श्रीक्षेत्र आंबेरी येथे संपन्न झालेल्या भगवान श्रीकृष्ण व सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्र्वर माउलींच्या जयंती महोत्सवाचा वृत्तांत
प्रतिवर्षी भगवान श्रीकृष्णांच्या व सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्र्वर माउली महाराजांच्या जयंतीचा व गोपाळकाला महोत्सवाचा सोहळा श्रीक्षेत्र आंबेरी तपोवन येथे संपन्न होत असतो. या वर्षी देखील हा महोत्सव श्रावण कृ.८ व ९; दिनांक २६ व २७ ऑगस्ट २०२४ असे दोन दिवस प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा व प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांच्या परममंगल उपस्थितीत मोठ्या उत्साहाने ‘तपोवना’त साजरा करण्यात आला.
आंबेरीतील सर्व निवासी साधक बंधुभगिनी श्रीसद्गुरुद्वयांच्या मार्गदर्शनानुसार सर्व तयारी अगोदरच करून महोत्सवासाठी सज्ज होते. ‘तपोवना’तील परिसर वर्षासरींमुळे हिरवागार झाला होता. संपूर्ण परिसरामध्ये कमालीची स्वच्छता जाणवत होती. विविध फुलझाडे, कृष्णतुळशी सर्वत्र बहरल्या होत्या. श्रावण मासातील ऊन्ह-पावसाचा खेळ ह्या निसर्गसौंदर्यात भर घालीत होता. जणू संपूर्ण ‘तपोवन’च श्रीभगवंतांच्या जन्मोत्सवासाठी उत्सुक झाले होते.
सोमवार, दिनांक २६ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजल्यापासूनच ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा, कऱ्हाड, चिपळूण तसेच दुबई, ऑस्ट्रेलिया, अमेरिका इत्यादी परदेशांतील केंद्रांमधून निमंत्रित साधकांचे प्रकल्पस्थानी आगमन होऊ लागले. येणाऱ्या साधक-सद्भक्तांना दर्शनासाठी प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंचे ‘श्रीचरणाधिष्ठान’ मंदिर पूर्ण वेळ खुले ठेवण्यात आले होते. मुख्य मंदिरात श्रीभगवंत, अनंतकोटिब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज व प.प.श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या पूजा संपन्न झाल्या होत्या. मंदिरातील स्तंभांना आकर्षक सजावट करण्यात आली होती. जन्मकाळासाठी देवांचा पाळणा सुगंधी पुष्पांनी अतिशय सुंदर सजवला होता. गर्भगृहातील पुष्पसजावट झुंबरांच्या प्रकाशात शोभून दिसत होती. श्रीराधावर भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंची सालंकृत मूर्ती पाहून दर्शन घेणाऱ्यांच्या मनात श्रीसंत नारायणस्वामी महाराजांनी त्यांच्या एका अभंगात वर्णन केल्याप्रमाणे ‘मोर मुकुट की निरखी छबि, लाजत मदन करोर । चंद्रवदन सुखसदन पें, भावक नैन चकोर ॥’ असाच भाव दाटून येत होता.
सायंकाळी चार वाजता ‘श्री हरिपाठ-गायन’सेवेने महोत्सवातील कार्यक्रमांच्या पहिल्या सत्रास प्रारंभ झाला. या प्रसंगी साधकबंधूंच्या सुश्राव्य स्वरांना सर्व वादकांनी जोषपूर्ण साथ दिली आणि आनंदविभोर होऊन पावली करणाऱ्या आणि श्रीभगवच्चरणीं श्री हरिपाठ-गायनसेवा रुजू करणाऱ्या साधकबंधूंच्या स्वरांनी संपूर्ण वातावरण अत्यंत प्रसन्न व भक्तिमय झाले.
