

|| श्री ||
प.पू.सद्गुरु श्री. मामांच्या पस्तिसाव्या आणि प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे यांच्या सहाव्या एकत्रित पुण्यतिथी महोत्सवाचा वृत्तांत

संक्षिप्त चलतचित्र
महोत्सव स्थळ
प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज यांचा पस्तिसावा व प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे यांचा सहावा एकत्रित पुण्यतिथी महोत्सव फाल्गुन कृष्ण नवमी (श्रीपाद नवमी) श्रीशके १९४६, रविवार दिनांक २३ मार्च २०२५ रोजी ‘काकडे पॅलेस सभागृह’, कर्वेनगर, पुणे येथे अतिशय उत्साहाने संपन्न झाला.
महिनाभर आधीपासूनच स्वयंसेवकांनी स्वच्छता इत्यादी सेवा सुरू केल्या होत्या. महोत्सवाच्या दिवशी ‘माउली’ व ‘श्रीपाद निवास’ या दोन्ही वास्तूंना आकर्षक सजावट करून परंपरेतील सर्व सद्गुरु महात्म्यांच्या प्रतिमांना आपल्या भगिनींनी गुंफलेले सुरेख हार घातले होते. कार्यक्रमस्थळी काकडे पॅलेसच्या सभागृहात व्यासपीठ देखील अतिशय सुंदर रीतीने सजवले होते. सद्गुरु-परंपरेची प्रतिमा व प.पू.सद्गुरु श्री.मामा आणि प.पू.सद्गुरु सौ.ताई यांच्या प्रतिमांना व पादुकांना सुगंधी पुष्पमाला अर्पण केल्या होत्या. ‘माउली’त सकाळी ७ ते ९ या वेळेत सौ.अर्चना व श्री.आशुतोष शेंडे यांच्या हस्ते श्रीसद्गुरु-पादुका पूजन आणि सौ.शलाका व श्री.प्रसाद काकडे यांच्या हस्ते श्रीसत्यदत्तपूजन करण्यात आले. गोव्याचे श्री.दत्तगुरु देसाई व श्री.सुरेंद्र प्रभुदेसाई गुरुजी यांनी या वेळी पौरोहित्य केले.
महोत्सवातील कार्यक्रमांत प्रथम सकाळी ७.१५ ते ८.१५ या वेळेत सामुदायिक साधना झाली. साधनेसाठी मोठ्या संख्येने साधक बंधुभगिनी उपस्थित होते. सकाळी ९ वाजता प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांचे सभागृहात मंगल आगमन झाले व तदनंतर ९.३० ते १०.३० या वेळेत सौ.मधुवंती बोरगांवकर यांची गायन-सेवा झाली. श्री.विजय उपाध्ये, श्री. मनोज भांडवलकर, श्री.मिलिंद तायवाडे व श्री.सुश्रुत चितळे यांनी त्यांना वाद्यसाथ केली. त्यांनी प्रथम ‘जय जय राम कृष्ण हरी’ हा नामजप केला. त्यानंतर ‘सुंदर ते ध्यान’, ‘अवचिता परिमळु’, ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’, ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’, ‘गुरु परमात्मा परेशु’, ‘अवघे गरजे पंढरपूर’, ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘बोलावा विठ्ठल’, तसेच प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांचा ‘संत प्रेमळ प्रेमळ’ यांसारखे सुंदर अभंग गाऊन अत्यंत श्रवणीय अशी गायन-सेवा श्रीसद्गुरुचरणीं रुजू केली. ही भक्तिरसपूर्ण गायनसेवा श्रीसद्गुरुचरणीं रुजू केल्याबद्दल सौ.मधुवंती बोरगांवकर यांचा व त्यांना वाद्यसाथ करणाऱ्या साथीदारांचा प.पू.श्री.दादांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानधन देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर ठीक १०.४५ वाजता प.पू.श्री.शिरीषदादांची पुण्यकालाची प्रवचन-सेवा सुरू झाली.
या ओवीचे विवरण करताना प.पू.श्री.दादांनी असे सांगितले की; ‘‘साधक-सद्भक्त हा देव, द्विज (ब्रह्मस्वरूप महात्मे) व गुरु यांवर अतूट अशी सात्त्विक श्रद्धा असणारा हवा. त्याने परमार्थ-शास्त्रशिक्षण घ्यावे. भगवंतांची चाकरी करावी वा नाम घेण्याचा धंदा करावा. भगवत्प्रेमाचे धन मिळवावे. त्याने अंतिमतः जीवाचे शिवाशी लग्न लावावे. मगच त्याला ती दिव्य शांती मिळेल. जो इंद्रियांवर संयम असणारा श्रद्धावान साधक-सद्भक्त आहे, त्यालाच ज्ञानाचा लाभ होतो आणि निर्वाण समाधान व शांती लाभते. हीच ब्रह्मस्थिती होय. ही शांती अचुंबित म्हणजे अस्पर्श, विषयादींचा स्पर्श नसलेली असते. साधकास ज्ञान होण्यासाठी त्याच्याकडे सात्त्विक श्रद्धा हवी. ती मिळविण्यासाठी त्याने ज्ञानाचे भांडार असलेल्या सद्गुरूंनाच शरण जावे तसेच सद्गुरुप्रदत्त नाम घ्यावे, साधन करावे व श्रीभगवंतांची व सद्गुरूंची वा त्यांच्या स्थानांची सेवा करावी. शांतीची व परब्रह्माची प्राप्ती होण्यासाठी साधकाने अंगी निरभिमानता व वैराग्य बाणवावे. यासाठी त्याने भक्तीची प्रेममुद्रा (सद्गुरूंची प्रेमकृपा) मिळवावी. ही भक्तीच ज्ञान, वैराग्य, निवृत्ती, धृती, शांती व ब्रह्मस्थिती यांची जननी आहे !’’
