

|| श्री ||
प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे पुण्यतिथी महोत्सवाचा वृत्तांत

महोत्सव स्थळ

प.पू.सद्गुरु मातु:श्री सौ. शकुंतलाताई आगटे
भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु मातुःश्री प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे यांचा सहावा पुण्यतिथी महोत्सव श्रीक्षेत्र आंबेरी येथे ‘प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तपोवन’ प्रकल्पस्थानी माघ कृ.७ (श्रीप्रिया सप्तमी) बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी भक्तिभावाने संपन्न झाला.
या प्रसंगी श्रीचरणाधिष्ठान मंदिराच्या गर्भगृहात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी ६ ते ९.३० या काळात प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताई महाराजांच्या पादुकांची पवमानाभिषेकसहित महापूजा करण्यात आली.
तदनंतर ठीक १०.१५ वाजता प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांचे श्रीचरणाधिष्ठान मंदिरात मंगल आगमन झाले व त्यांच्या उपस्थितीत श्री हरिपाठ गायन-सेवा श्रीसद्गुरुचरणीं रुजू करण्यात आली. त्यानंतर सकाळी ११.१५ वाजता प.पू.सद्गुरु श्री.दादांची प्रवचन-सेवा संपन्न झाली.
या श्री ज्ञानेश्वरीतील अतिशय महत्त्वाच्या ओवीवर त्यांनी अत्यंत रसाळ आणि भावपूर्ण निरूपण केले. या प्रवचनात प.पू.सद्गुरु श्री.दादांनी ‘राजविद्याराजगुह्ययोग’ म्हणजे काय? पूर्वी हा अधिकार कोणाला होता? त्याचा प्रसार कसा होत असे ? श्रीभगवंतांनी पार्थाच्या निमित्ताने हे गुह्य कसे उघड केले? प्रेमाची लक्षणे सद्गुरूंच्या व साधकांच्या ठिकाणी कशी दिसतात? श्रीसद्गुरु हे कसे सर्वव्यापी असतात आणि त्यांना स्थळ-काळाचे बंधन कसे असत नाही, इत्यादी विषयांसंदर्भात सखोल विवेचन केले. निरूपणाच्या ओघात प.पू.सद्गुरु श्री.दादांनी प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताई महाराजांच्या श्री मीराबाईंच्या अवताराशी ऋणानुबंध असलेल्या टांझानिया, आफ्रिका या देशात जन्मलेल्या ‘टीना’ नामक शिष्येची अतिशय मार्मिक व हृदयस्पर्शी कथा सांगितली. तसेच भक्तिमार्गाच्या साधकाने संप्रदायोक्त साधना, सद्गुरुसेवा, मानसपूजा, नामस्मरण आणि संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास हे सर्व नित्य नियमाने केलेच पाहिजे, असेही त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले.
त्यानंतर सर्व उपस्थितांनी व ‘राधे राधे राधे राधे’ असा नामजप केला. तदनंतर श्रीकृष्णस्तोत्र-पठण होऊन आरती, मंत्रपुष्पांजली झाली व ‘प्रेमसुमनांजली’ म्हणण्यात आली. महाप्रसादाने प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंच्या या पुण्यतिथी महोत्सवाची भावपूर्ण सांगता झाली.
श्रीपाद सेवा मंडळ, पुणे केंद्रामध्ये प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे यांचा पुण्यतिथी महोत्सव माघ कृ.७ (श्रीप्रिया सप्तमी) बुधवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. प.पू.सद्गुरु श्री. अनिरुद्धदादांच्या मार्गदर्शनाप्रमाणे या महोत्सवाची सर्व तयारी करण्यात आली होती. सकाळी ‘माउली’ व ‘श्रीपाद निवास’ दोन्ही स्थानी नित्यपूजा होऊन दुपारी १२ ते १२.३० या काळात ‘माउली’मध्ये ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे’ हा नामजप करण्यात आला. तदनंतर आरती व तीर्थप्रसाद झाला.
सायंकाळी ५.४५ वाजता प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांची प्रवचन-सेवा संपन्न होणार असल्याने दुपारी ४.३० ते ५.३० या वेळेत सामुदायिक साधना झाली. साधनेकरिता ‘श्रीपाद निवास’ येथे मोठ्या संख्येने साधक उपस्थित होते. सायंकाळी नियोजित वेळी प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या प्रवचन-सेवेस सुरुवात झाली.
