‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या कऱ्हाड केंद्रात शनिवार व रविवार दिनांक ६ व ७ जुलै २०२४ असे दोन दिवस, प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा पुण्यतिथी-महोत्सव आणि प.पू.सद्गुरु योगिराज श्री.मामा महाराज यांचा जयंती-महोत्सव साजरा करण्यात आला. प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे आणि प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा आगटे यांच्या परममंगल उपस्थितीत हे दोन्ही महोत्सव अत्यंत उत्साहाने व आनंदाने संपन्न झाले.
६ जुलै २०२४
कऱ्हाड येथील ‘श्रीसमर्थ मल्टीपर्पज हॉल’ येथे दुपारी २ वाजल्यापासून स्थानिक साधक-बंधुभगिनींची लगबग सुरू होती. भोवती सुरेख पुष्पसजावट केलेल्या, व्यासपीठावर विराजमान असणाऱ्या, प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज, प.पू.सद्गुरु श्री. मामा महाराज आणि सद्गुरुपरंपरा यांच्या भव्य प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ठीक ४.०० वाजता प.पू.सद्गुरु श्री. अनिरुद्धदादा यांच्या मंगल उपस्थितीत सामुदायिक साधनेने झाली. चहापान व विश्रांतीनंतर ठीक ५.30 वाजता प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांच्या प्रवचन-सेवेस सुरुवात झाली.
ही श्री ज्ञानेश्र्वरीच्या तेराव्या अध्यायातील सहाव्या श्र्लोकाच्या टीकेवरील एकशे चौऱ्यांशी क्रमांकाची ओवी या वेळी त्यांनी प्रवचन-सेवेसाठी घेतली होती. तेराव्या अध्यायामध्ये क्षेत्र-क्षेत्रज्ञयोगाचे विवरण आहे. प्रवचनाच्या प्रथम सत्रात प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी ‘क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय ? ज्ञान कोठे प्रकटते ? ज्ञानाच्या प्राकट्याची लक्षणे व चिन्हे कोणती ?’ याविषयी विवरण केले. ते म्हणाले; ‘‘परब्रह्माचे प्रतिबिंब अष्टधा प्रकृतीमध्ये पडते आणि त्यायोगे भ्रम होऊन जीव स्वतःला परब्रह्माहून वेगळा समजू लागतो. असे जीवाचे स्वतःस वेगळे समजणे हेच खरे अज्ञान आहे आणि या अज्ञानाचे नाहीसे होणे म्हणजेच स्वरूपसाक्षात्कार होणे आहे.’’
पुढे प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी ज्ञान प्रकट झाल्याने होणाऱ्या चित्तशुद्धीची विविध लक्षणे सांगितली. त्यांतील पहिल्या दोन लक्षणांचा विचार करताना त्यांनी सांगितले की; ‘‘ज्ञान प्रकटले असता साधकाच्या ठिकाणी ‘अमानित्व’ आणि ‘अदंभित्व’ ही लक्षणे दिसून येतात. स्वसन्मानाची, स्वस्तुतीची कोणतीच इच्छा न राहणे, आपले अस्तित्वच कोणास जाणवू नये असे आचरण करण्याइतपत स्थिती होणे यास ‘अमानित्व’ असे म्हटले आहे. आत एक आणि बाहेर एक अशा प्रकारे आपला फायदा करून घेण्याचा स्वभाव म्हणजेच दांभिकता होय. या प्रवृत्तीचा नाश होणे म्हणजे ‘अदंभित्व’ होय. साधकांनी आत्मपरीक्षण करून आपली स्थिती कशी आहे याचे स्वतःच अवलोकन करावे !’’ तसेच आपल्या सद्गुरुपरंपरेतील सर्वच महात्म्यांच्या ठायी अदंभित्व, अमानित्व ही चिन्हे प्रकर्षाने अनुभवास येतात असे सांगून, या संदर्भात प.पू.सद्गुरु सौ.ताईंच्या काही हृद्य आठवणी त्यांनी निरूपणाच्या ओघात सांगितल्या.
पहिल्या सत्रातील प्रवचन-सेवेनंतर शंका-समाधानाचा कार्यक्रम झाला. त्या वेळी प.पू.श्री.सद्गुरु शिरीषदादांनी साधकांच्या विविध पारमार्थिक शंकांचे समूळ निरसन केले. एका प्रश्र्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की; ‘‘साधकाने साधना करत असताना येणारे विविध शुभ अनुभव, बैठकीदरम्यान होणाऱ्या क्रिया, सद्गुरुदर्शन यांचा आनंद घ्यावा. सतत श्रीसद्गुरूंच्याच स्मरणात राहावे. तो सद्गुरुकृपेचा व त्यांच्याच करुणेचा प्रत्यय असतो. मात्र अशा अद्भुत अनुभवांनी प्रसंगी अहंकार वाढीस लागू शकतो. तसे होऊ देऊ नये. साधनेदरम्यान येणारे अनुभव, क्रिया, होणारी दर्शने अशा सर्व गोष्टी भगवतीच्या इच्छेवर, सद्गुरुकृपेवर सोडून द्याव्यात. जगभरात अस्तित्वात असलेले सर्वच परमार्थ-मार्ग हे सद्गुरुकृपेवर, शक्तीच्या कृपेवर अवलंबून असल्याने ही कृपा होणे अत्यावश्यक आहे.