चहापानाच्या अल्प विश्रांतीनंतर दुसऱ्या सत्रातील कार्यक्रमांना सुरुवात झाली. याच दरम्यान प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा व प.पू.सद्गुरु श्री. अनिरुद्धदादा यांचे मुख्य मंदिरात पावन आगमन झाले. अमेरिकेतील टेक्सास, डॅलस येथून आलेल्या साधकभगिनी कु.मृण्मयी साठ्ये यांनी श्रीभगवंतांच्या श्रीचरणीं नृत्यसेवा रुजू केली. कु.मृण्मयी यांनी कथ्थक या नृत्यप्रकारातून प्रारंभी, ‘कस्तूरीतिलकं ललाटपटले’ ही श्रीकृष्णवंदना सादर करून तदनंतर श्रीभगवंतांच्या श्रीकृष्णावतारातील काही बाललीला सादर केल्या. त्यात त्यांनी सुरेख पदलालित्य, उत्कट भाव यांनी युक्त असे श्रीबाळकृष्णांची माखनचोरी ‘मैं नहीं माखन खायो’, ‘बैसो मेरे नयनमें नंदलाल’, कालियामर्दन, वृंदावनातील होलिकोत्सव ‘होरी खेलत है गिरिधारी’ या रचनांवर आधारित प्रसंग अत्यंत बहारीने सादर केले.
त्यानंतर सायंकाळी ६.२५ ते ७.०० या वेळेत पुण्याचे साधकबंधू श्री.यश रुईकर यांनी अत्यंत श्रवणीय अशी गायनसेवा श्रीभगवच्चरणीं समर्पित केली. त्यांनी ‘माझे माहेर पंढरी’, ‘श्रीअनंता मधुसूदना’, ‘एवढासा माझा भाव तो काही’, ‘माझा भाव तुझे चरणीं’, ‘बाजे रे मुरलिया बाजे’ असे संतांचे सुप्रसिद्ध अभंग व पदे गायिली.
त्यानंतर ७.०५ ते ७.३५ या वेळेत श्री.विजय उपाध्ये यांनी संवादिनी-वादनसेवा श्रीभगवच्चरणीं रुजू केली. त्यांनी ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’, ‘अरे अरे ज्ञाना झालासे पावन’, ‘ज्ञानियांचा राजा गुरुमहाराव’, ‘फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार’, ‘डमडमडम डमरू बाजे’ अशा एकाहून एक सरस रचना सादर करून फारच बहार आणली. वरील सर्व कार्यक्रमांना श्री.संकेत खलप, गोवा यांनी तबल्याची, श्री.मनोज भांडवलकर यांनी पखवाजाची आणि श्री.शैलेश सहस्रबुद्धे यांनी तालवाद्याची साथ केली.
उपरोक्त कार्यक्रमानंतर श्रीभगवच्चरणीं सेवा रुजू करणाऱ्या या सर्व कलावंतांचा प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.
०७.४५ ते ०८.३० या वेळात सर्व उपस्थितांचा अल्पोपाहार झाला. अल्पोपाहारानंतर सांगलीच्या साधकभगिनी सौ.अर्चना साळुंखे यांनी श्रीभगवच्चरणीं गायन-सेवा समर्पित केली. त्यांनी ‘जाऊँ तोरे चरणकमल पर वारी’, ‘तुम्ही हरि म्हणा तुम्ही गोविंद म्हणा’, ‘धागा धागा अखंड विणू या’, ‘सोनियाचा दिवस आजि अमृतें पाहिला’, ‘विठ्ठला समचरण तुझे धरिले’, ‘जेथे नाम अखंडित । तेथे वेद मूर्तिमंत’, ‘ऐसा विटेवर देव कोठे’ असे संतांचे काही सुप्रसिद्ध अभंग तसेच ‘श्रीस्वामीसमर्थ नामपाठा’तील ‘जन्मोनी संसारी’ हे पद सादर केले. त्यांनाही श्री.विजय उपाध्ये यांनी संवादिनीची, श्री.संकेत खलप यांनी तबल्याची तर श्री.मनोज भांडवलकर यांनी पखवाजाची तसेच श्री.शैलेश सहस्रबुद्धे यांनी तालवाद्याची साथ केली.
