

|| श्री ||
श्रीक्षेत्र जळगांव (जामोद) केंद्रामध्ये संपन्न झालेल्या युवा साधक शिबिराचा वृत्तांत

‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या जळगांव-जामोद केंद्रामध्ये दिनांक २५ व २६ जानेवारी २०२५ असे दोन दिवस, प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या पावन उपस्थितीत युवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
संक्षिप्त चलतचित्र

या शिबिरात जळगांव-जामोदसह अकोला, अमरावती, वर्धा, मलकापूर, यवतमाळ, लोणार, मेहकर, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, लातूर, सोलापूर अशा विविध केंद्रांतून अनेक युवा साधक-बंधुभगिनी सहभागी झाले होते. शनिवार दिनांक २५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता सामुदायिक साधनेने शिबिराला सुरुवात झाली. चहापानानंतर ९ ते ९.३० या वेळेत सर्व साधकांनी आपापला परिचय करून दिला. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता शिबिराचे पहिले सत्र सुरू झाले. प्रारंभी प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी प्रास्ताविक करताना शिबिराचे प्रयोजन सर्वांसमोर मांडले. २०१९ साली आळंदी येथे असे पहिले युवा साधक शिबिर घेण्यात आले होते. मुख्यत्वेकरून त्या शिबिराला उपस्थित राहू न शकलेल्या साधकांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
विविध केंद्रांतील नवीन, युवा साधकांना आपल्या दिव्य- सद्गुरुपरंपरेचा व संप्रदायाचा परिचय व्हावा, प.पू.सद्गुरु श्री.मामांनी स्थापन केलेल्या ‘श्रीपाद सेवा मंडळ’ या आपल्या संस्थेची उद्दिष्टे कळावीत, मंडळाचे विविध प्रकल्प तसेच राबविले जाणारे विविध उपक्रम यांची माहिती व्हावी, असा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी सांगितले. ‘‘शिबिराच्या ह्या दोन दिवसांत उपस्थित साधकांनी परमार्थासंबंधी अधिकाधिक चर्चा करावी. मोबाईलचा अनावश्यक वापर कटाक्षाने टाळावा!’’ असेही त्यांनी या वेळी बजावले.
पहिल्या सत्रात, ‘अनुग्रह म्हणजे काय ?’ याविषयी सांगताना प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी असे सांगितले की, ‘‘एखाद्या जीवापाशी पाप आणि पुण्याचा सम प्रमाणात संचय झाला की त्याला भूलोकाची म्हणजे पृथ्वीलोकाची प्राप्ती होते व मनुष्यजन्म मिळतो. अशा या दुर्मिळ मनुष्यजन्माची प्राप्ती झाली तरी, कलियुगाचा महिमा पाहता आत्ताच्या काळात आपल्याला अधिकारी सत्पुरुषांची भेट होईलच असे नाही; आणि जरी त्यांची भेट झाली तरी प्रबळ प्रापंचिक कर्मांमुळे त्यांना अनुग्रहाविषयी विचारण्याची बुद्धी प्रत्येकाला होईलच असेही नाही. परंतु आपल्याला सर्वांना अत्यंत दिव्य अशा सद्गुरु-परंपरेकडून शक्तिपाताचा अनुग्रह झालेला आहे, ही महद्भाग्याची गोष्ट आहे. ‘संप्रदाय’ या शब्दातील ‘सं’ म्हणजे ‘भगवती शक्ती’; आणि ती प्रदान करण्याचे म्हणजेच श्रीभगवंतांची प्रेमशक्ती साधकहृदयात प्रतिष्ठापित करण्याचे परममंगल कार्य या संप्रदायकार्यरूपाने आपली दिव्य-सद्गुरुपरंपरा करीत असते. आपल्या परंपरेत भगवान श्रीदत्तात्रेयप्रभू हेच सद्गुरु असून ते श्रीभगवंतांचे परिपूर्ण अवतार आहेत. कुठल्याही प्रकारचे व्यावहारिक ज्ञान देणारे हे ‘गुरु’ असतात, तर आत्मज्ञानाची, मोक्षाची प्राप्ती करवून देणारे हे ‘सद्गुरु’ असतात !’’
