
|| श्री ||
नमो ज्ञानबिंबा, नमो सर्ववासा ।
नमो आदिरूपा, नमो श्रीपरेशा ।। १ ।।
नमो ध्यानलिङ्गा, नमो स्वस्तिभावा ।
नमो अङ्गलुब्धा, नमो मूलशर्वा ।। २ ।।
पदी अमृतेशा, अभ्यर्थना ही ।
युगायुगी मज, निजदास्य देई ।। ३ ।।
प.पू.सद्गुरु श्री.दादांनी, श्रीव्यासपौर्णिमेचे महत्त्व विशद करताना एक प्रवचनात असे सांगितले आहे की, ‘व्यास’ याचा अर्थ ‘आपले शुद्ध अंतःकरण’. आपल्या अंतःकरणात जेवढी वासनाविरहित, शुद्ध जागा असते तिला ‘व्यास’ असे म्हणतात. अंतःकरणातील वासना नियमित साधनेने दूर होऊ लागतात आणि हळूहळू त्या शुद्ध जागेचा व्यास वाढू लागतो. अंतःकरण असे संपूर्ण शुद्ध झाले की तिथे ‘व्यासतत्त्व’ म्हणजेच ‘सद्गुरुतत्त्व’ पूर्णपणे प्रकट झाले आहे असे म्हणतात आणि मग साधकाच्या ठिकाणी ती परमश्रेष्ठ गुरवी भक्ती प्रकट होते.
त्यामुळे श्रीगुरुपौर्णिमेचे औचित्य साधून, आपली साधना नियमाने व प्रेमाने व्हावी अशी श्रीसद्गुरुचरणीं प्रार्थना करण्यासाठी, साधनेविषयीचे चिंतन करण्यासाठी, श्रीसद्गुरूंनी कळकळीने केलेला अमृतबोध श्रवण करण्यासाठी, आपल्या करुणाब्रह्म श्रीसद्गुरुपरंपरेविषयी प्रेमादर व्यक्त करण्यासाठी आणि आपल्याकडून कळत नकळत घडलेल्या सर्व अपराधांची क्षमायाचना करण्यासाठी शेकडो साधक पुणे, मुंबई आणि डॅलस, अमेरिका येथे एकत्र जमले होते.
संक्षिप्त चलतचित्र
महोत्सव स्थळ
प्रतिवर्षीप्रमाणे आषाढ पौर्णिमेला, दिनांक २९ जुलै २०२६ रोजी, श्रीगुरुपौर्णिमेचा महोत्सव ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या पुणे केंद्रात श्रीसद्गुरुकृपेने अत्यंत आनंदात व उत्साहाने संपन्न झाला. त्यासाठीची तयारी एक महिनाआधीपासून ‘श्रीपाद निवास’ व ‘माउली’ या दोन्ही वास्तूंच्या साप्ताहिक स्वच्छता-सेवांनी सुरू झाली होती. महोत्सवाच्या निमित्ताने या दोन्ही वास्तू आकर्षक, रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी व रांगोळ्यांनी सुंदर सजवल्या होत्या.
श्रीगुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त प्रातःकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत होणाऱ्या सामुदायिक-साधनेसाठी ‘श्रीपाद निवास’ येथे मोठ्या संख्येने साधक-बंधुभगिनी उपस्थित होते. सकाळी ७ ते ९.३० या वेळेत ‘माउली’मध्ये श्री.कौस्तुभ व सौ.सिद्धी पोटभरे यांच्या हस्ते श्रीसत्यदत्तपूजा तसेच श्री.पार्थ व सौ.विरजा वझुरकर यांच्या हस्ते श्रीसद्गुरुपादुका-पूजन करण्यात आले.