अल्पशा विश्रांतीनंतर रात्री दहा वाजता सुरू होणाऱ्या प.पू.सद्गुरु श्री. दादांच्या जन्मकाळाच्या कीर्तन-सेवेसाठी सर्व वादक व टाळांची साथ करणारे साधकबंधू सज्ज होते. थोड्याच वेळात प.पू.सद्गुरु श्री.दादांचे शुभ्र धोतर, उपरणे, मोतिया रंगाचा मखमली अंगरखा, कपाळी बुक्का आणि मस्तकी फेटा अशा पारंपरिक वेषात मंदिरात आगमन झाले. या पावन सद्गुरुदर्शनाने उपस्थित सर्वांच्या हृदयात अष्टसात्त्विकाचा पूरच लोटला आणि त्याच वेळी अवीट गोडीच्या अद्भुत श्रीकृष्ण जन्मकथेला प्रारंभ झाला.
हा श्रीसंत तुकाराम महाराजांचा अभंग प.पू.सद्गुरु श्री.दादांनी जन्मकालाच्या कीर्तन-सेवेसाठी घेतला होता. कीर्तनाच्या प्रारंभी प.पू.सद्गुरु श्री.दादांनी सेवेसाठी घेतलेल्या अभंगाचा गूढार्थ थोडक्यात सांगितला तो असा की; ‘‘ ‘गोकुळ’ म्हणजेच ‘मनुष्य देह’. या देहात भगवंतांचा अवतार होणे म्हणजेच सद्गुरुकृपा होणे होय. या कृपेमुळे दुष्टांचा म्हणजेच षड्रिपूंचा चळकांप होतो आणि ‘घरोघर’ म्हणजे जेथे कर्मांचा, वासनांचा निवास आहे तेथून त्या जाऊन तेथेच सत्चित्आनंद प्रकटतो. हे फळ मिळण्यासाठी काय करावे ? तर प्रेमाने भगवन्नाम घ्यावे. सच्चिदानंद स्थिती ही परमार्थातील पदवी आहे, अशी स्थिती प्राप्त झालेला जीव सर्व दोषांतून मुक्त होतो !’’
पुढे प.पू.सद्गुरु श्री.दादांनी श्रीभगवंतांच्या श्रीकृष्ण अवताराच्या मंगल जन्मकथेचे ‘श्रीमद् भागवत’ व ‘गर्गसंहिता’ या महत्त्वाच्या प्रमाणग्रंथांचे संदर्भ देऊन तसेच संतांच्या विविध अभंगांच्या साह्याने अनुपमेय असे वर्णन केले. सनत्कुमारांच्या शापवाणीने जय-विजयांचा भूलोकी जन्म, सर्व असुर-शक्तींचे एकत्र येणे, भूदेवीची भगवंतांस विनवणी, देवकी-वसुदेव विवाह, दुष्ट कंसाच्या वर्तनाने त्यांस घडलेला कारावास, शेषांचा जन्म, योगमायेचा व स्वतः भगवंतांचा जन्म अशा सुरस, अद्भुत व दिव्य प्रसंगांचे वर्णन ऐकताना उपस्थित साधकजन मंत्रमुग्ध झाले होते.
आपल्या संप्रदायानुसार, श्रीभगवंतांचे जेव्हा गोकुळी नंदांच्या घरी आगमन झाले, त्या वेळी त्यांचा जन्मकाळ साजरा केला जातो. जन्मकाळाच्या कीर्तनात कथेच्या अनुरूप विविध अभंग, पदे यांचे अत्यंत सुंदर गायन करण्यात आले. ‘गवळण सांगे गवळणीला । पुत्र झाला यशोदेला ।।’ ह्या अभंगानंतर संवादिनी, तबला, पखवाज, झांजा, टाळ, घंटा व शंख अशा समस्त वाद्यांचा एकत्रित गजर करीत श्रीभगवंतांचा जन्मकाळ साजरा करण्यात आला. मंदिर-सभागृहातील वातावरण अतिशय उल्लसित, प्रसन्न झाले होते. त्याच वेळी मंदिरासमोरील दीपमाळ उजळली व कारंजी नाचू लागली. जणू काही आपण प्रत्यक्ष गोकुळीच आलो असल्याचा प्रत्यय सर्व उपस्थितांना येत होता. जन्मकाळी प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी पाळण्यातील श्रीभगवंतांच्या उत्सवमूर्तीचे व सद्गुरु श्री ज्ञानेश्र्वर माउलींच्या प्रतिमेचे पूजन केले. त्या वेळी सौ.अमिता आगटे यांनी ‘नंद मुकुंद मुरारी सावळा, गोकुळात हरि आला हो’ हे श्रीसंत माणिकप्रभू महाराजांनी रचलेले पद व ‘जो जो जो जो रे बाळा ।’ हा श्रीसंत एकनाथ महाराज विरचित श्रीभगवंतांचा पाळणा म्हटला. तदनंतर सर्वांनी श्रीभगवंतांची व श्री माउलींची आरती म्हटली.
