

|| श्री ||
चिपळूण येथे संपन्न झालेल्या भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या श्रीशैल्यगमन महोत्सवाचा वृत्तांत

गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ अर्थात् माघ कृष्ण प्रतिपदा श्रीशके १९४६ या दिवशी, चिपळूण येथील ‘लक्ष्मीबाई माटे सभागृहा’त भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा श्रीशैल्यगमन महोत्सव श्रद्धापूर्ण वातावरणात संपन्न झाला.
संक्षिप्त चलतचित्र
श्रीसद्गुरुपरंपरा, भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज, प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे महाराज यांच्या प्रतिमा विराजमान असलेल्या सभागृहाच्या व्यासपीठावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी प.पू.सद्गुरु श्री. मामांच्या पादुकांची षोडशोपचारे पूजा करण्यात आली. तदनंतर साडेसात ते साडेआठ या वेळेत प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या उपस्थितीत सामुदायिक साधना संपन्न झाली. अल्पोपाहार होऊन त्यानंतर ‘श्रीदत्तभावांजली’ स्तोत्राचे सामुदायिक पठण करण्यात आले.
सकाळी ठीक साडेनऊ वाजता प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा व प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांचे सभागृहात मंगल आगमन झाले. त्यानंतर शंका-समाधानाचे सत्र झाले. या वेळी “साधना, सेवा आणि सद्ग्रंथांचा अभ्यास या गोष्टी प्रत्येकाने केल्याच पाहिजेत”, असे प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांनी सांगितले. यानंतर प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांची प्रवचन-सेवा संपन्न झाली.
यानंतर प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांची प्रवचन-सेवा संपन्न झाली.
ही श्री ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील पन्नासाव्या श्लोकाच्या टीकेवरील एकहजार सहा क्रमांकाची ओवी त्यांनी प्रवचन-सेवेसाठी घेतली होती. या ओवीचे वैशिष्ट्य सांगताना ते म्हणाले की, “या ओवीत सद्गुरु श्री माउलींनी जीवाचा शिव होण्याचा क्रम सांगितलेला आहे. याच अनुषंगाने श्री ज्ञानेश्वरीतील तिसऱ्या अध्यायाला काही अभ्यासक कर्मयोग मानत असले तरी तो अभ्यासयोगाच्या दृष्टीने क्रमयोगच आहे !”
एखादा साधक अधिकाराप्रमाणे, कर्मानुसार क्रमाने मोक्षापर्यंत कसा जातो, याचे विवेचन करताना ते म्हणाले की; “उत्तम अधिकारी हा थेट मोक्षाला जातो. ज्याप्रमाणे पक्षी थेट फळापर्यंत जातो त्याप्रमाणेच त्या साधकाचा प्रवास होतो म्हणून त्या मार्गाला ‘विहंगम मार्ग’ असे म्हणतात. मध्यम अधिकारी हा टप्प्याटप्प्याने उड्या मारत मुक्कामी पोहोचतो. जसे माकड उड्या मारत शेंड्यावरील फळापर्यंत जाते तसे हे घडते, म्हणून त्या मार्गाला ‘मर्कट मार्ग’ असे म्हणतात. मंद अधिकारी मात्र अतिशय हळूहळू, मुंगीच्या पावलांनी मोक्षपदाला जातो. म्हणून त्या मार्गाला ‘पिपीलिका मार्ग’ असे संबोधले जाते. शास्त्रांनी साधकाच्या पारमार्थिक प्रगतीचा ‘विचार, विवेक, वैराग्य, ज्ञान आणि मोक्ष’ असा क्रम सांगितलेला आहे”, असे सांगून प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी यातील ‘विवेक’ व ‘वैराग्य’ या संकल्पना स्पष्ट केल्या. या सर्व गोष्टी गाठीशी नसतानाही श्रीसद्गुरुकृपेने हृदयात उदयाला आलेली भक्ती साधकाला सर्व प्रकारे कशी सांभाळते, हेही त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.
आपल्या ‘कृपायोग’ संप्रदायात भक्ती प्रथम येते आणि अन्य संप्रदायांत ती शेवटी प्राप्त होते, हा महत्त्वाचा फरकही त्यांनी या वेळी नमूद केला. “या सर्व गोष्टी प्राप्त होण्यासाठी श्रीसद्गुरुचरणीं दृढ विश्वास हवा. अंतःकरणात भक्ती निर्माण होण्यासाठी साधना आणि सत्संगती हेच प्रमुख मार्ग आहेत!” असेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी त्यांनी सद्ग्रंथांचे वाचन कसे करावे, याचे मार्गदर्शन केले.
या प्रवचन-सेवेनंतर ‘श्रीगुरुचरित्रा’तील श्रीशैल्यगमन कथेच्या अध्यायाचे वाचन झाले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’ या महामंत्राचा जप केला. तदनंतर आरती-मंत्रपुष्प होऊन सर्वांनी श्रीसद्गुरु दर्शन घेतले. महाप्रसादाने महोत्सवाची सांगता झाली. या वेळी पुणे, मुंबई, गोवा, कऱ्हाड, कोल्हापूर इत्यादी ठिकाणांहून मोठ्या संख्येने आलेल्या साधक बंधुभगिनींनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.
उत्सवातील काही क्षण चित्रे