साधकभक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे श्रीसद्गुरुदर्शन दोन सत्रांमध्ये संपन्न झाले. सकाळी ८.१५ वाजता प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांनी प्रथम ‘माउली’च्या गर्भगृहात येऊन देवांचे आणि श्रीसद्गुरूंचे दर्शन घेतले आणि त्यानंतर लगेचच श्रीसद्गुरु-दर्शनाच्या प्रथम सत्रास सुरुवात झाली. सकाळी ८.३० ते १.०० व सायंकाळी ३.३० ते ६.०० अशा दोन सत्रांमध्ये विविध ठिकाणांहून आलेल्या शेकडो साधक-सज्जनांनी श्रीसद्गुरुदर्शनाचा लाभ घेतला. महोत्सवानिमित्त ‘श्रीवामनराज प्रकाशना’च्या ग्रंथांचा व ‘अमृतबोध’ मासिकाचा स्टॉल लावण्यात आला होता. तसेच ‘श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठा’तर्फे बॅग्स, आसने इत्यादी वस्तू आणि श्रीक्षेत्र आंबेरी ‘तपोवन’ येथील सेंद्रिय पद्धतीने तयार केलेली उत्पादने व काही निवडक औषधे व औषधी तेले विक्रीसाठी उपलब्ध होती. या सर्व स्टॉल्सना साधकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
श्रीगुरुपौर्णिमा महोत्सवाच्या विशेष पर्वणीनिमित्त ‘माउली’ आणि ‘श्रीपाद निवास’ ही दोन्ही मंदिरे दर्शनासाठी दिवसभर उघडी ठेवण्यात आली होती.
सायंकाळी ७ वाजल्यापासून ‘श्रीपाद निवास’ येथे प.पू.सद्गुरु श्री. मामा महाराज आणि प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताई महाराज यांच्या पादुकांची राजोपचार महापूजा वे.मू.श्री.दत्तात्रेयशास्त्री जोशी गुरुजी आणि ब्रह्मवृंदाच्या पौरोहित्याखाली प.पू.श्री.शिरीषदादांच्या पावन उपस्थितीत संपन्न झाली. काही साधकबंधूंनी भावपूर्ण, सुरेल आवाजात ‘श्रीमामाष्टक स्तोत्र’ व ‘प्रेमसुमनांजली’ गाऊन अलंकारसेवेची सुरुवात केली व त्यानंतर ‘दत्तात्रेया जय गुरुराया’, ‘मन हा मोगरा’, ‘सद्गुरुसारिखा सोयरा जिवलग’ इत्यादी सुमधुर अभंगही त्यांनी गायिले.
गर्भगृहात उपस्थित असणाऱ्या वेदमूर्ती ब्रह्मवृंदाने ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, शास्त्र, पुराण व पंचांग इत्यादी सेवा श्रीसद्गुरुचरणीं समर्पित केल्या. त्यानंतर कु.वैष्णवी आफळे यांनी नृत्यसेवा, श्री.यश रुईकर यांनी गायनसेवा, श्री.चिन्मय देशपांडे यांनी चामरसेवा, श्री.शैलेश सहस्रबुद्धे व साधकबंधू आणि सर्व उपस्थित साधक-सज्जनांनी नामजप सेवा तसेच श्री. विजय उपाध्ये व श्री.सुधन्वा कुलकर्णी यांनी वाद्यसेवा; अशा विविध सेवा श्रीसद्गुरुचरणीं समर्पित केल्या. शेवटी, शंख तसेच नगारा, पखवाज, संवादिनी, तबला, टाळ इत्यादी सर्व वाद्यांची वादन सेवा श्रीसद्गुरुचरणीं समर्पित करण्यात आली.
राजोपचार महापूजा संपन्न झाल्यानंतर प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या पावन हस्ते सर्व वेदमूर्तींना वस्त्रे व दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर उपस्थित साधकांनी सद्गुरुदर्शन घेतले व तदनंतर तीर्थ-प्रसाद घेऊन सर्व साधकभक्त आपापल्या स्थानी परतले.
श्रीगुरुपौर्णिमेचा हा महोत्सव रविवार दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी, दादर येथील ‘सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाति समाज सभागृहा’त अत्यंत उत्साहाने व आनंदाने साजरा झाला.
