌गुरु समर्थ श्रीअक्कलकोट स्वामी महाराज

सद्‌गुरु श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज

   भगवान सद्गुरु श्री माउलींचा अवतार श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ अर्थात् १५ ऑगस्ट १२७५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास, श्री.विठ्ठलपंत आणि सौ.रुक्मिणी या अत्यंत सत्शील, सात्त्विक दांपत्याच्या पोटी आळंदी येथील सिद्धबेटावर झाला. प्रचलित मान्यतेनुसार १५ ऑगस्ट ही जन्मतारीख मानले जाते, पण संतांच्या अभंगांमधील उल्लेख पाहून एक संशोधक श्री.एकनाथ पाटील यांनी ‘बापरखुमादेविवरु’ मासिकाच्या श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, चरित्र, कार्य आणि तत्त्वज्ञान विशेषांकात लिहिलेल्या लेखानुसार २२ ऑगस्टच्या मध्यरात्री १२.३० च्या सुमारास (म्हणजे उजाडता २३ ऑगस्ट) सद्गुरु श्री माउलींचा जन्म झाला. आधुनिक संगणकीय पद्धतीने केलेल्या ज्योतिषशास्त्रीय गणितानुसार हीच तारीख जास्त योग्य वाटते.
  श्री माउलींचे आणि भगवान श्रीगोपालकृष्णांचे जन्माचे सगळे योग सारखे आहेत. दोघांची जन्मवेळ एक, जन्ममास एक, जन्मनक्षत्र एक आणि जन्मतिथीही एकच आहे. आळंदीतील सिद्धबेटाच्या या पावन भूमीवर, महासिद्धांनाही बोध करणारे महायोगिराज, साक्षात् श्रीकृष्णचंद्र महाप्रभू जन्माला आले, हे किती औचित्यपूर्ण आहे ! सद्गुरु श्री माउलींचे सारे चरित्र आणि कार्य औरच आहे. म्हणूनच आज साडेसातशे वर्षे उलटली तरी त्या दिव्य चरित्राची मोहिनी किंचितही कमी झालेली नाही; उलट दिवसेंदिवस वाढतच आहे.

अधिक माहिती…

  श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज श्री माउलींच्या अवतारामागची एक अनोखी हकिकत सांगत असत. एकदा सगळी सृष्टी जलमय झालेली असताना भगवंत बालरूप धारण करून एका वडाच्या पानावर आपला पायांचा अंगठा चोखत पहुडले होते. नेमके ‘नारायण नारायण’ करीत श्री नारदमुनी तेथे आले व भगवान बालमुकुंदांचे ते त्रिभुवनमोहक रूप पाहून गालातल्या गालात हसू लागले. देवांनी देखील वेडाचे पांघरुण घेऊन हसण्याचे कारण विचारले. नारद म्हणाले, “अहो देवा, तुम्ही या जगाचे पालक आणि असे बाललीला करता आहात, मग हसू येणारच ना ?” त्यावर बालमुकुंद प्रभू उत्तरले, “पण तू कारण नाही विचारलेस त्याचे ?” नारदजी म्हणाले, “विचारणारच होतो, पण तुमचे हे रूप पाहून हसूच फुटले त्याआधी.”
  श्रीभगवंत म्हणाले, “गड्या, मी जेव्हा जेव्हा अवतार घेऊन येतो तेव्हा हजारो भक्त याच श्रीचरणांवर डोके ठेवून धन्य होतात. मला कळत नाही की एवढी काय जादू आहे या पायांमध्ये ? सहज मनात आले, आपण अंगठा चोखून पाहावा की खरोखरच तो एवढा गोड आहे का ? म्हणून..” यावर नारदमुनी आणखी जोरात हसले व म्हणाले, “देवा, आता मी काय सांगावे आपल्याला, पण भक्तमंडळींना जे सुख मिळते, गोडवा लाभतो तो काय अंगठा चोखून थोडीच कळणार आहे ? त्यासाठी आपले मस्तक दुस-याच्या पायांवर ठेवावे लागेल. तेव्हाच कळेल.” एवढे बोलून नारायण उच्चार करीत नारदमुनी निघून गेले. हे ऐकून देवही विचारात पडले.
  पुन्हा सृष्टी निर्माण झाली. मत्स्य, कूर्म, वराह आदी अवतार झाले. नंतर श्रीभगवंत नववा बौद्ध अवतार घेऊन पंढरीत विटेवर प्रकटले. पुढे कलियुग सुरू झाल्यावर पुन्हा भगवंतच साक्षात् माउलींच्या रूपाने अवतरले. काही काळाने ते पंढरपूर येथे आपल्या भावंडांसमवेत दर्शनाला गेले. त्यावेळी माउलींनी श्रीपांडुरंगांच्या समचरणांवर मस्तक ठेवल्याबरोबर त्यांना त्या श्रीचरणांच्या अपूर्व गोडीचा अनुभव प्रथमत: आला व त्यांच्या तोंडून उद्गार निघाले, “मुक्ते, अगं, तो वटपत्री शयन करणारा बालमुकुंद भगवंत आणि हा समचरण साजिरा पांडुरंग एकच आहे हो ! त्याच्या चरणांची गोडी मोठीच विलक्षण आहे !” त्याच आनंदानुभवातून माउलींना त्यांचा आयुष्यातला पहिला अभंग स्फुरला, “रूप पाहाता लोचनी । सुख जाले हो साजणी ॥१॥” अशी ही आपलीच अलौकिक श्रीचरणगोडी भगवंतांना अनुभवायला मिळाली ती माउलींच्या अवतारामध्ये !
  भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रावर आजवर अनेक महात्म्यांनी काव्य व ग्रंथरचना केलेल्या आहेत. परंतु पारायणासाठी त्यांचे स्वतंत्र ओवीबद्ध चरित्र उपलब्ध नव्हते. सद्गुरु श्री माउलींच्याच प्रेरणेने त्यांचे पूर्णकृपांकित भक्तराज प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज यांच्याकडून २४०० ओव्यांचे ‘श्रीज्ञानदेव विजय’ हे महाकाव्य रचले गेले. पंधरा अध्यायांमधून प.पू.श्री.मामांनी भगवान श्री माउलींच्या दिव्य चरित्रातील काही सर्वांना माहीत असलेल्या व फारशा प्रचलित नसलेल्याही बऱ्याच लीला साध्यासोप्या तरीही अत्यंत रसाळ भाषेत सांगितलेल्या आहेत.
  आपल्याला ठाऊक असलेल्या रेडा बोलवणे, भिंत चालवणे यांबरोबरच; श्री गहिनीनाथांचे पूर्वचरित्र, कऱ्हाडच्या रामराजाचे गर्वहरण व त्याला कृपादान, पांडुरंगांच्या प्रसादमालेची प्राप्ती, गोपाळ बालकाला जीवनदान, पैठण येथील श्राद्धाच्या वेळी ब्रह्मवृंदाच्या पूर्वजांना जेऊ घालणे, उज्जैनच्या वीरमंगलाची रोमांचकारी कथा व मंगलेश्वर शिवलिंगाची स्थापना, हरिपाल डाकूचा उद्धार, काशीनगरीतील महायज्ञाच्या वेळचा अग्रपूजेचा प्रसंग व भगवान विश्वेश्वरांचे प्रकट होऊन माउलींच्या हातून पुरोडाश भक्षण, मृत सायन्नाचार्याच्या मुखातून सत्यकथन, नेवाशाच्या मशिदीला बोलते केल्याचा प्रसंग; यांसारख्या सद्गुरु श्री माउलींच्या अनेक अनवट लीला प.पू.श्री.मामांनी फार सुंदर भाषेत या ग्रंथात कथन केलेल्या आहेत. यांपैकी गोपाळ बालकाची व हरिपाल डाकूची कथा वाचताना तर फारच भरून येते.
  कनवाळू सद्गुरु श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या आज्ञेने, कळिकाळरूपी ज्वराने पीडित झालेल्या श्रद्धावान जनांबद्दलच्या अपार कळवळ्याने, त्यांना त्या भयानक पीडेतून कायमचे मुक्त करण्यासाठी सर्व प्रकारांनी धावा करून माउलीरूप कृपामेघ घनघोर बरसला; तोच ‘श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ’ होय ! श्री ज्ञानेश्वरी हा जागतिक आध्यात्मिक वाङ्मयातला सर्वांगपरिपूर्ण आणि एकमेवाद्वितीय ग्रंथराज आहे. म्हणूनच प.पू.श्री.मामा या ग्रंथराजाला ‘एक पुस्तकी ग्रंथालय’ असे म्हणतात. प.पू.श्री.मामांच्या परंपरेत हा प्रमाण ग्रंथ आहे.
  सद्गुरु श्री माउली हे त्यांच्या काळातील सर्व संतांचे अत्यंत लाडके होते. त्या काळात एकाहून एक थोर महात्मे त्यावेळी पृथ्वीवर अवतरलेेले होते आणि सगळे मिळून हरिभक्तीचा कल्लोळ करीत होते. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे त्याबद्दल सांगतात की, तो भारतीय आध्यात्मिक वैभवाचा सुवर्णकाळच होता ! त्यांच्या आधी किंवा त्यानंतर आजवर असे कधीच पुन्हा झालेले नाही. श्रीगुरुपरंपरेच्या सात-आठ पिढ्या एकाचवेळी एकत्र नांदत होत्या. श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज हे परंपरेचे आद्यगुरु तर श्री चोखोबारायांचे चिरंजीव श्री कर्ममेळा हे त्यांच्या सातव्या पिढीतील शिष्य; अशा श्रीगुरुपरंपरेच्या सात पिढ्या एकत्र लीला करीत होत्या.
  प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी सद्गुरु श्री माउलींच्या चरित्रावर ‘श्रीज्ञानदेव विजय’ हे महाकाव्य जसे रचले, तसेच ‘चैतन्यचक्रवर्ती’ नावाचे एक चार अंकी प्रदीर्घ संगीत नाटकही रचलेले आहे. या नाटकाची संहिता ‘श्रीवामनराज प्रकाशना’ने छापलेली आहे. श्री माउली व इतर संतांचे, माउलींचे व त्यांच्या भावंडांचे, विशेषत: मुक्ताबाईंबरोबरचे आणि माउली व श्रीगुरु निवृत्तिनाथांचे संवाद फार फार अप्रतिम लिहिलेले आहेत.
  सद्गुरु श्री माउलींनी श्रीभगवंतांना समाधीची परवानगी मागितल्यावर, देवांनीच त्यांना आळंदीच्या त्यांच्या स्थानाची माहिती दिली. आळंदीच्या सिध्देश्वर मंदिराच्या समोरील नंदीखाली असणारे समाधिविवर हेच माउलींचे अनादिस्थान आहे. तेथेच त्यांनी या पूर्वी एकशेआठ वेळा समाधी घेतलेली असून ही त्यांची एकशेनववी वेळ होती समाधी घेण्याची, असे श्री नामदेवराय सांगतात. तेथूनच ते पुन्हा पुन्हा दरवेळी अवतार घेऊन येत असतात. देवांच्या सांगण्यानुसार नंदी हलवल्यावर खालचे विवर मोकळे झाले. नामदेवरायांच्या चारही पुत्रांनी ते स्वच्छ करून त्यातील चौथ-यावर मृगाजिन वगैरे घालून समाधीची सर्व सिद्धता केली.
  कार्तिक कृष्ण त्रयोदशीला सकाळच्या वेळी माउलींची पूजा झाल्यावर, एकीकडून श्री निवृत्तिनाथ व एकीकडून श्रीभगवंतांनी हाताला धरून माउलींना त्या समाधिविवराच्या आत नेले. तेथील आसनावर बसून माउलींनी डोळे मिटून तीन वेळा नमस्कार केला, भीममुद्रा लावली आणि ते ‘संजीवन समाधी’त गेले. त्यानंतर श्रीपांडुरंग व श्री निवृत्तिनाथ बाहेर आले.
  संजीवन समाधी साधण्यासाठी तत्त्वांचा तत्त्वांमध्ये नाथ संप्रदायोक्त पद्धतीने लय केला जातो. सद्गुरु श्री माउलींनी समाधीविवरात बसल्यानंतर याच पद्धतीने तत्त्वांचा लय करायला सुरुवात केल्यावर, ती प्रक्रिया उपस्थित सर्व संतांना डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता आली. पृथ्वीतत्त्वाचा जलतत्त्वात, जलाचा अग्नीत, अग्नीचा वायूत व वायूचा आकाशतत्त्वात लय झाला. आकाशाचा लय कशातच होत नसल्याने ते भगवती शक्तीच्या आकाशाशी, चिदाकाशाशी तदाकार होऊन राहते. ही प्रक्रिया माउलींच्या देहावर घडताना उपस्थित संतांना प्रत्यक्ष पाहता आली. पृथ्वी व जलतत्त्वाचा लय झाल्यावर माउलींच्या स्थूल शरीराचा भाग अदृश्य झाला आणि त्याजागी तेजोमय मूर्ती दिसू लागली. तेजतत्त्वही लय पावल्यावर समोरची ती तेजाकृती देखील दिसेनाशी झाली व केवळ नादरूपाने प्रचिती शिल्लक राहिली. ते वायूतत्त्वही आकाशात लय पावल्यावर तो नादही मावळून गेला व माउलींची संजीवन समाधीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सर्वांना समजले. संजीवन समाधीचा अर्थ असा नाही की, माउलींनी देहत्याग केला. याच्या उलट प्रक्रियेने त्यांना केव्हाही हवे तेव्हा पुन्हा देहावर येता येते. मग ते जसे समाधीच्या पूर्वी होते तसेच पुन्हा आपल्याला दिसू लागतील. म्हणूनच सद्गुरु श्री माउलींची ही संजीवन समाधी एकमेवाद्वितीय म्हटली जाते ! संजीवन सामाधीच्या रूपाने ते विश्वाकार होऊन राहिलेले आहेत.
  अवघ्या एकवीस वर्षे, तीन महिने आणि पाच दिवस एवढ्या छोट्या कार्यकालात सद्गुरु श्री माउलींनी अक्षरश: युगानुयुगे पुरून उरेल एवढे अद्भुत कार्य करून ठेवलेले .
जयंती : श्रावण कृष्ण अष्टमी, गोकुळाष्टमी
संजीवन समाधी: कार्तिक कृष्ण त्रयोदशी
महत्त्वाची कार्यस्थाने: श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र नेवासा

