जळगांव (जामोद) येथे संपन्न झालेल्या भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या जयंती महोत्सवाचा वृत्तांत
प्रतिवर्षीप्रमाणे ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या जळगांव (जामोद) प्रकल्पस्थानी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा जयंती महोत्सव प.पू.सद्गुरु श्री. शिरीषदादा व प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांच्या पावन उपस्थितीत भाद्रपद शु.चतुर्थी; शुक्रवार व शनिवार दिनांक ६ व ७ सप्टेंबर २०२४ असे दोन दिवस अत्यंत उत्साहाने साजरा झाला.
या महोत्सवासाठी ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या पुणे, मुंबई, कऱ्हाड, कोल्हापूर, आंबेरी, गोवा, अकोला, अमरावती, नागपूर, वणी, भिलाई अशा विविध केंद्रांमधून साधक-भक्तजन उपस्थित होते. प्रकल्पस्थानी आल्यावर भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचे अतिशय प्रसन्न, सुहास्यवदन, चित्तवेधक, नयनमनोहर अशा बालरूपातील दर्शन घेतल्यावर उत्सवाला आलेल्या प्रत्येकाचा प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळून जात होता. ‘याचसाठी केला होता अट्टहास’, अशीच प्रत्येकाची भावना होती.
उत्सवासाठी मंदिर परिसर सुबक, सुंदर रांगोळ्यांनी, फुलांनी, विद्युत रोषणाईने फारच उत्तम प्रकारे सजवला होता. प्रकल्पस्थानी चार मजली नवीन इमारतीचे; ‘अन्नपूर्णा’चे; बांधकाम नुकतेच पूर्ण झाले आहे. अतिशय प्रशस्त, भव्य अशा या वास्तूत उत्सवासाठी आलेल्या बहुसंख्य साधक-सद्भक्तांची राहाण्याची अतिशय उत्तम सोय करण्यात आली होती. साधकांकडून आपल्या सिद्धस्थानांवर साधन व्हावे, या पावन सद्गुरुस्थानांची सेवा घडावी म्हणून कनवाळू श्रीसद्गुरु साधकांसाठी किती सोई-सुविधांची व्यवस्था करतात, हे नवीन झालेल्या भव्य बांधकामावरून प्रकर्षाने जाणवत होते.
महोत्सवाच्या आदल्या दिवशी, प.पू.सद्गुरु श्री.दादांनी स्वतः जातीने सगळी तयारी पूर्वनियोजनाप्रमाणे झाली आहे याची खातरजमा केली होती. विविध केंद्रांमधून प्रकल्पावर आलेले स्वयंसेवक स्थानिक साधक बंधुभगिनींना मदत करायला तत्पर होते.
दिनांक ६ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता जळगांव (जामोद) येथील ‘श्रीसरस्वती महिला भजनी मंडळा’च्या भजनसेवेने महोत्सवातील कार्यक्रमांस सुरुवात झाली. श्रीभगवंतांच्या श्रीचरणीं श्रवणीय गायनसेवा रुजू केल्याबद्दल मंडळाचे विश्वस्त समिती सदस्य श्री.संतोष बोरगांवकर काका यांच्या हस्ते या भगिनी मंडळाचा सत्कार करण्यात आला.
सायंकाळी ५.१५ ते ६.३०या वेळेत प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या परममंगल सान्निध्यात ‘श्रीदत्तभावांजली’ स्तोत्राचे सामुदायिक पठण करण्यात आले. त्यानंतर श्री.चिन्मय देशपांडे, श्री.श्रेयस पाटील, श्री.वेद खोपकर, श्री. महेश ताम्हणकर, श्री.सुदर्शन देशपांडे, श्री.निशिकांत जोशी तसेच सौ.रमा खाडिलकर या साधक बंधुभगिनींनी श्रीसद्गुरूंच्या श्रीचरणीं सुश्राव्य अशी अभंग-गायनसेवा सादर केली. त्यासाठी त्यांना संवादिनीवर श्री.विजय उपाध्ये, मृदंगावर श्री.मनोज भांडवलकर व श्री.रवींद्र देसाई यांनी उत्तम साथ दिली.
नित्याची सायंआरती झाल्यानंतर सर्व बंधुभगिनींनी अल्पोपाहार घेतला. रात्री ९ नंतर श्रीक्षेत्र आंबेरी येथील साधक बंधू श्री.राजेश आवटे व साथीदारांनी ‘श्री हरिपाठ’ गायनसेवा श्रीसद्गुरुचरणीं रुजू केली. अतिशय भावपूर्ण अशा या श्री हरिपाठ गायनसेवेत सगळेच उपस्थित सहभागी झाले होते. या दिव्य-आनंदाचा अनुभव सोबत घेऊन दुसऱ्या दिवशी पहाटे साजऱ्या होणाऱ्या देवांच्या जन्मकाळाच्या विचारांमध्ये सगळे आपापल्या निवासस्थानी विश्रांतीसाठी रवाना झाले.
