महोत्सव स्थळ
आषाढ शु.१५ श्रीशके १९४६; रविवार दिनांक २१ जुलै २०२४ रोजी पुणे केंद्रामध्ये श्रीगुरुपौर्णिमा महोत्सव विविध गावांतून, शहरांतून आलेल्या साधक बंधुभगिनींच्या, सद्भक्तांच्या आणि दर्शनार्थींच्या अभूतपूर्व सहभागाने अत्यंत आनंदाने, उत्साहाने पार पडला.
प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या सूचनांनुसार श्रीगुरुपौर्णिमा महोत्सवाची पूर्वतयारी म्हणून महिनाभर आधीपासूनच ‘माउली’ आणि ‘श्रीपाद निवास’ येथील स्वच्छतेसाठी स्वयंसेवकांची लगबग सुरू होती. अन्नपूर्णा, हार व सजावट तसेच मंदिर-व्यवस्था अशा विविध विभागांतील स्वयंसेवकांनी पूर्वतयारी करण्यासाठी आणि उत्सवादिवशीच्या सेवेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. यातील युवा स्वयंसेवकांचा सहभाग विशेष कौतुकास्पद होता.
उत्सवाच्या आदल्या दिवसापासूनच ‘माउली’ आणि ‘श्रीपाद निवास’ या वास्तू रंगीबेरंगी फुलांनी, माळांनी सुंदर सजून तयार होत्या. उत्सवाच्या दिवशी पहाटे सहा वाजल्यापासूनच ‘माउली’ येथे श्रीसद्गुरूंच्या दर्शनासाठी भाविक-भक्तांचे आगमन सुरू झाले होते. सकाळी ७ ते ८ या वेळेत होणाऱ्या सामुदायिक साधनेकरिता ‘श्रीपाद निवास’ येथे मोठ्या संख्येने साधक-बंधुभगिनी वेळेपूर्वीच उपस्थित होते. सकाळी ७ ते १० या वेळेत ‘माउली’ येथे ‘श्रीसद्गुरु पादुका-पूजन’ सौ.अमृता व श्री.विक्रांत देशमुख यांच्या हस्ते आणि ‘श्रीसत्यदत्त पूजन’ सौ.कल्याणी व श्री.जयदीप जहागीरदार यांच्या हस्ते संपन्न झाले.
सकाळी ठीक ८.४५ वाजता प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांनी ‘माउली’मध्ये देवांचे आणि श्रीसद्गुरूंचे दर्शन घेतले. त्यानंतर श्रीसद्गुरु-दर्शनाचे प्रथम सत्र सकाळी ९.०० वाजता आणि द्वितीय सत्र दुपारी ४.३० वाजता संपन्न झाले. यावेळी उपस्थित सर्व साधक भक्तांनी परममंगल सद्गुरु दर्शनाचा लाभ घेतला.
या वर्षी अभूतपूर्व गर्दी असूनही पाऊस नसल्याने सर्व व्यवस्था छान आणि सुटसुटीत झाली. दर्शनाकरिता आलेल्या साधक-बंधुभगिनींचे उत्सवादरम्यान अनमोल सहकार्य लाभले. ‘श्रीवामनराज प्रकाशन’, ‘अमृतबोध’, ‘श्रीक्षेत्र आंबेरी तपोवन येथील सेंद्रिय उत्पादने’, ‘स्मृतिचिन्हे’ या स्टॉल्सना साधकांनी आवर्जून भेट दिली आणि भरभरून प्रतिसाद दिला.
संध्याकाळी सात वाजल्यापासून ‘श्रीपाद निवास’ येथे प.पू.सद्गुरु योगिराज श्री.मामा महाराज आणि प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताई महाराज यांच्या राजोपचार महापूजेस वेदमूर्ती ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. रात्री नऊ वाजता प.पू.सद्गुरु श्री.दादांचे ‘श्रीपाद निवास’ येथे आगमन झाले.