सद्‌गुरु श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज

प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज

   श्री.टेंब्येस्वामींचा जन्म सावंतवाडी संस्थानातील माणगांव या छोट्याशा खेड्यात श्री.गणेशपंत व सौ.रमाबाई या अत्यंत सत्त्वशील व दत्तभक्त दांपत्याच्या पोटी झाला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा संपूर्ण वेदाभ्यास करून झालेला होता व ते दशग्रंथी ब्राह्मण म्हणून प्रसिद्धही झालेले होते. नृसिंहवाडी येथे त्यांना भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी स्वप्नात मंत्रदीक्षा दिली. पुढे श्रीदत्तप्रभूंच्या आज्ञेने त्यांच्या घरी माणगांव येथे त्यांनी दत्तमंदिर बांधून सात वर्षे उपासना चालविली व देवांच्याच आज्ञेने क्षणात ते सगळे वैभव सोडून बाहेरही पडले. पुढे पत्नीच्या निधनानंतर त्यांनी संन्यास घेतला व नंतरची २३ वर्षे श्रीदत्त संप्रदायाच्या संवर्धनाचे अद्भुत कार्य केले.
  प.प.श्री.टेंब्येस्वामींनी संपूर्ण भारत देश पायी फिरून, सनातन वैदिक धर्माला आलेली ग्लानी दूर करून धर्माची पुनर्स्थापना केली. भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभस्वामींचे जन्मस्थान- पीठापूर व भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामींचे जन्मस्थान-कारंजा, ही दोन्ही शोधून काढून तेथेही उपासना सुरू करून दिली. प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज म्हणजे संन्यासधर्माचे आदर्श आचार्य होत. प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूच त्यांच्या रूपाने अवतरले व त्यांनी श्रीदत्त संप्रदायाची संपूर्ण घडी नीट बसवली. नृसिंहवाडी, औदुंबर, गाणगापूर या दत्तस्थानांवर आचारसंहिता घालून दिली व चालू असलेल्या उपासनेला योग्य दिशा व अधिष्ठान प्राप्त करून दिले.

अधिक माहिती…

  प.प.श्री.टेंब्येस्वामींची “करुणात्रिपदी” ही अजरामर रचना जवळपास सर्व दत्तभक्त रोजच म्हणतात. त्यांनी रचलेले “श्रीदत्तमाहात्म्य”, “सप्तशती गुरुचरित्रसार”, “दत्तलीलामृताब्धिसार”, “त्रिशती गुरुचरित्र”, “द्विसाहस्री गुरुचरित्र”, “श्रीदत्तपुराण” यांसारखे ग्रंथ तसेच अत्यंत भावपूर्ण अशी शेकडो स्तोत्रे ही श्रीदत्तसंप्रदायाचे अलौकिक वैभवच आहे ! ते अतुलनीय भाषाप्रभू तर होतेच शिवाय त्यांची स्मरणशक्ती देखील अफलातून होती. पण मनाने अत्यंत भावूक आणि अनन्यशरणागत असे ते एक थोर भक्तश्रेष्ठही होते. श्रृंगेरी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य श्रीमत् सच्चिदानंद शिवाभिनव भारती महास्वामींनी एकदा उपस्थितांना प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांची ओळख “गुप्तरूपातील भगवान श्रीमद् आद्य शंकराचार्य ” अशीच करून दिली होती.
  प.प.टेंब्ये स्वामी महाराजांनी वयाच्या साठाव्या वर्षी, गुजराथ राज्यातील नर्मदा काठावरील पवित्र गरुडेश्वर स्थानी, आषाढ शुद्ध प्रतिपदा, दि. २३ जून १९१४ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास नश्वर देहाचा त्याग केला. त्यांचे पावन समाधी मंदिर तेथे उभारण्यात आलेले आहे.
  श्रीदत्तसंप्रदायाला उपासना आणि तत्त्वज्ञान अशा दोन्ही अंगांनी सबळ आधार आणि दैवी अधिष्ठान देण्याचे कार्य प.प.श्री.टेंब्ये स्वामींच्या ग्रंथांनीच केलेले आहे ! भगवान श्रीदत्तात्रेय प्रभू त्यांच्याशी बोलत असत व देवांच्या आज्ञेशिवाय ते कोणतीच गोष्ट करीत नसत. प.प.श्री.टेंब्येस्वामींचे चरित्र विलक्षण असून नैष्ठिक संन्यासधर्माचा परमादर्श आहे. अत्यंत कडक धर्माचरण हा त्यांचा विशेष सद्गुण, पण त्याचवेळी परम प्रेमळ, कनवाळू अंत:करण हाही त्यांचा स्थायीभाव होता. या दोन गोष्टी सहसा एकत्र सापडत नाहीत. धर्माचरणातील कर्मठपणा आणि अपार करुणा यांचा देवदुर्लभ संगम प.प.श्री.टेंब्येस्वामींच्या ठायी झालेला होता व हे त्यांच्या चरित्रातील प्रसंगांवरून लगेच ध्यानात येते. त्यांच्या लीला फार फार सुंदर आणि साधकांसाठी मार्गदर्शक आहेत.
  श्रीपाद सेवा मंडळाच्या श्रीवामनराज प्रकाशन संस्थेने “प.प.सद्गुरु श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अक्षयवाङ्मयमाला” या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत, प.प.श्री.टेंब्ये स्वामींचे जवळपास सर्व वाङ्मय सुलभ मराठी अर्थासह पुन्हा प्रकाशित केलेले आहे. तसेच प.प.श्री.टेंब्ये स्वामींच्या चरित्रपर गद्य स्वरूपात “पीयूषधारा” हा ग्रंथही प्रकाशित केला आहे.
जयंती : श्रावण कृष्ण पंचमी, दि. १३ ऑगस्ट १८५४
पुण्यतिथी: आषाढ शुद्ध प्रतिपदा, दि. २३ जून १९१४
महत्त्वाची कार्यस्थाने : श्रीक्षेत्र माणगांव, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी, श्रीक्षेत्र गरुडेश्वर