दिनांक ७ सप्टेंबर रोजी शनिवारी पहाटे चार वाजण्यापूर्वीच सगळे साधक बंधुभगिनी श्रींच्या मंदिरात उपस्थित झाले होते. श्रींचा पाळणा विविध रंगी सुगंधी पुष्पांनी सुरेख सजविला होता. पहाटेच्या त्या प्रसन्न, भक्तिमय, पवित्र वातावरणात ठीक ४.०० वाजता ह.भ.प.श्री.चिन्मय देशपांडे यांनी श्रींच्या जन्मकाळाच्या कीर्तनसेवेला सुरुवात केली. त्यांनी श्रीसंत तुकाराम महाराजांचा ‘हेंचि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥’ हा अतिशय गोड आणि रसाळ असा अभंग सेवेसाठी घेतला होता.
कीर्तनाच्या पूर्वरंगात त्यांनी प्रत्येक जीवाला कोणती न कोणती ‘आवडी’ असतेच हे उलगडून सांगितले. ही ‘आवडी’ भगवद्भक्तीची असावी हे त्यांनी प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंच्या ग्रंथांचा आधार घेऊन अतिशय मार्मिकपणे सांगितले. उत्तररंगात त्यांनी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या जन्माची कथा सांगितली. बुवांनी केलेले ते कथावर्णन आणि ठीक सूर्योदयाच्या वेळी; जन्मकाळ साजरा करताना चालू झालेले विविध वाद्यघोष, शंखनाद तसेच ‘दिगंबरा दिगंबरा…।’ या महामंत्राचा जप या सगळ्यांमुळे वातावरणात अत्यंत प्रसन्नता, पावित्र्य जाणवत होते.
प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी अत्यंत प्रेमादराने पाळण्यात असलेल्या भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या प्रतिमेला गुलाल-पुष्पे अर्पण केली. त्यानंतर आपल्या साधक-भगिनींनी मधुर स्वरांमध्ये पाळणा म्हटला. ‘घोरकष्टोद्धरण स्तोत्रा’चे पठण झाल्यावर देवांची आरती करण्यात आली. अतिशय श्रद्धाभक्तीने जन्मकाळाची रसाळ अशी कीर्तनसेवा रुजू केल्याबद्दल प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या हस्ते ह.भ.प.श्री.चिन्मय देशपांडे यांचा मानधन तसेच शाल व श्रीफळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. कीर्तनसेवेसाठी तबल्याची साथ करणारे श्री.सुश्रुत चितळे, मृदंगाची साथ करणारे श्री.मनोज भांडवलकर आणि संवादिनीची साथ करणारे श्री.श्रेयस पाटील यांचाही पुष्पगुच्छ आणि श्रीफळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.
सकाळी ठीक ८ ते ९ या वेळेत नवीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील भव्य सभागृहात सामुदायिक साधना संपन्न झाली. त्यादरम्यान मंदिराच्या गर्भगृहात देवांच्या पादुकांची पवमान अभिषेकपूर्वक पूजा करण्यात आली. साधनेनंतर अल्पोपाहार झाला. तदनंतर ज्याच्यासाठी सगळे साधक बंधुभगिनी उत्सुक होते ती प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांची प्रवचनसेवा ठीक १०.३० वाजता सुरू झाली.
प्रवचन-सेवेसाठी त्यांनी, श्री ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील एकोणिसाव्या श्लोकाच्या टीकेतील तीनशे सत्तावन्नावी ओवी घेतली होती.
प्रस्तुत ओवीच्या निरूपणात प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी ‘युक्ती’ आणि ‘योग’ या दोन्ही शब्दांचा अर्थ ‘श्रीभगवंतांशी जोडले जाणे’ असा आहे असे सांगितले. श्रीभगवंतांनी अर्जुनांना विविध योग सांगत असताना त्या संदर्भातील युक्तींवरचे विवरण केले आहे. आहार, विहार, निद्रा यांचे यथायोग्य सेवन तसेच कमी बोलणे यांचे महत्त्व समजावून सांगून, ‘भ्रामरीवर लक्ष केंद्रित करणे’ हीच साधनेची मुख्य युक्ती असल्याचेही प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी समजावून सांगितले. तसेच त्यांनी साधकांना सद्ग्रंथांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने उपयुक्त अशी एक युक्ती सहजरीतीने सांगितली. ते म्हणाले, ‘‘आपण अभ्यास करत असताना स्वतःलाच ओवीसंदर्भात प्रश्न विचारावा व त्यावर थोडे चिंतन करून अर्थ उलगडण्याचा प्रयत्न करावा !’’
