एक भव्य स्मारक:

 पुण्यात आनंदनगरात आपण प्रवेश केला की उजव्या बाजूस स्वरनगरीच्या डावीकडे ‘श्रीपादनिवास’ ही प्रशस्त वास्तू डौलाने उभी आहे.

 परमपूज्य सद्गुरु मामांचे हे पवित्र मंदिर असून दि. २७ मार्च २००० रोजी ‘श्रीपादनिवास’ या वास्तूची पूजा झाली. दत्तलोकनिवसिनी परमपूज्य सद्गुरु सौ. शकुंतलाताई आगटे व प.पू. सद्गुरु श्री. शिरीषदादा कवडे महाराज यांनी सद्गुरु परंपरेच्या व परमपूज्य सद्गुरु तीर्थरूप श्री. मामा महाराजांच्या प्रतिमांसह मंगल कलश घेऊन वास्तुप्रवेश केला. तदनंतर सुवासिनींनी पंचारतींनी सद्गुरूंना औक्षण केले व वास्तुशांतीचा कार्यक्रम परमपूज्य सद्गुरु श्री. शिरीषदादांचे मंगलहस्ते सुसंपन्न झाला. दुपारी ४ वाजता मंत्रजागर, सायंकाळी सामुदायिक साधना, आरती – करुणात्रिपदीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.

 स्वरनगरी रस्त्यालगतच्या प्रशस्त व डौलदार कमानीतून या इमारतीच्या प्रांगणात प्रवेश करताच डाव्या बाजूस श्रीदत्तमहाराजांना परमप्रिय असलेला औदुंबर वृक्ष आपली प्रेमळ छाया सर्वांना देत उभा आहे.



प.पू. सद्‌गुरु श्रीमामामहाराजांचे स्मृतिमंदिर:

‘श्रीपादनिवास’ या इमारतीच्या तळमजल्यावर सुंदर व टुमदार अशा गाभाऱ्यात परमपूज्य सद्गुरु तीर्थरूप मामांच्या पंचधातूमध्ये घडविलेल्या ओतीव मूर्तीचे आपल्याला छान व निवांत दर्शन होते. या मूर्तीलगत अनंतकोटी ब्रह्मांडनायक सद्गुरु स्वामी समर्थ महाराज यांची सोनेरी प्रभा असलेली नितांत सुंदर मूर्ती व श्रीभगवंतांच्या लोभस पादुकांचे तसेच कूर्म-दर्शन पण आपणांस होते. रोज या ठिकाणी सकाळी नित्य पंचामृत पूजा होते. सकाळी व सायंकाळी आरती होते. या ठिकाणी प.पू. सद्गुरु श्री. मामा महाराजांचे दर्शन घेऊन साधकांचे मन भावविभोर होते. परमपूज्य सद्गुरु श्री. मामा महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी इथेच श्री. राजोपचार पूजा संपन्न होते. काही वैयक्तिक विशेष प्रसंगी साधक सद्भक्त या ठिकाणी पूर्वसूचना देऊन परमपूज्य मामांच्या पादुकांवर अभिषेक पण करू शकतात. परमपूज्य मामांना वंदन करून गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा घालताना प्रदक्षिणा मार्गालगतच्या भिंतींवर आपल्या परंपरेतील सर्व महात्म्यांच्या अतीव सुंदर प्रतिमा असून भक्तजन त्यांचे दर्शन घेऊन सुखावतात.

‘श्रीपादनिवास’ इमारतीमध्ये वर जाण्यास उद्वाहनाची सोय करण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावर ‘श्रीवामनराज’ प्रकाशनाचे कार्यालय असून तेथे प्रकाशनाद्वारे प्रकाशित सर्व पुस्तके बघता येतात तसेच खरेदी करता येतात. आपल्याच साधक भगिनी कर्तव्य तत्परतेने आपल्याला हवी ती पुस्तके उपलब्ध करून देतात.



प.पू. श्रीमामासाहेब देशपांडे साधनागृह:

  दुसऱ्या मजल्यावर परमपूज्य सद्गुरु श्रीमामा महाराज यांचे नामाभिधान असलेले प्रशस्त साधना-सभागृह आहे. परमपूज्य सद्गुरु श्रीमामा महाराज व श्रीस्वामी समर्थ महाराज याच्या सुंदर प्रतिमांचे तसेच परमपूज्य सद्गुरु तीर्थरूप मामामहाराजांच्या परम पवित्र पादुकांचे मंगल दर्शन येथे आपणांस होते. येथे दर रविवारी सकाळी ७ ते ८ सामुदायिक साधना होते. आपले परंपरेचे तसेच वाचनालयाचे अनेक कार्यक्रम पण येथे होतात. पूर्वी परमपूज्य सद्गुरु तीर्थरूप मामा महाराजांच्या पुण्यतिथीचे अनेक कार्यक्रम येथे संपन्न झाले आहेत.

प.पू. सद्‌गुरु सौ. शकुंतलाताई आगटे सभागृह:

 तिसऱ्या मजल्यावर प.पू. सद्गुरू सौ. शकुंतलाबाई आगटे सभागृह आहे. परमपूज्य सद्गुरु सौ. ताईमहाराज व श्रीभगवंत यांच्या प्रतिमा या ठिकाणी समोरासमोर आहेत. दर रविवारी सकाळी ७ ते ८ वाजताचे दरम्यान साधक भगिनी येथे सामुदायिक साधनेसाठी एकत्र येतात. या दोन्ही सभागृहांत परमपूज्य सद्गुरु श्रीदादामहाराजांची अनेक प्रवचने संपन्न झाली आहेत.