प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज

प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराज

   प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांचा जन्म चक्रवर्ती या भगवती ढाकेश्वरी मातेच्या पुजारी घराण्यात, बांगलादेशाची राजधानी ढाका येथे झाला. त्यांचे नाव श्री.योगेशचंद्र चक्रवर्ती असे होते. बालपणापासून त्यांचा ओढा परमार्थाकडेच होता. मोक्षप्राप्तीसाठी तरुणपणी घरादाराचा त्याग करून देवीने दिलेल्या दृष्टांतानुसार ते पू.आत्मप्रकाश ब्रह्मचारी यांना शरण गेले. त्यांच्याकडून ब्रह्मचर्यव्रतासह शक्तिपातदीक्षा लाभून त्यांची साधना सुरू झाली. आपल्या श्रीगुरूंनी संन्यास घेतल्यावर लगोलग, १९१४ साली वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी त्यांनीही संन्यास घेतला. त्यांचे संन्यासनाम ‘श्री.चिन्मयानंद सरस्वती’ असे होते. पुढे दंडग्रहणानंतर ते ‘प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराज’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
  संन्यास नियमांच्या बाबतीत ते फार काटेकोर होते. लहान मुलासारखा सहज निर्मळ स्वभाव, तेजस्वी व तप:पूत चेहरा, मधुर बोलणे, अतीव कोमल अंत:करण आणि कडक शास्त्राचरण हे त्यांचे काही विशेष सद्गुण होते. पुण्यात प.पू.श्री.गुळवणी महाराजांकडे त्यांचे नेहमी येणे होई व बराच काळ मुक्कामही असे. प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांच्या मुखावर एक विलक्षण तेज विलसत असे. कडकडीत ब्रह्मचर्याचे ते तेज होते. त्यांच्या नजरेला नजर देण्याची कोणाची हिंमत होत नसे. कोणाचाही खोटेपणा, मतलबीवृत्ती व लबाडी त्यांना खपत नसे. ते अतिशय कर्मठ तरीही ऋजू स्वभावाचे होते. त्यांना प्रवासाची आवड होती.

अधिक माहिती…

  प.प.श्रीस्वामी महाराजांचे एक शिष्य श्री.शंकरराव मार्कंड यांनी त्यांना काशीमध्ये एक वास्तू बांधून दिली होती. प.प.श्रीस्वामी महाराजांची खरेतर इच्छा नव्हती, पण शंकररावांचा आग्रह पाहून त्यांनी होकार दिला. ते काशीला जात तेव्हा त्याच वास्तूमध्ये राहात असत. पण श्रीस्वामी महाराजांना त्या वास्तूचा काहीच मोह नव्हता. पुढे प्रारब्धवशात् शंकररावांची परिस्थिती खूप खालावली. ते पाहून स्वामी महाराज काशीला गेले, त्यांनी लगेच ती वास्तू विकून टाकली व आलेले सर्व पैसे श्री.शंकरराव मार्कंडांच्या स्वाधीन करून मोकळे झाले. ते पराकोटीचे निस्पृह व अनासक्त महात्मे होते.
  शक्तिपात दीक्षा देण्याच्या बाबतीत ते अत्यंत कठोर होते. आधी सव्वालाख गायत्री जप करायला लावत आणि मगच ते एखाद्याचा दीक्षेसाठी विचार करीत असत. कोणतेही विधिनिषेध न बाळगता, सरसकट दीक्षा दिलेल्या त्यांना अजिबात आवडत नसत. दीक्षा ही “लेने देने की नही होने पाने की बात है ।” असे ते नेहमी म्हणत असत. शक्तीची आज्ञा असल्याशिवाय दीक्षाच होत नाही, म्हणून कोणीही आपल्याच मनाने दीक्षा देऊन चालतच नाही, असे ते वारंवार सांगत असत. “मुझे दल बढाना नहीं है । दीक्षा क्या सस्ती चीज है जो मैं बाँटता फिरू?” असे ते स्पष्ट सांगत असत.
  वयाच्या बासष्ठाव्या वर्षी मध्यरात्री काशीक्षेत्रामध्ये प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. त्यांनीच पूर्वसूचना देऊन ठेवल्याप्रमाणे त्यांचे पार्थिव दगडी पेटीमध्ये घालून गंगार्पण करण्यात आले. प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांचे चरित्र आणि त्यांचा उपदेश साधकजनांसाठी सदैव मार्गदर्शक आहे.
जयंती : वैशाख शुद्ध द्वादशी, दि.८ मे १८९२
पुण्यतिथी: माघ कृष्ण तृतीया, दि.९ फेब्रुवारी १९५५
महत्त्वाची कार्यस्थाने : श्रीक्षेत्र वाराणसी (काशी)

प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराज

प.पू.सद्‌गुरु योगिराज श्री.वा.द.गुळवणी महाराज

   श्रीदत्त संप्रदायातील महान विभूतिमत्व, योगिराज सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराज यांचा जन्म कोल्हापूर संस्थानातील राधानगरी तालुक्यातील कुडुत्री या छोट्याशा खेड्यात वे.शा.सं.दत्तंभट व सौ.उमाबाई या सात्त्विक दांपत्याच्या पोटी झाला. गुळवणी घराणे हे श्रीनृसिंहवाडीच्या प.प.श्री.नारायणस्वामींचे कृपांकित होते व त्यांच्याच कृपेने हा वंश चालला होता. शालेय शिक्षण कोल्हापूरला झाल्यानंतर श्रीमहाराजांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मध्ये प्रवेश घेऊन चित्रकलेत प्राविण्य मिळविले. आधी बार्शीला व त्यानंतर पुण्याच्या नू.म.वि. मध्ये त्यांनी चित्रकला शिक्षकाची नोकरी केली.
  पंचम श्रीदत्तावतार प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी, १९०९ साली पवनी मुक्कामी, अनंत चतुर्दशीच्या मंगल मुहूर्तावर श्री.गुळवणी महाराजांवर शक्तिपातपूर्वक मंत्रानुग्रह करून परंपरेचे उत्तराधिकारही प्रदान केले. श्रीमहाराजांनी आपले दैवी सद्गुण व विनम्र सेवा यांमुळे प.प.श्री.टेंब्येस्वामींची पूर्णकृपा संपादन केली. श्रीस्वामींनी त्यांना आपल्या स्वत:च्या हृदयात भगवान श्रीदत्तप्रभूंचे दर्शन करविले होते. पुढे त्यांच्यावर बंगालमधील प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामींचीही कृपा झाली.
  श्रीमहाराजांची राहणी अतिशय साधी होती. स्वच्छता, टापटीप व वक्तशीरपणा हे त्यांचे अंगभूत सद्गुण होते. त्यांनी आजन्म शास्त्र मर्यादेचे काटेकोरपणे पालन केले. अपरंपार करुणा, ऋजुता, विनम्रता, प्रेमळपणा, प्रसिध्दिपराङ्मुखता, निस्पृहता, विलक्षण योगसामर्थ्य, महायोग-शक्तिपात शास्त्रातील अलौकिक अधिकार इत्यादी शेकडो दैवी सद्गुणांचे ते साक्षात् भांडारच होते !