अशी महत्त्वपूर्ण माहिती सांगून झाल्यानंतर प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी सर्व साधकांना ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की; ‘‘प.पू.सद्गुरु योगिराज श्री.गुळवणी महाराजांच्या आदेशानुसार, दिनांक २६ डिसेंबर १९७३ रोजी पुण्यातील नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्त्यावरील) आनंदनगर परिसरात ‘श्रीपाद सेवा मंडळा’चे ‘माउली’ हे मुख्य कार्यालय स्थापन करण्यात आले. मंडळाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व प्रकल्पांचे आराखडे हे प.पू.सद्गुरु श्री.मामांच्या समोर मांडले गेले होते आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणेच पुढील नियोजन होऊन आता ते प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाले आहेत. ‘श्रीपाद निवास’ हा एकच प्रकल्प याला अपवाद आहे. प.पू.सद्गुरु श्री.मामांनी लौकिकदृष्ट्या देहत्यागाची लीला केल्यानंतर, ‘आपल्या सद्गुरूंचे स्वतंत्र असे एखादे पवित्र स्थान असावे’, असे प.पू.सद्गुरु सौ.ताई व प.पू.सद्गुरु श्री.दादा यांना प्रकर्षाने वाटू लागले. त्यानुसार दिनांक २७ मार्च २००० रोजी, ‘श्रीपाद निवास’ या वास्तूत प.पू.सद्गुरु श्री.मामांच्या पंचधातूंमध्ये घडविलेल्या आसनस्थ ओतीव पूर्णाकृती मूर्तीची आणि श्रीपादुकांची प्राणप्रतिष्ठा होऊन तेथे त्यांचे मंदिर साकारण्यात आले. याच वास्तूच्या पहिल्या मजल्यावर प.पू.सद्गुरु श्री.मामांनी स्थापन केलेल्या ‘श्रीवामनराज प्रकाशना’चे मुख्य कार्यालय आहे.
फाल्गुन शुद्ध द्वादशी; दिनांक ८ मार्च १९९०; या दिवशी प.पू.सद्गुरु श्री.मामांच्या हस्ते हेळवाक येथील डोंगरावरील मंदिरात भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पंचधातूंच्या पूर्णाकृती श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना झाली. याच स्थानाला ‘श्रीक्षेत्र दत्तधाम’ व महाराष्ट्रातील ‘दक्षिण गिरनार’ असे संबोधले जाते. त्यानंतर काही काळाने वैशाख शु.पंचमी, दिनांक ११ मे १९९७ या दिवशी, ‘कै.श्री.आबासाहेब देशपांडे स्मृति श्रीदत्तमंदिर, श्रीक्षेत्र जळगांव (जामोद)’ ह्या प्रकल्पस्थानी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ही प्रसन्न बालमूर्ती भक्तजनांचे मन मोहून घेते. हे श्रीदत्तमंदिर प.पू.सद्गुरु श्री.मामा आणि प.पू.सद्गुरु श्री.दादा या गुरुशिष्यांच्या प्रेमाचे व कौतुकपूर्तीचे एक अद्वितीय उदाहरण आहे. या प्रकल्पस्थानी ज्या ठिकाणी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापित आहे त्याच ठिकाणी श्रीदत्तसंप्रदायातील थोर अधिकारी विभूतिमत्त्व आणि प.पू.सद्गुरु श्री.मामांचे उत्तराधिकारी प्रिय शिष्य प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांचा जन्म झालेला आहे. श्रीदत्तसंप्रदाय व श्रीनृसिंह भगवंतांचा अन्योन्य संबंध ध्यानात घेऊन, पुढे २०१४ साली या स्थानी तळघरात असलेल्या साधनागृहात भगवान श्रीलक्ष्मीनृसिंहांच्या मूर्तीचीही प्रतिष्ठापना करण्यात आली.
‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या काही मुख्य प्रकल्पांपैकी पूर्णपणे कार्यान्वित असलेला आणखी एक प्रकल्प म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील ‘प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तपोवन’ हा होय. प.पू.सद्गुरु श्री.मामांचे एक साधक श्री.भाऊ आळवे यांनी पूर्वीच येथील आपली पाच एकर जमीन श्रीसद्गुरूंच्या चरणीं अर्पण केली होती. श्रीदत्तसंप्रदायातील थोर अधिकारी विभूतिमत्त्व व प.पू.सद्गुरु श्री.मामांच्या उत्तराधिकारी परमशिष्या प.पू.सद्गुरु सौ.शकुंतलाताई आगटे यांच्या अथक परिश्रमांतून दिनांक २८ ऑक्टोबर २००५ रोजी हा प्रकल्प कार्यान्वित झाला. येथे भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंचे अतिशय सुंदर व भव्य असे मंदिर उभारलेले आहे.
याच मंदिरात दोन उपमंदिरे असून तेथे अनंतकोटिब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज व प.प.श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्याही मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंनी देह ठेवल्यानंतर काही काळाने दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी, प.पू.श्री.दादांच्या मार्गदर्शनानुसार या प्रकल्पस्थानी प.पू.सद्गुरु सौ.ताईंच्या ‘श्रीचरणाधिष्ठान मंदिरा’ची विधिवत् स्थापना करण्यात आली. हे मंदिर जेथे उभे आहे त्या स्थानी पूर्वी एक छोटे कौलारू शेतघर(कुटी) होते. प.पू.सौ.ताई त्यांच्या या अत्यंत प्रिय स्थानाला ‘रास-निकुंज’ असे संबोधत असत !’’ अशा प्रकारे प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी उपस्थित सर्व साधकांना आपल्या मंडळाच्या विविध प्रकल्पांची सविस्तर ओळख करून दिल्यानंतर शिबिराच्या प्रथम दिवसाच्या प्रथम सत्राची सांगता झाली.
चहापानानंतर ठीक अकरा वाजता द्वितीय सत्र सुरू झाले. त्यात प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी उपस्थित साधकांना ‘श्रीपाद सेवा मंडळा’ची उद्दिष्टे समजावून सांगितली. या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की; ‘‘ ‘माणुसकी’ तसेच ‘समता’, ‘एकता’ आणि ‘विश्वबंधुता’ या तत्त्वांचा प्रचार व प्रसार करणे हे मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. निसर्गातील सर्व घटकांबद्दल हृदयात प्रेमभाव असणे म्हणजे ‘समता’ होय. प.पू.सद्गुरु सौ.ताईंना निसर्गातील सर्व प्राणिमात्रांबद्दल असे निखळ प्रेम वाटत असे. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे म्हणजे ‘माणुसकी’ होय, असे प.पू.सद्गुरु श्री.मामा सांगत असत. संप्रदाय, धर्म, वर्ण, जाती, लिंग, प्रदेश, भाषा आदी निकषांवर भेदभाव न करता, परमार्थाची खरी तळमळ असणाऱ्या प्रत्येक जीवाला आत्मोन्नतीसाठी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे, अशी मंडळाची विचारधारणा आहे.
आरोग्यप्राप्ती, बलसंवर्धन आणि आध्यात्मिक उन्नतीकरिता योगसाधना करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना त्यासंबंधी संसाधने, मार्गदर्शन आणि वातावरण उपलब्ध करून देण्याचे कार्य मंडळातर्फे केले जाते. आपल्या सर्वच प्रकल्पांवर, परंपरेतील महात्म्यांच्या जयंती-पुण्यतिथींच्या विविध उत्सवप्रसंगी वेळोवेळी सामुदायिक साधनेचे तसेच कृपायोग शिबिरांचे आयोजन मंडळाद्वारे करण्यात येते. याशिवाय समाजातील गरजू घटकांना अन्नदान करणे व त्यासाठी विशिष्ट निधी उपलब्ध करवून त्या निधीच्या व्याजातून किंवा प्रत्यक्ष निधीतून अन्नदानासाठी, गरजू व्यक्तींच्या आरोग्यासाठी, होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करणे असेही उपक्रम सातत्याने राबविले जातात. प्रपंचाची चिंता सोडून साधकांनी परमार्थमार्गावर अग्रेसर व्हावे, असा मुख्य हेतू त्यामागे असतो!’’ प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी आपल्या मंडळाच्या प्रकल्पांच्या संदर्भातील अशी महत्त्वपूर्ण माहिती सांगून झाल्यावर या दुसऱ्या सत्राची सांगता झाली.
