
॥ श्री ॥
श्रीक्षेत्र जळगांव जामोद येथे संपन्न झालेल्या भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या जयंती महोत्सवाचा वृत्तांत
द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः ॥
भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंच्या जन्मोत्सवानंतर अवघ्या आठ-दहा दिवसांनी येणारा आणखी एक मधुरोत्सव म्हणजे भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा जन्मोत्सव ! भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जगद्गुरु भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंनी सद्गुरु भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या रूपाने कलियुगात प्रथम अवतार घेतला. त्याप्रीत्यर्थ हा महोत्सव प्रतिवर्षी साजरा होत असतो. आपल्या मंडळाचा हा मुख्य महोत्सव श्रीक्षेत्र जळगांव जामोद येथील प्रकल्पस्थानी, भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि पंचमी श्रीशके १९४८; दिनांक १४ व १५ सप्टेंबर २०२६ असे दोन दिवस प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा आणि प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांच्या परममंगल उपस्थितीत संपन्न झाला.
या महोत्सवासाठी पुणे, मुंबई, कऱ्हाड, कोल्हापूर, आंबेरी, नागपूर, भिलाई, अकोला, वर्धा, वणी अशा विविध केंद्रांतून अनेक साधक-सज्जन आवर्जून उपस्थित होते. महोत्सवाच्या आदल्या दिवशीपासूनच मंदिराचा संपूर्ण परिसर फुलांच्या माळांनी आणि दिव्यांच्या रोषणाईने सुशोभित करण्यात आला होता तसेच मंदिराच्या गर्भगृहात व सभागृहातही अतिशय सुंदर अशी फुलांची सजावट केली होती.
संक्षिप्त चलतचित्र
सोमवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात स्थानिक महिला भजनी मंडळाने भजन-गायनाची सेवा श्रीसद्गुरुचरणीं रुजू केली. त्यामध्ये त्यांनी ‘ऐकताच मुरली हरीची’, ‘भव पार कराया शिवा स्मरा’, ‘करीजे दत्तगुरु भजन’, ‘श्रीपाद श्रीवल्लभ सद्गुरु विराजती यतिवर’, ‘आले त्रैलोक्याचे स्वामी’, ‘सखे सद्गुरु मी इथे पाहिला’, ‘पावया छंदे तल्लीन गोविंदे’, ‘तुझ्या कृपेने भवसागर हा आम्ही तरू हो रघुपती’ यांसारखी अतिशय सुंदर पदे गायिली. श्रीभगवच्चरणीं सेवा रुजू केल्याबद्दल भजनी मंडळाच्या अध्यक्षा सौ.अर्चना पुराणिक यांना तसेच त्यांना संवादिनीवर साथ करणारे श्री. अजय पुराणिक व तबल्यावर साथ करणारे श्री.मुकुंद रोटे यांना ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या वतीने सौ.प्रतिमाताई आगटे यांच्या हस्ते मानधन व श्रीफळ-प्रसाद देण्यात आला.
त्यानंतर ‘अन्नपूर्णा’ इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील भव्य सभागृहात ‘श्रीदत्तभावांजली’चे सामुदायिक-पठण झाले व त्यानंतर काही साधकबंधूंनी श्रीभगवंतांच्या श्रीचरणीं अभंगगायन-सेवा रुजू केली. त्यामध्ये त्यांनी ‘लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड’, ‘आनंदाचा कंद उभा पांडुरंग’, ‘साऱ्या पुण्याची पुण्याई’, ‘सहा भुजा सिद्धासन’, ‘पद्मनाभा नारायणा’, ‘पैल मेरूच्या शिखरी’, ‘पावया छंदे तल्लीन गोविंदे’, ‘सद्गुरु सारिखा सोइरा जिवलग’, ‘संतांची संगती आवडे या जीवा’ यांसारखे अनेक सुंदर अभंग सादर केले. नेहमीप्रमाणे सायंकाळची ‘नित्योपासना’ झाली व त्यानंतर सर्वांनी अल्पोपाहाराचा लाभ घेतला. रात्री ९ ते १० या वेळेत साधकबंधूंनी श्री हरिपाठ गायन-सेवा श्रीभगवंतांच्या श्रीचरणीं समर्पित केली. सर्व उपस्थित साधकही या सेवेत उत्साहाने सहभागी झाले होते. या सुश्राव्य आणि भावपूर्ण श्री हरिपाठ गायन-सेवेने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमांची सांगता झाली.
मंगळवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजता पुण्याचे साधकबंधू ह.भ.प.श्री.चिन्मय देशपांडे यांनी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या जन्मकाळाच्या कीर्तनसेवेला प्रारंभ केला. निरूपणासाठी त्यांनी श्रीसंत तुकाराम महाराजांचा ‘हेचि थोर भक्ति आवडती देवा’ हा अभंग घेतला होता.
‘आवड’ या शब्दाचा अर्थ विशद करताना ते म्हणाले की ‘‘ज्याची आवड असते त्याचा पसारा होतो ! हे ब्रह्मांड ही श्रीभगवंतांची ‘आवड’ होय. खरे तर ‘आवड’ हा रजोगुण आहे; पण ही वृत्ती जर आपण ‘श्रीभगवंतांना काय आवडेल’ यावर किंवा ‘श्रीसद्गुरूंना काय व कसे केलेले आवडते’ यावर केंद्रित केली तर ती अपरिमित लाभ करवून देते !’’
आख्यानाच्या उत्तररंगात त्यांनी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची जन्मकथा विस्ताराने सांगितली. ही जन्मकथा जरी सर्व सज्जनांना सुपरिचित असली तरी एका नव्या दृष्टिकोनातून त्यांनी ती उलगडली. ‘अतिथी हे साक्षात् आपले आराध्य श्रीदत्तप्रभूच असतात’ या भावनेने त्यांचा आदरसत्कार करण्याची सुमतीमातेला आवड होती. याच आवडीमुळे त्यांनी श्राद्धाचे दिनी घरी भिक्षेला आलेल्या यतिवरांचा यथोचित आदर करून विप्रभोजनापूर्वीच त्यांना भोजन दिले. ते साक्षात् भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूच होते. त्यांनी सुमतीमातेला वर दिला त्यानुसार साक्षात् भगवान श्रीदत्तात्रेयांनी त्यांच्या पोटी पुत्ररूपाने अवतार घेतला. सुमतीमातुःश्रींना त्यांच्या ‘आवडी’चे एवढे श्रेष्ठ फळ मिळाले.
कथेच्या पूर्वपीठिकेत ह.भ.प.श्री.चिन्मय देशपांडे यांनी श्री.अपळराज, सौ.सुमतीमाता व त्यांचे पुण्यशील तीर्थरूप बापन्नाचार्य यांच्या कुळाविषयी अधिक माहिती सविस्तर सांगितली. कथेच्या अनुषंगाने त्यांनी अनेक स्वरचित पदे तन्मयतेने सादर केली. निरूपणाच्या अनुषंगाने श्री.चिन्मय देशपांडे यांनी प.पू.सद्गुरु सौ.ताई महाराजांची श्रावणमास-अनुष्ठानातील सेवेची एक हृद्य आठवणही सांगितली. प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या विविध प्रवचनांमधील दाखले देऊन झालेले त्यांचे निरूपण अतिशय अभ्यासपूर्ण व नेटके होते.