अधिक माहिती…

  योगिराज श्री.गुळवणी महाराजांनी आपल्या प्रदीर्घ आयुष्यात अनेक अलौकिक कार्ये संपन्न केली. त्यांपैकी दोन फार महत्त्वपूर्ण कार्ये म्हणजे, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील श्रींच्या मंदिरासभोवतालचा गोलाकार देखणा सभामंडप बांधण्याचे व प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांचे समग्र वाङ्मय मोठ्या कष्टाने जमवून अचूक व शुद्ध स्वरूपात प्रकाशित करण्याचे महान कार्य होय. जिथे जिथे प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांचे वास्तव्य झाले होते, तिथे समक्ष जाऊन त्यांचे वाङ्मय मिळवले व ते बारा खंडांमधून सद्गुरु श्री.टेंब्येस्वामींच्या जन्मशताब्दीचे निमित्त साधून प्रकाशित केले. हे त्यांचे श्रीदत्त सांप्रदायिकांवरचे कधीही न फिटणारे ऋण आहे.
  प्रत्यक्ष भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचेच अपरस्वरूप असणा-या योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांनी हजारो शिष्यांना शक्तिपात दीक्षा देऊन कृतार्थ केले. श्रीमहाराज म्हणजे अमानित्वाचे व अदंभित्वाचे मूर्तिमंत स्वरूप होते. साक्षात् श्रीदत्तप्रभूच असूनही त्यांनी कधीही चुकूनसुद्धा कोणाला त्याची कल्पना येऊ दिली नाही. कायम आपले माहात्म्य झाकूनच ठेवले.
  महाराजांचे एक श्री.श्रीनिवास आचार्य नावाचे शिष्य होते. त्यांचे एक मित्र श्री.रायकर म्हणून होते. त्यांना एकदा सरकारी नोटीस आली, त्यात रु.७६८ भरा असे म्हटले होते. त्यांच्यापाशी एवढी रक्कम नव्हती. ते आचार्यांना म्हणाले की, “आता काय करणार ? चल, तुमच्या महाराजांना विचारूया. तेच काहीतरी मार्ग सांगतील.” ते दोघे महाराजांकडे आले व सर्व हकीकत सांगितली. श्रीमहाराजांनी लगेच श्री.नारायण भालेरावांना हाक मारली व कपाटातील टिनच्या डब्यातील पैसे रायकरांना द्यायला सांगितले. आश्चर्य म्हणजे त्या डब्यात नेमके ७६८ रुपयेच निघाले. महाराज रायकरांना म्हणाले, “बायको-पोरांना नीट सांभाळा, काळजी करू नका.” हरप्रयत्नाने समोरच्याचे दु:ख दूर करूनच महात्मे पुढे जातात. अशी अलौकिक करुणा श्री.गुळवणी महाराजांच्या ठायी विलसत होती. याच प्रकारचे शेकडो अद्भुत कथा-प्रसंग श्रीमहाराजांच्या चरित्रात पाहायला मिळतात.
  सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांनी एकदा त्यांचे शिष्योत्तम प.पू.श्री.मामांना सांगितले की, “संप्रदाय कार्यासाठी तू स्वतंत्र पीठ स्थापन कर, आमचे पूर्ण आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत.” या आदेशानुसार प.पू.श्री.मामांनी सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी जवळ ‘ माउली ‘ ही वास्तू निर्माण केली. त्याच्या वास्तुशांतीस श्री.गुळवणी महाराज आजारी असल्याने प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत, पण त्यांच्या पादुका आणवून त्या अधिष्ठानाखाली सर्व सोहळा संपन्न झाला. त्या कार्यक्रमानंतर काही दिवसांतच प.पू.श्री.गुळवणी महाराजांनी दि.१५ जानेवारी १९७४ रोजी दुपारी १ च्या सुमारास आपल्या नश्वर देहाचा त्याग केला.
जयंती : मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी, दि.२३ डिसेंबर १८८६
पुण्यतिथी: पौष कृष्ण अष्टमी, दि.१५ जानेवारी १९७४
महत्त्वाची कार्यस्थाने : श्रीवासुदेव निवास, पुणे

प.पू.सद्‌गुरु योगिराज श्री.वा.द.गुळवणी महाराज

प.पू.सद्‌गुरु मातुःश्री पार्वतीदेवी देशपांडे

   राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामीसमर्थ महाराजांच्या कृपा परंपरेतील अलौकिक अधिकारसंपन्न विभूतिमत्व म्हणजे प.पू.सद्‌गुरु मातुःश्री पार्वतीदेवी देशपांडे ! प.पू.पार्वतीदेवी तथा प.पू.बाईंचा जन्म अक्कलकोटातलाच, १८७५ सालचा. त्यावेळी साक्षात् परब्रह्मच राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या रूपाने तेथे अलौकिक लीला करीत होते. प.पू.पार्वतीदेवींचे पिताश्री, प.पू.नारायणभट्ट सोनटक्के हे अक्कलकोट संस्थानात वाकनिस होते. ते श्रीस्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त व पूर्ण कृपांकित महात्मेच होते. श्रीस्वामी महाराजांनीच लहानग्या बाईला मांडीवर घेऊन, तिच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवून, सांगितले होते, “ही आमची पोर आहे !” श्रीस्वामी महाराजांच्या आज्ञेने अवघ्या सातव्या वर्षी प.पू.बाईंवर प.पू.नारायणभट्टांनी परंपरेच्या बीजमंत्रासहित शक्तिपातपूर्वक कृपानुग्रह केला. दीक्षा झाल्याक्षणीच प.पू.बाई प्रगाढ समाधीत गेल्या. त्यांचा जन्मजात अधिकारच तेवढा अद्भुत होता.
  त्या काळातील पद्धतीनुसार वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह नसरापुरच्या देशपांडे घराण्यातील पू.श्री.दत्तोपंतांशी झाला. पू.श्री.दत्तोपंत प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांचे पूर्णकृपांकित शिष्य होते. त्यांच्यासारखा अलौकिक संसार क्वचितच पाहायला मिळेल. एके दिवशी श्री स्वामी महाराज त्यांच्यासमोर प्रकटले व म्हणाले, “बये, तुला आता दुर्दैवाचे दशावतार पाहावे लागणार आहेत, तयारीत राहा.” त्याक्षणी मोठ्या खंबीरपणे प.पू.पार्वतीदेवी उत्तरल्या, “महाराज, आपण आणि माझे भगवंत माझ्यासोबत असाल तर मग मी दुर्दैवाचे दशावतारच काय, शतावतारही आनंदाने सहन करीन !”

अधिक माहिती…

  पतीनिधनानंतर आलेल्या प्रारब्धाच्या गंभीर परीक्षेतही प.पू.पार्वतीदेवी पुरेपूर उतरल्या. त्यावेळेपासूनच दुर्दैवाचे फेरे सुरू झाले. १८०० एकर जमिनीची मालकी असणा-या पू.श्री.दत्तोपंतांची इस्टेट त्यांच्या दत्तक गेलेल्या सख्ख्या भावाने हडपली व प.पू.पार्वतीदेवींना घराबाहेर काढले. प.पू.पार्वतीबाई जेवढ्या निस्पृहपणे संपन्नता उपभोगत होत्या, तेवढ्याच शांतपणे त्यांनी दारिद्र्यही उपभोगले. पू.श्री.दत्तोपंतांच्या देहत्यागापासूनच प.पू.मातुःश्री पार्वतीदेवींनी झोपेचा पूर्ण त्याग केला होता. आयुष्यातली शेवटची बारा वर्षे त्या चुकूनही जमिनीला पाठ लावून झोपल्या नाहीत. रात्रभर त्या साधनेत असत किंवा फेऱ्या मारत माळ घेऊन जप करीत. त्यांचा परमार्थ केव्हाच पूर्णत्वाला गेलेला होता, तरीही त्यांनी आपली साधना कधीच सोडली नाही.
  प.पू.पार्वतीदेवी या निष्णात ज्योतिषी व वैद्यही होत्या. त्यांनी आपल्या या दोन्ही दैवी विद्यांचा लोकांच्या भल्यासाठी भरपूर वापर केला. ज्योतिषाचा किंवा औषधांचा त्यांनी कधीच कसल्याही प्रकारचे मोबदला घेतला नाही. प.पू.पार्वतीदेवींच्या काळातील थोर सत्पुरुष त्यांचा अधिकार जाणून त्यांच्याशी अतीव प्रेमादराने वागत असत. प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज, श्रीसंत गोंदवलेकर महाराज, श्रीसंत नारायण महाराज केडगांवकर, श्री शंकर महाराज यांसारख्या अनेक विभूतींचा व प.पू.पार्वतीदेवींचा दृढ स्नेहबंध होता. श्री शंकर महाराज तर आवर्जून पू.पार्वतीदेवींकडे येत, त्यांच्या हातचे अन्न खात व मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांच्याशी वागत.
  मातुःश्री पार्वतीबाई विनामोबदला वैद्यकी देखील करीत. एकदा नसरापूर जवळच्या नायगांव मधील एका लहान मुलाला घेऊन लोक आले. तो अत्यवस्थच होता. प.पू.मामांना मातुःश्रींनी एक औषध आणायला तातडीने पाठविले. परंतु कोणत्याही दुकानात ते औषध मिळाले नाही. मातुःश्रींनी सद्गुरुस्मरण करून अंगारा दिला. पोराला लावला आणि आईच्या दुधातून चाटवायला सांगितला. थोड्या वेळाने मातुःश्रींनी मामांना पुन्हा तेच औषध आणायला पाठविले. आश्चर्य म्हणजे तेच औषध सगळीकडे त्यावेळी मिळाले. ते घेऊन मातुःश्रींनी त्या लहान मुलासाठी औषध तयार करून पाठविले. त्यावर मामांनी विचारले, ” आई, काल तर अंगारा दिला मग आता औषध का दिलेस? ” मातुःश्रींनी फार मार्मिक उत्तर दिले. त्या म्हणाल्या, “सख्या, काल औषध मिळाले नाही म्हणून देवांवर जडभार घातला, त्या अंगा-याने पोर बरेही झाले. पण आता औषध मिळाल्यावर मात्र देवांना उगीचच कशाला त्रास द्यायचा? ”
  मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी (तारखेने २७ नोव्हेंबर) त्यांनी आपले शिष्य प.पू.श्री.मामांना समोर बसवून, ‘भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलेले महात्म्यांचे प्रयाण कसे असते ते पाहा’, असे सांगून शांतपणे देहत्याग केला. शेवटच्या श्वासापर्यंत शिष्याला बोध देण्याची ही घटना आजवर दुसरी न ऐकली, न पाहिली व पुढेही कधी घडेल असे वाटत नाही.
  प.पू.मातु:श्री पार्वतीदेवींचे कोणत्याही परिस्थितीतला भक्कम आधार म्हणून आयुष्यभर अगदी जवळ बाळगावे, इतके जबरदस्त आहे. मातुःश्री पार्वतीदेवींच्या चरित्राचे आणखी एक अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे त्या प.पू.श्री.मामांच्या नुसत्या जन्मदात्रीच नव्हत्या, तर त्या त्यांच्या मोक्षगुरूही होत्या. प.पू.सौ.शकाताईंनी रसाळ भाषेत वर्णिलेली प.पू.मातुःश्री पार्वतीदेवींची ‘श्रीस्वामीतनया’ ही चरित्रगाथा एकदा हातात घेतल्यावर पूर्ण वाचून झाल्याशिवाय कोणी खाली ठेवणारच नाही ! भारावून जाणे म्हणजे काय ? हे ज्याला अनुभवायचे असेल, त्याने हे चरित्र एकदातरी आवर्जून वाचावेच!
जयंती: इ.स.१८७५
पुण्यतिथी: मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी, दि.२७ नोव्हेंबर १९४१
महत्त्वाची कार्यस्थाने : पुणे, नसरापूर