श्रवणेंद्रियांचे पारणे फिटविणाऱ्या व अंतःकरण बोधामृताने तृप्त करणाऱ्या या प्रवचन-सेवेनंतर ‘जय जय करुणामूर्ति दयाळा जय जय श्रीपादा ।’ व ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे ।’ हे नामजप व आरती-मंत्रपुष्प होऊन पुण्यकाल साजरा करण्यात आला. सद्गुरु-पादुकांचे दर्शन व तीर्थप्रसाद घेऊन उपस्थित भक्तजन अत्यंत समाधान पावले. संपूर्ण कार्यक्रम नेटक्या व अतिशय शिस्तबद्ध रीतीने संपन्न झाला.
या कार्यक्रमास ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ डॉ.श्रीमती कांचन मांडे, आर्वीचे ह.भ.प.डॉ.श्री.नारायणदादा निकम महाराज, कण्हेरी मठाचे ह.भ.प.श्री. लक्ष्मण महाराज कोकाटे, पुण्यातील ह.भ.प.श्री.राजेंद्र महाराज दहीभाते, श्री. श्रीकांत महाराज पातकर, संस्थेचे विश्वस्त, हितचिंतक व अनेक प्रतिष्ठित मंडळी आवर्जून उपस्थित होती. संस्थेचे विश्वस्त समिती सदस्य श्री.श्रीवर्धन गाडगीळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.
सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत ‘श्रीपाद निवास’ येथे ‘श्री हरिपाठ-गायन-सेवा’ श्रीसद्गुरुचरणीं रुजू करण्यात आली. सायंकाळी सात वाजता ‘श्रीपाद निवास’ येथे अतिशय प्रसन्न व मंगल वातावरणात प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज व प.पू.सद्गुरु सौ.ताई महाराज यांच्या पादुकांची षोडशोपचारे महापूजा संपन्न झाली. यात रुद्र, पवमान, पुरुषसूक्त यांचे पठण करून पंचामृत अभिषेकयुक्त पूजा करण्यात आली. तसेच चार वेद, शास्त्र, पंचांग, पुराण, चामर, गायन, नृत्य, विविध वाद्यवादन व नामजप इत्यादी सेवाही या वेळी श्रीसद्गुरुचरणीं समर्पित करण्यात आल्या. अत्यंत भावपूर्ण वातावरणात प.पू.श्री.शिरीषदादांच्या मंगल उपस्थितीत ही राजोपचार पूजा संपन्न झाली. प.पू.सद्गुरु श्री.मामा व प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताई यांचे दर्शन व तीर्थप्रसाद घेऊन सर्व साधक अतिशय तृप्त मनाने, आनंदाने स्वस्थानी परतले.
पुणे उत्सवातील काही क्षणचित्रे

















प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज यांचा पस्तिसावा आणि प.पू.सदगुरु सौ.ताई महाराज यांचा सहावा एकत्रित पुण्यतिथी महोत्सव अमेरिकेतील डॅलस, टेक्सास येथे शनिवार व रविवार, दिनांक २२ व २३ मार्च २०२५ अशा दोन दिवसांत सौ.मानसी व श्री.शरद वेर्णेकर यांच्या घरी प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहाने, भक्तिभावाने व मंगल वातावरणात संपन्न झाला.
अमेरिकेतील विविध शहरांमधून साधक बंधुभगिनी महोत्सवस्थळी एकत्र जमलेले होते. कार्यक्रमाची सुरुवात शनिवारी दुपारी ठीक तीन वाजता सामुदायिक साधनेने झाली. त्यानंतर सर्वांनाच प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या प्रवचनाची ओढ लागली होती.
श्री ज्ञानेश्वरीतील ही ओवी त्यांनी प्रवचन-सेवेसाठी घेतली होती. प.पू.सद्गुरु श्री.मामा आणि प.पू.सौ.ताई यांची चरित्रे प्रस्तुत ओवीत वर्णन केल्याप्रमाणे कशी तंतोतंत आहेत, हे त्यांनी या वेळी सांगितले. वरवर सोपी वाटणारी ही ओवी आपल्या परंपरेतील महात्म्यांची, प.पू.सद्गुरु श्री.मामांची आणि प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंची अंतरंगस्थिती वर्णन करते, हे त्यांच्या उत्तुंग चरित्रांमधील अनेक दाखले देऊन त्यांनी समजावून सांगितले.