व्यासपीठावरील पडद्यावर फुलांनी साकारलेल्या दीपस्तंभाची आणि फुलांच्या पणत्यांची आकर्षक सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. श्रीसद्गुरुपरंपरा, अनंतकोटिब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज, भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगिराज श्री.मामा महाराज व भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु मातुःश्री सौ.ताई महाराज यांच्या व्यासपीठावरील देखण्या प्रतिमांना अतिशय सुंदर सुवासिक पुष्पमाला अर्पण करण्यात आल्या होत्या. आकर्षक पुष्पगुच्छ आणि विविधरंगी तोरणांमुळे हॉलची शोभा अधिकच वाढली होती.
सकाळी ठीक ९.०० वाजता, श्री.उमेश व सौ.पौर्णिमा झेंडे यांच्या हस्ते श्रीसत्यदत्तपूजेला तर श्री.तेजस व सौ.गौरी नेरुरकर यांच्या हस्ते प.पू.सद्गुरु श्री.मामांच्या पादुका-पूजनास सुरुवात झाली. पूजेनंतर उपस्थित साधकांकरवी तालासुरात आरती संपन्न झाली.
दुपारी सामुदायिक-साधना सुरू असतानाच प.पू.सद्गुरु श्री.दादांचे सभागृहात मंगल आगमन झाले. साधनेनंतर सायंकाळी ४.१५ ते ५.१५ या वेळेत सुप्रसिद्ध गायक श्री.श्रीरंग भावे यांनी गायन-सेवा सादर केली. त्यांना श्री.मंदार जाधव यांनी पखवाजावर, सौ.अपर्णा देवधर यांनी सतारीवर, श्री.विजय उपाध्ये यांनी संवादिनीवर, श्री.चैतन्य देशपांडे यांनी तबल्यावर व श्री.चिन्मय देशपांडे यांनी टाळांची साथ केली.
प्रथम ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ।’ या जपाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’ हे लोकप्रिय भक्तिगीत, संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा ‘ज्ञानियांचा राजा गुरु महाराव’, समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांनी रचलेला ‘आरंभी वंदीन अयोध्येचा राजा’ इत्यादी अभंग अत्यंत बहारदारपणे श्री.श्रीरंग भावे यांनी सादर केले. त्यानंतर, श्रीभगवंतांच्या विस्मयकारक वेणुवादनाचे वर्णन करणारी संतश्रेष्ठ श्री भानुदास महाराज विरचित, ‘वृंदावनी वेणु कवणाचा माये वाजे ।’ ही भीमपलास रागातील उत्कृष्ट गौळण त्यांनी गायिली. त्यापाठोपाठ ‘माझे माहेर पंढरी’ हा श्रीसंत एकनाथ महाराजांचा अत्यंत गोड अभंग त्यांनी सादर केला. जुन्या मराठी चित्रपटातील गीतांची सुरेख मेडले सादर करून, श्री.श्रीरंगजींनी ‘संत गोराकुंभार’ या नाटकातील ‘अवघे गर्जे पंढरपूर’ हे भक्तिगीत गाऊन श्रीसद्गुरुचरणीं सेवा रुजू केली.
श्रीरंगजींचा खणखणीत रियाजी आवाज, स्पष्ट उच्चार, स्वरांवरील पक्की पकड आणि त्यांना मिळालेली सूर-तालवाद्यांची उत्कृष्ट साथ; यामुळे ही गायनसेवा अतिशय रंगतदार झाली. श्रोत्यांनी भरभरून टाळ्या वाजवून या सर्व गायक व वादक कलाकारांचे कौतुक केले. श्री.श्रीरंग भावे यांना मानधन, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ तसेच सर्व वादक कलाकारांना मानधन, पुष्पगुच्छ व श्रीफळाचा प्रसाद प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या हस्ते सत्कारपूर्वक देण्यात आला.
या कार्यक्रमानंतर सर्वजण आतुरतेने ज्याची वाट पाहात होते त्या प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या प्रवचन-सेवेस सुरुवात झाली.
