उद्देश आणि ध्येय


१) संप्रदाय, धर्म, वर्ण, जाती, लिंग, प्रदेश, भाषा आदि भेदभाव विरहीत अशा विशुद्ध अध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा मानवाच्या नैतिक उन्नती व चारित्र्यसंवर्धन तसेच आत्मोन्नती करीता प्रसार व प्रचार करणे.
२) समता, माणुसकी, एकता आणि विश्वबंधुता या तत्त्वांच्या प्रसार करून शांती निर्माण करणे व टिकविण्याचा प्रयत्न सर्व प्रकारे करणे.
३) समाजातील दिनदुबळ्या घटकांसाठी अन्न, वस्त्र औषधे यांची निःशुल्क व्यवस्था करणे.
४) आध्यात्मिक तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी विविध कार्यक्रम व उपक्रम हाती घेणे, कार्यान्वित करणे व पार पाडणे.
५) आत्मशक्तिसंपन्न उत्साही, होतकरू, समाजहितैषी अशा तळमळीच्या सज्जन चारित्र्यवान आरोग्य व बल संपन्न आणि निस्वार्थी कार्यकर्त्यांची संघटना तयार करून त्याद्वारे समाजात सद्प्रवृत्ती वाढीस लागण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणे व त्यासाठी योग्य ती व्यवस्था करणे.
६) जगातील सर्व धर्म व संप्रदायांचे वाड़मय एकत्र करणे, ते साठवणे व त्याचे शिक्षण देणे.
७) आरोग्य प्राप्ती, बलसंवर्धन आणि आध्यात्मिक उन्नतीकरिता योग साधना करू इच्छिणाऱ्या व्यक्तिंना त्यांसंबंधी साधने, मार्गदर्शन आणि वातावरण उपलब्ध करून देणे.
८) ठिकठिकाणी तपोवने (गुरुकुलासहित) उत्पन्न करून शास्त्रीय साधने व वनीकरणाद्वारे पर्यावरणाचे रक्षण करणे.
९) समाजातील गरजू घटकांना अन्नदान करणे व त्यासाठी विशिष्ठ निधी वगैरे जमवणे आणि त्याच्या (निधीच्या) व्याजातून किंवा प्रत्यक्ष निधीतून अन्नदानाचा खर्च चालविणे.
१०) वरील सर्व उदिष्टांच्या पूर्तीसाठी आवश्यक व जरूरीची सर्व कामे हाती घेणे, कार्यान्वित करणे व पार पाडणे. महाराष्ट्रात, भारतात व सर्वत्र अशा क्रमाने ठिकठिकाणी संस्थेची केंद्रे आणि तपोवन प्रकल्प, साधना केंद्रे आदि सुरू करून तेथून वरील उद्दिष्टांची पूर्ती करणे.
9

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!

2

आपल्याला शुध्द सत्संग साधायचा आहे;
प्रत्येक क्षणाला तो मिळवायचा आहे.
"आपल्या आयुष्याचे पहिले ध्येय तेच असले पाहिजे; मग बाकीचे सगळे !"
असे जर निश्चयाने ठरवले, तरच ते साधेल.

3

श्रीसद्‍गुरुंचे आपल्याकडे सतत लक्ष असतेच;
आपलेच त्यांच्याकडे लक्ष नसते.
प्रसंगांनीच आपल्याला त्यांच्या वात्सल्यमय पांघरुणाची जाणीव होत असते.

4

सद्‍गुरूंवर, श्रीभगवंतांवर पूर्णत्वाने सगळे सोपवले पाहिजे,पूर्ण शरणागती पत्करली पाहिजे. मग भले कितीही वाईट प्रसंग आले तरी चालतील; कितीही चांगले प्रसंग आले तरी चालतील. आणि हे जर जमले; तरच त्या प्रेमाचा वसंतोत्सव अनुभवता येईल.