श्री ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायातील सातव्या श्लोकावरील भाष्यातील या ओवीचे निरूपण करताना प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा म्हणाले की, ‘‘जो अंतर्यामी म्हणजेच अंतरंगी दृढ आहे, परमात्मस्वरूपात गढलेला आहे, तरीही बाहेरून मात्र सामान्य लोकांप्रमाणेच व्यवहार करीत असतो, अशा भगवद्भक्त महात्म्याचे श्री माउलींनी केलेले हे वर्णन आहे. ही ओवी वाचताना प.पू.सद्गुरु श्री.मामा आणि प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताई यांची प्रकर्षाने आठवण होते!’’ ‘ज्यांचे स्मरण केले असता आपल्याला पुण्य मिळते’ असा प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंनी सांगितलेला ‘पुण्यतिथी’ या शब्दाचा अर्थ सांगून पुढे त्यांनी या शब्दाचा प.पू.सद्गुरु श्री.मामांनी पूर्वी सांगितलेला अर्थही परत सांगितला. प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा पुढे म्हणाले की, ‘‘देह घेऊन पृथ्वीवर जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला कर्मे ही असतातच. प्रारब्धकर्माशिवाय स्थूल देह धारण करून या पृथ्वीवर जन्म घेता येत नाही. कर्म हे भोगूनच संपवावे लागते, असा नियम आहे. मात्र यात फरक असा असतो की, सामान्य जीवांचे कर्म हे त्यांच्या अनंत जन्मांची कमाई असते; तर संतांचे कर्म हे त्यांना देह धारण करण्यासाठी आवश्यक म्हणून परंपरेने दुसऱ्या कोणाचे तरी उचलून दिलेले असते. त्यांना स्वतःचे असे काही कर्म नसतेच. कारण कर्माचे मूळ असणाऱ्या वासनाच त्यांच्यापाशी नसतात. सद्गुरूंच्या चरित्राचे चिंतन-मनन हे कर्मसंन्यास साध्य करण्यासाठी आपल्याला अत्यंत मार्गदर्शक ठरते.
प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंच्या संदर्भात सांगायचे तर त्यांनी सद्गुरूंच्या शब्दापुढे अन्य कशाचीही पर्वा केली नाही. नित्य व नैमित्तिक कर्मे पार पाडत असताना आपल्या अर्थबळाचा विचार न करता, सद्गुरूंच्या शब्दांवर दृढ श्रद्धा ठेवून, ते जसे ठेवतील तसे समाधानाने राहणे असे धोरण त्यांनी नित्य ठेवले. विहित कर्मे करायलाच हवीत, या भावनेने कोणालाही दोष न देता त्यांनी प्रामाणिकपणे, निष्ठेने वाट्याला आलेली सर्व कर्मे पार पाडली. मुख्य म्हणजे, वडीलधाऱ्यांची सेवा, मुलांविषयीची कर्तव्ये, आतिथ्यधर्म सांभाळणे, दैनंदिन जीवनातील शिस्त, स्वच्छता, गृहकृत्यदक्षता आणि नोकरी; ही सर्व प्रापंचिक कर्तव्ये करीत असताना त्यांची साधना आणि सद्गुरुसेवा या गोष्टींत कधीही खंड पडला नाही. रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी प.पू.सद्गुरु सौ.ताईंचा दिवस पहाटे ३.३० लाच सुरू होत असे.
महात्मे वरवर पाहता सामान्यांसारखेच दिसतात. त्यामुळे आपल्यासारख्या सामान्यांना त्यांच्या अंतरंगस्थितीची कल्पनाही करता येत नाही. आपल्यावर मायेचा चश्मा असल्याने ती स्थिती जाणून घेण्याची आपली क्षमताही नसते. ‘सामान्यांमध्ये सामान्य होऊन राहा’, ही प.पू.सद्गुरु श्री.मामांची आज्ञा प.पू.सद्गुरु सौ.ताईंनी आयुष्यभर पाळली. कोणताही कर्तृत्वभाव न ठेवता प.पू.सद्गुरु श्री.मामांची प्रतिनिधी म्हणूनच त्यांनी जगभर कार्य केले. ज्यांनी प.पू.श्री.मामांना कधी प्रत्यक्ष पाहिले देखील नाही अशा लोकांच्या मनात त्यांनी त्यांच्याविषयी भक्तिप्रेम निर्माण केले.
निरूपणासाठी घेतलेली ही ओवी हे ‘योगवासिष्ठा’चे सार आहे. नित्य आणि नैमित्तिक कर्मे महात्मे देखील करतात; परंतु त्यात ते गुंतलेले नसतात. अंतरंगी ते अलिप्त असतात. त्यांना विषयांशी काहीच देणे-घेणे नसते. असा कर्मसंन्यास साध्य करण्यासाठी ‘भगवत्स्मरण’ आणि ‘सद्गुरुसेवा’ हे दोन प्रमुख मार्ग असल्याचे प्रतिपादन करून प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी झालेली सेवा श्रीसद्गुरुचरणीं समर्पित केली. त्यानंतर आरती आणि तीर्थप्रसादाने महोत्सवाची सांगता झाली.
उत्सवातील काही क्षण चित्रे