ही श्री ज्ञानेश्वरीतील ‘मोक्षसंन्यासयोग’ या अठराव्या अध्यायातील बासष्टाव्या श्लोकावरील टीकेची पहिलीच ओवी त्यांनी प्रवचन-सेवेसाठी घेतली होती. निरूपणाच्या प्रारंभी प.पू.सद्गुरु श्री.दादांनी सांगितले की, ‘‘भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हे शब्दसंपदेचे प्रभू आहेत. एकाच ओवीत सिद्धांत आणि दृष्टांत सांगण्याची त्यांची हातोटी विस्मयकारक आहे. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे प्रस्तुत ओवी होय. श्रीभगवंत पार्थाला जो उपदेश करून ‘विषादा’पासून ‘मोक्षसंन्यासा’कडे नेतात त्यात शेवटी येणारी आणि सर्व ज्ञानाचे सारच असणारी अशी ओवी आहे. या ओवीच्या पहिल्या दोन चरणांत सद्गुरु श्री माउली सिद्धांत सांगतात आणि त्याला पुष्टी देण्यासाठी उरलेल्या दीड चरणांत एक नितांत सुंदर, परिपूर्ण दृष्टांत देतात !’’
प.पू.श्री.दादांनी पुढे असे सांगितले की, ‘‘ ‘तया’ला म्हणजे ‘हृदयस्थ ईश्वरा’ला शरण जा. शरण कसे जा; तर ‘अहं’, ‘वाचा’, ‘चित्त’ आणि ‘आंग’ देऊन. ‘अहं’ देणे म्हणजे ज्ञानयोगाची साधना करणे. यात शक्तीमुळे मन-बुद्धी शुद्ध झाले की अहंकारही आपोआप शुद्ध होतो. इतरत्र गुंतलेल्या भावना, मी-माझे असे सर्वकाही श्रीभगवंतांना अर्पण केले की हा अहंकार मावळतो. वाचेने शरण जाण्याच्या मार्गालाच ‘नामसाधना’ किंवा ‘मंत्रसाधना’ असे म्हणतात. यात नाम क्रमाने मध्यमा, पश्यंती व परेत जाऊन ध्यानस्थिती प्राप्त होते. चित्त अर्पण करण्याच्या मार्गाला ‘राजयोग’ असे म्हणतात. मानवाचे चित्त क्षिप्त, मूढ किंवा एकाग्र असते. साधनेत भगवती शक्ती चित्त एकाग्र करून त्याचा लय करवते, यालाच ‘चित्त देणे’ असे म्हणतात. ‘आंग’ म्हणजे ‘देह’, हा श्रीभगवंतांची सेवा करण्यात झिजवावा.
अशा प्रकारे हे सर्व भगवत्-अर्पण करून शरण रिगावे. ‘रिगणे’ म्हणजे श्रीभगवंतांच्या चरणीं कायमस्वरूपी तदाकार होऊन राहणे. वरील सर्व साधनामार्ग हे स्वतःच्या मनाने अवलंबण्यास कठीण आहेत. परंतु श्रीसद्गुरूंनी करुणा-कृपेने शक्ती जागृत केली असता, ती भगवती शक्तीच हे सर्व आपसूक करवून घेते आणि त्या जीवाला ब्रह्मानंदाची, परमानंदाची अखंड प्राप्ती करवते.
जसे गंगेचे पाणी महोदधीत मिसळून, समरस होऊन, अखंड मिळतच राहते, तसे ‘अहं’, ‘वाचा’, ‘चित्त’ आणि ‘आंग’ या वृत्तींची गंगा त्या परब्रह्मरूपी सागरात सतत सामावत राहणे याला ‘शरणागती’ म्हणतात. त्या ब्रह्मानंदाला क्षयच नाही. ही मोक्षाची युक्ती सद्गुरु भगवान श्री माउलींनी अत्यंत खुबीने या ओवीत सांगितली आहे !’’
अखेरीस, ‘श्रीसद्गुरूंच्या कृपेचा पौर्णिमाप्रसाद आपल्या अंतःकरणात प्रकटण्यासाठी त्यांनी आपल्याकडून साधन करवून घ्यावे’, अशी प्रार्थना सर्वांच्या वतीने करून झालेली प्रवचन-सेवा प.पू.सद्गुरु श्री.दादांनी श्रीसद्गुरुचरणीं समर्पित केली.
