
|| श्री ||
पुणे आणि डॅलस, टेक्सास येथे संपन्न झालेल्या प.पू.सद्गुरु श्री. मामा महाराजांच्या छत्तिसाव्या आणि प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे यांच्या सातव्या एकत्रित पुण्यतिथी महोत्सवाचा वृत्तांत
संक्षिप्त चलतचित्र
महोत्सव स्थळ
प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज यांचा छत्तिसावा व प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे यांचा सातवा एकत्रित पुण्यतिथी महोत्सव फाल्गुन कृष्ण नवमी; ‘श्रीपाद नवमी’; श्रीशके १९४७, गुरुवार दिनांक १२ मार्च २०२६ रोजी ‘माउली’ व ‘श्रीपाद निवास’ येथे आणि दिनांक १३ मार्च २०२६ रोजी ‘काकडे पॅलेस सभागृह’, कर्वेनगर, पुणे येथे अतिशय उत्साहाने संपन्न झाला.
महोत्सवाच्या जवळजवळ महिनाभर आधीपासून ‘माउली’, ‘श्रीगुरुकृपा’, ‘अन्नपूर्णा’ व ‘श्रीपाद निवास’ या सर्व वास्तूंमध्ये साफसफाई मोहीम राबवली गेली. यामध्ये विशेषतः तरुण स्वयंसेवकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. त्यामुळे अपेक्षेपेक्षा फारच लवकर सर्व कामे आटोपली.
दिनांक १२ मार्च रोजी ‘माउली’ आश्रम संकुल व परिसरात अतिशय आकर्षक सजावट करण्यात आली होती. येथील श्रीसद्गुरुपरंपरेच्या प्रतिमांना आपल्या भगिनींनी गुंफलेले सुगंधी फुलांचे सुंदर मोहक हार अर्पण केले होते. ‘श्रीपाद निवासा’त सकाळी ७.१५ ते ८.१५ या वेळेत सामुदायिक साधना संपन्न झाली. ‘माउली’त सकाळी ७ ते ९ या वेळेत सौ.कल्याणी व श्री.अजय वैद्य यांच्या हस्ते ‘श्रीसद्गुरुपादुका -पूजन’ आणि सौ.गायत्री व श्री.सोहम संगवई यांच्या हस्ते ‘श्रीसत्यदत्त पूजन’ संपन्न झाले. श्री.सुरेंद्र प्रभुदेसाई व श्री.दत्तगुरु या गुरुजींनी या वेळी पौरोहित्य केले.
प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा आणि प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांच्या पावन उपस्थितीत सकाळी ११.३० ते ११:४५ या दरम्यान ‘श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे ।’ आणि तदनंतर १२ या दरम्यान ‘जय जय करुणामूर्ति दयाळा’ या नामजपांनी ‘माउली’ परिसर दुमदुमून गेला. दुपारी ठीक १२ वाजता शंखनादासह घंटा, झांजा, मृदंग, संवादिनी अशा वाद्यांच्या गजरात प.पू.सद्गुरु श्री.मामांचा तसेच प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंचा जयजयकार करून पुण्यकाल साजरा करण्यात आला. त्यानंतर आरती व मंत्रपुष्पांजली झाली. सर्व साधकांनी श्रीसद्गुरुदर्शन व तीर्थप्रसाद घेतल्यावर हा कार्यक्रम संपला.
