
|| श्री ||
श्रीक्षेत्र आंबेरी येथे संपन्न झालेल्या प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा वृत्तांत
प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे यांचा सातवा पुण्यतिथी महोत्सव माघ कृ.७; श्रीप्रिया सप्तमी, श्रीशके १९४७, रविवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘प.प.श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तपोवन श्रीक्षेत्र आंबेरी’, येथे अत्यंत प्रेमादरपूर्वक आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
या महोत्सवासाठी चिपळूण, कऱ्हाड, गोवा, मुंबई अनेक इत्यादी ठिकाणांहून निमंत्रित साधक-बंधुभगिनी आदल्या दिवशी संध्याकाळपासून प्रकल्पस्थानी येण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे आदल्या दिवसापासूनच तेथे उत्सवाची लगबग जाणवत होती. प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवशी म्हणजे रविवारी ८ फेब्रुवारीला सकाळी आठ वाजल्यापासून साधक कार्यक्रमासाठी प्रकल्पस्थानी उपस्थित होऊ लागले. सकाळच्या चहापानानंतर मुख्य मंदिरात श्रीभगवंतांचे दर्शन घेऊन साधकमंडळी ‘श्रीचरणाधिष्ठान’ मंदिरात दर्शन घेऊन स्थानापन्न झाली.
श्रीक्षेत्र आंबेरी येथील ‘प.प.श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तपोवन’ ही कोकणातील अत्यंत निसर्गरम्य आणि शांत अशी तपोभूमी आहे. या नितांतसुंदर परिसरात प.पू.सद्गुरु सौ.ताईंचे अस्तित्व कणाकणांत भरलेले आहे. या ठिकाणी श्रीराधावर श्रीकृष्णचंद्रप्रभू श्रीभगवंतांचे तसेच राजाधिराज सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराज आणि प.प.सद्गुरु श्री.थोरले स्वामी महाराज यांचे जागृत अधिष्ठान आहे. श्रीनाथ मारुतींचे मंदिर तसेच पुष्करिणी, मुख्य मंदिराच्या भोवताली असणाऱ्या असंख्य तुळशी, कदंबाचा नयनमनोहर वृक्ष यांमुळे या सर्व परिसरात निसर्गसौंदर्य, शांतता, पावित्र्य आणि प्रसन्नता यांचा अतिशय सुंदर मिलाप झाल्याचे जाणवते.
श्रीक्षेत्र आंबेरी येथे वास्तव्यास असताना प.पू.सद्गुरु सौ.ताई श्रीभगवंतांच्या मंदिराच्या समोरील छोट्याशा टेकडी असलेल्या त्यांच्या ‘रासनिकुंज’ नावाच्या कुटीमध्ये साधनेसाठी व एकांतासाठी जाऊन बसत असत. त्याच ठिकाणी उभारलेल्या ‘श्रीचरणाधिष्ठान’ मंदिरामध्ये प्रस्तुत उत्सव संपन्न झाला.
‘श्रीचरणाधिष्ठान’ मंदिराच्या पायऱ्यांवर साधक भगिनींनी सुरेख रांगोळ्या काढल्या होत्या. मंदिराच्या गर्भगृहात फुलांची अतिशय सुंदर सजावट करण्यात आली होती. प.पू.सौ.ताईंना अत्यंत प्रिय असणाऱ्या सुवासिक फुलांची गर्भगृहात केलेली अतिशय सुंदर सजावट उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. सकाळी ठीक सहा वाजता प.पू.सद्गुरु सौ.ताईंच्या श्रीचरणपादुकांवर पवमानसूक्ताने अभिषेक-पूजेला सुरुवात झाली.
