
|| श्री ||
श्रीक्षेत्र आंबेरी येथे संपन्न झालेल्या भगवान श्रीकृष्ण व सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या एकत्रित जयंती महोत्सवाचा वृत्तांत
दरवर्षीप्रमाणे ‘श्रीपाद सेवा मंडळा’चा भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीचा व सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जयंतीचा आणि गोपाळकाल्याचा महोत्सव श्रीक्षेत्र आंबेरी येथील ‘प.प.श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तपोवन’ प्रकल्पस्थानी, श्रावण कृष्ण ८ व ९ श्रीशके १९४८ म्हणजेच शुक्रवार व शनिवार, दिनांक ४ व ५ सप्टेंबर २०२६ असे दोन दिवस प.पू.सद्गुरु श्री. शिरीषदादा व प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांच्या पावन उपस्थितीत अतिशय भक्तिभावाने, उत्साहाने आणि अत्यंत शिस्तबद्ध रीतीने संपन्न झाला.
संक्षिप्त चलतचित्र
प.प.सद्गुरु श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या जयंतीच्या पावन दिनाचे औचित्य साधून, श्रावण कृष्ण पंचमी, मंगळवार दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी, ‘प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तपोवन, श्रीक्षेत्र आंबेरी’ येथे ‘श्रीमद् भगवद्गीतेच्या सामुदायिक-पठण कार्यक्रमा’चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मुंबई, पुणे, चिपळूण, गोवा, कऱ्हाड, नागपूर यांसारख्या विविध ठिकाणांहून सुमारे दोनशे चाळीसहून अधिक साधक ‘तपोवना’त उपस्थित होते. श्रावण महिन्यात साक्षात् श्रीभगवंतांसमोर आणि श्रीसद्गुरूंच्या प्रत्यक्ष उपस्थितीत श्रीमद् भगवद्गीता पठण करण्याच्या कल्पनेनेच सर्वजण सद्गदित झाले होते.
या कार्यक्रमाची पूर्वपीठिका अशी की, प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांच्या आज्ञेनुसार ‘श्रीसंत मुक्ताई विद्यापीठ’ व ‘शारदा ज्ञानपीठम्’ यांच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर २०२५ पासून श्रीमद् भगवद्गीता-पठण शिकविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात एकंदरीत सोळा वर्गांमधून सुमारे पाचशे पंचवीसपेक्षा अधिक साधक सहभागी झालेले आहेत. या सोळा वर्गांसाठी अनुक्रमे श्री. धनंजय चितळे, श्री.श्रीवर्धन गाडगीळ, सौ.अदिती दातार, सौ.शोभना आपटे, सौ.रूपाली अकोलकर, सौ.हेमलता केळकर, सौ.मृणालिनी पाटणकर, सौ.श्रुती व श्री.यशवंत पंढरपुरे, सौ.राजश्री गोटखिंडीकर, सौ.नयना पोतदार, सौ.वैजयंती जोशी, श्री.रवी बेडेकर, सौ.स्वरा दाणी (ज्ञानेश्वरी बेडेकर), सौ.अनादी ढवळे व सौ.अनघा नेने यांनी अध्यापन केले.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सर्वच वर्गांचे गीता-पठण संपूर्ण शिकवून झाल्यानंतर प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या अनुज्ञेने प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या जयंतीच्या पावन दिनी सामुदायिक-गीता-पठणाचा सुमंगल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
श्रीभगवंतांच्या मंदिरात भगवान श्रीगोपालकृष्ण महाराज, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज आणि प.प.श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज यांचे दर्शन घेऊन या उपक्रमातील सर्व सहभागी साधक दुपारी १.३० वाजता आसनस्थ झाले. दुपारी ठीक १.४५ वाजता नामजपाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’, ‘श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।’ आणि ‘जय जय करुणामूर्ति दयाळा जय जय श्रीपादा … ।’ या नामगजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. त्यापाठोपाठ श्रीमद् भगवद्गीतेच्या पठणाला प्रारंभ झाला.
