|| श्री ||
अकलूज येथे संपन्न झालेल्या सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी महोत्सवाचा वृत्तांत
या वर्षी सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी महोत्सव, कार्तिक कृष्ण १२ व १३, गुरुवार व शुक्रवार दिनांक २८ व २९ नोव्हेंबर २०२४ असे दोन दिवस अकलूज येथील लोणकर वस्ती, संग्रामनगर येथे श्रीदत्त मंदिराच्या परिसरात अत्यंत उत्साहाने साजरा झाला.
संक्षिप्त चलतचित्र
अभ्यागतांसाठी मुख्य रस्त्यापासून कार्यक्रमस्थळापर्यंत ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावलेले होते व स्थानिक स्वयंसेवकही आलेल्या सज्जनांच्या मदतीसाठी सज्ज होते. कार्यक्रमाचे ठिकाण भव्य मंडप, विविधरंगी फुले व सुंदर रांगोळ्यांनी सुशोभित करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व साधकांच्या निवास व भोजनाच्या सोयी-सुविधांचे उत्तम नियोजन अकलूज केंद्रातील साधक श्री.दिलीप लोणकर व इतर स्थानिक कार्यकर्त्यांनी केले होते. विविध केंद्रांमधून शिबिराकरिता आलेले स्वयंसेवकही स्थानिक साधक बंधुभगिनींना मदत करण्यासाठी तत्पर होते. महोत्सवासाठी ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या पुणे, मुंबई, कऱ्हाड, कोल्हापूर, आंबेरी, गोवा, अकोला, अमरावती, नागपूर, वणी, भिलाई अशा विविध केंद्रांमधून साधक-भक्तजन उपस्थित होते. ‘श्रीवामनराज प्रकाशना’च्या तसेच ‘अमृतबोध’ मासिकाच्या स्टॉल्सनाही साधकांनी आवर्जून भेट दिली व त्यांचा लाभ घेतला.
गुरुवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी दुपारी प.पू.सद्गुरु श्री. शिरीषदादा व प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांचे कार्यक्रमस्थळी मंगल आगमन झाले. त्या वेळी श्री.व सौ.लोणकर यांनी प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांची पाद्यपूजा करून त्यांना औक्षण केले. सुगंधी फुले व तुलसीदलांच्या हारांनी सुशोभित अशा सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज आणि प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज यांच्या व्यासपीठावर विराजमान असणाऱ्या प्रतिमा सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या.
प्रारंभी महोत्सवासाठी येणाऱ्या साधक बंधुभगिनींचे स्वागत व नावनोंदणी होऊन चहापान झाले. त्यानंतर संध्याकाळी चार वाजता मुंबई, पुणे व गोवा केंद्रांतील साधकबंधूंनी ‘श्री हरिपाठ’ गायनसेवा श्रीसद्गुरुचरणीं रुजू केली. या सेवेत श्री.दिलीप लोणकर यांच्या पाठशाळेतील छोटे टाळकरी सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. उपस्थित सर्व साधक-सद्भक्तही या भावपूर्ण नामसंकीर्तनात तल्लीन झाले होते. सायंकाळी ५.१५ ते ६.१५ या वेळेत प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा व प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या सुमंगल उपस्थितीत सामुदायिक साधना झाली.
रात्री ठीक ७.३० वाजता शंकासमाधानाच्या सत्राला प्रारंभ झाला. या वेळी साधकांनी विचारलेल्या विविध पारमार्थिक प्रश्नांना प.पू.सद्गुरु श्री. शिरीषदादांनी समर्पक उत्तरे दिली व त्यांच्या शंकांचे संपूर्ण निरसन केले.
नामसाधनेविषयीच्या प्रश्नांना उत्तरे देताना प.पू.श्री.दादा म्हणाले की, ‘‘नामसाधना ही सगुण साधना आहे आणि आपल्या परंपरेतून होणारी नामदीक्षा ही शक्तियुक्तच असते. नाम घेत असताना साधकाने मानसिक क्रियांकडे लक्ष देऊ नये, नामाच्या धारेकडे लक्ष द्यावे. कारण श्रीभगवती शक्ती त्या साधकाच्या सर्वच वासनांचे विविध प्रकारचे विचार मनात आणते, पण केवळ परमार्थानुकूल वासना कायम ठेवून इतर वासना ती पुसून टाकते. ‘साधना’ हेच या जन्माचे प्राधान्य असले पाहिजे !’’
नामजपासाठी माळ वापरण्याबद्दल विचारले असता प.पू.सद्गुरु श्री. शिरीषदादा म्हणाले की; ‘‘न मोजता केलेला जप हा शंभर पटींनी श्रेष्ठ असतो. माळेवर केलेला जप हे प्राथमिक साधन आहे. त्याचबरोबर सबीज नामजप माळेवर होऊच शकत नाही. सबीज नाम देण्यासाठी देहधारी सद्गुरूच लागतात !’’