प.पू.सद्गुरु श्री.दादांनी त्यानंतर कथेचा पुढील भाग सांगितला. श्रीभगवंत गोकुळात आल्यानंतर श्री नंदबाबांच्या घरी झालेल्या आनंदोत्सवाचे प.पू.श्री. दादांनी अतिशय रसपूर्ण वर्णन केले आणि झालेली कीर्तन-सेवा भगवच्चरणीं समर्पित केली. त्यानंतर पहिल्या दिवशीचे कार्यक्रम समाप्त झाले. श्रीभगवंतांचे, श्री माउलींचे व उभय सद्गुरु श्रीस्वामी महाराजांचे दर्शन आणि तीर्थप्रसाद घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच परत येण्यासाठी सर्व मंडळी आपापल्या मुक्कामी परतली.
दुसऱ्या दिवशी, म्हणजे मंगळवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी चहापान व नाष्टा झाल्यानंतर साधकजन नऊ वाजता मुख्य मंदिरातील सभागृहात आसनस्थ झाले. सकाळीच श्रीभगवंतांची व उभय श्रीस्वामी महाराजांची पूजा संपन्न झाली होती. प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंच्या श्रीचरणपादुका श्रीचरणाधिष्ठान मंदिरातून ‘राधेकृष्ण गोपालकृष्ण’ असे नामसंकीर्तन करीत टाळ-मृदंगांच्या गजरात श्रीभगवंतांच्या मंदिरात गर्भगृहात स्थापित करण्यात आल्या. सभागृहाच्या मध्यभागी सुगंधी पुष्पांनी सजविलेली दहीहंडी बांधण्यात आली होती. थोड्याच वेळात राजदंड व भालदार-चोपदारांसह प.पू.सद्गुरु श्री.दादांचे सभागृहात आगमन झाले. तत्पूर्वीच त्यांना अभंगगायनाची साथ करणारे साधकबंधू सज्ज होते.
‘जय जय रामकृष्ण हरी’ व ‘विठोबा रखुमाई’ या नामगजराने काल्याच्या कीर्तन-सेवेस प्रारंभ झाला. याही प्रसंगीचे प.पू.सद्गुरु श्री.दादांचे कीर्तनकारांच्या पारंपरिक वेषातील दर्शन साधकजीवांच्या हृदयांना विश्रांतीचा परमलाभ घडवणारे होते.
श्रीसंत एकनाथ महाराजांचा हा अभंग प.पू.सद्गुरु श्री.दादांनी सेवेस घेतला होता. गोकुळात आल्यापासून भगवंतांनी त्यांच्या बाललीलांना आरंभ केला. वाड्यात रांगण्यापासून, दही-दूध चोरणे, गोपबालकांसह गोपींच्या घरी जाऊन लोणी चोरणे अशा अनेक खोड्यांचे रसाळ वर्णन प.पू.श्री.दादांनी अभंगाच्या अनुषंगाने केले. त्यातीलही काल्याच्या लीलेचे विशेष महत्त्व व त्याचा गूढार्थ त्यांनी उलगडून सांगितला.
‘‘ ‘काला’ म्हणजेच ‘ब्रह्मरस’. त्याचा ‘कवळु’ म्हणजे तो हातात घेतला आहे. येथे हातांची पाच बोटे श्रद्धा, तितिक्षा, धैर्य, सात्त्विक भाव व निर्धार दर्शवितात. आणि तळहात म्हणजेच श्रीसद्गुरुकृपा. सद्गुरुकृपेच्या आधारावरच या पाच गुणांनी हा कालारूपी ब्रह्मरस प्राप्त करून घेऊन त्यायोगे जीवाने ब्रह्मस्वरूप होणे, असा हा गोपाळकाला आहे !’’ असे विवेचन प.पू.सद्गुरु श्री.दादांनी या वेळी केले.
