

|| श्री ||
कऱ्हाड येथे संपन्न झालेल्या प.प.श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा आणि प.पू.सद्गुरु योगिराज श्री.मामा महाराजांच्या जयंती महोत्सवाचा वृत्तांत

प.प.सद्गुरु श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची पुण्यतिथी आणि प.पू.सद्गुरु योगिराज श्री.मामा महाराजांची जयंती यानिमित्त साजरा होणारा एकत्रित महोत्सव, आषाढ शु.१ व २, गुरुवार व शुक्रवार, दिनांक २६ व २७ जून २०२५ असे दोन दिवसांत ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या कऱ्हाड केंद्रातर्फे ‘श्रीसमर्थ मल्टिपर्पज हॉल’ येथे उत्साहाने संपन्न झाला. श्रीसद्गुरुदर्शनाच्या ओढीने आणि उत्सवात सहभागी होण्यासाठी ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या पुणे, मुंबई, चिपळूण, अहमदनगर, गोवा, कोल्हापूर, लातूर, सोलापूर, बेळगांव, इत्यादी अनेक केंद्रांमधून आलेले साधकभक्त त्या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमस्थळी भव्य मंडप घालून सुरेख रांगोळी काढण्यात आली होती. प्रवेशद्वारापाशी स्वागत कक्ष व त्याच्याशेजारीच ‘श्रीवामनराज प्रकाशना’चा स्टॉल, ‘अमृतबोध’ मासिकाचा स्टॉल, श्रीक्षेत्र आंबेरी येथील सेंद्रिय उत्पादनांच्या विक्रीचा स्टॉल यांचीही व्यवस्था या मंडपात करण्यात आली होती. हॉलमध्ये ठिकठिकाणी ‘श्रीवामनराज प्रकाशना’च्या ग्रंथांची थोडक्यात माहिती देणारे देखणे फलक झळकत होते. मुख्य व्यासपीठावर श्रीसद्गुरुपरंपरा तसेच प.प.सद्गुरु श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज व प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज यांच्या सुगंधित पुष्पहार घातलेल्या प्रतिमा विराजमान होत्या. तसेच व्यासपीठावर अतिशय सुंदर पुष्पसजावटही करण्यात आली होती.
संक्षिप्त चलतचित्र
२६ जूनला दुपारी ३.४० वाजता प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले आणि लगेचच त्यांच्या उपस्थितीत सामुदायिक साधनेने महोत्सवास प्रारंभ झाला. साधनेनंतर चहापान झाले. त्याच दरम्यान प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांचेही कार्यक्रमस्थळी आगमन झाले. त्या वेळी काही साधक भगिनींनी सद्गुरूंचे औक्षण केले.
सायंकाळी ठीक ५.३० वाजता प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या प्रवचन-सेवेस प्रारंभ झाला.
श्री ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायातील प्रस्तुत ओवी त्यांनी प्रवचन-सेवेसाठी घेतली होती. प.पू.श्री. अनिरुद्धदादांनी ‘‘येथे श्रद्धा हा भाव सर्वात महत्त्वाचा आहे; आणि या ओवीच्या प्रत्येक चरणाला श्रद्धेचा संदर्भ लागू पडतो !’’ असे सांगितले. प्रवचनाच्या ओघात त्यांनी श्रीभगवंतांनी प्रकट केलेल्या ब्रह्मविद्येची परंपरा सांगून ‘ती लुप्त का झाली ?’ तसेच ‘ही विद्या कोणाकडून समजून घ्यावी ?’ ‘ती प्राप्त करून घेण्यात श्रद्धेचा भाग कसा महत्त्वाचा असतो ?’ याविषयी सविस्तर विवेचन केले.