कळत-नकळत घडलेल्या प्रमादांच्या परिमार्जनाविषयी प.पू.सद्गुरु श्री. दादांनी सांगितले की; ‘‘दीक्षेनंतर जागृत झालेल्या विवेकाकडे साधकाने दुर्लक्ष करू नये. तसेच जाणीव झालेल्या प्रमादांचा पश्चात्ताप, अनुताप करावा. आपली चूक समजून घेऊन श्रीसद्गुरूंकडे, श्रीभगवंतांकडे वारंवार क्षमा मागावी. यानेच त्या प्रमादाचे परिमार्जन होते !’’
‘‘निश्चयात्मक बुद्धीकडे जाण्यासाठी साधकांनी नित्य साधनेसोबत संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास व सद्ग्रंथांचे पुनःपुन्हा वाचन करणे, ते ग्रंथ समजून घेणे आवश्यक आहे,’’ याचा पुनरुल्लेख या वेळी प.पू.सद्गुरु श्री.दादांनी केला.
‘नामजप’ आणि ‘नामस्मरण’ यांतील फरक सांगताना प.पू.सद्गुरु श्री. दादांनी ‘नामजप’ याचे गुह्य प्रकट केले की, ‘‘ ‘नाम जपणे’ याचा अर्थ नुसते नाम घेणे असा नसून, ते जीवामध्ये जपणे हाही त्याचा एक भाग आहे. ‘नामस्मरण’ करणे म्हणजे जे नामी आहेत त्यांचे रूप आठवणे. नामसाधनेमध्ये ‘नामजप’ आणि ‘नामस्मरण’ हे दोन्ही होतात !’’
रात्री ८.३० नंतर कीर्तनरत्न ह.भ.प.श्री.चिन्मय देशपांडे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. ‘ज्ञानियांचा राजा गुरु महाराव ।’ या श्रीसंत तुकाराम महाराजांच्या प्रसिद्ध अभंगावर त्यांनी श्रीसद्गुरुचरणीं कीर्तनसेवा रुजू केली. पूर्वरंगात, ‘सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउली हे ‘ज्ञानियांचा राजा’ कसे होते’ हे त्यांनी रसाळ वाणीने सांगितले. उत्तररंगात, प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या अनेक ग्रंथांच्या आधारे श्री माउलींच्या संजीवन समाधीचे विस्तृतपणे व अभ्यासपूर्ण आख्यान केले. श्री ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीच्या अत्यंत करुणरसपूर्ण प्रसंगाच्या श्री.चिन्मय देशपांडे यांनी केलेल्या भावोत्कट विवरणामुळे सर्व उपस्थित साधक-सद्भक्तांची हृदये हेलावून गेली. कीर्तनसेवेच्या समाप्तीला प्रत्यक्ष प.पू.सद्गुरु श्री.दादांकडून श्री.चिन्मय देशपांडे यांना पाठीवर काैतुकाची थाप मिळाली. ते पाहून त्यांच्या कीर्तनगुणांचे सार्थक झाल्याची भावना सर्वच उपस्थितांच्या मनांत निर्माण झाली.
अतिशय सुंदर, श्रवणीय अशी कीर्तनसेवा रुजू केल्याबद्दल प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या हस्ते ह.भ.प.श्री. चिन्मय देशपांडे यांचा मानधन तसेच शाल व श्रीफळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. कीर्तनसेवेसाठी तबल्याची साथ करणारे श्री.चैतन्य देशपांडे, पखवाजाची साथ करणारे श्री.मनोज भांडवलकर आणि संवादिनीची साथ करणारे श्री.श्रेयस पाटील यांचाही मानधन आणि श्रीफळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी, शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक ६.३० वाजता, प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या उपस्थितीत सामुदायिक साधनेने कार्यक्रमांची सुरुवात झाली. अल्पोपाहारानंतर साधकांनी ‘श्रीस्वामी समर्थ नामपाठा’चे तसेच ‘श्रीदत्तभावांजली’चे वैयक्तिक पारायण केले आणि त्यानंतर ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’ या महामंत्राचा सामुदायिक जपही करण्यात आला.
