
|| श्री ||
श्रीक्षेत्र आंबेरी येथे संपन्न झालेल्या प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे यांच्या जयंती महोत्सवाचा वृत्तांत
भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु मातुःश्री प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे यांचा जयंती महोत्सव श्रीक्षेत्र आंबेरी येथे ‘प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तपोवन’ प्रकल्पस्थानी वैशाख कृ.१४, श्रीशके १९४८ शुक्रवार दिनांक १५ मे २०२६ रोजी अतिशय भक्तिभावाने संपन्न झाला.
संक्षिप्त चलतचित्र
सकाळी ६ ते ९ या वेळेत ‘श्रीचरणाधिष्ठान मंदिरा’मध्ये प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंच्या पादुकांची पवमानाभिषेकासहित महापूजा संपन्न झाली. त्यानंतर ठीक ९.३० वाजता श्रीक्षेत्र आंबेरी व गोवा केंद्रातील साधकबंधूंनी सामूहिकरित्या ‘श्री हरिपाठ’ गायनसेवा श्रीसद्गुरुचरणीं अर्पण केली. त्या वेळी संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भरून गेले होते. उपस्थित भाविकांनीही या मंगलसेवेत मनःपूर्वक सहभाग घेतला.
या कार्यक्रमानंतर सकाळी ठीक १०.३० वाजता सर्वजण आतुरतेने ज्याची वाट पाहात होते ती प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांची प्रवचनसेवा सुरू झाली.
ही ओवी त्यांनी सेवेकरिता घेतली होती. या वेळी निरूपण करताना प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी सांगितले की, ‘‘ब्रह्मविद्या ही परब्रह्मप्राप्तीचे मूळ आहे, हे श्रीभगवंत अर्जुनाला या ओवीतून सांगत आहेत. श्रीभगवंतांची इच्छा अशी आहे की, ही ब्रह्मविद्या भक्ताच्या अंतःकरणात प्रकट व्हावी आणि त्याने त्या परब्रह्मप्राप्तीचा अखंड आनंद अनुभवावा !’’ प.पू.श्री. अनिरुद्धदादांनी ‘श्रीपद्मपुराणा’तील एका कथेचा आधार घेऊन असे स्पष्ट केले की, ‘‘ही ब्रह्मविद्या, ही शक्ती म्हणजे श्रीभगवंतांपर्यंत पोहोचून भगवत्स्वरूप होण्याचे माध्यम आहे आणि म्हणूनच त्या शक्तीची उपासना करावी. जी कृती किंवा जो विचार तुम्हांला श्रीभगवंतांकडे घेऊन जातो ती ‘विद्या’ आणि जो विचार तुम्हांला श्रीभगवंतांपासून दूर नेतो ती ‘अविद्या’. ब्रह्मविद्या ही सर्व विद्यांमधील श्रेष्ठतम विद्या आहे. ब्रह्मविद्याच योगमाया म्हणून भासणाऱ्या अविद्येचा नाश करते. ही ब्रह्मविद्या केवळ श्रीसद्गुरूच प्रकट करू शकतात. ती अत्यंत गूढ असून तिचा केवळ अनुभवच घेता येतो. ब्रह्मविद्या प्रकट झाल्यावर श्रीसद्गुरूंनी दाखविलेल्या मार्गाने ती फुलत जाते आणि साधकाला परब्रह्मप्राप्तीचा अनुभव येतो. साधकाचा देह जरी प्रारब्धाधीन असला तरी त्याच्या हृदयात सदैव श्रीसद्गुरूंच्या चरणांचे अधिष्ठान असले पाहिजे ! प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंचे आपल्याला कलियुगात सगुण रूपात दर्शन झाले आहे आणि भगवती शक्तीने आपल्यावर अनुग्रह करून तिचे अधिष्ठान आपल्या हृदयात स्थापित केले आहे. त्यामुळे आपण अत्यंत भाग्यवान आहोत !’’ असे सांगून प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंच्या जयंती महोत्सवानिमित्त झालेली प्रवचन-सेवा श्रीसद्गुरुचरणीं समर्पित केली.
अत्यंत बोधप्रद अशा या प्रवचन-सेवेनंतर ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे ।’ तसेच ‘राधे राधे राधे राधे…’ या नामजपांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर आरती व मंत्रपुष्प होऊन भक्तिभावाने पुण्यकाल साजरा करण्यात आला. सर्व साधकांनी प.पू.सद्गुरु सौ.ताईंचे दर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. अत्यंत प्रसन्न वातावरणात संपन्न झालेल्या या जयंती महोत्सवानंतर अंतःकरणात समाधान आणि आनंद घेऊन साधकजन स्वस्थानी परतले.
शनिवार दिनांक १६ मे २०२६ रोजी श्रीक्षेत्र आंबेरीला ‘तपोवना’त प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईमहाराजांच्या ‘श्रीचरणाधिष्ठान मंदिरा’त श्रीयंत्र व प.पू.सद्गुरु सौ.ताईंमहाराजांच्या पादुकांना कुंकुमार्चनाचा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. सकाळी ठीक साडेआठ वाजता कुंकुमार्चनास प्रारंभ झाला. या कुंकुमार्चनात कु.दिव्या अनिरुद्ध आगटे आणि आणखी काही साधकबंधू सहभागी झाले होते. प्रथम श्रीयंत्र आणि श्रीसद्गुरुपादुकांना ‘पवमानसूक्ता’ने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर ‘श्रीसूक्ता’च्या तेहेतीस आवर्तनांनी दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच ‘देवीअथर्वशीर्षा’च्या बारा आवर्तनांनी जलाभिषेक करण्यात आला. अतिशय मंगल वातावरणात आणि मंत्रघोषात मुख्य पूजा संपन्न झाली. त्यानंतर श्रीयंत्र आणि प.पू.सद्गुरु सौ.ताईमहाराजांच्या पादुकांना ‘ललितासहस्रनामावली’ने कुंकुमार्चन करण्यात आले. कुंकुमार्चनानंतर प.पू.सद्गुरु सौ.ताईमहाराजांच्या पादुकांना व श्रीयंत्राला विविध पुष्पांनी अलंकृत करण्यात आले. अर्पण केलेले फुलांचे अलंकार आणि सुगंधी फुलांची विशेष सजावट लक्ष वेधून घेणारी होती. तदनंतर आरती व मंत्रपुष्प होऊन ‘देव्यापराधक्षमापन स्तोत्र’ पठणाने कुंकुमार्चनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या विशेष कार्यक्रमाकरिता ‘तपोवन’ आणि गोवा येथील ब्रह्मवृंद उपस्थित होता. या ब्रह्मवृंदाला प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांच्या हस्ते वस्त्र, श्रीफळ, दक्षिणा देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी श्रीयंत्र व प.पू.सद्गुरु सौ.ताईमहाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले व सर्वांना तीर्थप्रसाद देण्यात आला. महाप्रसादाने या सर्वांगसुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.