भोजन व विश्रांतीनंतर दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत ‘श्रीविष्णुसहस्रनाम’, ‘श्रीकृष्णाष्टकम्’, ‘श्रीगोविन्दाष्टकम्’, ‘श्रीअच्युताष्टकम्’, ‘श्रीमधुराष्टकम्’, ‘अपराधक्षमापनस्तोत्रम्’ आदी स्तोत्रांचे सामुदायिक पठण करण्यात आले. तदनंतर ५ ते ६.३० या काळात झालेल्या तिसऱ्या सत्रात, प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी अभ्यासाचे अंतरंग आणि बहिरंग असे दोन प्रकार सांगितले. ‘अंतरंग अभ्यास’ म्हणजे सद्गुरुप्रदत्त साधना व मानसपूजा होय; तर ‘बहिरंग अभ्यास’ म्हणजे आपल्या परंपरेच्या सद्ग्रंथांचे वाचन, अनुष्ठान, पारायण इत्यादी करणे होय.
या सत्रात जळगांव जामोद प्रकल्पस्थानावर पूर्ण वेळ सेवेला असणारे साधक श्री.महेश राय यांनी आपल्या परंपरेच्या अनमोल अशा वाङ्मयसंपदेचे ‘श्रीवामनराज प्रकाशना’ने प्रकाशित केलेले दहा विभाग सांगितले. संतांची पावन चरित्रे; स्मृतिग्रंथ; पारायण ग्रंथ; उपासना-स्तोत्रग्रंथ; साधनाविषयक अभ्यासग्रंथ; प.पू.सद्गुरु श्री.मामा, प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताई व प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा यांच्या प्रवचनांचे संकलन असणारी ग्रंथसंपदा; तसेच श्रीसद्गुरूंच्या अभंगरचनांचे संग्रह; संप्रदाय तत्त्वज्ञानसंबंधी आवश्यक त्या संस्कृत ग्रंथांचे अनुवाद असणारे ग्रंथ इत्यादी ते विभाग होत. ‘श्रीवामनराज प्रकाशना’ची ही सर्व ग्रंथसंपदा ‘ना नफा तत्त्वा’वर अत्यल्प दरात सर्वांसाठी उपलब्ध आहे.
ह्या प्रसंगी बोलताना प.पू.श्री.अनिरुद्धदादा म्हणाले की; ‘‘आपल्या सद्गुरुपरंपरेने आपल्यासाठी एवढे अमोघ व दुर्मिळ वाङ्मयाचे भांडार निर्माण करून ठेवलेले आहे. त्यामुळे परमार्थपथावर अग्रेसर होण्यासाठी ह्या सद्ग्रंथांचा नियमित व प्रेमाने अभ्यास करणे ही प्रत्येक साधकाची जबाबदारी आहे. आत्ताच्या पिढीने वाचायला वेळ मिळत नाही, हे कारण देणे अतिशय चुकीचे आहे व ते अजिबात मान्य होण्यासारखे नाही. हाच अमूल्य वेळ आपण कितीतरी तास सोशल मिडियावर वाया घालवतो व त्याने आपलेच नुकसान करून घेतो. त्यामुळे आपल्याला झालेल्या अनुग्रहाचे महत्त्व जाणून नियमितपणे हा अभ्यास वेळीच करायला हवा!’’