‘‘अनुभवी व ज्ञाते सद्गुरु लाभले, त्यांनी सांगितल्याप्रमाणे नित्य प्रेमाने साधना केली तर हा जीव परब्रह्मानुभूतीच्या अखंड अनुभवात स्थिर होतो, यालाच सद्गुरु श्री माउली ‘सुखिया जाहला’ असे म्हणतात. खरे तर दीक्षा झाल्याबरोबरच साधक हे ‘सुखावलेले’ असतात. मात्र आपापल्या कर्मसंस्कारांमुळे चित्तशुद्धी होईपर्यंत त्यांना प्रापंचिक अनुभव येत राहतात. म्हणूनच साधकांनी आपल्या परंपरेवर, सद्गुरूंवर आणि त्यांनी करुणाकृपेने देऊ केलेल्या साधनेवर पक्की सात्त्विक श्रद्धा ठेवली तर त्यांना निश्चितपणे परब्रह्माचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाने आपली श्रद्धा कमी पडते व आपण सतत देहसापेक्ष, प्रपंचविषयक विचारांतच अधिक वेळ व्यर्थ घालवितो !’’ असे प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी विवरण करताना सांगितले.
या प्रवचन-सेवेनंतर प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांनी पारमार्थिक शंका-समाधान सत्र संपन्न केले. त्या वेळी साधकांनी विचारलेल्या विविध पारमार्थिक शंकांचे शास्त्रोचित असे संपूर्ण समाधान प.पू.सद्गुरूंनी अमृतमय रसाळ वाणीने केले. ‘आपल्या श्रीसद्गुरूंच्या समवेत अन्य अधिकारी व्यक्ती उपस्थित असतील तर त्यांना नमस्कार करावा का ?’ या प्रश्नाचे उत्तर देताना प.पू.श्री.दादांनी सांगितले की, ‘‘सर्वप्रथम आपल्या सद्गुरूंना नमस्कार करावा व त्यानंतर अन्य श्रेष्ठ व्यक्तींना नमस्कार करावा. नमस्कार करणाऱ्याचा भाव जर नम्र असेल, तर तो ज्याला नमस्कार करतो त्या व्यक्तीचा काही पुण्यभाग हा नमस्कार करणाऱ्याकडे जात असतो. म्हणून आपणही इतरांकडून नमस्कार करून घेण्यापूर्वी नक्की विचार करावा !’’ असेही त्यांनी या वेळी सांगितले.
‘परमार्थामध्ये ‘पूर्वमार्ग’ व ‘पश्चिममार्ग’ म्हणजे काय ?’ या प्रश्नाला उत्तर देताना प.पू.श्री.दादांनी असे सांगितले की, ‘‘पूर्वमार्ग म्हणजे दीक्षा होण्यापूर्वीचा, शक्तिजागृतीपूर्वीचा मार्ग आहे आणि पश्चिममार्ग हा पश्चात् म्हणजे नंतरचा मार्ग आहे. पूर्वमार्ग हा प्रपंचाचा मार्ग आहे. पूर्व मार्गात इडा व पिंगला या नाड्यांद्वारे प्राणांचे वहन होत असते तर पश्चिममार्ग हा सुषुम्ना नाडीचा सिद्ध मार्ग आहे. सद्गुरूंच्या कृपेने सुषुम्ना नाडी उघडते व शक्तीद्वारे वासना जाळल्या जात असल्यामुळे शुद्ध झालेले प्राण सुषुम्नामार्गात प्रवेश करतात व अशा रीतीने जीवाला शेवटी परमात्मपदाची प्राप्ती होते !’’ ‘साधनेदरम्यान काही साधकांचे आसन उचलले जाते ते गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध नाही का ?’ या प्रश्नास उत्तर देताना प.पू.सद्गुरु श्री.दादांनी ‘‘ही सर्व प्रक्रिया भगवती शक्तीद्वारे पृथ्वी व आप या तत्त्वांचा लय झाल्यावर शरीराची घनता कमी झाल्यामुळे होते’’, असे सांगून या संदर्भातील स्वतःचा दिव्य व अद्भुत अनुभव कथन केला. ‘कोणते संस्कार परमार्थाला साहाय्यक ठरतात ?’ यावर विवेचन करताना, ‘‘जे संस्कार जीवाला प्रपंचातून, वासनांतून काढून भगवंतांकडे नेतात तेच उत्तम संस्कार होत’’, असे प.पू.श्री.दादांनी सांगितले.