‘श्रीभगवंतांना आपल्या श्रीसद्गुरुस्वरूपावर प्रेम करणारे भक्त जास्त आवडतात’, हे सांगत असताना प.पू.सद्गुरु सौ.ताईंच्या प्रवचन-सेवेचा आधार घेत श्रीभगवंत आणि श्रीराधाजी यांच्या परस्पर भक्तिप्रेमाचा प्रसंग त्यांनी सुंदर वर्णिला. त्याचबरोबर प.पू.सौ.ताईंना प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज ‘भक्तिशास्त्राची आचार्या’ म्हणत असत असेही त्यांनी सांगितले. कारण प.पू.सौ.ताई नेहमी सद्गुरु श्री. मामांच्या इच्छेनुसारच आणि श्रीभगवंत आणि श्रीसद्गुरु यांना जे आवडेल, जे अपेक्षित आहे अशाच पद्धतीने आचरण करीत असत. प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराजांनी प.पू.सद्गुरु सौ.ताईंना वेळोवेळी कसे सांभाळले याचे दाखले सुद्धा त्यांनी कीर्तनसेवेदरम्यान दिले. अशा रीतीने भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या जन्माची सुरस कथा उत्तम प्रकारे रंगवताना त्यांनी तो सारा कथाप्रसंग अक्षरशः सर्वांच्या डोळ्यांसमोर उभा केला.
ठीक सूर्योदयसमयी, ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात आणि सर्व मंगल वाद्यांच्या नादात भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा जयजयकार करून, त्यांच्या श्रीचरणीं गुलाल-पुष्पे अर्पित करून जन्मकाल हर्षोल्लासाने साजरा करण्यात आला. त्या वेळी काही साधक-भगिनींनी पाळणा गायिला. अतिशय भक्तिभावपूर्ण अशी कीर्तनसेवा श्रीचरणीं रुजू केल्याबद्दल ह.भ.प.श्री. चिन्मय देशपांडे यांना प.पू.सद्गुरु श्री. अनिरुद्धदादांच्या मंगलहस्ते पुष्पगुच्छ, प्रसादधन, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना श्री.मनोज भांडवलकर यांनी पखवाजाची, श्री.श्रेयस पाटील यांनी संवादिनीची, सौ.अपर्णा देवधर यांनी सतारीची तर श्री.चैतन्य देशपांडे यांनी तबल्याची उत्कृष्ट साथ केल्याने ही कीर्तनसेवा अधिकच बहारीची झाली. या साथीदार साधक बंधुभगिनींना सुद्धा प.पू.श्री.अनिरुद्धदादांच्या हस्ते प्रसादधन, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर सकाळी ८ ते ९ या वेळेत ‘अन्नपूर्णा’ इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात सामुदायिक-साधना संपन्न झाली. त्या वेळी मुख्य मंदिरातील गर्भगृहात श्रीभगवंतांची पवमान अभिषेकपूर्वक पूजा करण्यात आली.
तत्पश्चात् सर्वजण मोठ्या आतुरतेने ज्याची वाट पाहत होते त्या प.पू.श्री. अनिरुद्धदादांच्या प्रवचन-सेवेला अल्पोपाहारानंतर ठीक सव्वादहा वाजता सुरुवात झाली.
श्री ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील सहाव्या श्लोकाच्या टीकेमधील सद्गुरु श्री माउलींची ही एकशे सत्तरावी ओवी त्यांनी सेवेसाठी घेतली होती. साधकांनी कर्तृत्वाचा अहंकार बाळगू नये. निरूपणाच्या ओघात ‘मोहरें’ या पदाचे अनेक सुंदर अर्थ त्यांनी उलगडून सांगितले. ‘मोहरा’ म्हणजे बुद्धिबळातील प्यादे. ते ज्याप्रमाणे स्वतः काहीच करीत नाही, त्याला जसे चालविले जाते तसे ते चालते त्याप्रमाणे साधकाने असावे. ‘मोहरें’ म्हणजे ‘अंतकरणात भक्ती मोहरणे’ असा दुसरा अर्थ त्यांनी सांगितला. साधना करता करता कधी कधी सद्गुरुस्मरणाने अश्रुरूपाने किंवा इतर प्रकारे प्रेम प्रकट होते. श्रीभगवंतांविषयी, श्रीसद्गुरूंविषयी अंतःकरणात हळूहळू प्रेम वाढू लागल्याचे हे लक्षण आहे.