प.पू.सद्‌गुरु मातुःश्री पार्वतीदेवी देशपांडे

प.पू.सद्‌गुरु योगिराज श्री.श्री.द.(मामा) देशपांडे महाराज

   परमपूज्य सद्गुरु श्री.श्रीपाद दत्तात्रय (मामा) देशपांडे हे श्रीदत्त संप्रदाय, श्रीनाथ संप्रदाय व श्रीभागवत संप्रदाय यांचे थोर अध्वर्यू, सद्गुरु श्री माउलींचे तत्वज्ञान प्रत्यक्ष आचरणात आणणारे व त्या तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे विसाव्या शतकातील महान संत, विलक्षण प्रतिभावान, अनुभूतिसंपन्न साहित्यिक व थोर स्वातंत्र्यसेनानी होते. प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गरुडेश्वरला देह ठेवला आणि प.पू.पार्वतीदेवी व पू.श्री.दत्तोपंत देशपांडे या सत्शील दत्तभक्त दांपत्याच्या पोटी प.पू.सद्गुरु श्री.मामांच्या रूपाने अवतार घेतला.
  पू.श्री.दत्तुअण्णा व प.पू.पार्वतीदेवी हे त्यांना होणाऱ्या अल्पायुषी अपत्यांमुळे खूप व्यथित झाले होते. शेवटी १९१२ सालामधील नित्याच्या नरसोबावाडीच्या पौर्णिमा-वारीला देवांसमोर त्यांनी गा-हाणे मांडले. श्रीदत्तप्रभूंनी “प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांच्या भेटीस जावे” असा आदेश दिला. प.प.श्री.टेंब्येस्वामीमहाराजांच्या दर्शनाला जाताच, ते स्वतःहून म्हणाले, ”काही काळजी करू नका. आता अपत्य टिकेल व दीर्घायुषी होईल. तो होणारा मुलगा साक्षात्कारी, कुलोद्धारक होईल.” पुढे श्रीकृपेने सौ.पार्वतीदेवींना गर्भ राहिला व उत्तमोत्तम डोहाळे होऊ लागले. ती दिव्य गर्भलक्षणे पाहून दोघेही मनोमन सुखावले.

अधिक माहिती…

  मंगळवार दि. २३ जून १९१४ रोजी सौ.पार्वतीदेवींना असह्य प्रसूतिवेदना होऊ लागल्या. त्या जीवघेण्या परिस्थितीत त्यांनी प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांचा कळवळून धावा केला. खरे तर त्या वेळी नर्मदाकिनारी गरुडेश्वरला प.प.श्री.टेंब्येस्वामींनी आपली देहत्यागाची तयारी केली होती. पण प.प.श्री.थोरले महाराज त्यांच्यासमोर प्रत्यक्ष प्रकटले व आशीर्वाद देत म्हणाले, ”बाळ, काळजी करू नकोस. या वेदना आता थांबतील. गुरुवारी सकाळी आमच्याच पूर्णांशांनी पुत्र जन्माला येईल. त्याचे नाव ‘श्रीपाद‘ ठेवा.” त्यानुसार गुरुवारी २५ जून १९१४ रोजी सकाळी ९.२९ मिनिटांनी प.पू.श्री.मामांचा जन्म झाला. आश्चर्य म्हणजे, प.पू.श्री. मामांच्या जन्माची वेळ व प.प.श्री.टेंब्ये स्वामींचा पावन देह नर्मदेत विसर्जित करण्याची वेळ अगदी तंतोतंत जुळते. ज्यावेळी तिकडे स्वामीकुडी नर्मदेत विसर्जित झाली, त्याचवेळी इकडे स्वामीकला पुन्हा प्रकट झाली. श्रीदत्तब्रह्म कार्यासाठी पुन्हा एकदा अवतीर्ण झाले. या नित्य अवताराने फक्त आपली काया बदलली, तत्त्व तेच, फक्त भिन्न रूप धारण केले.
  श्रीपाद तीन वर्षांचा असताना पुन्हा त्यांचे बि-हाड पुण्यातून नसरापूरला हलले. श्रीपादचे शिक्षण नसरापुरात सुरू झाले. पाढे, परवचा, मूळाक्षरे तर त्याने घरीच आत्मसात केली होती. प.पू.मातु:श्री पार्वतीदेवी व पू.श्री.दत्तूअण्णा वेळोवेळी लहानग्या श्रीपादला समजेल-उमजेल अशा पद्धतीने परमार्थाचे, सदाचाराचे धडे देतच होते. श्रीपाद जात्याच अत्यंत हुशार आणि तीव्र आकलन क्षमतेचा असल्याने त्यानेही भराभर सर्व गोष्टी आत्मसात केल्या. आपल्या साधुतुल्य आई-वडिलांच्या दैनंदिन वर्तनाचेही फार महत्त्वाचे संस्कार श्रीपादच्या तरल अंतःकरणावर होत होतेच. प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांच्या जयंती दिवशी श्रीपादला ध्यानात श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकरांचे साक्षात् दर्शन झाले होते. एकदा श्रीपाद मित्रांसोबत खेळताना बनेश्वरच्या जंगलात हरवला असताना बनेश्वरच्या स्थापनेपासून तेथे असणारे साधुपुरुष श्री बुवासाहेबांचे त्याला दर्शन झाले आणि त्यांनीच त्याला घरी आणून सोडले. भोरचे पू.श्री.दत्तंभट महाराज, केडगांवचे पू.श्री.नारायण महाराज, नाशिकचे पू.श्री.गजानन महाराज गुप्ते, पू.श्री.कैवल्याश्रमस्वामी महाराज इत्यादी अनेक सत्पुरुषांचे दर्शन-सहवास व आशीर्वाद श्रीपादला लहानपणीच लाभला होता.
  प.पू.पार्वतीदेवींना ज्योतिषाचे उत्तम ज्ञान होते. त्यामुळे त्यांच्याकडे बरेच लोक पत्रिका दाखवून अडी अडचणींबाबत विचारायला येत. श्रीपादला उपजत वाचासिद्धी आहे, हे त्यांनी अनेकवेळा पाहिले होते. त्यामुळे त्या काही प्रसंगी श्रीपादला उत्तरे विचारीत आणि तो जसे सांगे तसेच पुढे घडत असे. उदरी आलेल्या श्रीदत्तप्रसादावर उत्तम संस्कार करण्याचे अत्यंत महत्त्वाचे व कठीण कार्य मातुःश्री पार्वतीदेवींनी लीलया पार पाडले. श्रीपाद बालपणापासूनच अतिशय चौकस, हुशार व प्रत्येक गोष्ट तर्काच्या घासपट्टीवर घासून पाहिल्याशिवाय स्वीकारत नसे.
  पू.श्री.दत्तूअण्णांनी श्रीपादला हिमालय यात्रेला नेले. पुढे वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी वडिलांबरोबर श्रीपादने अनवाणी नर्मदा परिक्रमादेखील केली होती. या दोन्ही यात्रांमध्ये त्याला चिरंजीव अश्वत्थामा, भगवती नर्मदामैया अशी दिव्य दर्शनेही झाली. या दोन्ही अत्यंत अवघड यात्रांना लहानग्या श्रीपादला नेण्यासाठी मातुःश्री पार्वतीदेवींनी काहीच आडकाठी केली नाही.
  श्री ज्ञानेश्वरीचा वारसा आणि वरदहस्त त्यांच्या मातुःश्री प.पू.पार्वतीदेवी यांच्या कडून लाभला होता. श्री ज्ञानेश्वरी मध्ये वर्णिलेली सिध्दांची सर्व लक्षणे त्यांच्या ठायी प्रकट झाली होती. श्री ज्ञानेश्वरीचे अनेक अभ्यासक आहेत परंतु प.पू.श्री.मामांसारखा गूढार्थ व योगार्थ जाणणारा व माउलींनी वर्णिलेला कर्म, ज्ञान, भक्ती व योग मार्ग प्रत्यक्ष आचरणारा आणि साधकांना त्याची प्रचिती आणून देण्याची क्षमता असणारे समर्थ सद्गुरु मिळणे केवळ विरळच आहे.
  प.पू.श्री.मामा ज्योतिष, आयुर्वेद, हठयोग, मंत्रशास्त्र, अध्यात्मशास्त्रामध्ये संपूर्ण पारंगत होते. आपल्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी संसारामध्ये गुरफटलेल्या जीवांनी अध्यात्माकडे वळावे व आत्मकल्याण साधावे यासाठीच केला. श्रीगुरुचरित्रामध्ये वर्णन केलेले अनेक चमत्कार, भगवान श्रीदत्तप्रभूंचेच अवतार असणाऱ्या प.पू.श्री.मामांकडूनही अगदी सहजपणे घडल्याचे दिसून येते. आपल्या सद्गुरुंप्रती आदरभाव कसा असावा याचा वस्तुपाठच त्यांनी आपल्या आचरणातून घालून दिला आहे. प.पू.श्री.गुळवणी महाराजही आपल्या शिष्याची योग्यता व महती जाणून त्यांच्याशी प्रेमाने व आदराने वागत असत.
  प.पू.श्री.मामांनी अनेकदा आसेतूहिमाचल यात्रा केल्या, आजन्म पंढरीची वारी केली. भारतामधील असे एकही तीर्थक्षेत्र नसेल की जेथे प.पू.श्री.मामा गेले नाहीत. प.पू.श्री.मामांचे थोरपण जाणून असल्यामुळे सर्व तीर्थक्षेत्रांवरील पुजारी, सेवेकरी, संतमंडळी त्यांच्याशी आदराने व आपुलकीने वागत असत. सद्गुरूंच्या आज्ञेनुसार संप्रदायाचे कार्य चालविण्यासाठी १९७३ साली प.पू.श्री.मामांनी ‘माउली‘ मठाची स्थापना केली. सद्गुरु प.पू.श्री.वा.द.गुळवणी महाराज यांच्या नावाने १९८३ साली ‘श्रीवामनराज प्रकाशना‘ची स्थापना केली. तसेच पुढे श्रीक्षेत्र आळंदी येथे सिद्धबेट तपोवन व श्रीमुक्ताई ज्ञानपीठ, कोयनानगर जवळ श्रीक्षेत्र दत्तधाम, श्रीक्षेत्र आंबेरी येथे प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज तपोवन अशा भव्य प्रकल्पांचा आराखडा रचला आणि प.पू.श्री.मामांचे उत्तराधिकारी शिष्योत्तमद्वयी प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे आणि प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी ते प्रकल्प पूर्णत्वास नेले. आध्यात्मिक व सामाजिक कार्यासाठी ‘श्रीपाद सेवा मंडळा’ची स्थापना केली.
  जिज्ञासू, आर्त, सिद्ध अशा सर्वांनाच ‘माउली’ मठ आणि वरील सर्व प्रकल्पांचे ठिकाणीही प.पू.श्री.मामांच्या सहवासात येणारा परमशांतीचा अनुभव आजही येत आहे.
जयंती : आषाढ शुद्ध द्वितीया, दि.२५ जून १९१४
पुण्यतिथी: फाल्गुन कृष्ण नवमी, दि. २१ मार्च १९९०
महत्त्वाची कार्यस्थाने : ‘माउली’ मठ पुणे, श्रीक्षेत्र दत्तधाम