षोडशोपचार महापूजेनंतर आरती होऊन राजोपचार सेवांना सुरुवात झाली. त्यामध्ये चार वेद, शास्त्र, पुराण, पंचांग या गाभाऱ्यातील सेवा-उपचारांनंतर बाह्य सेवांमध्ये कु.सागरिका पटवर्धन यांनी सुंदर नृत्य-सेवा सादर केली. श्री. यश रुईकर यांची अभंग गायनसेवा झाली. श्री.श्रेयस पाटील यांची चामरसेवा झाली. त्यानंतर काही साधकबंधूंनी मिळून नामजप सेवा सादर केली आणि श्री.विजय उपाध्ये यांची सुमधुर वाद्य-सेवा सादर झाली. या सर्व सेवांसाठी श्री.विजय उपाध्ये यांनी संवादिनीची, श्री.मनोज भांडवलकर यांनी पखवाजाची आणि श्री.चैतन्य देशपांडे यांनी तबल्याची सुरेख साथ केली. पूजा संपन्न झाल्यावर प.पू.सद्गुरु श्री.दादांना वेदमूर्ती श्री.दत्तात्रेयशास्त्री जोशी गुरुजींनी स्वस्तिआशीर्वचन व सद्गुरूंचा प्रसाद दिला. त्यानंतर प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या हस्ते वस्त्रे, दक्षिणा, श्रीफळ इत्यादी देऊन यथोचितरित्या सर्व ब्रह्मवृंदाची संभावना करण्यात आली.
राजोपचार महापूजेनंतर सर्व उपस्थितांनी प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज आणि प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताई महाराज यांचे मनोभावे दर्शन घेतले. तीर्थप्रसाद घेऊन सर्वजण आनंदाने श्रीसद्गुरूंच्या स्मरणानंदात आपापल्या स्थानी रवाना झाले.
उत्सवातील काही क्षण चित्रे
‘श्री दासबोध’ या ग्रंथात समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांनी सद्गुरूंची तेरा लक्षणे सांगितलेली आहेत. ते म्हणतात;
पुढे ते असेही म्हणतात की, या तेरांपैकी एकही गुण उणा असून चालणार नाही. ही सर्वच्या सर्व लक्षणे ज्यांच्यापाशी आढळतात तेच सद्गुरु ! आपल्या उज्ज्वल, अलौकिक सद्गुरु-परंपरेतील प्रत्येक विभूती या सर्व गुणांनी मंडित आहेतच, शिवाय एक विशेष गुण त्यांच्यात आहे तो म्हणजे ‘अकारण करुणा’ ! या करुणेमुळेच त्यांनी आपल्याला सनाथ केले आहे आणि चुकणाऱ्या स्खलनशील अशा सर्व लेकरांना ते अखंड अनाक्रोश क्षमाच करीत असतात. आई घेईल त्यापेक्षा अधिक काळजी सद्गुरु घेत असतात. प्रत्येक साधकाकडे त्यांचे सतत पूर्ण लक्ष असते. प्रत्येक साधक-जीवाला भगवत्प्राप्ती होईपर्यंत त्याचा योग आणि क्षेम वाहण्याचे ब्रीदच त्यांनी उचललेले असते.
अशा ‘करुणामूर्ति, दयाळ’ सद्गुरुपरंपरेविषयी आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांचे सप्रेम स्मरण-पूजन करण्यासाठी, त्यांचे दर्शन घेऊन, वंदन करून क्षमाप्रार्थना करण्यासाठी श्रीगुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त मुंबई केंद्रातील सर्व साधक-सद्भक्त एकत्र जमले होते. हा उत्सव रविवार दिनांक २८ जुलै रोजी, दादर येथील ‘सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज सभागृहा’त अत्यंत उत्साहाने व आनंदाने साजरा झाला.
