प.पू.सद्गुरु श्री.श्री.द.(मामा) देशपांडे महाराज यांचा चौतिसावा व प.पू.सद्गुरु सौ.शकुंतलाताई आगटे यांचा पाचवा एकत्रित पुण्यतिथी-महोत्सव फाल्गुन कृष्ण नवमी, बुधवार दिनांक ३ एप्रिल २०२४ रोजी, ‘माउली आश्रम’ व ‘श्रीपाद निवास’ येथे अतिशय आनंदाने व साधेपणाने सुसंपन्न झाला. या वर्षी महोत्सवाच्या दिवशी पुणे परिसरातील कोणतेच सोयीचे कार्यालय कार्यक्रमासाठी उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे रविवार दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी, पुण्यातील ‘काकडे पॅलेस हॉल’ येथे मोठा कार्यक्रम सकाळी ७ ते दुपारी १२.३० या वेळेत संपन्न झाला.
३ एप्रिल २०२४
दिनांक ३ एप्रिल रोजी, ‘माउली आश्रम’ व ‘श्रीपाद निवास’ तसेच ‘अन्नपूर्णा’ या इमारतींचा परिसर स्वच्छ करून सुंदर पुष्पमालांनी सजविला होता. ‘श्रीपाद निवासा’तील व ‘माउली आश्रमा’तील श्रीसद्गुरुपरंपरेच्या प्रतिमांना व प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज व प.पू.सद्गुरु सौ.ताई महाराज यांच्या प्रतिमांना सुगंधी, सुंदर पुष्पमाला अर्पण केल्या होत्या. ‘अन्नपूर्णा’ इमारतीत तळमजल्यावर सर्व साधकांच्या सोयीसाठी ‘श्रीवामनराज प्रकाशना’चे ग्रंथ तसेच ‘अमृतबोध’ मासिक यांचे स्टॉल्सही लावण्यात आले होते.
‘श्रीपाद निवासा’त सकाळी ठीक ७.१५ ते ८.१५ या वेळेत सामुदायिक साधना संपन्न झाली. ‘माउली’मध्ये सकाळी ठीक ७ ते ९ या वेळेत सौ.स्नेहल व श्री.पराग गुमास्ते यांच्या हस्ते ‘श्रीसत्यदत्त पूजा’ आणि सौ.दीप्ती व श्री. अमेय जोशी यांच्या हस्ते ‘श्रीसद्गुरुपादुका-पूजन’ संपन्न झाले. गोव्याचे श्री.दत्तगुरु व श्री.सुरेंद्र गुरुजी यांनी या प्रसंगी पौरोहित्य केले.
सकाळी ११.३० वाजल्यापासून ‘श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे । हे नाथ नारायण वासुदेव ॥ गोविन्द गरुडध्वज प्राणप्यारे । हे नाथ नारायण वासुदेव ॥’ व ‘जय जय करुणामूर्ति दयाळा जय जय श्रीपादा । जय जय सद्गुरु अनाथनाथा जय जय श्रीपादा ॥’ या नामजपांनी ‘माउली’ परिसर दुमदुमून गेला. प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांचे ११.४५ वाजता ‘माउली’त आगमन झाले तेव्हा तर साधकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला. दुपारी ठीक १२ वाजता शंखनादासह घंटा, झांजा, मृदंग, संवादिनी अशा वाद्यांच्या गजरात प.पू.सद्गुरु श्री.मामांचा तसेच प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंचा जयजयकार करून पुण्यकाल साजरा करण्यात आला. त्यानंतर आरती व मंत्रपुष्पांजली झाली. समस्त साधक-बंधुभगिनींच्या वतीने प.पू.सद्गुरु श्री.दादांनी श्रीसद्गुरुद्वयांच्या सुकोमल श्रीचरणीं गुलाबपुष्प-पाकळ्या समर्पित केल्या. देवांचे, श्रीसद्गुरूंचे दर्शन व तीर्थप्रसाद घेऊन हा सकाळचा कार्यक्रम संपला.