प.पू.सद्‌गुरु योगिराज श्री.श्री.द.(मामा) देशपांडे महाराज

प.पू.सद्‌गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे

   प.पू.सद्‌गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे यांचे विभूतिमत्त्व आणि समस्त अवतारकार्य आश्र्चर्यचकित करणारे आणि कल्पनातीत होते. त्यांचे लौकिक आणि अलौकिक व्यक्तिमत्त्वही असाधारण, अत्यंत दिव्य; आणि अनंत दैवीसंपदांनी युक्त असणारे होते. त्यांच्या प्रेममयी श्रीमूर्तीचे केवळ ओझरते होणारे स्मरणही सात्त्विक भावविवर्धक आणि आनंदविभोर करविणारे असते. भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंचे अपरस्वरूप असलेल्या; तसेच भगवती श्रीराधिकाजींचा परिपूर्ण अवतार असलेल्या प.पू.सद्‌गुरु सौ.ताई, त्यांच्या हजारो शिष्य-भक्तजनांच्या हृदयसिंहासनांवर डौलाने विराजमान झालेल्या आहेत.
  प.पू.सौ.ताईंचे या पृथ्वीतलावर वैशाख कृ.चतुर्दशी श्रीशके १८६९; म्हणजे २० मे १९४७, सोमवार रोजी, उत्तररात्री भरणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणावर व मीन लग्नावर अवतरण झाले. ‘लोलाक्षी’ हे भगवती श्रीराधाजींचेच असलेले एक नाम त्यांचे ‘जन्मनाम’, ‘नक्षत्रनाम’ होते. उच्चविद्याविभूषित असलेले श्री.रामचंद्र घाटे आणि सौ.बिन्दुमती घाटे हे उभयता; त्यांचे भाग्यशाली, पुण्यशील पिता-माता होत. प.पू.सौ.ताईंचे शालेय शिक्षण पुण्याच्या ‘माॅडर्न हायस्कूल’मधून अगोदर मराठी आणि नंतर इंग्रजी माध्यमातून झाले. पुढे पुण्याच्याच ‘सर परशुरामभाऊ महाविद्यालया’तून त्यांचे पदवीचे (B.Sc.[Chem.]) शिक्षण झाले. त्यांनी पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण (M.Sc.[Org.Chem.]) पूर्ण केले होते. शिक्षणशास्त्राचीही पदवी (B.Ed.) त्यांनी संपादन केली होती. पुढे पुण्याच्या ‘अभिनव अभियांत्रिकी संगणक केंद्रा’तून त्यांनी कॉम्प्यूटर इंजिनिअरिंगची पदवीही (B.E.[Compu. Engg.]) प्रथम श्रेणीने मिळवली.