17

श्रीभगवंतांचे अनुसंधान, त्यांचे नामसंकीर्तन हे केवळ त्यांच्यासाठीच व्हायला हवे. त्यांच्याशिवाय त्यात इतर काहीही, एवढेसेही यायला नको. नाही तर आपले 'मी-माझे' सुटणारच नाही.

5

संसार हा एकाच गोष्टीसाठी चांगला; की संसार करता करताच सगळ्या परीक्षा होऊन जातात. मग परमार्थासाठी वेगळया परीक्षांना बसायची जरुरी नसते.

6

कुठल्या रूपाने श्रीभगवंत समोर येतील, माहित नाही! म्हणून समोर आलेल्या प्रत्येकाशी चांगलेच वागावे, नीटच वागावे. येणाऱ्याचे स्वागतच करावे; आपण अगदी त्याला ओळखत असलो तरी सुद्धा!

7

एखादी गोष्ट जर सोडायची असेल तर ते इतके सोपे नसते. आपण सोडू सोडू असे नुसते म्हणतो; मात्र ते सुटत नाही. पण जर कोणी दणका घातला तर मात्र ते लगेच सुटते. हा दणका कोण घालते? तर ते सद्‍गुरु घालतात; बरोबर योग्य वेळी घालतात. असा दणका मिळाला की, ती गोष्ट जागच्या जागी सुटते.

1

सद्‍गुरूंचा विश्वास निर्माण व्हावा, ह्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यांनी सांगितलेले नीट ऐकून मनापासून करावे लागते; आणि शिवाय ते आपले म्हणून करावे लागते !

8

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

10

हरिभजनाला, नामस्मरणाला उशीर करण्यात काही अर्थ नाही. जेवढा उशीर कराल, तेवढे आयुष्य हातातून निघून गेले असे समजायचे. म्हणून आपला एकही क्षण वाया जाणार नाही असा कसोशीने प्रयत्न तरी करायचा; म्हणजे निदान एक क्षण तरी मुखी नाम येईल.

11

आपल्या प्रत्येक कृतीमध्ये असे काही तरी
असावे की, जे श्रीभगवंतांना पोहचले पाहिजे.
.... आणि असे विचार येऊ लागले की समाजावे,
आपण अगदी योग्य दिशेला चाललो आहोत!

12

एक लक्षात ठेवा; कधीही, कितीही, कशीही कर्मे पुढे आली तरी ती नि:स्पृहपणे करायचा प्रयत्न करावा. शिवाय त्याच्यात दुसऱ्याला बुडवायचा चुकून सुद्धा विचार करू नये. जेवढा बुडवायचा विचार येईल, त्याच्या शंभर पटींनी भरावे लागेल हे लक्षात ठेवावे.

13

साधना जेव्हा मिळते तेव्हा; आपण जर लक्षात ठेवले असेल तर; असे आठवेल की, सद्‍गुरूंनी वेगळेच सांगितलेले असते आणि आपण मात्र ते ऐकूनही तिसरेच करत असतो.
शिवाय वर त्यांनाच विचारत असतो की; अहो आम्हांला अनुभव कसा नाही?

14

जितका साधनेचा निर्णय आपण पुढे ढकलू तितका आयुष्यातील वेळ वाया जात जाईल आणि आयुष्याच्या
शेवटी श्रीभगवंत काही भेटणार नाहीत. मग शेवटी त्यांचे नाम आठवणार नाही किंवा रूपही आठवणार नाही.

15

शांतपणे कर्मांचा उपभोग न घेणे
हे घातक ठरणारे असते.
पण तोच अलिप्तपणा जमला पाहिजे .

16

आपले कुठल्याही गोष्टींकडे दुर्लक्ष जरी झाले,तरी श्रीभगवंतच आपल्याला सांभाळून घेतात. ते आपल्याला कमीपणा येऊन देत नाहीत; कारण आपण त्यांचे नाम घेतोय ना? त्यांना तेच तर हवे असते. म्हणूनच कोठल्याही परिस्थितीत नामस्मरण सोडू नये.