पठणाच्या सुरुवातीला प्रस्तावनेचे श्र्लोक म्हणण्यात आले. त्यानंतर अध्याय एक ते नऊ यांचे सलग पठण अत्यंत उत्स्फूर्तपणे पार पडले. नवव्या अध्यायानंतर घेण्यात आलेल्या अल्प विश्रांतीनंतर उर्वरित दहा ते अठरा या अध्यायांचेही सलग पठण तितक्याच उत्साहाने संपन्न झाले. श्रीमद् भगवद्गीतेचे सर्व अठरा अध्याय म्हणून पूर्ण झाल्यानंतर उपस्थित सर्व साधकांनी मिळून अत्यंत श्रद्धेने ‘श्रीगीता माहात्म्य’ आणि ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र’ यांचे देखील सामुदायिक-पठण केले. शेवटी सर्व सहभागी साधकांनी क्षमाप्रार्थना म्हटली आणि सायंकाळी ६.१५ वाजता श्रीगीतेची आरती म्हणून या हृद्य कार्यक्रमाची भावपूर्ण सांगता झाली.
या प्रसंगी सर्वांनाच तिथे भरून राहिलेले दिव्यत्व व पावित्र्य प्रकर्षाने जाणवत होते. आश्र्चर्य म्हणजे, सलग साडेचार तास बसून संपूर्ण गीता व त्यानंतर ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’चे पठण करूनही उपस्थित साधकांना कोणत्याही प्रकारचा थकवा अथवा कुठल्याही प्रकारचा सलग बसण्याचा त्रास जाणवला नाही. त्यामुळे हे पठण आपण करत नसून साक्षात् श्रीभगवंत व श्रीसद्गुरूच आपल्याकडून करवून घेत आहेत असाच दृढ भाव सर्वांच्या अंतःकरणात दाटलेला होता. प.पू.सद्गुरु श्री.दादांनी आपल्या अनुष्ठानात व्यस्त असूनही कार्यक्रमस्थळी भेट दिली. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी प.पू.सद्गुरु श्री. अनिरुद्धदादा सुद्धा आवर्जून काही वेळासाठी उपस्थित होते. उभय सद्गुरूंनी प्रस्तुत उपक्रमाविषयी आपली प्रसन्नता व्यक्त केली.
प.पू.सद्गुरु श्री.दादा श्रावणमास-अनुष्ठानात व्यग्र असून देखील सर्वांना त्यांच्या पावन दर्शनाचा लाभ मिळाला ही सर्व साधकांसाठी अत्यंत सुखानंदाची पर्वणी ठरली. श्रीसद्गुरुदर्शनानंतर भारावलेल्या अंतःकरणानेच मंडळी मंदिरातील सायंकाळच्या आरतीला उपस्थित होती.
कार्यक्रमासाठी श्रीक्षेत्र आंबेरीला येण्याची तीव्र इच्छा असूनही काही कारणास्तव येऊ न शकलेल्या साधकांपैकी काही साधकांनी त्याच वेळी आपापल्या स्थानीच संपूर्ण गीता-पठण केले. ऑस्ट्रेलियातील एका भगिनींनी ऑस्ट्रेलियात तर पुण्यातील काही भगिनींनी पुण्यात श्रीक्षेत्र आंबेरी येथील गीता-पठणाच्या वेळीच संपूर्ण गीता-पठण करून या सामुदायिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवला. प्रत्यक्षात कितीही अंतर असले तरी श्रीसद्गुरुप्रेमच सर्व साधकांना एकत्र आणते, याचा हा सुंदर प्रत्यय होता.
सायंकाळच्या आरतीनंतर, या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. महाप्रसाद घेऊन, या मंगल दिवसाचा आनंद व दिव्य अनुभूती मनात साठवून सर्वजण आपापल्या मुक्कामी रवाना झाले. श्रावण महिन्यात श्रीक्षेत्र आंबेरी येथील श्रीभगवंतांच्या मंदिरात अत्यंत पवित्र वातावरणात झालेल्या प्रस्तुत सामुदायिक-गीता-पठण उपक्रमामुळे भगवद्भक्ती, सद्गुरुप्रेम, श्रीगीतेची गोडी वृद्धिंगत होण्यास व साधकांमधील बंधुभाव दृढ होण्यास मदत झाली.
या कार्यक्रमासाठी ‘तपोवना’तील पूर्णवेळ सेवेला असणाऱ्या साधकांबरोबरच आदल्या दिवशीपासूनच पुणे, चिपळूण इत्यादी ठिकाणांहून आलेल्या अनेक स्वयंसेवकांनी मनापासून परिश्रम घेतले. अशा प्रकारे प.पू.सद्गुरु श्री. दादांच्या आज्ञेनुसार संपन्न झालेला हा अविस्मरणीय सोहळा स्वयंसेवकांच्या उत्तम नियोजनामुळे व सेवाभावामुळे अतिशय शिस्तबद्ध रीतीने व भावपूर्ण वातावरणात सिद्धीस गेला.