शंकासमाधान सत्रानंतर ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’ या महामंत्राचा नामजप करण्यात आला. तदनंतर आरती व मंत्रपुष्प होऊन पुण्यकाळ साजरा झाला. रात्री ८.०० ते ९.०० या वेळात काही साधक कलाकारांनी गायन व वादन-सेवा श्रीसद्गुरुचरणीं समर्पित केली. प.पू.सद्गुरु श्री.दादा व प.पू.सद्गुरु सौ.ताई यांच्या काही अभंगरचना या वेळी सादर करण्यात आल्या. सौ.रमा खाडिलकर यांनी ‘ॐ नमोजी आद्या’, ‘अहो स्वामी कृपावंता’, ‘सुवर्ण झळाळ दिव्य परिमळ’, ‘अर्थ अनर्थाचे मूळ’, ‘आम्ही भाग्याचे भाग्याचे’; श्री.माधव वासुदेव खाडिलकर यांनी ‘गोकुळ भ्याले, गोधन भ्याले’, ‘बाईल माझी गुणाची वो’ तर श्री.चिन्मय विवेक देशपांडे यांनी ‘डोळा कृष्णरूप, चित्ती कृष्णकथा’, ‘गुरुजी, मैं ना जानूं जोग’, ‘नेणो आम्ही वेद, नेणो ती पुराणें’, ‘स्वामी कथा पडो श्रवणीं’ इत्यादी अभंगरचना अत्यंत सुश्राव्य आवाजात भावपूर्णरित्या सादर केल्या. या सर्व रचनांना श्री.माधव खाडिलकर यांनी संगीतबद्ध केले होते. या वेळी गायक कलाकारांना श्री.चिन्मय देशपांडे यांनी संवादिनीची, श्री.माधव खाडिलकर यांनी टाळवाद्याची, श्री.चैतन्य देशपांडे यांनी तबल्याची तर श्री.मनोज भांडवलकर यांनी पखवाजाची साथ केली. या बहारदार गायन व वादन-सेवेने उपस्थित साधक-सज्जन भक्तिरसात अक्षरशः नाहून निघाले. श्रीसद्गुरुचरणीं सेवा रुजू करणाऱ्या या सर्व कलाकारांचा प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर अल्पोपाहार होऊन पहिल्या दिवशीचे कार्यक्रम समाप्त झाले.
दुसऱ्या दिवशीही प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या पावन उपस्थितीत सकाळी ०७.०० ते ०८.०० या वेळेत सामुदायिक साधनेने कार्यक्रमांना सुरुवात झाली. अल्पोपाहारानंतर सकाळी १० वाजेपर्यंत उपस्थित साधकांनी ‘श्रीगुरुसाहस्री’ किंवा ‘श्रीदत्ताभावांजली’ ग्रंथांचे वैयक्तिक वाचन-पारायण केले. याच दरम्यान सौ.स्मिता व श्री.महेश वाघमारे यांच्या हस्ते ‘श्रीसत्यदत्तपूजा’ व श्री.राधेय अभय आफळे यांच्या हस्ते ‘श्रीसद्गुरुपादुका-पूजन’ संपन्न झाले.
त्यानंतर प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या प्रवचन-सेवेस प्रारंभ झाला. या वेळी त्यांनी आदल्या दिवशी सेवेला घेतलेल्या ओवीच्याच उर्वरित दोन चरणांचे विस्तारपूर्वक विवेचन केले. सद्गुरु श्री माउलींनी या ओवीतून जीवाच्या ठिकाणी ज्ञान प्रकट झाल्यावर दिसणारी लक्षणे सांगितली आहेत असे सांगून, ‘हे ज्ञान कधी प्रकटते ?’ ‘सात्त्विक श्रद्धा म्हणजे काय ? व ती कशी वाढते ?’ अशा काही मूलभूत मुद्यांचाही प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी विषयाच्या अनुषंगाने या वेळी परामर्श घेतला. ‘‘साधकाची साधनेवर व सद्गुरूंवर दृढ श्रद्धा असली पाहिजे. साधकांची श्रद्धा ही सत्त्व, रज व तम गुणांनी मिश्रित असते. केवळ सात्त्विक श्रद्धा वाढीस लागण्यासाठी त्या दृष्टीने प्रयत्नांची जोड असणे आवश्यक असते. नित्य साधना व सद्गुरुसेवा यांच्यायोगे हा भाव दृढ होत जातो. जसा एखादा कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याचा घट बनवतो तसेच सद्गुरुसेवेने चित्ताचा आकार व त्यावरील संस्कार बदलून त्याला योग्य दिशा मिळते !’’ असे प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी सांगितले.