सायंकाळी ४ ते ५ या वेळेत ‘श्रीपाद निवास’ येथे ‘श्रीहरिपाठ-गायनसेवा’ श्रीसद्गुरुचरणीं रुजू करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता प.पू.श्री.शिरीषदादा व प.पू.श्री.अनिरुद्धदादा यांच्या मंगल उपस्थितीत प.पू.सद्गुरु श्री. मामा व प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताई यांच्या पादुकांच्या राजोपचार महापूजेला सुरुवात झाली. या वेळी वे.मू.श्री.दत्तात्रेयशास्त्री जोशी आणि ब्रह्मवृंदाकरवी ‘रुद्र’, ‘पवमान’, ‘पुरुषसूक्त’ यांचे पठण होऊन षोडशोपचारे अभिषेकासहित पूजा संपन्न झाली. तदनंतर अलंकार-पूजा, नैवेद्य व आरती झाली. त्यानंतर गर्भगृहात उपस्थित असलेल्या ब्रह्मवृंदाने चार वेद, शास्त्र, पंचांग, पुराण या सेवा श्रीसद्गुरुचरणीं रुजू केल्या. त्यानंतर कु.सागरिका पटवर्धन यांनी नृत्य, श्री.चिन्मय देशपांडे व श्री.यश रुईकर यांनी गायन, कु.शाल्मली भालेराव तसेच श्री.शैलेश सहस्रबुद्धे व श्री.सुदर्शन देशपांडे आणि साथीदार यांनी चामर, श्री.विजय उपाध्ये, श्री.चैतन्य देशपांडे व श्री. मनोज भांडवलकर यांनी वाद्यवादन आणि काही साधकबंधूंसह सर्व उपस्थितांनी नामजप; इत्यादी सेवा श्रीसद्गुरुचरणीं समर्पित केल्या. प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी सर्व ब्रह्मवृंदास वस्त्रे व दक्षिणा अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर भक्तिभावाने श्रीसद्गुरुदर्शन घेऊन व त्यानंतर तीर्थप्रसाद घेऊन सर्व उपस्थित साधक-सज्जन स्वस्थानी परतले.
दिनांक १३ मार्च रोजी ‘काकडे पॅलेस सभागृह’ कर्वेनगर, पुणे येथे सकाळी ७.१५ ते ८.१५ या वेळेत सामुदायिक साधनेने कार्यक्रमांस सुरुवात झाली. सभागृहातील व्यासपीठ साधकभगिनींनी फुलांच्या मनमोहक रचना करून अतिशय सुंदर रीतीने सजवले होते. तसेच तेथील श्रीसद्गुरुपरंपरेच्या तसेच प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज व प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताई महाराज यांच्या प्रतिमांना सुंदर सुवासिक फुलांचे हार घालण्यात आले होते.
सकाळी ठीक ९ वाजता प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा व प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांचे सभागृहात मंगल आगमन झाले. लगेचच श्रीमती श्रुति देवस्थळी यांची गायनसेवा सुरू झाली. अतिशय सुमधुर व भावपूर्ण स्वरात त्यांनी ‘करम की गती न्यारी संतो’, ‘घट घट में पंछी बोलता’, ‘घनु वाजे घुणघुणा’, ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’, ‘रूपे सुंदर सावळा गें माये’, ‘बाजे रे मुरलिया बाजे’ अशा विविध रचना गाऊन सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांना श्री.विजय उपाध्ये यांनी हार्मोनियमची श्री.अभिजीत जायदे यांनी तबल्याची, श्री.मनोज भांडवलकर यांनी पखवाजाची व श्री.सुश्रुत चितळे यांनी टाळांची अतिशय उत्तम साथ केली. श्रीसद्गुरुचरणीं ही श्रवणीय गायन-सेवा रुजू केल्याबद्दल श्रीमती श्रुति देवस्थळी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानधन देऊन तसेच त्यांच्या साथीदारांचा श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानधन देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर ठीक १०.३० वाजता प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांनी प.पू.सद्गुरु श्री.मामांच्या व प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंच्या सहवासातील काही हृद्य आठवणी सांगितल्या. प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताई कुठलेही संकट आल्यास ते स्वतःवर घेऊन प.पू.श्री.दादांना पाठीशी घालत असत, धाकट्या भावाप्रमाणे त्यांचा सांभाळ करीत असत, असे प.पू.श्री.दादांनी त्या वेळी सांगितले.