उत्सवाच्या आधीपासून ‘तपोवना’तील पूर्णवेळ निवासी साधकांनी आणि मंडळाच्या इतर केंद्रांतील स्वयंसेवकांनी श्रीसद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे नियोजनबद्ध पद्धतीने आवश्यक ती सर्व पूर्वतयारी केली होती. संपूर्ण ‘तपोवन’ परिसर स्वछ, सुंदर आणि नव्याने रंगवलेल्या रूपात शोभून दिसत होता. श्रीभगवंतांच्या आगमनासाठी भूमाताही हिरवा शालू नेसून, विविधरंगी मनमोहक फुलांचे दागिने लेवून प्रसन्नतेने डोलत होती.
मंदिरात अत्यंत मोहक अशी मोरपिसांच्या आकारात केलेली झेंडू, शेवंती यांची पुष्परचना भाविकांचे मन मोहून घेत होती. गर्भगृहातील श्रीभगवंतांच्या मूर्तीच्या मागील बाजूसही अशाच पद्धतीने मोरपिसांच्या आकाराची सुरेख पुष्परचना केलेली होती.
गुरुवार दिनांक ३ सप्टेंबरपासूनच देश-परदेशांतील निमंत्रित साधकांचे ‘तपोवना’च्या परमपावन भूमीत आगमन होण्यास सुरुवात झाली.
महोत्सवाचा प्रारंभ शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक १० वाजता अनोख्या अशा पालखी सोहळ्याने झाला. प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताई महाराजांची प्रतिमा व अतिशय सुंदर, सुबक अशा श्रीचरण पादुका विशेष बनवून घेतलेल्या सुशोभित पालखीत प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी पूजनपूर्वक स्थापित केल्या. त्यानंतर टाळ-मृदंगांच्या नादात वाजतगाजत व ‘राधेकृष्ण गोपालकृष्ण’चा जयघोष करीत या पादुका पालखीतून ‘श्रीचरणाधिष्ठान’ मंदिरातून भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंच्या मुख्य मंदिरात आणण्यात आल्या. श्रीभगवंतांच्या मंदिरात पाच सुवासिनींनी ओवाळल्यानंतर प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंच्या पादुका मुख्य गर्भगृहात श्रीभगवंतांच्या पादुकांशेजारी विधिवत् विराजमान करण्यात आल्या.
दुपारी फराळानंतर उपस्थित साधकांनी श्रीभगवंतांच्या मंदिरात तसेच श्रीचरणाधिष्ठान मंदिरात आपले वैयक्तिक पठण, पारायण, नामजप, साधना इत्यादी साधले. दोन्ही मंदिरे महोत्सवानिमित्त पूर्ण दिवसभर दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली होती.
दुपारी ठीक चार वाजता श्री हरिपाठ-गायनाच्या सेवेने संध्याकाळच्या सत्राला प्रारंभ झाला. प.पू.श्री.अनिरुद्धदादा या प्रसंगी उपस्थित होते. सर्वच साधकांनी या सेवेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. चहापानानंतरच्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका सौ.मंजिरीताई आलेगांवकर यांचे सुश्राव्य गायन झाले. त्यांनी राग श्री, राग हंसध्वनी व त्यानंतर ‘जोहार मायबाप जोहार’, ‘झीनी झीनी बाजे’ आणि प.पू.सद्गुरु श्री.दादांनी रचलेले ‘माझे जीवपण’ हे अभंग अतिशय सुंदर गायिले. त्यानंतर श्री.विजय उपाध्ये यांनी आपल्या संवादिनीवर ‘ओंकार स्वरूपा’, ‘अमृताहुनी गोड’, ‘पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा’ असे काही अभंग, तसेच ‘घनु वाजे घुणघुणा’ हाही अभंग त्यांच्या स्वतंत्र वादनशैलीत सादर केला.