‘निगिजे पूर्वीलिया मोहरा । (ज्ञाने.६.१०.५९)’ या ओवीत ‘मोहरा’ हा शब्द सद्गुरु श्री माउलींनी ‘मार्ग’ किंवा ‘वाट’ या अर्थाने वापरला आहे. हा सुषुम्नेचा मार्ग; पश्चिम मार्ग; केवळ सद्गुरुकृपेने सापडतो. म्हणून सद्गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तसेच सद्गुरु श्री माउलींनी आठव्या अध्यायात ‘मोहरें’ शब्दाचे आणखी वेगळ्या अर्थाने उपयोजन केले आहे. तेथे ते म्हणतात;
लावीं मग शरीर । राहो अथवा जावो ॥ ज्ञाने.८.८.८२ ॥
प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज म्हणायचे की, ‘‘नुसत्या पार्चमेंट पेपरला काहीही किंमत नसते. त्यावर आर.बी.आय.चा शिक्का बसला की त्याला मोल प्राप्त होते. तसेच आपल्या अंतकरणावर जर सद्गुरुकृपेची मोहोर उमटली तरच मनुष्यजन्मास मोल प्राप्त होते !’’
श्रीभगवंतांवर किंवा श्रीसद्गुरूंवर जर निखळ प्रेम असेल तर दारिद्र्य सुद्धा काही करू शकत नाही हे समजावून सांगताना प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीची गुरुकुलातील भावस्पर्शी कथा सांगितली. त्या दोघांमधील विशुद्ध प्रेमाविषयी सांगताना प.पू.श्री. अनिरुद्धदादांचा कंठ दाटून आला होता आणि उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले होते. ‘‘अखंड श्रीभगवन्नामस्मरण करणे हा कर्मातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. केलेली साधना कधीही वाया जात नाही. सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तंतोतंत वागण्याचा प्रयत्न करावा. तसे केले तर संन्यास, त्याग आपोआप होतो’’, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी श्री सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याप्रमाणे गौतमी ब्राह्मणीची, दोन मित्र आणि जंगलात वाट दाखवणारा वाटाड्या यांची, द्रौपदी व पितामह भीष्माचार्यांची, अजामीळाची आणि श्री जडभरतांची अशा अनेक मार्मिक कथाही सांगितल्या.
‘‘जगद्गुरु भगवान श्रीदत्तात्रेयांचा कलियुगातील प्रथम अवतार म्हणजे भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज ! या अवतारात त्यांनी अनेक सिद्धांवर अनुग्रह करून त्यांचा उद्धार तर केलाच, पण मुख्यत्वे सामान्य जनांवर करुणाकृपा करून त्यांचा उद्धार करणे हे कार्य त्यांच्या चरित्रातून प्रकर्षाने दिसून येते’’, असे सांगून प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी झालेली प्रवचनसेवा भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं समर्पित केली. साधकांना विचारप्रवृत्त करणाऱ्या या रसाळ प्रवचनसेवेनंतर मुख्य मंदिरात आरती संपन्न झाली आणि श्रीभगवंतांचे दर्शन घेऊन सर्वांनी प्रेमादराने महाप्रसाद ग्रहण केला.
सायंकाळी ४ वाजता सुरू होणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी साधक-भक्तांनी सुरेख, सुवासिक पुष्पमालांनी देवांची पालखी सजवली होती. राजदंड, ध्वज, सूर्य-चंद्र चिन्हांकित छत्र, चामर, मोरचेल; तसेच टाळ, मृदंग, संवादिनी इत्यादी वाद्यांसह प्रदक्षिणेसाठी पालखी सज्ज झाली.