प्रेमाने व नित्य साधन झाल्यास सर्व जीवांप्रति अंतःकरणात समभाव उत्पन्न होतो. सर्वच जीव हे भगवत्स्वरूप असल्याची सतत जाणीव ठेवून वागल्यास, त्यायोगे आपल्यातील दोष कमी होतील. यालाच ‘भगवद्भाव स्थिरावणे’ असे म्हणतात. हे देखील ज्ञानाचेच लक्षण आहे !’’
याप्रसंगी प.पू.श्री.दादांनी, प.पू.सद्गुरु श्री.मामा व प.पू.सद्गुरु सौ.ताई यांच्या एका आठवण-प्रसंगातून आपले सद्गुरु शिष्यांची सर्वार्थाने कशी काळजी वाहतात व त्यांच्यावर प्रेमाचा, कृपेचा वर्षाव कसा करतात ते सांगितले. ‘‘यासाठी सर्वच साधकांनी सद्गुरुसान्निध्यात म्हणजेच त्यांच्या नित्य अनुसंधानात राहावे. त्यांना अनन्यभावाने शरण जाऊन नेमाने साधन करावे आणि सद्गुरुचरण कधीही सोडू नयेत. साधना हीच सद्गुरुसान्निध्याची किल्ली आहे !’’ असा उपदेश प.पू.सद्गुरु श्री.दादांनी केला.
नव्याने प्रकाशित झालेल्या ‘श्रीगुरुगीता’ ग्रंथासंबंधी एका प्रश्र्नास उत्तर देताना प.पू.सद्गुरु श्री.दादा म्हणाले की; ‘‘ ‘श्रीगुरुगीता’ हा प्रमाणग्रंथ असून ही साधकांसाठी ‘आचारसंहिता’च आहे. सद्गुरुतत्त्व म्हणजे काय ? सद्गुरूंप्रति साधकाचा भाव व आचार कसा असावा ? आपल्या सद्गुरूंशी साधकाने कसे वागावे ? अशा अनेक विषयांचे मार्गदर्शन या ग्रंथामध्ये केलेले आहे. साधक बंधुभगिनींनी श्रावण अनुष्ठानामध्ये याचे पारायण अवश्य करावे !’’
‘‘साधकांनी नित्य साधनेसोबतच संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास व ग्रंथांचे वाचन करणे आवश्यक आहे,’’ याचाही पुनरुल्लेख या वेळी प.पू.श्री. दादांनी केला.
शंका-समाधान सत्रानंतर नामजप व आरती संपन्न झाली. त्यानंतर कु.शाल्मली भालेराव यांनी श्रीसद्गुरुचरणीं अत्यंत श्रवणीय अशी गायनसेवा समर्पित केली. त्यांना श्री.विजय उपाध्ये यांनी संवादिनीची तसेच श्री. शुभम बेर्डे यांनी तबल्याची उत्तम साथ केली. कु.शाल्मली यांनी यमन रागातील ‘चलो चलो प्रभू के दर्शन को’ या पदाने समर्पक सुरुवात केली. त्यानंतर ‘सुंदर तें ध्यान’, ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म’, ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’ इत्यादी अभंग गायिले. ‘श्रीस्वामीसमर्थ नामपाठा’तील ‘सुवर्ण झळाळ, दिव्य परिमळ’ या त्यांच्या सुमधुर अभंग-पदगायनाच्या श्रवणाने उपस्थित सर्वच साधकभक्तांची मने भक्तिरसात नाहून निघाली. शेवटी गायिलेल्या ‘पसायदाना’ने सर्वांना मंत्रमुग्ध केले. या अवीट गोडीच्या गायनसेवेबद्दल कु.शाल्मली भालेराव, श्री.विजय उपाध्ये व श्री.शुभम बेर्डे यांचे प.पू.सद्गुरु श्री.दादा यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन कौतुक केले. अल्पोपाहारानंतर पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाची समाप्ती झाली.
७ जुलै २०२४
दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक ७.०० वाजता, प.पू.श्री.अनिरुद्धदादांच्या उपस्थितीत सामुदायिक साधनेने कार्यक्रमांची सुरुवात झाली. अल्पोपाहारानंतर साधकांनी ‘श्रीगुरुसाहस्री’चे तसेच ‘श्रीदत्तभावांजली’चे वैयक्तिक वाचन केले. त्याच वेळी सौ.श्रुती व श्री. विराज कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीसत्यदत्त पूजा व सौ.भाग्यश्री व श्री.कृष्णाजी कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीसद्गुरुपादुका-पूजन संपन्न झाले.