संध्याकाळी ६.३० ते ७.३० या काळात मुख्य मंदिरात नित्याप्रमाणे देवांची आरती झाली व भोजनानंतर रात्री नऊ वाजता प.पू.श्री.अनिरुद्धदादांच्या पावन उपस्थितीत काही साधक-बंधुभगिनींनी सुश्राव्य अभंगगायन-सेवा श्रीसद्गुरुचरणीं रुजू केली. कु.शाल्मली भालेराव ह्यांनी अतिशय गोड आवाजात ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’, ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म’ आणि ‘श्रीस्वामीसमर्थ नामपाठा’तील ‘सुवर्ण झळाळ, दिव्य परिमळ’ हे अभंग उत्तमरित्या सादर केले. श्री.श्रेयस पाटील ह्यांनी प.पू.सद्गुरु शिरीषदादांच्या ‘आपुलिया चित्ता जेणे आठव’ ह्या अभंगाला स्वतः चाल लावून तो गायिला. तसेच त्यांनी ‘माझा भाव तुझे चरणीं’, ‘बोलावा विठ्ठल’ हेही अभंग उत्तमरित्या सादर केले. श्री.सोहम बगे ह्यांनी ‘जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ’ हा अभंग व श्रीसंत सखुबाईंची ‘दह्या-दुधाचे माठ मोलाचे नीट धरावे जपून’ ही गौळण गाऊन कार्यक्रमाला रंगत आणली. श्री.सारंग पाटील ह्यांनी ‘भीमा अमरजा संगमतीरी’ ह्या अभंगाने सर्वांना श्रीक्षेत्र दत्तधाम येथे होणाऱ्या पालखी-सोहळ्याची आठवण करून दिली. श्री.अंबरीश देशपांडे ह्यांनी श्री गुरुनानकदेव रचित ‘जो नर दुःख में दुःख नही माने’ हा अभंग गायिला. अभंगगायन-सेवेचा शेवट श्री.श्रेयस पाटील ह्यांनी ‘स्वामी कृपा कधी करणार’ ही भैरवी गाऊन केला. कार्यक्रमाच्या अखेरीस प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी झालेल्या गायन-सेवेप्रति समाधान व्यक्त केले व त्यानंतर शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमांची समाप्ती झाली.
रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी, पहाटे ठीक ४.४५ वाजता प.पू.श्री.अनिरुद्धदादांच्या मंगल उपस्थितीत सामुदायिक साधनेने कार्यक्रमांना सुरुवात झाली. साधनेनंतर थोडी विश्रांती व चहापान झाले. त्यानंतर सर्वांनी आपापले आन्हिक आवरले व सकाळी नऊ वाजता दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राला सुरुवात झाली. या वेळी प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या संलग्न संस्थांची ओळख करून दिली.

या प्रसंगी त्यांनी सर्वांना असे सांगितले की, ‘‘प.पू.सद्गुरु श्री.मामांनी समस्त साधकांना ‘सत्-चित्-आनंद’मय अवस्था प्राप्त होण्यासाठी व निरामय साधनेसाठी श्रीक्षेत्र आळंदी येथील सद्गुरु भगवान श्री माउलींच्या ‘सिद्धबेट’ या जन्मस्थानी ‘श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन’ या ट्रस्टची स्थापना केली. त्यासोबत आजच्या काळात आत्मोद्धारासाठी तळमळणाऱ्या साधकांसाठी विशुद्ध ज्ञानभांडार उपलब्ध व्हावे, या हेतूने प.पू.श्री.मामांनी ‘श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठ’ ही संलग्न संस्था स्थापन केली. या ज्ञानपीठाद्वारे सर्व प्रकारच्या तत्त्वज्ञानग्रंथांचे व त्यातही प्रामुख्याने संतवाङ्मय; वेद, शास्त्रे, पुराणे, उपनिषदे, विविध विद्या, कला यांविषयक वाङ्मय; तसेच वैदिक धर्मातील अद्वैत तत्त्वज्ञान मांडणारे ग्रंथ; श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज व श्रीसंत ज्ञानेश्वर माउली यांचे समग्र वाङ्मय; विविध संदर्भग्रंथ, विश्वकोश, विविध परंपरा-संप्रदायांची दुर्मिळ हस्तलिखिते; इत्यादी सर्व साहित्य साधक-सद्भक्तांना मुक्तहस्ते अभ्यासण्यासाठी उपलब्ध करवून दिले जाते. इतकेच नाही तर, जगभरातील सर्वच सद्भक्तांना याचा लाभ घेता यावा, यासाठी या सर्व ग्रंथांचे E-Library द्वारे Digitization ही केले जात आहे. याचसोबत संतवाङ्मयाच्या सखोल अभ्यासाकरिता साधक-अभ्यासकांच्या आवडीच्या अभ्यास-विषयांनुसार अनेक प्रकारची मार्गदर्शक शिबिरे, मर्मज्ञ अभ्यासकांची व्याख्याने, प्रवचने, कीर्तने वेळोवेळी आयोजित केली जातात.