सकाळी ९ वाजता सौ.विरजा व श्री.पार्थ वझुरकर यांच्या हस्ते श्रीसत्यदत्तपूजनाला; आणि सौ.संगीता व श्री.दिनेश मुळे यांच्या हस्ते प.पू.सद्गुरु श्री.मामांच्या पादुका-पूजनास सुरुवात झाली. पूजेनंतर तरुण साधकांच्या चमूकरवी तालासुरांत आरती संपन्न झाली. या वर्षी व्यासपीठावर कागद, प्लॅस्टिक व खऱ्या फुलांचा कल्पकतेने वापर करून आकर्षक पुष्परचना करण्यात आल्या होत्या. व्यासपीठावरील श्रीसद्गुरुपरंपरा, अनंतकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज, भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगिराज श्री.मामा महाराज व भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु मातुःश्री सौ.ताई महाराजांच्या देखण्या प्रतिमांना अतिशय सुंदर, सुवासिक पुष्पमाला अर्पण करण्यात आल्या होत्या. रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी, तोरणांनी हॉलची शोभा अधिकच खुलली होती.
प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या उपस्थितीत दुपारी ३ ते ४ या वेळात सामुदायिक साधना संपन्न झाली. त्यानंतर लगेचच प.पू.सद्गुरु श्री.दादांचे सभागृहात मंगल आगमन झाले. त्यानंतर प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या अनुमतीने सायंकाळी ४.१५ ते ५.१५ या वेळेत सौ.अपर्णा देवधर, श्री.विजय उपाध्ये, कु.चैत्राली देसाई व सहकलाकारांनी शास्त्रीय संगीताच्या आधारे एक आगळी-वेगळी ‘अभंग-गायनसेवा’ सादर केली. पखवाज-तबला-टाळ या ताल-वाद्यांचा साज चढवून, सतार व संवादिनीने ही सुरांची मैफल अधिकच सुश्राव्य झाली. श्री.विजय उपाध्ये व सौ.अपर्णा देवधर यांनी काही सुपरिचित अभंग सादर केले व ते अभंग ज्या रागांवर आधारित होते त्या रागांची त्या अभंगांना पोषक अशी मांडणीही केली. त्यांना श्री.मनोज भांडवलकर यांनी पखवाजाची, श्री. सोहम पराळे यांनी तबल्याची व श्री.संयोग पेंढरकर यांनी टाळांची साथ केली.
प्रथम श्री.विजय उपाध्ये व सौ.अपर्णा देवधर यांनी श्री माउलींच्या श्री हरिपाठातील पहिला अभंग, ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।’ (राग चारुकेशी) सादर केला. त्यानंतर, ‘लंबोदरा तुझा, शोभे शुंडादंड ।’ (राग हंसध्वनी) व ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे ।’ (राग सारंग) हे अभंग सादर केले. मग कु.चैत्राली देसाई यांनी ‘गुरुविण कोण मज त्राता’ हे भक्तिगीत आणि संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा ‘पद्मनाभा नारायणा’ हा अभंग उत्कृष्टरित्या सादर केला. त्यानंतर परत एकदा सतार व संवादिनीवर यमन कल्याण रागातील ‘नामाचा गजर गर्जे भीमातीर’, श्री माउलींचे ‘रंगा येई वो येई’ आणि ‘विश्र्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशलें’ हे अभंग सादर झाले. शेवटी श्रीभगवंतांच्या अवीट गोडीच्या गोचारण लीलेचे वर्णन करणाऱ्या, ‘गोधनें चाराया जातो शाङ्र्गपाणि’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. या श्रवणमधुर सादरीकरणाने सर्व कलाकारांनी श्रोत्यांना एक उत्कृष्ट सांगीतिक मेजवानीच दिली. श्रीसद्गुरुचरणीं ही उत्तमसेवा रुजू केल्याबद्दल सर्व कलाकारांना प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या हस्ते सत्कारपूर्वक पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळाचा प्रसाद देण्यात आला.
यानंतर सर्वजण आतुरतेने ज्याची वाट पहात होते त्या कार्यक्रमास, म्हणजे प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या प्रवचन-सेवेस सुरुवात झाली.
