|| श्री ||

श्रीहनुमान जयंती महोत्सवाचा वृत्तांत

गुरुवार, दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी, पहाटे ६:०० ते ७:०० या वेळेत ‘माउली’ आश्रम, पुणे येथे दरवर्षीप्रमाणे श्री हनुमान जयंतीचा उत्सव अतिशय आनंदाने साजरा करण्यात आला. या वेळी प.पू. सद्‌गुरु श्री. शिरीषदादा आणि प.पू. सद्‌गुरु श्री. अनिरुद्धदादाही कार्यक्रमास उपस्थित होते.

भक्तीचे महान आचार्य असणाऱ्या श्री मारुतिरायांच्या जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या विधिवत् पूजनाने झाली. त्यानंतर ६:०० वाजता ‘श्री राम जय राम जय जय राम’ या नामजपाला सुरुवात झाली. पाठोपाठ ‘मारुतिराया बलभीमा शरण आलो मज द्या प्रेमा’ या भजनाचा गजर करण्यात आला. सूर्योदयाच्या पावन वेळी, सकाळी ठीक सहा वाजून बत्तीस मिनिटांनी विविध वाद्यांच्या गजरात आणि ‘अंजनीसुत, पवनसुत हनुमान की जय ’ अशा जयघोषात श्रीहनुमंतांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

या प्रसंगी उपस्थित साधकांनी ‘शरण शरण हनुमंता’‘धन्य अंजनीचा सुत’ हे अभंग म्हटले. त्यानंतर आरती व मंत्रपुष्पांजली होऊन सर्वांनी भक्तिभावाने श्रीहनुमंतांचे तसेच देवांचे व श्रीसद्‌गुरूंचे दर्शन घेतले. तीर्थप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

‘माउली’ आश्रमातील या उत्सवाप्रमाणे ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या विविध प्रकल्पस्थानीही श्री हनुमान जयंतीचा सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात आला. जळगांव जामोद येथील स्थानिक साधकांनी, तसेच श्रीक्षेत्र दत्तधाम येथे गडावरील सेवेकऱ्यांनी आणि श्रीक्षेत्र आंबेरी तपोवनातील साधकांनीही भक्तिभावाने श्री हनुमान जयंती साजरी केली.

संक्षिप्त चलतचित्र

उत्सवातील काही क्षण चित्रे

9

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!