अधिक माहिती…

  प.पू.सौ.ताई ह्या राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट जलतरणपटू आणि ॲथेलीट होत्या. कलकत्ता येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत त्यांनी राष्ट्रीय विजेतेपद (National Championship) मिळवले होते. जलतरणातील त्यांचे काही विक्रम आजही अबाधित आहेत. Back stroke हा त्यांचा खास आवडीचा पोहण्याचा प्रकार होता. त्यांचे पोहणे शैलीदार, अत्यंत आकर्षक आणि मोहक असे. ॲथलेटिक्समध्ये ‘डिस्कस्‌ थ्रो’ हा त्यांचा Event होता. त्या प्रकारातही त्या राष्ट्रीय विजेत्या होत्या. भोपाळला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांच्या संघातील एक स्पर्धक भगिनी आजारी पडल्याने, त्यांच्या कोचने प.पू.सौ.ताईंना आयत्या वेळी ‘गोळाफेक’ही करायला लावली. त्यातही त्यांनी रजतपदक मिळवले; पण त्या गडबडीत त्यांचा गुडघा दुखावला गेला व ते दुखणे त्यांना पुढे सहा महिने पुरले.
  प.पू.सौ.ताई या जन्मतःच एकपाठी कुशाग्र बुद्धिमत्ता आणि अत्युत्कृष्ट एकाग्रता घेऊन आल्या होत्या. त्यांना हाती घेतलेले प्रत्येक काम परिपूर्णतेने करण्याचा ध्यास असे. शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात त्यांनी खेळ व अभ्यासात अनेक पदके-ट्रॉफीज मिळवल्या होत्या. शाळेत असतानाही त्या वर्ग-नायिका, शाळा-नायिका म्हणून विद्यार्थ्यांकरवी निवडल्या जात असत. त्यांच्या सर्व सहपाठी मित्र-मैत्रिणींना व त्यांच्या शिक्षक-शिक्षिकांना त्यांच्याविषयी अत्यंत प्रेम व अभिमान वाटत असे. M.Sc. केल्यानंतर त्यांनी प्राध्यापिका म्हणून ‘स.प.महाविद्यालय’, ‘फर्ग्युसन महाविद्यालय’, ‘अभिनव अभियांत्रिकी महाविद्यालय’ या संस्थांमधून शिकविण्याचे कामही केले. त्या एक उत्कृष्ट, आदर्श आणि शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून विद्यार्थीवर्गात लोकप्रिय होत्या.
  प.पू.सौ.ताईंना अगदी बालवयापासूनच परमार्थाची ओढ व आवड होती. त्यांचेकरवी त्या काळातही अनेक चमत्कार सहजगत्या घडलेले आहेत. पुढे १९७७ साली ३१ जुलैला, अधिक-श्रावणात, श्रवण-नक्षत्रावर प.पू.सद्‌गुरु श्री.मामांचा कृपाप्रसाद त्यांना लाभल्यानंतर त्यांचे पारमार्थिक-सामर्थ्य पूर्णपणे प्रस्फुटित झाले. प.पू.सद्‌गुरु श्री.मामा त्यांना आपली लेक मानत असत आणि त्यांचेविषयी सार्थ अभिमानही बाळगून असत. त्यांनी परंपरेच्या आणि श्रीभगवंतांच्या आज्ञेप्रमाणे प.पू.सौ.ताईंना सांप्रदायिक-दीक्षाधिकार देऊन, त्यांच्यावर आपल्या ‘उत्तराधिकारी’ म्हणूनही जबाबदारी सोपविलेली होती. आपल्या सद्‌गुरूंच्या आदेशाप्रमाणे प.पू.सौ.ताईंनीही अखेरच्या श्र्वासापर्यंत देश-परदेशांत प्राणपणाने, तन-मन-धनाने अत्यंत कुशलतापूर्वक संप्रदाय-सेवाकार्य संपन्न केले. आज जगाच्या पाचही खण्डांमध्ये त्यांचे हजारो चाहते, शिष्यजन, भक्तगण विखुरलेले आहेत. प.पू.सौ.ताईंचे अवघे व्यक्तिमत्त्वच अनेक दैवीगुणांनी संपृक्त झालेले होते. त्यांचे लौकिक आणि अलौकिक अस्तित्वही दिव्य होते. अष्ट-महासिद्धी, नवनिधी त्यांच्या सेवेत सदैव तत्पर असत. त्यांचे पारमार्थिक वैभव आणि सामर्थ्य कल्पनेच्याही पलीकडले होते. पण एवढे असूनही त्या आपल्या सद्‌गुरूंच्या शिकवणुकीनुसार आयुष्यभर आपले अलौकिकत्व झाकून घेऊन, सामान्यांमध्ये सहजतेने मिसळून, सामान्यांसारख्याच वागत राहिल्या.
  प.पू.सौ.ताईंचा पांचभौतिक देहही नाना शास्त्रोक्त शुभलक्षणांनी युक्त होता. त्यांच्या चालण्या-बोलण्या-वागण्यात एक राजसी ऐट आणि दैवीगुणैश्र्वर्यसंपन्नता दिसून येत असे. त्यांचा भालप्रदेश उन्नत आणि विशाल होता. कान व कानांच्या पाळ्या मोठ्या व प्रमाणबद्ध होत्या. नेत्र कमलपाकळीप्रमाणे आणि अतिशय तेजस्वी होते. त्यांची भेदक दृष्टी समोरच्या व्यक्तीचा आरपार वेध घेत असे. तरुण वयात त्यांचा काळाभोर, रेशमी-केशसंभार कमरेखाली रुळणारा असे. त्यांचे डोळे नेहमीच आत्मवेध घेत जगापासून अलिप्त, अंतर्मुख असत. अनेकदा त्या बाह्यभानावर नसत. चालता-बोलता कधीही त्या समाधिमग्न होत असत. त्यांच्या हातांच्या दहाही बोटांवर सुंदर चक्रचिन्हे होती. तळहातांवरही अंकुश, स्वस्तिक, बाण, तोमर, चामर, धनुष्य इत्यादी मंगलचिन्हे होती. त्यांच्या तळपायांवर यव, चक्र, ऊर्ध्वरेखा, कमलपुष्प, ध्वजा, चंद्रमा, पर्वत, कुण्डल, मत्स्य आदी दिव्यचिन्हेही दिसून येत. आश्र्चर्य म्हणजे, त्यांच्या तळहात-तळपायांवर त्या म्हणतील ती शुभचिन्हे निळसर प्रकाशातून प्रकट होत असत; आणि याउलट त्यांची इच्छा नसल्यास कोणतेही शुभचिन्ह शोधूनही दिसत नसे ! त्यांचे तळहात-तळपाय नवजात बालकांप्रमाणे लोण्यासारखे मऊ आणि लालसर गुलाबी असत. त्यांच्या तेजस्वी चेहेऱ्यावर नित्य अबोध शिशुंप्रमाणे निरागसता व पावित्र्य विलसत असे. त्या सदैव आनंदी असत. त्यांचे हसणे देखील मनमोकळे आणि खळखळून असे. त्यांचे बोलणे, त्यांचा स्वर अत्यंत कोमल आणि मधुर, श्रुतिप्रिय असे. आपल्या नैसर्गिक प्रेमळतेने त्या त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्यांना कधीच आपलेसे करीत असत.
  प.पू.सौ.ताई या अत्यंत मृदू, ऋजू अंतःकरणाच्या व प्रेमाची जणूकाही ओतीव मूर्तीच होत्या. समोरच्याचे दुःख त्यांना पाहवत नसे. अनेक अडल्या-नडलेल्यांना त्या उदार चित्ताने पडेल ती मदत करीत असत. त्यांच्या सहज करुणाकृपेने अनेकांचे संसार सुरळीत झाले; अनेकांची विपन्नावस्था दूर होऊन, आधिव्याधी नष्ट होऊन ते लोक समाधानी जीवन जगू लागले. त्यांच्या दयेला आणि औदार्याला सीमाच नव्हती. प्रसंगी आपल्या घरादाराचा, मुलाबाळांचा विचारही बाजूला सारून त्या गरजूंच्या मदतीला, सेवेला धावत असत. वयोवृद्धांशी, ज्येष्ठांशी त्या जितक्या आदराने, प्रेमाने वागत तितक्याच लहान मुलांमध्येही मूल होऊन रमत असत. त्यांचे स्मितहास्य अत्यंत मधुर आणि चित्तवेधक असे. आपल्या सहजसाधेपणाने, निष्कपट प्रेमाने त्या लोकांची अंतःकरणे जिंकून घेत असत. पंचमहाभूतांवर तसेच दृष्ट-अदृष्ट सृष्टीवरही त्यांची अप्रतिहत सत्ता चालत असे. त्यांना समग्र निसर्गाचीच भाषा कळत असे. वृक्ष-वेली, पशू-पक्षी, कीटक-सर्पादी त्यांना आनंदाने वश होत असत, त्यांची आज्ञा पाळीत असत. त्यांच्या मनात जे जे येई, ते ते त्वरित तसेच पूर्ण होत असे. त्यांच्या अंगी नांदणाऱ्या उपजत दैवी-सामर्थ्याच्या जोरावर त्या अक्षरशः काहीही करण्यास समर्थ होत्या. निर्जीवांवरही त्यांचा प्रभाव पडून त्या वस्तू सजीवांप्रमाणेच प्रतिसाद देत असत. त्यांच्या सान्निध्यात, अवतीभवती अनेक अतर्क्य, चमत्कारिक गोष्टी सहजपणे घडून येत असताना दिसत असत.
  प.पू.सौ.ताईंच्या कृपा-अनुग्रहाने अनेक साधक-सज्जनांनी अत्युच्च पारमार्थिक अनुभूती प्राप्त केलेल्या आहेत. त्यांच्या जगभरातील विशाल भक्तपरिवाराच्या त्या करुणावत्सल माताच होत्या. २०१९ सालच्या २५ फेब्रुवारीला, सोमवारी त्यांनी अगोदरच सूचित केल्याप्रमाणे शांतपणे भौतिक देहाची खोळ सांडली व त्या श्रीभगवंतांसह स्वधामी, गोलोकी झळाळत्या वैभवाने प्रस्थान करत्या झाल्या.
  प.पू.सौ.ताईंच्या दिव्यत्वाची काहीशी प्रचिती अनेक भक्तभाविकांनी त्यांच्या संदर्भात केलेल्या स्मृतिलेखांवरून येऊ शकते. म्हणूनच त्यांना बघू न शकलेल्या, त्यांचा परिचय नसणाऱ्या मुमुक्षू-जिज्ञासूंना त्यांच्या दैवीसामर्थ्याचे, लोकविलक्षण माधुर्याचे ओझरते का होईना दर्शन घडावे, याच सद्‌हेतूने ‘श्रीवामनराज प्रकाशना’मार्फत आम्ही त्यांचा ‘पंचखण्डात्मक बृहत्‌ स्मृतिग्रंथ’ प्रकाशित करण्याचे ठरविले आहे. श्रीसद्‌गुरुपरंपरेच्या कृपाशीर्वादाने आणि आपणां सर्वांच्या प्रेमळ सहकार्याने आमचा हा संकल्प लवकरच पूर्णत्वाला जाईल याची आम्हांला खात्री आहे.शेवटी, भगवती जगज्जननी श्रीकृष्णवल्लभा श्रीराधिकाजींचाच अद्‌भुत, अनिर्वचनीय आविर्भाव असणाऱ्या प.पू.सद्‌गुरु मातुःश्री सौ.ताईंच्या श्रीचरणीं हीच वारंवार प्रार्थना करतो की;
  नारायणि महामाये विष्णुमाये सनातनि ॥१५॥ प्राणाधिदेवी कृष्णस्य मामुद्धर भवार्णवात्‌ । संसारसागरे घोरे भीतं मां शरणागतम्‌ ॥१६॥ प्रपन्नं पतितं मातर्मामुद्धर हरिप्रिये । (१७)देहि मह्यं परां भक्तिं कृष्णेन परिसेविते । स्निग्धदूर्वाङ्‌कुरैः शुक्लपुष्पैः कुसुमचन्दनैः ॥ नार.पंच.२.४.२०॥ “हे नारायणी; हे महामाये ! हे विष्णुमाये; हे सनातनी ! हे भगवान श्रीकृष्णांच्या प्राणाधिदेवी ! या घोर संसारसागरात पतित होऊन भयभीत झालेल्या मज शरणागताचा हे माते; हे श्रीकृष्णप्रिये; या भवार्णवातून उद्धार करा ! कोमल दूर्वांकुर, श्र्वेतपुष्पे व चंदन आदींनी स्वतः भगवान श्रीकृष्ण आपली पूजा करतात. आपण (आपल्या श्रीचरणीं आश्रय देऊन) मला (उत्तम) पराभक्ती प्रदान करावी !”
जयंती: वैशाख कृष्ण चतुर्दशी, दि.२० मे १९४७
पुण्यतिथी: माघ कृष्ण सप्तमी, दि. २५ फेब्रुवारी २०१९
महत्त्वाची कार्यस्थाने : श्रीक्षेत्र आंबेरी, ‘माउली’ मठ पुणे, श्रीक्षेत्र दत्तधाम, मस्कत, दुबई, अमेरिका, ऑस्ट्रेलिया

