माघ कृष्ण प्रतिपदा, रविवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ या दिवशी, चिपळूण येथे ‘माटे सभागृहा’त भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा श्रीशैल्यगमन महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी पुणे, मुंबई, गोवा, नाशिक, नागपूर इत्यादी अनेक ठिकाणांहून साधक-बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सवासाठी व्यासपीठावर भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, प.पू.सद्‌गुरु श्री. मामा महाराज देशपांडे, प.पू.सद्‌गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे महाराज तसेच श्रीसद्‌गुरुपरंपरा यांच्या सुंदर प्रतिमा विराजमान होत्या. या प्रतिमांभोवतीची व व्यासपीठावरील फुलांनी केलेली सर्वच सजावट वातावरण प्रसन्न करीत होती.
श्री हरिपाठ-गायनसेवा
प.पू.सद्‌गुरु श्री.मामा महाराजांच्या पादुकांचे षोडशोपचारे पूजन करून उत्सवास प्रारंभ झाला. सौ.शर्वरी आणि श्री.राहुल ओक यांच्या हस्ते पादुकापूजन करण्यात आले. तदनंतर प.पू.सद्‌गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या उपस्थितीत सामुदायिक-साधना संपन्न झाली. अल्पोपाहारानंतर श्रीक्षेत्र आंबेरी तपोवनातील आणि गोवा केंद्रातील साधकांनी ‘श्री हरिपाठ-गायनसेवा’ सादर केली. तालासुरात गायलेल्या अभंगांबरोबरच त्यांनी केलेल्या सुंदर पावल्या पाहताना उपस्थित सर्व साधकजन रंगून गेले होते. त्यानंतर श्री.धनंजय चितळे यांनी ‘संस्कृती संवर्धिनी फाऊंडेशन’च्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा घेतला. फाऊंडेशनचे वाचनालय, ‘अमृतबोध मासिका’चे प्रकाशन याबरोबरच त्यांनी नियोजित ‘श्रीदत्तमंदिर प्रकल्प’ आणि सध्या ‘श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ, मार्कंडी’ येथे सुरू असलेले सेवाकार्य यांचीही उपस्थितांना माहिती दिली. श्री.मनोहर मोरे यांच्या हस्ते सर्व साधकांच्या वतीने प.पू.सद्‌गुरु श्री.अनिरुद्धदादांना भेटवस्तू अर्पण करण्यात आली.
तदनंतर प.पू.श्री.अनिरुद्धदादांची प्रवचन-सेवा संपन्न झाली. त्यांनी सेवेकरिता श्री ज्ञानेश्र्वरीच्या पाचव्या अध्यायातील, ही ओवी घेतली होती. या वेळी निरूपणादरम्यान त्यांनी असे सांगितले की, ‘‘श्री ज्ञानेश्र्वरीच्या पाचव्या अध्यायात ‘संन्यासयोग’ आला आहे. पण या ओवीतील सर्व प्रक्रिया ‘अभ्यासयोगा’तीलच आहे !’’ श्रीभगवंतांनी श्रीमद् भगवद्‌गीतेच्या पाचव्या अध्यायातील २६, २७ व २८ या श्र्लोकांमध्ये ‘अभ्यासयोगा’ची पूर्वपीठिका कशी सांगितली आहे, याचेही त्यांनी विवरण केले. ‘रथ्योदक’ या शब्दाचा नेमका अर्थही त्यांनी उलगडून सांगितला आणि तो अर्थ नेमका लक्षात येण्यासाठी नेपाळ-यात्रेदरम्यान प.पू.सद्‌गुरु श्री. शिरीषदादांनी विटांच्या रस्त्यावर दाखविलेल्या रथांच्या धावांचाही संदर्भ त्यांनी दिला. आपल्या विवेचनात त्यांनी अमेरिकेतील काही साधकांना साधनेदरम्यान आलेले विलक्षण अनुभवही सांगितले. प्रवचन-सेवेच्या समारोपात त्यांनी साधकांनी साधना नियमाने, प्रेमाने करावी असा श्रीसद्‌गुरुपरंपरेचा निरोप कळकळीने दिला. पुण्यकाळप्रसंगी, ‘श्रीगुरुचरित्रा’तील श्रीशैल्यगमन-अध्यायाचे वाचन, नामजप आणि आरती झाली. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सुयोग केळकर यांनी केले; तर पौरोहित्य वेदमूर्ती श्री.ध्रुव भोळे यांनी केले. उपस्थित सर्व साधक-बंधुभगिनींनी दर्शनानंतर भोजन-प्रसादाचा लाभ घेतला. सभागृहातील ‘श्रीवामनराज प्रकाशना’च्या स्टॉलला तसेच ‘अमृतबोध मासिका’च्या स्टॉललाही साधकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमस्थळीची सर्व व्यवस्था, पार्किंग व्यवस्था इत्यादींबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. काहीजणांनी नियोजित श्रीदत्तमंदिर प्रकल्पस्थानालाही भेट दिली. अनेक साधक-बंधुभगिनींनी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ मार्कंडी येथेही जाऊन दर्शन घेतले. येणेप्रकारे श्रीसद्‌गुरुकृपेने हा सर्व महोत्सव अत्यंत नेटकेपणाने व आनंदाने संपन्न झाला.
परमपूज्य सद्‌गुरु श्री. अनिरुद्धदादा आगटे

उत्सवातील काही क्षण चित्रे

Main Image
Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1

9

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!

