|| श्री ||
श्रीक्षेत्र दत्तधाम येथे संपन्न झालेल्या भगवान श्रीदत्तात्रेय जयंती महोत्सवाचा वृत्तांत
मार्गशीर्ष शु.१४, शनिवार दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी, श्रीक्षेत्र दत्तधाम येथील भगवान श्रीदत्तात्रेय जयंतीचा महोत्सव प्रतिवर्षीप्रमाणेच मोठ्या उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
संक्षिप्त चलतचित्र
श्रीदत्त जयंतीच्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत गडावर दर्शनार्थींचा अखंड ओघ सुरू होता. ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या साधक बंधुभगिनींबरोबरच चिपळूण, कऱ्हाड, पाटण, कोयनानगर या भागांतील अनेक भाविकही आवर्जून भगवान श्रीदत्तप्रभूंच्या दर्शनाला येत होते. श्रीदत्तजयंती महोत्सवानिमित्त मंदिरावर केलेली दिव्यांची रोषणाई, फुलांच्या आकर्षक माळांची सजावट, ठिकठिकाणी काढलेल्या छोट्याच पण मनमोहक रांगोळ्या या साऱ्यांमुळे येणाऱ्या भक्तजनांना प्रसन्नतेचा अनुभव येत होता. अनेक सज्जनांनी ‘श्रीवामनराज प्रकाशना’च्या आणि ‘अमृतबोध’च्या स्टॉलला भेट दिली आणि शुद्ध परमार्थ सांगणाऱ्या या ग्रंथांची खरेदीही केली.
श्रीदत्त जन्मोत्सव आणि पालखी-सोहळा नीट पाहता यावा म्हणून उपस्थित साधक-सद्भक्त आधी मुख्य मंदिरामधील भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महराजांचे, नामसमाधी मंदिरात प.पू.सद्गुरु श्री.मामांचे, श्रीविठ्ठल-रखुमाई यांचे व श्रीयंत्राचे दर्शन घेऊन दुपारी तीन वाजल्यापासूनच मंदिर-प्रांगणात आसनस्थ होऊ लागले. साधारणपणे चार-साडेचार वाजेपर्यंत मंदिराचे प्रांगण सद्भक्तांच्या गर्दीने पूर्ण भरून गेले.
सायंकाळी नियोजित वेळी ‘श्रीदत्तभावांजली’ स्तोत्रपठण, पुरुषसूक्त पठण, ‘श्रीगुरुचरित्रा’तील भगवान श्रीदत्तप्रभूंच्या जन्माध्यायाचे वाचन, सामुदायिक नामस्मरण आणि आरती हे कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर लगेचच पालखी-सोहळा सुरू झाला. पालखी-सोहळ्यामध्ये स्वतः प.पू.सद्गुरु श्री. शिरीषदादा आणि प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा उपस्थित होते. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी एक सालंकृत शुभ्रवर्णी अश्व पालखी-सोहळ्यात सहभागी झाला होता. पांढऱ्याशुभ्र पोशाखातील टाळकरी, राजदंड, सूर्य-चंद्र चिन्हांकित अब्दागिऱ्या, चवऱ्या, मोरचेल घेणारे साधकबंधू, मशालजी, तुतारीवादक, पारंपरिक पोशाखातील चोपदार या साऱ्यांसह सज्ज असणाऱ्या सुशोभित पालखीत विराजमान असणाऱ्या देवांचे दर्शन घेणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता.
प्रारंभी प.पू.सद्गुरु श्री.दादांनी ‘रूप पाहतां लोचनीं’ हा अभंग गायिला. त्यानंतर ‘धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची’ या पदाने पालखी-सोहळ्यास सुरुवात झाली. त्या वेळी प.पू.श्री.सद्गुरु श्री.शिरीषदादांनी व टाळकऱ्यांनी केलेली पावली बघताना सर्वांनाच अवर्णनीय आनंद होत होता. पालखीच्या तीन प्रदक्षिणांमध्ये ‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ हे नामगजर तसेच ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या महामंत्राचा गजर केला गेला. त्याबरोबरच प्रत्येक थांब्यावर ‘दत्ता ब्रह्मचारी’, ‘पैल मेरूच्या शिखरीं’, ‘नामसंकीर्तन साधन पै सोपे’ इत्यादी अभंगांचे तसेच ‘करुणात्रिपदी’चेही गायन करण्यात आले. हा देवदुर्लभ सोहळा कधी संपूच नये असे सर्व उपस्थितांना वाटत होते.
पालखी-सोहळा संपन्न झाल्यानंतर उपस्थित भाविकांनी शिस्तबद्ध रीतीने भगवान श्रीदत्तात्रेयांचे दर्शन घेतले. ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या नाशिक येथील साधक बंधुभगिनींनी सर्व उपस्थितांना सेवाभावाने उपवासाच्या पदार्थांचे वितरण केले. सर्व उपस्थितांनी अत्यंत भावभरल्या अंतःकरणाने श्रीक्षेत्र दत्तधामचा निरोप घेतला.