सायंकाळी ठीक ४ ते ५ या वेळेत, ‘श्रीपाद निवासा’त आपल्या साधक-बंधूंनी ‘श्री हरिपाठ-गायनसेवा’ श्रीसद्गुरुचरणीं रुजू केली. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता ‘श्रीपाद निवास’ येथे राजोपचार-महापूजा आयोजित करण्यात आली होती. प्रथम संकल्प व तदनंतर श्रीगणेशपूजन करण्यात आले. पूर्वपूजेत उभय श्रीसद्गुरुपादुकांना पंचामृत स्नान, फलरस-स्नान व पुष्पोदक-स्नान संपन्न होऊन तदनंतर अभिषेक, अलंकार-पूजा, नैवेद्य व आरती झाली. त्यानंतर चार वेद, पंचांग, पुराण, शास्त्र, संगीत (गायन व वाद्य सेवा), नृत्य, चामर, नामजप इत्यादी सेवा अत्यंत भावपूर्ण वातावरणात श्रीसद्गुरुचरणीं समर्पित करण्यात आल्या.
वेदमूर्ती श्री.दत्तात्रेयशास्त्री जोशी व त्यांचे सहकारी ब्रह्मवृंद हे या प्रसंगी राजोपचार-महापूजेत अतिशय तन्मयतेने सहभागी झाले होते. तसेच कु.श्रुती कानिटकर यांनी शास्त्रसेवा, कु.विलीना फडणीस यांनी नृत्यसेवा, कु.शाल्मली भालेराव यांनी गायनसेवा, श्री.श्रेयस पाटील व श्री.चिन्मय देशपांडे यांनी चामरसेवा, श्री.सुधन्वा कुलकर्णी यांनी वाद्यसेवा तसेच काही साधकबंधूंनी नामजपसेवा श्रीसद्गुरुचरणीं समर्पित केली.
प.पू.सद्गुरु श्री.दादांनी सर्व ब्रह्मवृंदास वस्त्रे व दक्षिणा अर्पण करून त्यांचे आशीर्वचन घेतले. श्रीसद्गुरुवंदन करून व तीर्थप्रसाद घेऊन रात्री ११ च्या सुमारास समस्त साधक-बंधुभगिनी श्रीसद्गुरूंच्या महन्मंगल व पवित्र स्मृती उराशी जपत आपापल्या गंतव्यस्थानी रवाना झाले.
७ एप्रिल २०२४
दिनांक ७ एप्रिल रोजी ‘काकडे पॅलेस हाॅल’ येथे सकाळी ७.१५ वाजता सामुदायिक साधनेने महोत्सवातील कार्यक्रमांस सुरुवात झाली. सभागृह अतिशय नयनरम्य व सुबक पुष्परचना करून सजविले होते. साधक अगदी आनंदाने व प्रेमाने या कार्यक्रमात सहभागी होत होते. तळमजला व पहिला मजला अशा दोन ठिकाणी मिळून येणारी बहुतेक मंडळी व्यवस्थित रितीने बसू शकतील अशी वातानुकूलित बैठक-व्यवस्था करण्यात आलेली होती.