2

आपल्याला शुध्द सत्संग साधायचा आहे;
प्रत्येक क्षणाला तो मिळवायचा आहे.
"आपल्या आयुष्याचे पहिले ध्येय तेच असले पाहिजे; मग बाकीचे सगळे !"
असे जर निश्चयाने ठरवले, तरच ते साधेल.

3

श्रीसद्‍गुरुंचे आपल्याकडे सतत लक्ष असतेच;
आपलेच त्यांच्याकडे लक्ष नसते.
प्रसंगांनीच आपल्याला त्यांच्या वात्सल्यमय पांघरुणाची जाणीव होत असते.

4

सद्‍गुरूंवर, श्रीभगवंतांवर पूर्णत्वाने सगळे सोपवले पाहिजे,पूर्ण शरणागती पत्करली पाहिजे. मग भले कितीही वाईट प्रसंग आले तरी चालतील; कितीही चांगले प्रसंग आले तरी चालतील. आणि हे जर जमले; तरच त्या प्रेमाचा वसंतोत्सव अनुभवता येईल.

17

श्रीभगवंतांचे अनुसंधान, त्यांचे नामसंकीर्तन हे केवळ त्यांच्यासाठीच व्हायला हवे. त्यांच्याशिवाय त्यात इतर काहीही, एवढेसेही यायला नको. नाही तर आपले 'मी-माझे' सुटणारच नाही.

5

संसार हा एकाच गोष्टीसाठी चांगला; की संसार करता करताच सगळ्या परीक्षा होऊन जातात. मग परमार्थासाठी वेगळया परीक्षांना बसायची जरुरी नसते.

6

कुठल्या रूपाने श्रीभगवंत समोर येतील, माहित नाही! म्हणून समोर आलेल्या प्रत्येकाशी चांगलेच वागावे, नीटच वागावे. येणाऱ्याचे स्वागतच करावे; आपण अगदी त्याला ओळखत असलो तरी सुद्धा!

7

एखादी गोष्ट जर सोडायची असेल तर ते इतके सोपे नसते. आपण सोडू सोडू असे नुसते म्हणतो; मात्र ते सुटत नाही. पण जर कोणी दणका घातला तर मात्र ते लगेच सुटते. हा दणका कोण घालते? तर ते सद्‍गुरु घालतात; बरोबर योग्य वेळी घालतात. असा दणका मिळाला की, ती गोष्ट जागच्या जागी सुटते.

1

सद्‍गुरूंचा विश्वास निर्माण व्हावा, ह्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यांनी सांगितलेले नीट ऐकून मनापासून करावे लागते; आणि शिवाय ते आपले म्हणून करावे लागते !

8

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

10

हरिभजनाला, नामस्मरणाला उशीर करण्यात काही अर्थ नाही. जेवढा उशीर कराल, तेवढे आयुष्य हातातून निघून गेले असे समजायचे. म्हणून आपला एकही क्षण वाया जाणार नाही असा कसोशीने प्रयत्न तरी करायचा; म्हणजे निदान एक क्षण तरी मुखी नाम येईल.

11

आपल्या प्रत्येक कृतीमध्ये असे काही तरी
असावे की, जे श्रीभगवंतांना पोहचले पाहिजे.
.... आणि असे विचार येऊ लागले की समाजावे,
आपण अगदी योग्य दिशेला चाललो आहोत!

12

एक लक्षात ठेवा; कधीही, कितीही, कशीही कर्मे पुढे आली तरी ती नि:स्पृहपणे करायचा प्रयत्न करावा. शिवाय त्याच्यात दुसऱ्याला बुडवायचा चुकून सुद्धा विचार करू नये. जेवढा बुडवायचा विचार येईल, त्याच्या शंभर पटींनी भरावे लागेल हे लक्षात ठेवावे.

13

साधना जेव्हा मिळते तेव्हा; आपण जर लक्षात ठेवले असेल तर; असे आठवेल की, सद्‍गुरूंनी वेगळेच सांगितलेले असते आणि आपण मात्र ते ऐकूनही तिसरेच करत असतो.
शिवाय वर त्यांनाच विचारत असतो की; अहो आम्हांला अनुभव कसा नाही?

14

जितका साधनेचा निर्णय आपण पुढे ढकलू तितका आयुष्यातील वेळ वाया जात जाईल आणि आयुष्याच्या
शेवटी श्रीभगवंत काही भेटणार नाहीत. मग शेवटी त्यांचे नाम आठवणार नाही किंवा रूपही आठवणार नाही.

15

शांतपणे कर्मांचा उपभोग न घेणे
हे घातक ठरणारे असते.
पण तोच अलिप्तपणा जमला पाहिजे .

16

आपले कुठल्याही गोष्टींकडे दुर्लक्ष जरी झाले,तरी श्रीभगवंतच आपल्याला सांभाळून घेतात. ते आपल्याला कमीपणा येऊन देत नाहीत; कारण आपण त्यांचे नाम घेतोय ना? त्यांना तेच तर हवे असते. म्हणूनच कोठल्याही परिस्थितीत नामस्मरण सोडू नये.