प्रवचन-सेवेनंतर या महोत्सवाचे औचित्य साधून सर्व साधकांच्या वतीने मुंबई केंद्रातील ज्येष्ठ साधक श्री.अशोक पाध्ये यांच्या हस्ते शाल व श्रीफळ अर्पण करून प.पू.सद्गुरु श्री. दादांचे पूजन करण्यात आले. या वेळी उपस्थित साधक-बंधुभगिनींच्या वतीने सौ.धनश्री जोशी यांनी प.पू.सद्गुरु श्री. शिरीषदादांच्याच शब्दांचा आधार घेऊन त्यांच्या श्रीचरणीं विनवणी केली की;
नाही उमजत काही, घालमेल तुम्हांपायी ।। २ ।।
एक चरणांची आस, तेचि ध्यान रात्रंदिस ।। ३ ।।
म्हणे अमृता पिसाट, देवा दाखवावी वाट ।। अ.श.६४.५ ।।
श्रीसद्गुरुपूजनानंतर श्रीसद्गुरु-दर्शनाचा मंगल सोहळा सुरू झाला. श्रीसद्गुरूंच्या अपार प्रेमकृपेच्या जाणिवेने दर्शन घेताना साधकांची अंतःकरणे गहिवरून आली होती.
‘श्रीवामनराज प्रकाशना’च्या व ‘अमृतबोध’ मासिकाच्या स्टॉलला तसेच श्रीक्षेत्र आंबेरी ‘तपोवन’ येथील सेंद्रिय उत्पादनांच्या स्टॉललाही अभ्यागतांनी भरभरून प्रतिसाद दिला. तीर्थप्रसाद घेऊन, श्रीसद्गुरूंनी केलेला बोध व त्यांची प्रेमळ मूर्ती मनात साठवत सर्व साधक-सज्जन समाधानाने आपापल्या स्थानी परतले.
प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या मार्गदर्शनाखाली तरुण स्वयंसेवक सर्व कार्यक्रमाची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडतात. त्यांनी या सर्व कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन केले. सर्व वयोगटांच्या स्वयंसेवकांनी एकजुटीने, तत्परतेने सर्वांना मदत केली आणि त्यामुळे श्रीसद्गुरुकृपेने हा सोहळा अतिशय शिस्तबद्ध रीतीने आणि नेटकेपणाने संपन्न झाला. श्रीसद्गुरु आम्हां सर्वांकडून अशीच निरलस सेवा वारंवार करवून घेवोत, हीच त्यांच्या सुकोमल श्रीचरणीं प्रार्थना !
या वर्षी अमेरिकेतील श्रीगुरुपौर्णिमा महोत्सव शनिवार व रविवार, दिनांक १ व २ ऑगस्ट २०२६ असे दोन दिवस प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या परममंगल उपस्थितीत डॅलस येथे सौ.मानसी आणि श्री.शरद वेर्णेकर यांच्या निवासस्थानी अत्यंत उत्साहाने, भक्तिभावाने आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला.
प.पू.श्री.अनिरुद्धदादांच्या मार्गदर्शनाप्रमाणे या महोत्सवाचे सर्व नियोजन करण्यात आले होते. काही दिवस आधीपासूनच साधक बंधुभगिनींनी अत्यंत उत्साहाने महोत्सवाच्या पूर्वतयारीला सुरुवात केली होती. अमेरिकेतील विविध शहरांमधून तसेच परदेशांतूनही अनेक साधकमंडळी या महोत्सवासाठी आवर्जून उपस्थित होती.
कार्यक्रमस्थळी प्रवेश करताच मन प्रसन्न करणारे सुंदर वातावरण अनुभवास येत होते. प्रवेशद्वारापाशी सुंदर रांगोळ्या रेखाटलेल्या होत्या.श्रीसद्गुरुपरंपरा, प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज व प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताई महाराज यांच्या प्रतिमांभोवती सुगंधी फुलांची कल्पक आणि मनोहर सजावट आणि नाजूक कोरीव काम केलेल्या लाकडी कमानी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या.
