श्री जैताई मातृगौरव पुरस्कार, २०२४
वणी येथील प्राचीन अशा जैताई देवस्थानाच्या वतीने, ‘वैशिष्ट्यपूर्ण समाज सेवेसाठी’ देण्यात येणारा ‘श्री जैताई मातृगौरव पुरस्कार’ २०२४, श्रीपाद सेवा मंडळ, पुणे येथील, श्री दत्तसंप्रदायचे अध्वर्यू, परमपूज्य सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे ह्यांचे शिष्योत्तम आणि उत्तराधिकारी, परमपूज्य सद्गुरु श्री शिरीषदादा कवडे यांना सादर प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, गौरव चिन्ह आणि रु. ५१ हजार रोख स्वरूपातील हा पुरस्कार प्रदान केल्यावर, श्री दादांनी, पुरस्काराच्या रकमेत, आपले रु. ४० हजार मिळवून जैताई देवस्थानाला सविनय साष्टांग प्रणिपात करून रु. ९१ हजाराची देणगी प्रदान केली.
याप्रसंगी व्यासपीठावर हरिभक्तपरायण निकम महाराज, वेदमूर्ती अनिल रईच, जैताई देवस्थानचे अध्यक्ष माधव सरपटवार, सचिव मनुमहाराज तुगणायत, सदस्य आशुतोष शेवाळकर, किशोर साठे, चंद्रकांत अणे, तुषार नगरवाला, सामाजिक कार्यकर्ता संजय खाडे हे मान्यवर उपस्थित होते.
श्री निकम महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, “परमपूज्य दादांच्या उपस्थितीमुळे, हा केवळ गौरव समारंभ उरलेला नसून सत्संग झालेला आहे” असे प्रतिपादन केले.
विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड ह्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी बोलताना, त्यांनी श्रीपाद सेवा मंडळाच्या माध्यमातून चालणाऱ्या गोसेवा ते विद्यार्थी सुविधा अशा विविध भौतिक कार्यांच्या सोबत, वामनराज प्रकाशनाच्या द्वारे होत असलेल्या मानसिक तथा माऊली परिवाराच्या वतीने होत असलेल्या बौद्धिक, धार्मिक, आध्यात्मिक स्वरूपातील सामाजिक उन्नयनाचे वैशिष्ट्य अधोरेखित करून पूज्य श्री दादांच्या कार्याचा विविधांगी परामर्श घेतला.
“जैताई मातेचा प्रसाद स्वरूपातील हा पुरस्कार आयुष्यातील एक अवर्णनीय आनंद आहे” असे म्हणत सत्काराला उत्तर देताना परमपूज्य सद्गुरु श्री शिरीषदादा कवडे यांनी जगदंबेच्या या विजयदुर्गा स्वरूपाचे वर्णन करीत देवीच्या आणि वणीच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. “आपापल्या क्षेत्रात अग्रेसर असलेले अनेक दिग्गज वणीत त्याकाळी वास्तव्याला होते” असे सांगून, “श्री नानासाहेब शेवाळकरांनी या आडवळणाच्या गावाला साहित्याचे वळण लावले” असे म्हणत त्यांनी वणीतील प्राचीन ज्ञान परंपरेला वंदन केले. वणी हे आपले जन्मग्राम नसले, कर्मग्राम नसले तरी हे गाव, जेथे त्यांचे सर्व प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण झाले ते, आपले ‘ज्ञानग्राम’ आहे असा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. श्री दादांचे अनेक शाळकरी सुहृद ह्या विशेष सोहोळयासाठी उपस्थित होते ही त्यांच्यासाठी मोठीच आनंदाची बाब होती.
“आपल्या मूळ आधारापासून तुटल्यामुळे, आज माणूस निराधार होत आहे. जीवनाकडे पाहण्याची शुद्ध दृष्टी गमावून बसला आहे. भासमान दुःखाने ग्रस्त आहे. जीवनामध्ये झपाट्याने ऱ्हास पावत असलेली नीतिमत्ता, संस्कार ही खरोखरच अत्यंत काळजीची गोष्ट झाली आहे” असे प्रतिपादन करीत “सात्विकतेचे अधिष्ठान देऊन व्यक्तीला सत्कार्यप्रवृत्त करणे हेच धर्माचे प्रथम स्वरूप आहे” हे त्यांनी ह्या प्रसंगी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन जैताई देवस्थानचे सचिव भागवत कथाकार मनुमहाराज तुगणायत यांनी केले. सौ रेणुका अणे यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.