|| श्री ||
श्रीक्षेत्र दत्तधाम येथे संपन्न झालेल्या श्रीगुरुद्वादशी महोत्सवाचा वृत्तांत
सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ अर्थात् आश्विन कृष्ण द्वादशी श्रीशके १९४६ या दिवशी, भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या निजानंदगमनाचा उत्सव श्रीक्षेत्र दत्तधाम येथे भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
श्रीगुरुद्वादशी महोत्सव संक्षिप्त चलतचित्र
सकाळच्या सत्रामध्ये श्रीरामेश्वरनाथ महाराजांना तसेच श्रीसद्गुरु-पादुकांना लघुरुद्राभिषेक संपन्न झाला. या वेळी सौरसूक्त, पुरुषसूक्त, श्रीगणपती अथर्वशीर्ष, श्रीसूक्त यांचेही पठण करण्यात आले. अभिषेकानंतर श्रीभगवंतांना ‘अष्टोत्तरशतनामावली’ने पुष्पार्चन करण्यात आले. श्रीगुरुद्वादशीच्या उत्सवाच्या निमित्ताने मंदिर संपूर्ण दिवसभर भाविकांना दर्शनासाठी खुले होते. मुंबई, पुणे, सातारा, कऱ्हाड, कोल्हापूर, चिपळूण अशा विविध गावांतील अनेक साधक-सद्भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. जे भाविक प्रथमच श्रीदत्तधामला आले होते ते गडावरील प्रसन्न व शांत वातावरण, स्वच्छता, श्रीभगवंतांना घातलेले पिवळ्या शेवंतीचे हार हे सर्व पाहून भारावून गेले होते. गडावरील ‘श्रीवामनराज प्रकाशना’च्या तसेच ‘अमृतबोध’ मासिकाच्या स्टॉललाही त्यांनी आवर्जून भेट दिली व त्यांचा लाभ घेतला.
संध्याकाळी ठीक पाच वाजता ज्या सोहळ्याची सर्वजण प्रतीक्षा करीत होते तो श्रीभगवंतांचा पालखी-सोहळा सुरू झाला. प्रथम ‘जय जय राम कृष्ण हरी’ने भजनाला प्रारंभ झाला. ‘रूप पाहतां लोचनी’ हा रूपाचा अभंग म्हटल्यानंतर राजदंड, छत्र-चामरे-मोरचेल, अब्दागिऱ्या या सर्वांसह असलेल्या पालखीमध्ये श्रींच्या पादुका विराजमान झाल्या आणि मग प.पू.सद्गुरु श्री. शिरीषदादांच्या नेतृत्वाखाली पालखी-प्रदक्षिणा सुरू झाल्या. पालखीच्या तीन प्रदक्षिणांमध्ये साधक-भक्तांनी विविध अभंगांचे तसेच ‘करुणात्रिपदी’चे गायन केले. ते श्रवण करताना तसेच टाळकऱ्यांच्या पावल्या बघताना सर्व उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते. पालखी-सोहळ्यानंतर आरती झाली. तोपर्यंत काळोख पडू लागला होता. मंदिरात आरती सुरू असतानाच साधकांनी मंदिराभोवतीच्या प्रांगणात, नामसमाधी मंदिराच्या सभोवती तसेच श्रीगुरु-पादुका मंदिराजवळ आणि श्री मारुतिरायांच्या मंदिराजवळ पणत्यांची मांडणी केली.
आरती संपन्न झाल्यानंतर प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी त्रिपुरावरील पणती लावून दीपोत्सवास सुरुवात केली. त्यानंतर साधक-बंधुभगिनींनी सर्व पणत्या लावल्या आणि संपूर्ण परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. त्यानंतर सर्व उपस्थित साधक-सद्भक्तांनी शिस्तबद्ध रीतीने श्रीभगवंतांचे दर्शन घेतले आणि तीर्थ-प्रसाद घेऊन सर्वजण आपापल्या स्थानी परतले.