संक्षिप्त चलतचित्र
सकाळी ठीक साडेनऊ वाजता प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांचे ‘श्रीचरणाधिष्ठान’ मंदिरात शुभागमन झाले. त्यानंतर पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली. सुरुवातीला गोवा येथील कु.पृथा प्रसाद गावकर यांनी गायन-सेवा सादर केली. कु.पृथा या सुप्रसिद्ध गायिका मुग्धा गावकर यांच्या शिष्या आहेत. कु.पृथा यांनी ‘पद्मनाभा नारायणा’ या अभंगगायनाने सेवेची सुरुवात केली. अत्यंत गोड गळा, तयारीपूर्वक सादरीकरण ही त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यानंतर त्यांनी ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’ ही रचना गायली. त्यात त्यांनी ‘अमृताहुनी ही गोड’ अशी एक सुंदर जागा घेतली. सर्वश्रेष्ठ मानली जाणारी अमृताची गोडीही श्रीभगवंतांच्या नामापुढे फिकी आहे, हे त्यांचे गायन ऐकताना वारंवार प्रकर्षाने जाणवत राहिले. त्यांचा ‘गुरु एक जगी त्राता’ हा अभंग ऐकत असताना सर्व साधक अत्यंत भावविभोर झाले होते. त्यानंतर संत श्री तुकाराम महाराजांचा ‘बोलावा विठ्ठल’ हा अभंग त्यांनी अत्यंत बहारीने सादर केला. शंकरा रागावर आधारित असलेले ‘स्वामीलीला अपरंपार’ हे ‘श्रीस्वामीसमर्थ नामपाठा’तील प.पू.श्री.दादांचे पदही त्यांनी अत्यंत भावपूर्ण रीतीने सादर केले. शेवटी, ‘बाजे रे मुरलीया बाजे’ ही प्रसिद्ध रचना सादर करून कु.पृथा यांनी झालेली सेवा श्रीसद्गुरुचरणीं रुजू केली. त्यांना संवादिनीची साथ सावंतवाडी येथील श्री.मंगेश रामचंद्र मिस्त्री यांनी आणि तबल्याची साथ गोव्याच्या श्री.रामकृष्ण देसाई यांनी केली. तसेच प्रकल्पावरच वास्तव्यास असणाऱ्या कु.मीरा जोग या शाळकरी मुलीने अत्यंत उत्तमरीतीने तालवाद्याची साथ केली. या प्रसंगी, प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या हस्ते कु.पृथा यांना वस्त्र, श्रीफळ प्रसाद व पुष्पगुच्छ व त्यांना साथसंगत करणाऱ्या सर्व कलाकारांचा श्रीफळ व पुष्पगुच्छरूपी प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमानंतर सर्व साधक, श्रोते नेहमीच ज्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतात त्या प.पू.श्री.दादांच्या प्रवचन-सेवेला सुरुवात झाली. ग्रंथराज ‘श्री ज्ञानेश्वरी’च्या सहाव्या अध्यायातील दुसरी ओवी त्यांनी सेवेकरिता घेतली होती.
सर्वप्रथम प.पू.श्री.दादांनी ही ओवी सेवेसाठी घेण्यामागची दोन करणे सांगितली. पहिले कारण असे की, त्यांनी सर्वात प्रथम ह्याच ओवीवर सांगली येथे झालेली प.पू.सद्गुरु श्री.मामामहाराजांची प्रवचन-सेवा ऐकली होती.
दुसरे कारण म्हणजे, एकदा प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताई आणि प.पू.सद्गुरु श्री.दादा ‘रासनिकुंज’ कुटीच्या परिसरात संध्याकाळी फिरायला आले होते. त्या वेळी अचानक प.पू.सौ.ताई प.पू.श्री.दादांना म्हणाल्या की; ‘‘मी येथे राहून ब्रह्मरसाचे पारणे करीन !’’ त्यावर प.पू.श्री.दादांनी त्यांना त्यांच्या त्या वाक्याचा अर्थ विचारला. त्या वेळी प.पू.सौ.ताईंनी त्यांना असे सांगितले होते की, ‘‘श्रीभगवंतांनी माझ्यासाठी ब्रह्मरसाचे पारणे केले आहे, त्याचा लाभ येथे सर्वांना होईल !’’