प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा व प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांचे मंदिरात मंगल आगमन झाल्यानंतर सायंकाळी ठीक सव्वाचार वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. प्रथम प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी श्रींची प्रतिमा व पादुका पालखीत प्रतिष्ठापित केल्या आणि प.पू.श्री.शिरीषदादांनी व प.पू.श्री. अनिरुद्धदादांनी पादुकांची पूजा केली. त्यानंतर प.पू.सद्गुरु श्री. शिरीषदादांनी ‘जय जय रामकृष्ण हरि’चा गजर करून, रूपाचा अभंग गाऊन पुनश्च जलद लयीत नामाचा गजर केला. त्यानंतर भोयांनी पालखी उचलली. मंदिराबाहेरील पहिल्या थांब्याला ‘धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची’ व ‘श्रीपाद श्रीवल्लभ सद्गुरु विराजती यतिवर’ या अभंगांचे गायन झाले व पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. यात भगवान श्रीदत्तात्रयप्रभूंची, श्रीसद्गुरूंची तसेच श्रीभगवंतांची स्तुती करणारे अनेक अभंग सादर झाले. यात ‘औदुंबरी देव देखिला’, ‘भीमा अमरजा संगमातीरी’, ‘दत्ता ब्रह्मचारी’, ‘अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारु मोठा रे’, ‘आम्हीं भाग्याचे भाग्याचे’, तसेच ‘सुखालागी करिसी तळमळ’, ‘विदारूनी महास्तंभ’ इत्यादी अनेक अभंग दमदार, खणखणीत आवाजात सादर झाले. शेवटच्या प्रदक्षिणेत ‘करुणात्रिपदी’ म्हटली गेली. भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची ललकारी, ‘ज्ञानोबा तुकाराम’चा जयघोष, सद्गुरुअष्टकाचे पठण यामुळे वातावरण भारून गेले होते. प.पू.सद्गुरु श्री.दादा सुद्धा अतिशय आनंदाने, उत्साहाने अभंग गात होते व पावली करीत होते. त्यामुळे तरुण टाळकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. या आनंद सोहळ्याची सांगता ‘त्रैलोक्याचा राजा नरहरि तो माझा’ या अभंगाने व ‘श्रीदत्तप्रार्थनास्तोत्रा’च्या पठणाने झाली. त्यानंतर श्रींच्या पादुकांना पाच सुवासिनींकरवी औक्षण केले गेले व श्रीभगवंतांची प्रतिमा आणि श्रीचरणपादुका पुन्हा गर्भगृहात स्थापन करण्यात आल्या. त्यानंतर मुख्य मंदिरात आरती संपन्न झाली.
‘आता या मंगल सोहळ्याची सांगता झाली’, अशी चुटपुट मनाला लागली; तेवढ्यातच ‘‘आता श्रीसद्गुरुदर्शनाचा लाभ सर्वांना होणार आहे !’’ ही आनंदवार्ता साधकांना सुखावून गेली. श्रीसद्गुरूंचे मंगल दर्शन घेऊन, तीर्थप्रसाद ग्रहण करून सर्वांनी अल्पोपाहार घेतला. त्यानंतर परगांवांहून आलेल्या बऱ्याचशा साधकांनी सर्वांचा निरोप घेतला. ‘श्रीदत्तभावांजली’चे व सुंदर अभंगांचे गायन, श्री ज्ञानदेव हरिपाठ-पठण, अभ्यासपूर्ण कीर्तनसेवा, अंतर्मुख करणारी रसाळ प्रवचन-सेवा, आनंदाचा आविष्कार असणारा पालखी सोहळा आणि श्रीसद्गुरुदर्शन; यांच्या अलौकिक लाभामुळे सर्वांचीच मने समाधानाने आणि आनंदाने तृप्त झाली होती.
या सर्व सोहळ्यात स्थानिक व परगांवांहून आलेल्या साधकांनी एकोप्याने, शिस्तीने व प्रेमाने सर्व सेवांमध्ये सहभाग घेतला. अशा प्रकारे दोन दिवस चाललेला हा महोत्सव श्रीसद्गुरुकृपेने व त्यांच्या मार्गदर्शनामुळे अतिशय मंगलमय, आनंदमय वातावरणात संपन्न झाला.