कार्यक्रमस्थळी ‘श्रीवामनराज प्रकाशना’च्या ग्रंथांच्या स्टॉलला तसेच ‘संस्कृती संवर्धिनी फाऊंडेशन’द्वारे प्रकाशित होणाऱ्या ‘अमृतबोध’ मासिकाच्या स्टॉललाही अनेकांनी भेट देऊन, अभ्यासास उपयुक्त अशा अनेक ग्रंथांची खरेदी केली. त्याचबरोबर श्रीक्षेत्र आंबेरी येथील विविध सेंद्रिय उत्पादनांच्या विक्री-स्टॉललाही उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला.
सकाळी ठीक १०.३० वाजता प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांच्या प्रवचन-सेवेस आरंभ झाला. सुरुवातीला त्यांनी आदल्या दिवशी झालेल्या प्रवचन-सेवेतील मुद्द्यांचा थोडक्यात आढावा घेतला आणि त्यानंतर हृदयात ज्ञान प्रकटल्याने दिसणाऱ्या चिन्हांचा विचार व त्यांची लक्षणे विस्ताराने सांगितली. ‘अदंभित्व’ या चिन्हाची लक्षणे सांगताना प.पू.श्री.अनिरुद्धदादा म्हणाले की; ‘‘केलेल्या परोपकाराची गुप्तता ठेवणे, आपला अभ्यास न मिरविणे, आपल्या ज्ञानाचा अहं न बाळगणे, सामर्थ्य व कीर्ती झाकून ठेवून कार्य करणे ही काही ठळक लक्षणे अदंभित्व दाखवून देतात. या सर्वच लक्षणांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प.पू.सद्गुरु सौ.ताई होत !’’
प.पू.सद्गुरु सौ.ताईंच्या ठायी प्रखर ज्ञान आणि ज्ञानचिन्हे प्रकट झाली होती. ती त्यांच्या स्थूलदेहावरही दिसत असत. हे दर्शविणारे त्यांच्या जीवनचरित्रातील काही प्रसंग प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी निरूपणाच्या ओघात सांगितले. पुढे ते म्हणाले की; ‘‘ही ज्ञानचिन्हे पुढे अधिकाधिक गहन होत जातात. यांमध्ये ‘अहिंसा’, ‘क्षमा’, ‘आर्जव’, ‘सद्गुरुभक्ती’, ‘आचार्योपासना’ असे अनेक प्रकार आहेत. वेळेअभावी त्या सर्वांचाच विचार करणे येथे शक्य होणार नाही !’’
‘‘सातत्याने श्रीसद्गुरुस्मरण करावे तसेच नेमाने व प्रेमाने साधना करावी;’’ असा कळकळीचा उपदेश करून प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी आपली झालेली प्रवचन-सेवा श्रीसद्गुरुचरणीं समर्पित केली.
यानंतर शंका-समाधानाच्या दुसऱ्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सद्यकाली घरोघरी नव्या पिढीमध्ये संस्कारांचा दिसणारा अभाव आणि लोपत चाललेले शास्त्रांचे ज्ञान याबद्दल प.पू.श्री.दादांनी या वेळी तीव्र खेद व्यक्त केला. त्यानंतर व्यवहारातील काही चपखल उदाहरणे तसेच संत-साहित्यातील समर्पक दाखले देऊन, अत्यंत मार्मिक आणि यथोचित मार्गदर्शन करून त्यांनी साधकांच्या मनातील अनेक शंकांचे समूळ निरसन केले.
‘‘वैराग्य हेच साधकाचे सर्वोत्तम आभूषण आहे. मनातील सर्व चिंता योगाग्नीमध्ये जळून भस्म होतात व त्यानंतर वैराग्य प्रकटते. म्हणून त्यालाच शास्त्रांत ‘चिताभस्म’ असे संबोधलेले आहे. हेच ‘चिताभस्म’ भगवान श्रीशिवशंकरांना प्रिय असे आहे !’’ असा खुलासा प.पू.सद्गुरु श्री. दादांनी ‘चिताभस्मा’संबंधी विचारलेल्या एका प्रश्र्नाचे उत्तर देताना केला. त्यांची अमोघ वाणी आणि शब्दन् शब्द उपस्थित सर्वांना मोहून टाकणारा, अंतर्मुख करणारा तसेच भक्तिमार्गातील वाटचाल सुगम करून देणारा असाच होता. हे सत्र आणि त्यांचे बोलणे कधी थांबूच नये, अशीच सर्व साधकभक्तांची इच्छा होती; मात्र वेळेअभावी हे शंका-समाधान सत्र आवरते घेण्यात आले.
त्यानंतर दुपारी १२.३० ते १.०० या कालावधीत पुण्यस्मरण व आरती संपन्न झाली. त्यानंतर उपस्थित साधकजनांना सद्गुरुदर्शनाचा लाभही घेता आला.
कऱ्हाड केंद्रातर्फे श्री.जयवंत क्षीरसागर यांनी प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा यांना श्रीफल व पुष्पगुच्छ अर्पण केले. तदनंतर उपस्थित सर्व साधकभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि अत्यंत तृप्त मनाने व समाधानाने सर्वजण आपापल्या मुक्कामी परतले.
उत्सवातील काही क्षण चित्रे