शनिवारी दुपारी ठीक ३.३० वाजता प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या परममंगल उपस्थितीत सामुदायिक-साधनेने महोत्सवाची सुरुवात झाली. सर्व साधक ज्याची आतुरतेने वाट पाहात होते त्या प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या प्रवचन-सेवेला चहापानाच्या अल्प विश्रांतीनंतर सायंकाळी ठीक ५ वाजता प्रारंभ झाला.
श्री ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्यायातील बत्तिसावी ओवी त्यांनी सेवेसाठी घेतली होती. वरवर पाहता अगदी सरळ आणि सहज अर्थ आहे असे भासणाऱ्या या ओवीत सद्गुरु श्री माउलींना नेमके काय अभिप्रेत आहे, याचे अत्यंत रसाळ आणि उद्बोधक विवेचन प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी केले.
या ओवीचा विचार करताना त्यांनी सांगितले की; ‘‘श्रीभगवंत पार्थाला म्हणतात की, ‘जो युक्तिपंथ आचरून मोक्ष पर्वत चढून गेला त्याला त्याला महासुखाचा कळस विनासायास प्राप्त होतो !’ ’’ ‘महासुख’ म्हणजे नेमके काय, हे स्पष्ट करताना त्यांनी ‘सुख’ आणि ‘महासुख’ यांतील सूक्ष्म भेद अत्यंत सुंदरतेने असा समजावून सांगितला की, ‘‘प्रपंचातील सुख हे क्षणभंगुर, मर्यादित आणि परिस्थितीनुसार बदलणारे असते; परंतु ‘महासुख’ म्हणजे कधीही न संपणारा, अखंड आणि परमआनंदाचा अनुभव होय !’’
त्यानंतर ‘निमथा’ या शब्दाचा अर्थ उलगडताना प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी सांगितले की, ‘‘पर्वताचा माथा वर निमुळता होत जातो. माथ्याच्या वरचा सर्वोच्च भाग म्हणजे ‘निमथा’ होय. जेव्हा साधक ‘युक्तिपंथें’, म्हणजेच कृपायोग आणि साधनामार्गाचा आश्रय घेऊन पुढे जातो तेव्हा श्रीभगवंतांनी सांगितलेले हे ‘महासुख’ आपल्याला विनासायास प्राप्त होते !’’
या बोधप्रद प्रवचन-सेवेनंतर शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता आरती व मंत्रपुष्प संपन्न झाले. त्यानंतर ठीक ७.४५ वाजता प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी ‘साधना आणि अभ्यासाची आवश्यकता’ या विषयावर उपस्थित साधकांना मोलाचे मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी सांगितले की, ‘‘साधकाने या मार्गावर वाटचाल करताना सदैव ‘संप्रदाय पांघरून’ पुढे जावे. आजच्या माहितीच्या महापुराच्या आणि विविध प्रलोभनांनी भरलेल्या जगात, बाह्य आकर्षणांना बळी न पडता आपल्या संप्रदायातील ग्रंथांचा नियमित अभ्यास करीत त्याने सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपली परमार्थिक वाटचाल अखंडपणे सुरू ठेवावी !’’
तदनंतर अल्पोपाहार घेऊन सर्व साधक मंडळी विश्रांतीसाठी आपापल्या नियोजित स्थानी परतली.
दुसऱ्या दिवशी रविवारी, सकाळी ठीक ७ वाजता प.पू.श्री. अनिरुद्धदादांच्या परममंगल उपस्थितीत सामुदायिक-साधनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली झाली. सकाळी ८ ते ९ या वेळेत अल्पोपाहार झाल्यानंतर ठीक ९ वाजता सौ.मानसी आणि श्री.निरंजन केतकर यांच्या हस्ते श्रीसद्गुरुपादुका-पूजनाला प्रारंभ झाला. सकाळी ११.३० च्या सुमारास अत्यंत मंगल वातावरणात आरती आणि मंत्रपुष्पांजली संपन्न झाली. त्यानंतर सर्व साधकांनी भक्तिभावाने श्रीसद्गुरुप्रतिमांचे तसेच श्रीसद्गुरुपादुकांचे दर्शन घेतले. बालसाधकांच्या चमूने तीर्थप्रसाद वाटपाची सेवा अत्यंत उत्साहाने आणि शिस्तबद्ध रीतीने पार पाडली.