प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांनी ‘हृदयसंवाद’ या ग्रंथात ‘सेवाभाव’ कसा असावा ? याचा खुलासा व मार्गदर्शन विस्ताराने केले असल्याचे या वेळी त्यांनी नमूद केले. ‘निष्काम सेवा आणि सेवाभाव’ या दोन्ही गोष्टींचे परमार्थमार्गात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कलियुगात प्रत्येकाला सद्गुरूंच्या वैयक्तिक सेवेची संधी लाभणे शक्य नसले तरी सद्गुरुस्थानाची सेवा ही देखील सद्गुरुसेवेचेच फळ देणारी आहे. म्हणून वेळोवेळी आपल्या विविध प्रकल्पस्थानांवर जाऊन साधकांनी केवळ भगवत्प्राप्तीची इच्छा ठेवून सेवा करावी. बाह्य सेवेबरोबरच सद्गुरूंची अंतरंगसेवाही आवश्यक असून, ‘गुरु दाविलिया वाटे’नुसार साधना, संप्रदायोक्त आचारविचार ठेवण्याचा प्रयत्न व मानसपूजा या प्रकाराने साधकांनी सद्गुरूंची अंतरंगसेवा करावी. आपली श्रद्धा अधिक दृढ होण्यास याचा निश्चित लाभ होतो.’’ असेही प.पू.श्री. अनिरुद्धदादांनी सांगितले.
प्रवचन-सेवेची सांगता करताना प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी सांगितले की; ‘‘अनेक कल्प जरी तप केले तरी प.पू.सद्गुरु श्री.मामांसारखे अलौकिक सद्गुरु भेटणे हे दुर्लभ आहे. केवळ त्यांची अपार करुणाकृपा व सद्गुरुपरंपरेचे थोर उपकार म्हणूनच आपल्याला त्यांनी ‘साधक’ म्हणून स्वीकारले आहे. केवळ आपल्यासारख्या सामान्य जीवांचा कळवळा येऊन आपला उद्धार व्हावा म्हणून मार्ग दाखविण्यासाठी त्यांनी देह धारण केला होता. आपण साधक म्हणून नित्य नेमाने व प्रेमाने साधना करणे, सद्गुरूंच्या उपदेशानुसार सुयोग्य वर्तन ठेवणे आणि सद्गुरुसेवेची कास धरणे हेच आपले परम कर्तव्य आहे !’’