प्रवचन-सेवेदरम्यान प.पू.श्री.दादांनी असे सांगितले की, ‘‘शक्तिपाताचे असे काही प्रकार आहेत की जो शक्तिपात केवळ श्रीभगवंतच करू शकतात. तसाच मोहाचा शक्तिपात श्रीभगवंतांनी अर्जुनाला केला. श्रीभगवंतांनी अविद्या, मोह इत्यादी कोणत्याही प्रकारचा शक्तिपात जरी केला तरी त्याची सात्त्विक लक्षणेच प्रकट होताना दिसतात. त्यामुळे जरी मोहाचा शक्तिपात केलेला असला तरीही सात्त्विकाचीच सर्व लक्षणे अर्जुनाच्या ठिकाणी दिसू लागली !’’
प.पू.श्री.दादांनी या प्रवचनात ‘मोह आणि महामोह’, ‘स्नेह आणि अतिस्नेह’, ‘पारणे आणि परगुणे’, ‘पाहुणा आणि पाहुणेर’ तसेच ‘अवसर आणि अवस्वर’ इत्यादी शब्दांमधील फरकाचेही विस्ताराने विवरण केले.
या प्रवचन-सेवेत प.पू.श्री.दादांनी ग्रंथराज ‘श्री ज्ञानेश्वरी’चे महत्त्व विशद करताना असेही सांगितले की, ‘‘कलियुगात नामाचा लोप झालेला आहे. ज्या जीवांच्या उद्धाराची वेळ जवळ आलेली आहे त्यांना सप्रभव साधन लाभावे म्हणून प्रत्यक्ष श्रीभगवंतांनी सद्गुरु श्री माउलींच्या रूपाने अवतार घेऊन ग्रंथराज ‘श्री ज्ञानेश्वरी’ची रचना केली.
आपल्या श्रीसद्गुरूंनी आपल्याला सनाथ करून आपल्या चित्तावर श्रीभगवंतांच्या कृपेची मोहर उठवली आहे म्हणूनच केवळ श्रीभगवंतांनी आपल्याला जवळ केले आहे. श्रीभगवंतांनी आपल्याला त्यांचे पाहुणे केले आहे. हा ‘ब्रह्मरस’ त्यांच्या कृपेने आपल्याला लाभलेल्या या ब्रह्मविद्येचा गाभा आहे. भगवंतांच्या प्रेमशक्तीलाच ‘ब्रह्मरस’ असे म्हटले जाते. ‘श्री ज्ञानेश्वरी’च्या अमृतकलशातून आपल्याला हा ब्रह्मरस लाभणार आहे. मात्र तो श्रीभगवंतांच्या मुखातूनच घ्यायचा असतो. तो त्यांच्या प्रेमाचा आस्वाद आहे !’’
प्रवचनसेवेनंतर, ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव’ व ‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ हे नामजप करण्यात आले. नामजपानंतर आरती-मंत्रपुष्प होऊन तदनंतर ‘प्रेमसुमनांजली’चे गायन होऊन अत्यंत भावपूर्ण रीतीने कार्यक्रम संपन्न झाला. नामजप आणि आरती श्रीक्षेत्र आंबेरी येथील प्रकल्पनिवासी साधकबंधूंनी म्हटली. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्व उपस्थितांनी श्रीभगवंतांचे, उभय सद्गुरु श्रीस्वामी महाराजांचे व प.पू.सद्गुरु सौ.ताईंचे दर्शन घेतले. त्यानंतर तीर्थप्रसाद होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
नेहमीप्रमाणेच महोत्सवप्रसंगी प्रकल्पस्थानी ‘श्रीवामनराज प्रकाशना’चे ग्रंथ तसेच आंबेरी येथे तयार होणारी सेंद्रिय उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती, त्यांना साधकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. महोत्सवाच्या सुखद स्मृती हृदयात साठवून सर्व साधक तृप्त मनाने आपापल्या स्थानी रवाना झाले.
उत्सवातील काही क्षण चित्रे