अल्पोपाहाराच्या विश्रांतीनंतर कु.गौरी चैतन्य यांनी तीन तालामध्ये कथ्थक नृत्य-सेवा श्रीभगवंतांच्या चरणीं समर्पित केली. त्याचबरोबर ‘होरी’ हा नृत्यप्रकारही त्यांनी उत्कृष्ट रीतीने सादर केला. तत्पश्र्चात् श्री.यश रुईकर यांनी ‘सावळे सुंदर रूप मनोहर’, ‘हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा’, ‘अवघे गरजे पंढरपुर’, ‘एवढासा माझा भाव तो काई’ इत्यादी अभंग भावपूर्ण स्वरात गाऊन श्रीभगवंतांच्या चरणीं सेवा रुजू केली.
रात्री ठीक १० वाजता कार्यक्रमाचा चरमबिंदू असणाऱ्या प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या जन्मकाळ-प्रवचन-सेवेला प्रारंभ झाला. या प्रसंगी त्यांनी श्री ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायातील आठव्या श्र्लोकावरील सद्गुरु श्री माउलींच्या टीकेतील
या ओवीचे विवेचन करून ‘श्रीमद् भागवत’, ‘गर्गसंहिता’, ‘श्रीदेवी भागवत’ व ‘ब्रह्मवैवर्त महापुराण’ या ग्रंथांतील विविध दाखल्यांच्या आधारे श्रीभगवंतांच्या जन्माची सुरस कथा रसाळतेने वर्णन केली.
प.पू.श्री.दादा श्रीभगवंतांच्या जन्मवेळेस पडणाऱ्या पावसाचे जसे वर्णन करत होते तसा हलका पाऊस त्याच वेळी ‘तपोवन’ परिसरातही सुरू झाला. श्रीभगवंतांच्या जन्माचे वर्णन जेव्हा ‘गौळण सांगे गौळणीला’ या अभंगाच्या संगतीने कथेत आले तेव्हा सर्व वाद्यांच्या गजरात आणि घंटा व शंखध्वनी यांच्या निनादात श्रीभगवंतांचा जन्मकाळ हर्षोल्लासाने साजरा करण्यात आला. त्याच वेळी मंदिरासमोरील दीपमाळही प्रज्वलित झाली, विविधरंगी रोषणाईसह मुख्य द्वारासमोरील कारंजी नृत्य करू लागली. उपस्थित साधकांमध्ये आनंद आणि अष्टसात्त्विक भाव दाटून आले. सर्व उपस्थितांना आपण या मंगल क्षणी जणू प्रत्यक्ष गोकुळात आहोत असेच वाटत होते.
श्रीभगवंतांचाच अवतार असलेल्या सद्गुरु श्री माउलींचाही जन्म याच तिथीला झालेला असल्याने त्यांचाही जन्मकाळ या वेळी साजरा करण्यात आला. या प्रसंगी सौ.अमिता आगटे यांनी अतिशय मधुर स्वरात श्रीसंत एकनाथ महाराज विरचित श्रीभगवंतांच्या पाळण्याचे गायन केले. तदनंतर आरती व तीर्थप्रसाद होऊन सर्वांनी आपापल्या मुक्कामी प्रयाण केले.
दुसऱ्या दिवशी चहापान आणि अल्पोपाहार झाल्यानंतर अत्यंत प्रसन्न वातावरणात सकाळी ठीक दहा वाजता ‘जय जय रामकृष्ण हरी’च्या जयघोषात प.पू.सद्गुरु श्री.दादांनी काल्याच्या कीर्तन-सेवेला प्रारंभ केला. प.पू.श्री. दादांनी श्रीसंत तुकाराम महाराजांचा पुढील अभंग निरूपणासाठी घेतला होता;
करिती नामाचें चिंतन । गडी कान्होबाचें ध्यान ॥ ध्रु. ॥
आली द्यावी डाई । धांवे वळत्या मागें गाई ॥ २ ॥
एके ठायीं काला । तुका म्हणे भाविकाला ॥ ३ ॥
‘‘हा अभंग जसा ‘बाह्य काल्या’चे वर्णन करतो, तसाच तो ‘अंतरंग काल्या’चे रहस्यही उलगडतो’’ असे सांगून, प.पू.श्री.दादांनी संतांच्या विविध अभंगांच्या आधारे काल्याच्या लीलेचे अतिशय रसाळ वर्णन केले. या वेळी प्रसंगानुरूप त्यांच्या साथीदार साधकबंधूंनी गोपाळांचे काही खेळही सादर केले.