सकाळी ९.२० वाजता सौ.गायत्री गायकवाड-गुल्हाणे यांनी श्रीसद्गुरुचरणीं अत्यंत सुरेल, सुश्राव्य अशी गायनसेवा समर्पित केली. त्यांना श्री.चैतन्य देशपांडे यांनी तबल्याची, श्री.मनोज भांडवलकर यांनी पखवाजाची तर श्री.संयोग पेंढरकर यांनी टाळांची उत्तम साथ केली. या कार्यक्रमात सौ.गायत्रीताईंनी ‘पंढरीसी जा रे, आल्यांनो संसारा’, ‘कानडा राजा पंढरीचा’ असे काही सुंदर अभंग सादर केले. प.पू.श्री.दादांच्या अनुमतीने सौ.गायत्रीताई यांच्या लहानग्या सुकन्येने; चि.स्वर्णिका हिने; सुद्धा एक अभंग गायिला. ‘अवघा रंग एक झाला’ या भैरवीने गायनसेवेची सांगता झाली. श्रीसद्गुरुचरणीं सेवा रुजू करणाऱ्या सर्व कलाकारांचे प.पू.सद्गुरु श्री.दादांनी मानधन व श्रीफळ प्रसाद देऊन कौतुक केले. त्या वेळी त्यांनी चि.स्वर्णिकाच्या तालबद्ध गायनाची विशेष प्रशंसा केली.
या कार्यक्रमापाठोपाठ प.पू..सद्गुरु श्री.दादांच्या हस्ते अकलूज येथील दोन विशेष अतिथींचा; ‘श्री ज्ञानेश्वरी व्यासपीठा’चे चालक ह.भ.प.श्री.सुरेश महाराज सूळ यांचा तसेच संपूर्ण श्री ज्ञानेश्वरी मुखोद्गत असणाऱ्या अवघ्या दहा वर्षे वयाच्या ह.भ.प.श्री.सोहम अमझरे यांचा; पुष्पहार-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभानंतर सकाळी ठीक १०.३० वाजता, प.पू.सद्गुरु श्री. शिरीषदादांच्या प्रवचन-सेवेस आरंभ झाला.
ही श्री ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायातील एकोणतिसाव्या श्लोकाच्या टीकेवरील चारशे चौदावी ओवी प.पू.श्री.दादांनी प्रवचन-सेवेसाठी घेतली होती. प्रस्तुत ओवीचे निरूपण करताना त्यांनी सांगितले की, ‘‘या ओवीला प.पू.सद्गुरु श्री.मामा ‘भक्तीच्या परमोत्कर्षाचा सिद्धांत’ असे म्हणत असत.
भगवद्स्वरूप झालेल्या महात्म्यांची उदासपणे देह धारण करण्याची स्थिती सांगताना प.पू.श्री.दादांनी दोन बहारीचे दृष्टांत दिले. जसे एखादी स्त्री उसने आणलेले दागिने घातले तरी त्यात गुंतून न राहता ज्याचे त्याला परत करते तशी देहाविषयी अनासक्ती भगवद्स्वरूप झालेल्या महात्म्यांपाशी असते. तसेच ज्याप्रमाणे वारा फुलातील सुगंध घेऊन जातो पण फूल मात्र झाडावरच राहते, त्याप्रमाणे महात्म्यांच्या संदर्भात त्यांचे जीवचैतन्य भगवद्स्वरूप होते आणि देह मागे उरतो. निःसीम भक्त हे श्रीभगवंतांनी श्रीमद् भगवद्गीतेत भक्तिमार्गाच्या रूपाने सांगितलेल्या ‘एकांत धर्मा’चे पालन करतात. या मार्गाच्या प्राप्तीची प्रक्रिया व त्याचा प्रकाश सहाव्या अध्यायात, त्याचे फल नवव्या अध्यायात तर अशा भक्तांची लक्षणे बाराव्या अध्यायात सद्गुरु श्री माउलींनी विस्ताराने वर्णिलेली आहेत. ही भक्ती सद्गुरुकृपेनंतर साधकाच्या हृदयात त्याच्या अधिकारानुसार, पूर्वपुण्यानुसार प्रकाशित होते !’’
प्रवचन-सेवेचा समारोप करताना प.पू.श्री.दादांनी परत एकदा साधनेचे महत्त्व सांगून, ‘‘ ‘गुरु परमात्मा परेशु’ अशा दृढ भावाने, साधकाने जर नियमाने साधन केले तर श्रीसद्गुरुपरंपरेच्या अभिवचनाप्रमाणे तो खात्रीने भगवद्स्वरूप होईल’’, असे प्रतिपादन केले.
प्रवचन-सेवेनंतर आरती झाली व पुण्यकाल साजरा झाला. त्यानंतर सर्व साधकांनी रांगेने प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांचे दर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. दुपारी अवीट गोडीच्या महाप्रसादाचा लाभ घेऊन परगांवाहून आलेल्या साधकांनी सर्वांचा प्रेमाने निरोप घेतला व दोन दिवस अनुभवलेल्या महोत्सवाचा आनंद हृदयात साठवून सर्वजण आपापल्या घरी परतले.