 आपल्या सर्वांसाठी ही वास्तू नितांत प्रसन्न आणि प्रेरणादायी आहे !

9

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!

2

आपल्याला शुध्द सत्संग साधायचा आहे;
प्रत्येक क्षणाला तो मिळवायचा आहे.
"आपल्या आयुष्याचे पहिले ध्येय तेच असले पाहिजे; मग बाकीचे सगळे !"
असे जर निश्चयाने ठरवले, तरच ते साधेल.

3

श्रीसद्‍गुरुंचे आपल्याकडे सतत लक्ष असतेच;
आपलेच त्यांच्याकडे लक्ष नसते.
प्रसंगांनीच आपल्याला त्यांच्या वात्सल्यमय पांघरुणाची जाणीव होत असते.

4

सद्‍गुरूंवर, श्रीभगवंतांवर पूर्णत्वाने सगळे सोपवले पाहिजे,पूर्ण शरणागती पत्करली पाहिजे. मग भले कितीही वाईट प्रसंग आले तरी चालतील; कितीही चांगले प्रसंग आले तरी चालतील. आणि हे जर जमले; तरच त्या प्रेमाचा वसंतोत्सव अनुभवता येईल.

17

श्रीभगवंतांचे अनुसंधान, त्यांचे नामसंकीर्तन हे केवळ त्यांच्यासाठीच व्हायला हवे. त्यांच्याशिवाय त्यात इतर काहीही, एवढेसेही यायला नको. नाही तर आपले 'मी-माझे' सुटणारच नाही.

5

संसार हा एकाच गोष्टीसाठी चांगला; की संसार करता करताच सगळ्या परीक्षा होऊन जातात. मग परमार्थासाठी वेगळया परीक्षांना बसायची जरुरी नसते.

6

कुठल्या रूपाने श्रीभगवंत समोर येतील, माहित नाही! म्हणून समोर आलेल्या प्रत्येकाशी चांगलेच वागावे, नीटच वागावे. येणाऱ्याचे स्वागतच करावे; आपण अगदी त्याला ओळखत असलो तरी सुद्धा!

7

एखादी गोष्ट जर सोडायची असेल तर ते इतके सोपे नसते. आपण सोडू सोडू असे नुसते म्हणतो; मात्र ते सुटत नाही. पण जर कोणी दणका घातला तर मात्र ते लगेच सुटते. हा दणका कोण घालते? तर ते सद्‍गुरु घालतात; बरोबर योग्य वेळी घालतात. असा दणका मिळाला की, ती गोष्ट जागच्या जागी सुटते.

1

सद्‍गुरूंचा विश्वास निर्माण व्हावा, ह्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यांनी सांगितलेले नीट ऐकून मनापासून करावे लागते; आणि शिवाय ते आपले म्हणून करावे लागते !

8

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

10

हरिभजनाला, नामस्मरणाला उशीर करण्यात काही अर्थ नाही. जेवढा उशीर कराल, तेवढे आयुष्य हातातून निघून गेले असे समजायचे. म्हणून आपला एकही क्षण वाया जाणार नाही असा कसोशीने प्रयत्न तरी करायचा; म्हणजे निदान एक क्षण तरी मुखी नाम येईल.

11

आपल्या प्रत्येक कृतीमध्ये असे काही तरी
असावे की, जे श्रीभगवंतांना पोहचले पाहिजे.
.... आणि असे विचार येऊ लागले की समाजावे,
आपण अगदी योग्य दिशेला चाललो आहोत!

12

एक लक्षात ठेवा; कधीही, कितीही, कशीही कर्मे पुढे आली तरी ती नि:स्पृहपणे करायचा प्रयत्न करावा. शिवाय त्याच्यात दुसऱ्याला बुडवायचा चुकून सुद्धा विचार करू नये. जेवढा बुडवायचा विचार येईल, त्याच्या शंभर पटींनी भरावे लागेल हे लक्षात ठेवावे.

13

साधना जेव्हा मिळते तेव्हा; आपण जर लक्षात ठेवले असेल तर; असे आठवेल की, सद्‍गुरूंनी वेगळेच सांगितलेले असते आणि आपण मात्र ते ऐकूनही तिसरेच करत असतो.
शिवाय वर त्यांनाच विचारत असतो की; अहो आम्हांला अनुभव कसा नाही?

14

जितका साधनेचा निर्णय आपण पुढे ढकलू तितका आयुष्यातील वेळ वाया जात जाईल आणि आयुष्याच्या
शेवटी श्रीभगवंत काही भेटणार नाहीत. मग शेवटी त्यांचे नाम आठवणार नाही किंवा रूपही आठवणार नाही.

15

शांतपणे कर्मांचा उपभोग न घेणे
हे घातक ठरणारे असते.
पण तोच अलिप्तपणा जमला पाहिजे .

16

आपले कुठल्याही गोष्टींकडे दुर्लक्ष जरी झाले,तरी श्रीभगवंतच आपल्याला सांभाळून घेतात. ते आपल्याला कमीपणा येऊन देत नाहीत; कारण आपण त्यांचे नाम घेतोय ना? त्यांना तेच तर हवे असते. म्हणूनच कोठल्याही परिस्थितीत नामस्मरण सोडू नये.