ही श्री ज्ञानेश्र्वरीतील सातव्या अध्यायातील सातवी ओवी त्यांनी प्रवचन-सेवेसाठी घेतली होती. या वेळी ते म्हणाले की, ‘‘आपण ज्या संप्रदायाप्रमाणे मार्गक्रमण करीत आहोत त्या संप्रदायाला आपल्याकडून नेमके काय अपेक्षित आहे ? साधकाने साधनेने कुठली स्थिती मिळवायची असते ? आणि सद्गुरुतत्त्व हे कसे असते ? या सगळ्यांचा खुलासा श्री माउलींनी सहाव्या अध्यायात केला आहे; व त्यातील काही विशेष भाग अध्याय क्रमांक ७, ९ व १८ मध्ये उलगडले आहेत. महायोगाचा साधक ‘ज्ञान’, ‘विज्ञान’ आणि ‘भक्ती’ या तिन्ही अंगांची प्रचिती आलेला असावा !’’
पुढे प.पू.श्री.दादांनी ‘ज्ञान’ आणि ‘विज्ञान’ या संकल्पना विस्ताराने व सोप्या शब्दांत स्पष्ट केल्या. त्यातही त्यांनी ‘विज्ञाना’ची संकल्पना विशेष विस्ताराने सांगितली. विज्ञानाचे प्रचलित अर्थ आधी सांगून, त्यांनी सद्गुरु श्री माउलींना अभिप्रेत असलेली प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराजांनी केलेली ज्ञान-विज्ञानाची व्याख्या विस्ताराने सांगितली की; ‘‘ ‘ज्ञान’ म्हणजे ‘परब्रह्म जाणून घेणे’ आणि ‘विज्ञान’ म्हणजे ‘भगवतीची लीला जाणून घेणे’ !’’ पुढे विज्ञानाचे भौतिक आणि अभौतिक हे दोन भाग सांगून त्यातही अभौतिक भागातील दैविक, यौगिक आणि आध्यात्मिक ही अंगे त्यांनी स्पष्ट केली.
‘श्रीसद्गुरु कसे असावेत ?’ या विषयी ‘सद्गुरु विज्ञानी असावे लागतात’ हे महायोगाचे मतही त्यांनी विवरून सांगितले. प.प.श्री.विद्यारण्य स्वामी म्हणतात की, ‘परोक्ष ज्ञानाने ‘सत्’ समजते, अपरोक्षज्ञानाने ‘चित्’ कळते आणि प्रेमवृत्तीने ‘आनंद’ मिळतो.’ ‘हेच अनुक्रमे, ज्ञान, विज्ञान आणि भक्ती होय !’ असे प.पू.सद्गुरु श्री.दादांनी सांगितले. तसेच ‘‘प्रपंच दिसतो तसाच खरा आहे असे मानणे’’ अशी अज्ञानाची सोपी व्याख्या सांगून, मूळ ओवीतील ‘अज्ञानाचे हरपणे’ व ‘विज्ञानाचे करपणे’ हेही उलगडून सांगितले. या स्थितीत श्रीभगवंतांच्या कृपेने जर प्रेमवृत्तीचा प्रकाश पूर्ण झाला, त्या भगवतीने पूर्ण प्रेमप्रकाश केला तर तो भक्त होतो. त्याचे हे ‘भगवद्भक्त’ होणे हे श्रीभगवंतांना अपेक्षित आहे.
शेवटी प.पू.श्री.दादा म्हणाले की, ‘‘ही स्थिती प्राप्त होण्यासाठी ‘यातून मला काय मिळणार आहे ?’ असा विचार न करता, श्रीसद्गुरूंनी सांगितलेली साधना त्यांनी सांगितल्याप्रमाणे केली पाहिजे. त्याचबरोबर जास्तीत जास्त अनुसंधानात राहिले पाहिजे. त्यासाठी नामस्मरण आणि आपल्या संप्रदायाच्या ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे. हा अभ्यास ज्ञान-विज्ञानयुक्त असल्यामुळे फार महत्त्वाचा आहे !’’ प्रवचनाची सांगता करताना श्रीसद्गुरूंनी श्रीगुरुपौर्णिमेच्या निमित्ताने परंपरेचा ‘साधन करत राहा, याशिवाय कल्याण नाही’ असा निरोपही सगळ्यांना दिला.