आपले सद्गुरु हे परमात्म्याच्या गूढ स्वरूपाशी एकरूप होऊन असतात. लौकिकदृष्ट्या ते आपल्याला सामान्यांसारखेच वावरताना दिसतात. परंतु सामान्यांमध्ये आणि महात्म्यांमध्ये सगळ्यात मोठा फरक असा असतो की, आपल्या वाट्याला आलेले कर्म हे आपल्याच देहप्रारब्धामुळे आलेले असते, तर महात्मे त्यांची कर्मे स्वअर्जित नसली तरीही स्वतःच्या वाट्याला आलेली कर्मे अत्यंत प्रामाणिकपणे करीत असतात. मात्र त्या कर्मांच्या फळापासून ते अंतःकरणातून पूर्णपणे अलिप्त असतात. त्या कर्मांचा त्यांच्या परमार्थाला कधीच अडथळा होत नाही. त्यांचे भगवद्अनुसंधान कधीही सुटत नाही.
पहिल्या दिवशीच्या प्रवचन-सेवेनंतर प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी साधना आणि अभ्यास यांविषयी मार्गदर्शन केले. ‘योगवासिष्ठा’च्या ‘वैराग्य’ या प्रकरणांत झालेल्या श्री वसिष्ठ महामुनी आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या संवादाचा संदर्भ देऊन त्यांनी अभ्यास कसा करावा तसेच चिंतन आणि मनन हे किती आवश्यक आहे या विषयीही मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी साधकांच्या पारमार्थिक प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. तदनंतर आरती-तीर्थप्रसाद झाला व सर्व साधक आपापल्या मुक्कामी परतले.
दुसऱ्या दिवशी रविवारी २३ मार्च रोजी कार्यक्रमांची सुरुवात सकाळी ठीक ७.०० वाजता सामुदायिक साधनेने झाली. त्यानंतर प.पू.सद्गुरु श्री. मामा महाराजांच्या आणि प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताई महाराजांच्या पादुकांची पूजा सौ.संध्या व श्री.उदय पारशिवणीकर या दांपत्याने केली. तदनंतर पुण्यकाळाचा नामजप आणि आरती-तीर्थप्रसाद झाला.
रविवारी दुपारी प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी प्रवचनाचे दुसरे पुष्प गुंफले. या सत्रामध्ये, परमार्थात प्रगती करताना साधकांनी कसे आणि काय प्रयत्न केले पाहिजेत या विषयी त्यांनी मार्गदर्शन केले. ‘योगवासिष्ठा’चा संदर्भ देऊन ते म्हणाले की, ‘‘श्री वसिष्ठ मुनी प्रभू श्रीरामचंद्रांना सांगतात की, परमार्थमार्गावर पुढे जाण्याकरिता अध्यात्मशास्त्राचा अभ्यास, चिंतन, सदाचरण आणि सद्गुरुसेवा या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हे उपाय साधकांना ‘अंतरी दृढ’ बनविण्यास मदत करतात.
सध्याच्या काळात सद्गुरुसान्निध्य आणि त्यांची ‘बहिरंग-सेवा’ (म्हणजे त्यांच्या सान्निध्यात राहून त्यांची सेवा) करायला मिळणे हे अत्यंत कठीण आहे. तशी संधी जरी मिळाली तरी ती सेवा टिकवून ठेवता येणे हे त्याहूनही अवघड आहे. परंतु सद्गुरूंनी सांगितलेली ‘अंतरंग-सेवा’ (म्हणजे आपली साधना, नामस्मरण व सद्ग्रंथांचा अभ्यास) आपण निश्चितच करू शकतो. ती आपण प्रामाणिकपणे, नित्यनियमाने आणि प्रेमाने करायला हवी !’’
संध्याकाळच्या सत्रातील प्रवचन-सेवेनंतर सर्व साधकांनी हरिपाठ गायन-सेवा श्रीचरणीं रुजू केली. टाळ-मृदंगाच्या गजरात सर्वजण अक्षरशः नाहून निघाले. संध्याकाळच्या आरतीनंतर या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता झाली.
प.पू.सद्गुरु श्री.मामांच्या आणि प.पू.सद्गुरु सौ.ताईंच्या सुमधुर आठवणींनी आणि सद्गुरूंच्या अलोट प्रेमाने सर्वांची मने गहिवरून आली होती. वसंत ऋतूमध्ये जशी झाडांना नवी पालवी फुटावी तशी प.पू.सद्गुरु श्री. अनिरुद्धदादांच्या सान्निध्याने आणि मार्गदर्शनाने सर्वांच्या मनाला टवटवी आली होती. महोत्सव संपन्न झाल्यानंतर, परस्परांचा प्रेमाने निरोप घेऊन सद्गुरूंच्या आठवणींचे मनात पुनःपुन्हा स्मरण करीत सर्व साधकजन आनंदाने आपापल्या मुक्कामी परतले.
डॅलस उत्सवातील काही क्षणचित्रे