पुढे श्रीभगवंतांच्या वनलीला वर्णन करताना त्यांनी गोपगड्यांसह खेळलेले खेळ साथीदार साधकबंधूंनी मोठ्या अटीतटीने सादर केले. या खेळांचा विशेष असा की, कोणत्याही खेळात श्रीभगवंत कधीच हरत नाहीत. ‘हुतूतू’, ‘शर्यत’, ‘कुस्ती’, ‘कान्होबाचा दरबार’ असे विविध खेळ पाहताना सर्वच जण दंग झाले. नंतर ‘राधेकृष्ण, गोपाळकृष्ण’चा गजर करीत सर्वांनी फेर धरला. बाल मुकुंदांच्या रूपातील चि.शर्व याने दहीहंडी फोडली.
त्यानंतर कीर्तन-सेवेचा समारोप करून प.पू.सद्गुरु श्री.दादांनी झालेली सेवा श्रीभगवंतांच्या चरणीं समर्पित केली. आरती झाल्यावर देवदर्शन व काल्याचा प्रसाद घेऊन सर्वजण तृप्त झाले. उपस्थित साधकांसाठी सुग्रास भोजन-प्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
दुपारच्या विश्रांतीनंतर सायंकाळी ०६.३० वाजता श्रीभगवंतांची राजोपचार महापूजा सुरू झाली. प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी वेदमूर्ती श्री. दत्तात्रेय जोशी गुरुजी आणि ब्रह्मवृंदाच्या मार्गदर्शनाप्रमाणे यथासांग षोडशोपचारे पूजा केली. प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या उपस्थितीत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, शास्त्र, पुराण, पंचांग, नृत्य, गायन, चामर, वाद्य व नामजप सेवा यांनी युक्त अशी परिपूर्ण राजोपचार पूजा अनुभवण्याचे भाग्य उपस्थित साधकजनांना मिळाले. याप्रसंगी कु.मृण्मयी साठ्ये यांनी नृत्य, सौ.अर्चना साळुंखे यांनी गायन, श्री.यश रुईकर यांनी चामर, सर्व साधकबंधूंनी नामजप, तसेच श्री.विजय उपाध्ये, श्री.मनोज भांडवलकर, श्री. संकेत खलप, श्री.शैलेश सहस्रबुद्धे यांनी वाद्य-वादन अशा सेवा श्रीभगवंतांच्या चरणीं अर्पण केल्या.
या प्रसंगी सर्वांना श्रीविजयी पांडुरंगांच्या मूर्तीचेही दर्शन घेता आले. श्रीसंत एकनाथ महाराजांच्या पूजेत असलेल्या मूर्तीप्रमाणेच घडविलेल्या या मूर्तीची येथे मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. ह्या मूर्तीची नित्य पूजा होत असते. मात्र राजोपचार पूजाप्रसंगीच सर्वांना मूर्तीचे दर्शन घेता येते. एरवी पूजेनंतर ही मूर्ती वेदीमध्ये ठेवली जाते.
राजोपचार-पूजेनंतर सर्वांनी श्रीभगवंतांचे दर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. तदनंतर अल्पोपाहार करून सर्वजण अत्यंत आनंद व समाधान हृदयात भरून घेऊन स्वस्थानी परतले.
श्रीक्षेत्र आंबेरी ‘तपोवन’ येथील श्रीजन्माष्टमीचा दोन दिवसांचा महोत्सव म्हणजे साधकांसाठी अतिविशेष पर्वणीच असते. श्रीभगवंतांचे व श्रीसद्गुरूंचे दर्शन, प.पू.सद्गुरु श्री.दादांची जन्मकालाची व काल्याची अवर्णनीय अशी कीर्तनसेवा या सर्वांचा एकत्रित लाभ म्हणजे श्रीसद्गुरूंची अपरंपार करुणाकृपाच होय. त्यांच्या करुणेच्या अमृतधारा अखंड मस्तकी झराव्यात आणि त्यांच्या करुणाकृपेनेच श्रीभगवंतांची निष्काम भक्तीही लाभावी अशी कळकळीची प्रार्थना करीत धन्य झालेले सर्व साधक आपापल्या स्थानी रवाना झाले.