कीर्तनसेवेत प.पू.श्री.दादांनी असे सांगितले की, ‘‘काल्याचा लाभ हा केवळ श्रीभगवंतांपाशीच नाही तर श्रीसद्गुरूंपाशीही होत असतो. श्रीभगवंतांनी श्रीमद् भगवद्गीतेत म्हटले आहे की, ‘सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।’. त्यानुसार जो श्रीभगवंतांना अनन्यभावाने शरण जातो त्यालाच त्यांच्या काल्याचा लाभ मिळतो; मात्र सद्गुरूंच्या दरबारात हा काला सर्वांसाठी उपलब्ध असतो आणि त्याचे मुख्य माध्यम केवळ भगवन्नामस्मरण हेच आहे !’’
मथुरा हे श्रीभगवंतांचे नित्य क्षेत्र असून, वृंदावनात गेल्या दोन-अडीचशे वर्षांत श्री ग्वारिया बाबा व श्री कुंभनदास महाराज यांच्यासारखे श्रीभगवंतांची सख्यभक्ती करणारे अनेक महात्मे होऊन गेले. त्यांच्या चरित्रांत घडलेल्या काही अलौकिक भगवल्लीलांचे कथन केल्यानंतर प.पू.श्री.दादांनी काल्याची पार्श्र्वभूमी स्पष्ट केली. या वेळी त्यांनी असे सांगितले की, ‘‘पूतना म्हणजे साक्षात् ‘अज्ञान’, वत्सासुर म्हणजे ‘ममत्व’ किंवा ‘मोह’, बकासुर म्हणजे ‘दंभ व अहंकार’ आणि अघासुर म्हणजे ‘पाप’. या सर्व असुरांचा (विकारांचा) नाश झाल्याशिवाय काल्याचा अनुभव घेता येत नाही. दही, भात, भाकरी, लोणची हे सर्व पदार्थ एकत्र केलेला श्रीभगवंतांच्या कृपेने मिळणारा काला अमृतमय होतो आणि श्रीसद्गुरूंच्या कृपेने मिळालेले साधन प्रेमाने आणि नेमाने केल्यामुळे साधकाला ब्रह्मरसरूपी काल्याची प्राप्ती होते.
कीर्तन-सेवेच्या समाप्तीला सर्व उपस्थित साधकांनी ‘राधेकृष्ण गोपालकृष्ण’च्या जयघोषात फेर धरला. त्यानंतर अतिशय आनंदात दहीहंडीचा कार्यक्रम रंगला आणि तदनंतर आरती संपन्न झाली. सर्वांनी पुनश्र्च देवदर्शन करून काल्याचा प्रसाद ग्रहण केला. दुपारी महाप्रसाद, विश्रांती आणि चहापान झाले.
सायंकाळी साडेसहा वाजता श्रीभगवंतांच्या राजोपचार महापूजेला प्रारंभ झाला. गो-पूजनानंतर गर्भगृहातील श्रीविजयी विठ्ठलांच्या स्वरूपातील श्रीभगवंतांच्या मूर्तीला तसेच त्यांच्या आणि प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंच्या पादुकांना सर्व राजोपचार समर्पित करण्यात आले. प्रथम आवाहन-प्रार्थना, मग अभिषेक, षोडशोपचारे पूजन आणि अलंकार सेवा झाल्यानंतर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, शास्त्र, पुराण व पंचांग या सेवा गर्भगृहातील वेदमूर्ती श्री. दत्तात्रेयशास्त्री जोशी व उपस्थित ब्रह्मवृंदाने श्रीभगवच्चरणीं विधिवत् समर्पित केल्या. तदनंतर सभामंडपातील सेवांमध्ये सौ.विरजा वझुरकर यांनी सुरेल गायनसेवा, कु.गौरी चैतन्य यांनी नयनमनोहर नृत्यसेवा श्रीभगवच्चरणीं रुजू केली. श्री.यश रुईकर यांनी चामरसेवा तर श्री.विजय उपाध्ये यांनी वाद्यसेवा रुजू केली. साधकांच्या चमूने भावपूर्ण नामजपसेवा देवांच्या श्रीचरणीं समर्पित केली. या सेवेत सर्व उपस्थित साधकजन सहभागी झाले होते. रात्रीच्या अल्पोपाहारानंतर, हृदयात महोत्सवाचा अवर्णनीय आनंद साठवून सर्व साधक आपापल्या स्थळी रवाना झाले.