प्रवचनानंतर या उत्सवाचे औचित्य साधून मुंबई केंद्रातील ज्येष्ठ साधक श्री.गणेश कुलकर्णी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ अर्पण करून प.पू.सद्गुरु श्री.दादांचे सर्व साधकांच्या वतीने प्रातिनिधिक पूजन करण्यात आले. प.पू.सद्गुरु श्री.दादांच्याच रचनेचा आधार घेत, त्यांच्या श्रीचरणीं सर्वांनी काकुळतीने असे विनविले की;
असो द्यावी दास, सांभाळावा ।। ३ ।।
घ्यावी जगदीशा घडोघडी सेवा ।
सदा मनोभावा, रूपवेध ।। ४ ।।
यांपरी नलगे वासना जीवास ।
अमृतेसी सोस, येतुलाचि ।। ५ ।।
– (आणखी काही अभंग, अ. क्र.२६.)
यानंतर श्रीसद्गुरु-दर्शनाचा सोहळा सुरू झाला. श्रीसद्गुरूंची प्रेमळ कृपादृष्टी व त्यांनी वात्सल्याने केलेली विचारपूस यामुळे साधकांची अंतःकरणे भरून आली होती. ‘श्रीवामनराज प्रकाशना’च्या व ‘अमृतबोध’ मासिकाच्या स्टॉलला; तसेच श्रीक्षेत्र आंबेरी तपोवन येथील सेंद्रिय उत्पादनांच्या स्टॉललाही उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. तीर्थप्रसाद घेऊन, सद्गुरुबोध व त्यांची प्रेमळ मूर्ती हृदयात साठवून सर्व साधक-सज्जन समाधानाने आपापल्या स्थानी परतले.
प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या मार्गदर्शनाखाली आता तरुण स्वयंसेवकांचा मोठा ताफा तयार झाला आहे. या युवा स्वयंसेवकांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन केले. सर्व वयोगटांच्या, सर्व केंद्रांच्या स्वयंसेवकांनी एकजुटीने, सर्वांना तत्परतेने मदत केली. त्यामुळे हा सोहळा शिस्तबद्ध आणि तरीही खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडला. श्रीसद्गुरु आम्हां सर्वांकडून अशीच निरलस सेवा नित्य करवून घेवोत अशीच प्रार्थना त्यांच्या श्रीचरणीं सर्व साधकांच्या वतीने करीत आहोत.
उत्सवातील काही क्षण चित्रे
या वर्षीचा अमेरिकेतील श्रीगुरुपौर्णिमा महोत्सव, शनिवार आणि रविवार, दिनांक २० आणि २१ जुलै २०२४ असे दोन दिवस डॅलस येथे प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या परममंगल उपस्थितीत अतिशय भावपूर्ण आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवासाठी दीड दिवसांच्या भरगच्च कायक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवारी दुपारी ठीक ३.०० वाजता प.पू.श्री.अनिरुद्धदादांच्या उपस्थितीत सामुदायिक साधनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. चहापान आणि अल्पोपाहाराच्या छोट्या विश्रांतीनंतर सर्व साधक मंडळी मोठ्या जिज्ञासेने वाट पाहात असलेल्या प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या प्रवचन-सेवेला सुरुवात झाली. त्यांनी या वेळी श्री ज्ञानेश्र्वरीच्या तेराव्या अध्यायातील एकशे चौऱ्याऐंशी क्रमांकाची ओवी सेवेला घेतली होती.
वरवर बघता अगदी सोपा अर्थ असणाऱ्या या ओवीतून सद्गुरु श्री माउलींना नेमके काय अभिप्रेत आहे ? याचे अतिशय रसाळ आणि उद्बोधक असे विवरण प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी केले. ते म्हणाले की, ‘‘येथे श्री माउलींनी केलेली देहाची संकल्पना ही स्थूल देहाची नसून क्षेत्र-क्षेत्रज्ञ या योगाच्या पार्श्र्वभूमीवर सूक्ष्म देहाची आहे !’’ तसेच अमानित्व, अदंभिकत्व, सद्गुरुभक्ती ही लक्षणे सूक्ष्म देहावर कशी प्रकटतात ? ते सांगून आपल्या परंपरेतील सर्वच सद्गुरु-महात्म्यांच्या ठायी ती आढळून येतात असे त्यांनी दाखले देऊन स्पष्ट केले.