प्रवचन-सेवेनंतर पारमार्थिक शंका-समाधान सत्रास सुरुवात झाली. हे सत्र देखील प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांनी संपन्न केले. ‘परमार्थमार्गात अग्रेसर होण्यासाठी साधकांनी नित्य साधनेबरोबर आणखी काय प्रयत्न करावेत ?’ यासंबंधी मार्गदर्शन करताना प.पू.सद्गुरु श्री.दादा म्हणाले; ‘‘सद्गुरूंनी तसेच आपल्या परंपरेने घालून दिलेल्या मूल्यांचे व केलेल्या उपदेशांचे साधकांनी तंतोतंत पालन करावे. संप्रदाय पांघरून राहावे. प्रत्येक प्रसंगात, कोणतेही कर्म करण्याआधी, ‘आपल्या सद्गुरूंना हे आवडेल का ?’ असा विचार सतत आपल्या मनात ठेवावा. त्याचबरोबर साधकांनी सद्गुरूंप्रति दास्यभावाने राहावे. ‘आपण सद्गुरुचरणींचे दास आहोत’ या भावनेने राहिल्याने आपला अहंकार कमी होत जातो !’’ ‘साधकाची दशा कशी असावी ?’ या प्रश्नाला उत्तर देताना प.पू.सद्गुरु श्री.दादांनी सांगितले की; ‘‘साधकाची बाह्यदशा (पेहराव) ही सरळ, स्वच्छ व साधी असावी. आपला वेष आपल्या लौकिक देशकालपरिस्थितीला साजेसा असावा; तर अंतर्दशा ही अलिप्त, निःस्वार्थ असावी. श्रीभगवंतांकडे व श्रीसद्गुरूंकडे नेहमी त्यांची करुणाकृपाच मागावी. वृथा अभिमान व दांभिकता यांचा त्याग करावा !’’ या वेळी त्यांनी प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराजांच्या जीवनातील या संदर्भातील एक हृद्य प्रसंग कथन केला.
‘उपाधी’ची नेमकी संकल्पना सांगताना प.पू.श्री.शिरीषदादा म्हणाले की; ‘‘आपले जे मूळ स्वरूप आहे त्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही गोष्ट वागवणे व त्यात गुरफटत जाणे यालाच ‘उपाधी’ असे म्हणतात !’’ सिद्ध महात्मे उपाधींमधून बाहेर पडण्यासाठी किती व कसे प्रयत्न करतात हे त्यांनी प.प.श्री. श्रीधर स्वामी महाराजांच्या जीवनातील एका प्रसंग सांगून स्पष्ट केले. प्रश्नोत्तराच्या ओघात त्यांनी असे सांगितले की; ‘‘शास्त्रांचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास करीत असताना अतिवाद किंवा अतितर्क टाळावेत. असे केल्याने काहीच लाभ होत नाही. शास्त्रमर्यादांमध्ये राहून ती ती संकल्पना समजून घ्यावी, मात्र तर्क कोठे थांबला पाहिजे याचेही भान ठेवावे !’’ प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांचे हे परमार्थाच्या अनेक अंगांचे मार्मिकरित्या स्पष्टीकरण करणारे मार्गदर्शनपर बोलणे अखंड ऐकतच राहावे असे सर्व उपस्थितांना वाटत होते.
यानंतर ‘जय जय करुणामूर्ती दयाळा जय जय श्रीपादा । जय जय सद्गुरु अनाथनाथा जय जय श्रीपादा ॥’ हा नामजप करण्यात आला. आरती व मंत्रपुष्प होऊन पुण्यकाळ साजरा करण्यात आला. त्यानंतर सर्व उपस्थित साधक-सद्भक्तांनी देवांच्या व सद्गुरूंच्या दर्शनाचा लाभ घेतला. कऱ्हाड केंद्रातर्फे श्री.अभय आफळे यांच्या हस्ते प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ‘श्रीसमर्थ मल्टिपर्पज हॉल’चे मालक श्री.व सौ.पाटील, उत्सवात ध्वनिव्यवस्थेचे नियोजन करणारे श्री.विनायक कुंभार व भोजन-व्यवस्था करणारे श्री.राजू महाराजा यांना प.पू.सद्गुरु श्री. शिरीषदादांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रसाद म्हणून देण्यात आले. पुण्यकालानंतर सर्वांनी अवीट गोडीच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. अशा रीतीने श्रीसद्गुरुकृपेने हा दोन दिवसीय महोत्सव अत्यंत आनंदाने व शिस्तबद्ध रीतीने संपन्न झाला. सद्गुरुचरणांचे हृदयात स्मरण करीत व नित्य साधनारत राहण्याचा निश्चय करीत साधकांनी परस्परांचा प्रेमाने निरोप घेतला आणि महोत्सवाच्या परममंगल स्मृती मनात साठवून सर्वजण स्वगृही परतले.
उत्सवातील काही क्षण चित्रे