सकाळी ठीक ९.१५ वाजता प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांचे सभागृहात आगमन झाले. तदनंतर ह.भ.प.श्री.विजय जगताप यांनी अत्यंत सुश्राव्य अशी गायनसेवा श्रीसद्गुरुचरणीं समर्पित केली. त्यांनी प्रथम राग ललतमध्ये ‘तुम बिछरत मोहे चैन नही अब ।’ गाऊन नंतर राग बैरागीमध्ये ‘तेरो ही गुण गावत नाम जपत शंकर मदनारी ।’ सादर केले. त्यानंतर त्यांनी ‘नरसिंह नाथ मेरो, प्रह्लाद लाज राखी ।’ हे पद गायिले. मग ‘जय जय रामकृष्ण हरि ।’ हे भजन सादर करून त्यांनी ‘तुझिया सत्तेने वेदांसी बोलणे ।’ हा श्रीसंत नामदेव महाराजांचा व ‘पंढरीची वारी आहे माझे घरी ।’ हा श्रीसंत तुकाराम महाराजांचा अभंग म्हटला. शेवटी ‘हेचि दान देगा देवा ।’ ही भैरवी गाऊन त्यांनी ही अत्यंत श्रवणीय गायनसेवा श्रीसद्गुरुचरणीं समर्पित केली. या गायनसेवेस साधक-सद्भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्री. विजय जगताप यांना श्री.विजय उपाध्ये यांनी संवादिनीची तसेच श्री. ऋग्वेद व श्री. हृषीकेश जगताप यांनी अनुक्रमे पखवाजाची व तबल्याची साथ केली. तसेच श्री.राजेंद्र महाराज दहिभाते व श्री.वेदांत खरात यांनी त्यांना बहारदार स्वरसाथ केली. श्री.ओंकार खरात हे टाळांच्या साथीला होते. श्री.विजय जगताप व त्यांच्या साथीदारांचा प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या हस्ते मानधन तसेच शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रस्तुत गायनसेवेनंतर प.पू.सद्गुरु श्री.दादांनी ‘काकडे पॅलेस हॉल’चे व्यवस्थापक श्री.मुकंद गोखले व श्री.हृषीकेश जोशी यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सभागृह प्रेमाने व आपुलकीने उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
एव्हाना ठीक १०.३० वाजले होते. उपस्थित समस्त साधक मंडळी प.पू.सद्गुरु श्री.दादांची प्रवचन-सेवा कधी सुरू होते याची अगदी प्राण कानांत एकवटून वाट बघत होती. प.पू.सद्गुरु श्री.दादांनी व्यासपीठावर येऊन श्रीसद्गुरुपरंपरेच्या श्रीचरणीं तसेच प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज व प.पू.सद्गुरु सौ.ताई महाराज यांच्या श्रीचरणीं भक्तिभावाने वंदन केले आणि प्रवचन-सेवेस सुरुवात केली. श्री ज्ञानेश्र्वरीच्या बाराव्या अध्यायातील,
या ओवीवर त्यांनी अतिशय रसाळ व मार्मिक निरूपण केले. प.पू.श्री. दादा म्हणाले की, ‘‘अध्यात्म-साधनेतील प्रगतीस फक्त सद्गुरुकृपा हाच मुख्य उपाय आहे. परिपूर्णब्रह्मप्राप्तीत सगुण व निर्गुण या दोन्ही ब्रह्मरूपांचा साक्षात्कार साधकांस व्हायला हवा. त्यासाठी योगाभ्यास व ज्ञानाभ्यास या दोन्हींची आवश्यकता आहे. तसेच सगुण परमात्म्याविषयी अंतःकरणात भक्तीही हवी !’’
निरूपणाच्या ओघात त्यांनी जागृत झालेल्या भगवतीच्या कार्याचे स्वरूप, मनोरूप महिषाचे निर्दालन, साधनेने शुद्ध झालेल्या मनाचे (मानसपूजेचे) सामर्थ्य या संदर्भात अतिशय मार्मिक विवेचन केले. ‘‘साधकांनी आळस झटकून नित्यनेमाने व प्रेमाने साधना केली तर श्रीसद्गुरुकृपेने त्यांना याच जन्मी निश्र्चितपणे भगवत्प्राप्ती होऊ शकेल !’’ असे सांगून, पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने झालेली सेवा प.पू.श्री.दादांनी श्रीसद्गुरुचरणीं समर्पित केली. डोळ्यांत अंजन घालणारी ही प्रवचन-सेवा ऐकताना उपस्थित सर्व श्रोतृवर्ग अक्षरशः मंत्रमुग्ध झाला होता.
त्यानंतर नामजप, आरती व मंत्रपुष्प होऊन कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित साधक-सद्भक्तांनी प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज व प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताई महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले व नित्यनियमाने साधना करण्याचा दृढ निश्र्चय करीत सर्वजण आपापल्या निवासस्थानी परतले.
या कार्यक्रमास वर्धा येथील डॉ.श्री.नारायणराव निकम महाराज, पुण्यातील विदुषी डॉ.श्रीमती कांचनताई मांडे, ह.भ.प.श्री.लक्ष्मण महाराज कोकाटे इत्यादी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.