साधकावस्थेत असताना, ह्या लक्षणांच्या अनुषंगाने साधकांनी आत्मपरीक्षण कसे करावे आणि स्वतःची प्रगती कशी करून घ्यावी ? या संदर्भात त्यांनी दोन संत्रांमध्ये उपस्थित साधकांना मार्गदर्शन केले. प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंच्या स्थूलदेहावर अशी चिन्हे प्रकटली होती, हे दर्शविणाऱ्या सुमधुर आठवणींना या वेळी त्यांनी उजाळा दिला. प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंच्या भावविभोर करणाऱ्या आठवणी ऐकून या वेळी सर्व साधकमंडळी अतिशय भारावून गेली होती.
पहिल्या सत्रातील प्रवचन-सेवेपाठोपाठ शंकासमाधान-सत्र संपन्न झाले. त्यामध्ये साधकांच्या साधनेशी निगडित असलेल्या विविध शंकांचे प.पू.श्री. अनिरुद्धदादांनी साध्या-सोप्या भाषेत समूळ निरसन केले. सायंकाळी आरती आणि मंत्रपुष्प संपन्न झाले. अल्पोपाहार झाल्यानंतर प्रथम सत्राची सांगता झाली आणि जमलेली साधक मंडळी आपापल्या नियोजित स्थळी रवाना झाली.
रविवार, दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांची सुरुवात सकाळी ठीक सात वाजता आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक साधनेने झाली. त्यानंतर नऊ वाजता सौ.सौम्या आणि श्री.कुलीन मेहता यांच्या हस्ते श्रीसद्गुरुपादुका-पूजनास प्रारंभ झाला. उत्सवाच्या स्थानी श्रीसद्गुरु-परंपरा, प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज व प.पू.सद्गुरु सौ.ताई महाराज यांच्या प्रतिमांना सुगंधी फुलांचे सुंदर हार घालून, सभोवती मनोवेधक अशी सजावट करण्यात आली होती. तसेच त्या स्थानी केलेली रोषणाईही सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. पादुका-पूजनानंतर आरती आणि मंत्रपुष्प संपन्न झाले. महाप्रसाद घेण्यापूर्वी सगळ्यांनी प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या परममंगल दर्शनाचा लाभ घेतला.
छोट्याशा विश्रांतीनंतर सायंकाळी ४.०० वाजता आयोजित केलेल्या सामुदायिक साधनेसाठी सर्व साधक मंडळी आवर्जून उपस्थित होती. चहापानाच्या विश्रांतीनंतर प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी दुसऱ्या सत्रातील प्रवचन-सेवा संपन्न करून ती श्रीसद्गुरुचरणीं समर्पित केली. अत्यंत बोधप्रद आणि रसाळ अशा प्रवचनसेवेने साधकमंडळी तृप्त होऊन अत्यंत समाधान पावली.
सायंकाळी सात वाजता आरती संपन्न झाली. अल्पोपाहारानंतर सत्राच्या शेवटच्या टप्यात प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी ‘श्रीगुरुगीता’ यासंदर्भात आणि श्रावण-अनुष्ठानाविषयी मार्गदर्शन केले. ‘श्रावण-अनुष्ठान’ म्हणजे काय ? ते करण्याच्या पद्धती काय ? याविषयी त्यांनी उपस्थित साधकांना सविस्तर माहिती दिली.
श्रीसद्गुरूंच्या असीम करुणाकृपेने श्रीगुरुपौर्णिमा महोत्सव अतिशय सुंदररित्या पार पडला. यानिमित्ताने प.पू.श्री.अनिरुद्धदादांच्या लाभलेल्या सान्निध्याने सुखावून आपले साधन नियमित घडो अशी प्रार्थना करीत सर्व साधक मंडळी अत्यंत प्रसन्न चित्ताने आपापल्या स्थानी परतली.