प.पू.सद्‌गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे

प.पू.सद्‌गुरु श्री.शिरीषदादा कवडे

   प.पू.श्री.शिरीषदादांचे सुरुवातीचे शिक्षण यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे झाले. त्यांनी क-हाडच्या शासकीय इंजिनियरींग कॉलेज मधून इलेक्ट्रिकल शाखेतून बी.ई. केले. पुढे त्यांनी एम.ई. ही पदवी देखील मिळवली. त्याच काळात त्यांची व प.पू.सद्‌गुरु श्री.मामांची भेट झाली व पौष कृष्ण षष्ठी, दि.२६ जानेवारी १९८१ रोजी श्रीनृसिंहवाडी मुक्कामी त्यांना प.पू.श्री.मामांकडून कृपानुग्रह व परंपरेचे उत्तराधिकारही प्राप्त झाले. प.पू.श्री.दादांना बालवयातच ज्योतिषादी विद्यांची सिद्धी होतीच, त्यात कालौघात असंख्य गूढविद्यांचीही भर पडली. परंतु प.पू.श्री.मामांच्या कृपेने त्यांचे विश्व पूर्णत:च बदलून गेले.
  प.पू.श्री.मामांच्या आज्ञेने प.पू.श्री.दादांनी त्यावेळी नवीनच प्रकाशित होऊ घातलेल्या ‘श्रीवामनराज’ नावाच्या त्रैमासिकाचे संपादन करायला सुरुवात केली. तिथूनच त्यांच्या जगावेगळ्या संतवाङ्मयीन सेवाकार्यास सुरुवात झाली. आजमितीस प.पू.श्री.दादांच्या संपादित तसेच लिखित ग्रंथसंपदेने सव्वाशेचा आकडा पार केलेला असून, या ग्रंथांची एकत्रित पृष्ठसंख्या साधारणपणे वीस हजारांहूनही जास्तच आहे. त्यामध्ये दिवसेंदिवस भर पडतेच आहे. मराठी संतसाहित्य विभागात प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांचे नाव त्यामुळेच सर्वाग्रणी आहे. त्यांच्या काव्याचे, अभंगांचेही संग्रह प्रकाशित झालेले आहेत.
महत्त्वाची कार्यस्थाने : ‘माउली’ मठ पुणे, श्रीक्षेत्र जळगांव जामोद, सिद्धबेट तपोवन आळंदी, श्रीक्षेत्र दत्तधाम, श्रीक्षेत्र आंबेरी.

प.पू.सद्‌गुरु श्री.शिरीषदादा कवडे
9

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!

2

आपल्याला शुध्द सत्संग साधायचा आहे;
प्रत्येक क्षणाला तो मिळवायचा आहे.
"आपल्या आयुष्याचे पहिले ध्येय तेच असले पाहिजे; मग बाकीचे सगळे !"
असे जर निश्चयाने ठरवले, तरच ते साधेल.

3

श्रीसद्‍गुरुंचे आपल्याकडे सतत लक्ष असतेच;
आपलेच त्यांच्याकडे लक्ष नसते.
प्रसंगांनीच आपल्याला त्यांच्या वात्सल्यमय पांघरुणाची जाणीव होत असते.

4

सद्‍गुरूंवर, श्रीभगवंतांवर पूर्णत्वाने सगळे सोपवले पाहिजे,पूर्ण शरणागती पत्करली पाहिजे. मग भले कितीही वाईट प्रसंग आले तरी चालतील; कितीही चांगले प्रसंग आले तरी चालतील. आणि हे जर जमले; तरच त्या प्रेमाचा वसंतोत्सव अनुभवता येईल.

17

श्रीभगवंतांचे अनुसंधान, त्यांचे नामसंकीर्तन हे केवळ त्यांच्यासाठीच व्हायला हवे. त्यांच्याशिवाय त्यात इतर काहीही, एवढेसेही यायला नको. नाही तर आपले 'मी-माझे' सुटणारच नाही.

5

संसार हा एकाच गोष्टीसाठी चांगला; की संसार करता करताच सगळ्या परीक्षा होऊन जातात. मग परमार्थासाठी वेगळया परीक्षांना बसायची जरुरी नसते.

6

कुठल्या रूपाने श्रीभगवंत समोर येतील, माहित नाही! म्हणून समोर आलेल्या प्रत्येकाशी चांगलेच वागावे, नीटच वागावे. येणाऱ्याचे स्वागतच करावे; आपण अगदी त्याला ओळखत असलो तरी सुद्धा!

7

एखादी गोष्ट जर सोडायची असेल तर ते इतके सोपे नसते. आपण सोडू सोडू असे नुसते म्हणतो; मात्र ते सुटत नाही. पण जर कोणी दणका घातला तर मात्र ते लगेच सुटते. हा दणका कोण घालते? तर ते सद्‍गुरु घालतात; बरोबर योग्य वेळी घालतात. असा दणका मिळाला की, ती गोष्ट जागच्या जागी सुटते.

1

सद्‍गुरूंचा विश्वास निर्माण व्हावा, ह्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यांनी सांगितलेले नीट ऐकून मनापासून करावे लागते; आणि शिवाय ते आपले म्हणून करावे लागते !

8

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

10

हरिभजनाला, नामस्मरणाला उशीर करण्यात काही अर्थ नाही. जेवढा उशीर कराल, तेवढे आयुष्य हातातून निघून गेले असे समजायचे. म्हणून आपला एकही क्षण वाया जाणार नाही असा कसोशीने प्रयत्न तरी करायचा; म्हणजे निदान एक क्षण तरी मुखी नाम येईल.

11

आपल्या प्रत्येक कृतीमध्ये असे काही तरी
असावे की, जे श्रीभगवंतांना पोहचले पाहिजे.
.... आणि असे विचार येऊ लागले की समाजावे,
आपण अगदी योग्य दिशेला चाललो आहोत!

12

एक लक्षात ठेवा; कधीही, कितीही, कशीही कर्मे पुढे आली तरी ती नि:स्पृहपणे करायचा प्रयत्न करावा. शिवाय त्याच्यात दुसऱ्याला बुडवायचा चुकून सुद्धा विचार करू नये. जेवढा बुडवायचा विचार येईल, त्याच्या शंभर पटींनी भरावे लागेल हे लक्षात ठेवावे.

13

साधना जेव्हा मिळते तेव्हा; आपण जर लक्षात ठेवले असेल तर; असे आठवेल की, सद्‍गुरूंनी वेगळेच सांगितलेले असते आणि आपण मात्र ते ऐकूनही तिसरेच करत असतो.
शिवाय वर त्यांनाच विचारत असतो की; अहो आम्हांला अनुभव कसा नाही?

14

जितका साधनेचा निर्णय आपण पुढे ढकलू तितका आयुष्यातील वेळ वाया जात जाईल आणि आयुष्याच्या
शेवटी श्रीभगवंत काही भेटणार नाहीत. मग शेवटी त्यांचे नाम आठवणार नाही किंवा रूपही आठवणार नाही.

15

शांतपणे कर्मांचा उपभोग न घेणे
हे घातक ठरणारे असते.
पण तोच अलिप्तपणा जमला पाहिजे .

16

आपले कुठल्याही गोष्टींकडे दुर्लक्ष जरी झाले,तरी श्रीभगवंतच आपल्याला सांभाळून घेतात. ते आपल्याला कमीपणा येऊन देत नाहीत; कारण आपण त्यांचे नाम घेतोय ना? त्यांना तेच तर हवे असते. म्हणूनच कोठल्याही परिस्थितीत नामस्मरण सोडू नये.