श्री एकनाथी भागवतातील खिरीतील डावाचा अतिशय चपखल असा दृष्टांत देऊन ते म्हणाले की, ‘‘श्रीसद्गुरूंच्या सान्निध्यात असताना साधकाने आपल्या वृत्तींमध्ये नित्य साधनेने आणि प्रयत्नपूर्वक बदल घडविण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे. नाही तर त्या साधकाची अवस्था ही खिरीतील डावासारखी होते. (जसे खिरीतील डावाला कधीच त्या खिरीचा गोडवा अनुभवता येत नाही तशी त्या साधकाची अवस्था होते.) !’’
प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी पुढच्या चरणातील ‘प्रयाग’ या शब्दाच्या अनुषंगाने ‘युक्ती, योग आणि योगी’ असा योगाच्या दृष्टीने होणारा हा त्रिवेणी संगम आहे अर्थ सांगितला आणि भक्तिशास्त्राच्या अंगाने हाच त्रिवेणी संगम ‘युक्ती, योग आणि भक्ती’ असा आहे, हे समजावून सांगितले. प.पू.सद्गुरु श्री. अनिरुद्धदादांचे प्रवचन ऐकून सगळ्या साधकांना श्रीसद्गुरूंच्या असीम कृपेची आणि आपण कधीही फेडू न शकणाऱ्या अशा त्यांच्या ऋणाची प्रकर्षाने जाणीव झाली.
प्रवचनसेवेनंतर आरती झाली व त्यानंतर श्रीभगवंतांचे दर्शन घेऊन सर्वांनी अवीट गोडीच्या महाप्रसादाचा लाभ घेतला.
दुपारी साजऱ्या होणाऱ्या भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या पालखी-सोहळ्यासाठी सगळे सुसज्ज झाले होते. अधूनमधून वरुणराजही आपली उपस्थिती लावत होते. त्यांनाही कदाचित् श्रीभगवंतांच्या पालखी-सोहळ्यात सेवा करावी असे वाटत असावे.
सोहळ्यासाठी पालखी सुवासिक फुलांनी व सुंदर माळांनी सुशोभित करण्यात आली होती. पालखीसोबत प्रदक्षिणेसाठी साधक बंधू दिवटी, सूर्य-चंद्र चिन्हांकित छत्र-चामरे, चवऱ्या, मोरचेल या राजचिन्हांसह तसेच टाळ, मृदंग, संवादिनी इत्यादी वाद्यांसह सज्ज झाले होते.
प.पू.सद्गुरु श्री.दादा तसेच प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा या दोघांचेही पालखी-सोहळ्यासाठी आगमन झाल्यावर सर्व साधक बंधुभगिनींमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सायंकाळी ठीक ४.३० वाजता प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या उपस्थितीत प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी पूजन करून भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची प्रतिमा व श्रीचरणपादुका पालखीत स्थापित केल्या. पहिल्या द्वारावर ‘धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची’ या अभंगाने पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. प्रदक्षिणाक्रमात गायिल्या जाणाऱ्या अभंग श्रवणाने साधकांच्या नेत्रांतून नकळत अश्रू वाहत होते. त्या अभंगांच्या तालावर सहजपणे पावले ताल धरत होती. केवळ आणि केवळ आनंदाचा असा तो अनुपम सोहळा होता.
तिसरी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर पाच सुवासिनींनी देवांना औक्षण केले व त्यानंतर श्रीभगवंतांची प्रतिमा व श्रीचरणपादुका पुन्हा गर्भगृहात स्थापन करण्यात आल्या.
श्रींची आरती झाल्यावर सर्वांनी रांगेने श्रीभगवंतांचे दर्शन घेऊन तीर्थ-प्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर अल्पोपाहार घेऊन परगांवाहून आलेल्या बहुतांश साधकांनी सर्वांचा प्रेमाने निरोप घेतला. दोन दिवस अनुभवलेल्या भक्तिमय वातावरणातून घरी परत जाताना साधकांचा पाय मंदिरातून निघत नव्हता. हा आनंदोत्सव वारंवार अनुभवता यावा म्हणून साधक देवांना मनोमन प्रार्थना करीत होते. प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या कृपाशीर्वादाने आणि प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या नेटक्या मार्गदर्शनानुसार भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा जन्माचा हा महोत्सव अत्यंत आनंदाने, उत्साहाने सुसंपन्न झाला.