त्यानंतर लगेचच श्रीसद्गुरु-दर्शनाचा सोहळा सुरू झाला. परमदयाळू सद्गुरूंच्या प्रेमळ कृपाकटाक्षाने आणि आपुलकीच्या शब्दांनी साधकांची अंतःकरणे समाधान पावली.
तदनंतर सर्व उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. छोट्याशा विश्रांतीनंतर ठीक ४ वाजता सर्व साधक मंडळी प्रवचन-श्रवणासाठी पुन्हा एकत्र जमली.
दुसऱ्या दिवशीच्या प्रवचन-सेवेत प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी ‘युक्तिपंथें’ या शब्दात नेमक्या कोणत्या युक्तींचा समावेश होतो, याचेही अत्यंत सुंदर विवरण केले. ‘युक्तिपंथ’ या शब्दाचा एक अर्थ सांगताना ते म्हणाले की, ‘‘ ‘भक्तियोग’, ‘कृपायोग’ आणि ‘ज्ञानयोग’ हे सर्व या ‘पंथराजा’मध्येच अंतर्भूत आहेत. तसेच परमप्राप्तीच्या दिशेने साधकाला घेऊन जाणाऱ्या विविध साधना-युक्तींचा समावेश असलेला असा हा श्रेष्ठ मार्ग आहे !’’
साधकांना मार्गदर्शन करताना सद्गुरूंनी या युक्तींचे स्वरूपही स्पष्ट केले, ते असे; १. शरणागती – सद्गुरूंच्या श्रीचरणीं अनन्यभावाने शरण जाऊन राहणे. २. साधनेवरील दृढ विश्वास – सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनामार्गावर अढळ श्रद्धा ठेवून सातत्याने साधना करणे. ३. सेवा – अंतरंग आणि बहिरंग अशा दोन्ही प्रकारच्या सेवांच्या माध्यमातून श्रीसद्गुरुचरणीं समर्पित भाव ठेवणे. या युक्तींचा निश्चयाने अवलंब केला तर मोक्षाचा पर्वत चढण्याचा मार्ग साधकासाठी सहज आणि सुकर होतो आणि अखेरीस त्याला परमानंदस्वरूप ‘महासुखा’ची प्राप्ती होते.
एखाद्या विरळा, विशेष अधिकारी अशा पार्थासारख्या परमभक्ताला जसे हे महासुख प्राप्त होते, तसेच साधकानेही या युक्तिपंथाचा आश्रय घेतल्यास त्याला त्या परमसुखाच्या दिशेने वाटचाल करता येते !’’ शेवटी, ‘‘सर्व साधकांकडून श्रीसद्गुरुसेवा, शरणागती घडावी आणि त्यांची साधना निर्विघ्नपणे चालू राहावी !’’ अशी मंगल प्रार्थना करत प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी या प्रवचन-सेवेची सांगता केली.
चहापानाच्या अल्पविरामानंतर सर्व साधकांनी ‘श्रीहरिपाठ’ आणि अभंग-गायनसेवेत अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला. नामस्मरण आणि अभंग-गायनाने संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भरून गेले होते. श्चा तत्पश्चात् आरती आणि मंत्रपुष्पांजली व तीर्थप्रसाद हे कार्यक्रम संपन्न झाले.
अशा रीतीने दोन दिवसांचा हा भक्तिरसपूर्ण आणि चैतन्यमय महोत्सव श्रीसद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने व मार्गदर्शनाने अत्यंत आनंदाने संपन्न झाला. सद्गुरुप्रेम आणि नवीन ऊर्जा घेऊन सर्व साधक मंडळी आपापल्या स्थानी परतली.