मंडळाची ‘संस्कृती संवर्धिनी फाऊंडेशन’ ही दुसरी संलग्न संस्था चिपळूण येथे कार्यरत आहे. ह्या संस्थेद्वारे ‘अमृतबोध’ हे मासिक प्रकाशित केले जाते. त्यातून विविध संतांची चरित्रे, त्यांचा आपल्या दिव्य सद्गुरुपरंपरेशी असणारा ऋणानुबंध तसेच सद्गुरूंच्या कृपेने साधकांना आलेले विलक्षण अनुभव प्रकाशित केले जातात. राजाधिराज सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराजांचे अनन्यभक्त असणारे पू.श्री.गोपाळबुवा केळकर यांनी स्थापन केलेला श्रीस्वामी समर्थ महाराजांचा मठ चिपळूण जवळ मार्कंडी येथे आहे. त्या संस्थेच्या मान्यवर सदस्यांच्या इच्छेप्रमाणे, त्या मठाच्या व्यवस्थापनाचे कार्यही आता ‘संस्कृती संवर्धिनी फाऊंडेशन’द्वारेच पाहिले जाते. याशिवाय चिपळूण येथे श्रीदत्तमंदिर-प्रकल्पाचेही काम सुरू आहे,’’ असे प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी सांगितले.
सकाळी ठीक अकरा वाजता शिबिराच्या अखेरच्या सत्राला सुरुवात झाली. या सत्रात, ‘साधक कसा असावा?’ व ‘साधकांकडून काय अपेक्षा आहेत?’ ह्यासंबंधी बोलताना प.पू.श्री.अनिरुद्धदादा म्हणाले की; ‘‘तसे पाहता सद्गुरूंना आपल्या साधकांकडून फक्त नियमितपणे व प्रेमाने साधना व्हावी एवढीच अपेक्षा असते. परंतु एक आदर्श साधक म्हणून आपल्याही काही जबाबदाऱ्या असतात. त्यांतील एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे सद्गुरुस्थानी जाऊन सेवा करणे. आपल्या परंपरेत सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे!’’ सेवेचे महत्त्व सांगताना प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी असे सांगितले की, ‘‘भगवत्सेवा, मातृ-पितृसेवा, गोसेवा, भूसेवा आणि सद्गुरुसेवा असे सेवेचे महत्त्वाचे पाच प्रकार आहेत. त्यांतील ‘सद्गुरुसेवा’ ही परमार्थात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण श्रीभगवंतांना काय प्रिय असते ते सद्गुरूंना माहीत असते. या सेवेने हळूहळू अहंकार कमी होऊ लागतो. आपल्या वृत्तींचा त्याग होऊन सद्गुरूंना आपल्याकडून ज्या प्रकारची सेवा अपेक्षित असते ती घडू लागते.
दर महिन्यातून किमान एका शनिवारी-रविवारी तरी आपल्या एखाद्या प्रकल्पस्थानी जाऊन सेवा करणे आपल्याला सहज शक्य आहे. एरवी तो वेळ आपण बाहेर कसाही वाया घालवतो. साधकबंधूंसाठी आवर्जून शारीरिक सेवा सांगितली असली तरी भगिनीवर्गालाही ती वर्ज्य नाही. त्यांनी फक्त प्रकल्पस्थानांचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने, आपले मासिक धर्माचे दिवस वगळता अन्य वेळी प्रकल्पस्थानी सेवा करणे अपेक्षित आहे. सेवेसाठी प्रकल्पस्थानी गेल्यावर शांतता राखावी व सेवा करताना मानसिक जप करीत राहावा, तसेच काही वेळ तरी आपल्या वैयक्तिक वाचन-पारायणासाठी, उपासनेसाठी जरूर राखून ठेवावा. त्यायोगे सर्वांगीण परमार्थ साधण्यास मदत होते. सेवा करताना, ‘हे सर्व सद्गुरूच आपल्याकडून करवून घेत आहेत’ असा साधकाचा दृढ विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे!’’ यासाठी त्यांनी प.पू.सद्गुरु सौ.ताईंचे उदाहरण दिले. ‘‘प.पू.सद्गुरु श्री.मामांच्या आज्ञेनुसार, प.पू.सौ.ताईंनी कोणत्याही अडथळ्यांची तमा न बाळगता, परदेशांत कोणाच्याही मदतीशिवाय एकटीने जाऊन जगाच्या पाचही खंडांत प्रचंड मोठ्या प्रमाणात सद्गुरुकार्याचा विस्तार केला आहे!’’ असेही त्यांनी सांगितले.
साधकांकडून असणाऱ्या अपेक्षा सांगताना ते पुढे म्हणाले की, ‘‘सर्व साधकांनी सोशल मिडियाच्या Addiction पासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यायोगे आपली बहिर्मुखता कमी होईल आणि त्यामुळे होणारे विविध वासनासंस्कार आपोआपच होणार नाहीत. यासाठी आपल्या आचरणाला यम-नियमांची जोड द्यावी. त्यायोगे शक्तीला कार्य करण्यास मदत होते. ‘यम’ हे स्वतःसाठी पाळले जातात, तर ‘नियम’ हे लोकांसोबत वावरताना उपयोगी पडतात. साधनेत मात्र प्रत्याहारापासून सुरुवात होते व ती जागृत कुंडलिनी शक्ती मनात वासना निर्माण होण्याला आळा घालते. याचसोबत साधकांची बुद्धी तल्लख असावी, स्मरणशक्ती कुशाग्र असावी व साधकांनी उत्तम निरीक्षक (Good Observer) असावे. तसेच आपले चारित्र्य शुद्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. बाहेर काहीही विपरीत घटना घडोत, पण नोटबंदीच्या काळात आपल्या कोणत्याही प्रकल्पाच्या दक्षिणापेटीत एक हजार रुपयांच्या नोटा मिळाल्या नाहीत. यावरून आपल्या सद्गुरुपरंपरेतील महात्म्यांच्या अतिशुद्ध चारित्र्याची व त्यामुळे भाविकांच्या हृदयात त्यांच्याविषयी असणाऱ्या प्रेमादराची कल्पना येते. अशा प्रकारचे शुद्ध चारित्र्य व वर्तणूक सद्गुरूंना साधकांकडूनही अपेक्षित आहे!’’
शिबिराच्या समारोपाच्या वेळी प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी सर्व साधकांना कळवळून सांगितले की, ‘‘आपल्याला मिळालेला हा बहुमूल्य मनुष्यजन्म आणि त्यातही अतिदिव्य सद्गुरुपरंपरेची अत्यंत दुर्मिळ अशी आपल्यावर झालेली सद्गुरुकृपा यांचे महत्त्व जाणून आपण प्रत्येकाने झडझडून साधना करावी. आपल्या सद्गुरु-परंपरेच्या उत्सवांना नियमितपणे उपस्थित राहावे. आपल्या जवळ असलेल्या प्रकल्पस्थानांवर नियमितपणे सेवेला, सामुदायिक साधनेला आवर्जून येत जावे. शक्य झाल्यास, मंडळाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या भक्तियात्रांना जात जावे. कारण या सगळ्यामुळे आपल्या साधनेला बळ मिळते!’’ दुसऱ्या सत्रानंतर शंका-समाधानाचे सत्र झाले व त्या वेळी प.पू.श्री. अनिरुद्धदादांनी साधकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे देऊन त्यांचे पूर्ण समाधान केले. त्यानंतर महाप्रसाद झाला व या दोन दिवसांच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा शिबिराची सांगता झाली.
सर्व साधकांना हे शिबिर संपूच नये व श्रीसद्गुरूंचे पावन सान्निध्य आणखी काही काळ तरी मिळावे असे वाटत होते. शिबिराच्या अविस्मरणीय स्मृती हृदयात साठवून सर्व युवा साधक-बंधुभगिनी अंतर्मुख होऊन, नियमित साधनेचा निश्चय करीत आपापल्या स्थानी परतली.
शिबिरातील काही क्षण चित्रे