त्यानंतर प.पू. सद्गुरु श्री. अनिरुद्धदादा यांची प्रवचन-सेवा सुरू झाली.
हा ‘श्रीहरिपाठा’तील तेरावा अभंग त्यांनी सेवेकरिता निवडला होता. प्रवचनाच्या सुरवातीस प्रस्तुत अभंग सेवेला निवडण्यामागची दोन मुख्य कारणे त्यांनी सांगितली.
पहिले म्हणजे, श्री माउलींची कमी शब्दांत व्यापक परमार्थ सांगण्याची विलक्षण हातोटी ! अत्यंत मृदू आणि प्रेमळ भाषेत त्यांनी परमार्थ उलगडून सांगितला आहे; त्यामुळे त्यातील सुख, आनंद आणि समाधान सहज अनुभवता येते.
दुसरे म्हणजे, हरिपाठ हा परमपूज्य सद्गुरु श्री मामा आणि परमपूज्य सद्गुरु सौ. ताई या दोघांच्याही विशेष आवडीचा होता. यासंदर्भात त्यांनी परमपूज्य सद्गुरु सौ. ताईंच्या काही सुंदर आठवणी सांगितल्या. त्यांना हरिपाठ का आवडायचा ? हेही त्यांनी स्पष्ट केले. सद्गुरुकृपेने श्री माउलींना अभिप्रेत अर्थ उलगडणे आणि त्यातील आनंद अनुभवणे, हाच त्याचा खरा अर्थ ! संत महात्मे हा अर्थ प्रत्यक्ष जगतात आणि त्या माध्यमातून ते अखंड, चिरंतन आनंदाचा अनुभव घेत असतात.
श्री माउलींचे संपूर्ण वाङ्मय, त्यांची शब्दयोजना आणि त्यामागील अभिप्रेत अर्थ समजला की वाचनाची गोडी कशी वाढते, यावर प.पू. सद्गुरु श्री. अनिरुद्धदादा यांनी सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले, परमपूज्य मातुःश्री हरिपाठाचा अत्यंत सुंदर अर्थ सांगायच्या. हरिपाठ म्हणजे पाठीमागचा, मेरुदंडाच्या मार्गाने जाणारा, म्हणजेच सुषुम्नेचा किंवा साधनेचा मार्ग ! या मार्गाने गेल्यावरच हरीची भेट होते. हरीची समाधी स्पष्ट करताना ते म्हणाले की, भगवंतांच्या म्हणजे हरीच्या अखंड नामस्मरणाने ही समाधी साध्य होते; म्हणूनच तिला ‘हरीची समाधी’ असे म्हणतात. हीच एक परिपूर्ण समाधी असून, त्यात पूर्णपणे तदाकार होता येते.
साधारणपणे असे वाटते की द्वैतबुद्धी असेल तर हरीची समाधी साधता येत नाही. परंतु श्री माउली सांगतात की, एकदा हरीची समाधी साधली की द्वैतबुद्धी पुन्हा जागृत होत नाही आणि जीव जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. बुद्धी ही त्रिगुणात्मक असल्यामुळे परब्रह्माचा अनुभव येत नाही; त्यासाठी सद्बुद्धी जागृत होणे आवश्यक आहे. दीक्षेच्या वेळी ही सद्बुद्धी जागृत होते आणि नियमित साधनेमुळे ती अधिकाधिक दृढ होत जाते. ही बुद्धी दुर्लभ आहे, तीच साधकाला परमात्म्याकडे नेते.
साधना किती काळ करावी ? याबाबत प.पू. सद्गुरु सौ. ताई सांगायच्या की, जोपर्यंत त्या बुद्धीला भगवंत किंवा सद्गुरु हाच एकमेव विषय उरत नाही, तोपर्यंत चिकाटीने साधना करत राहावी. त्यातूनच भगवंतप्राप्ती होते. प.पू. सद्गुरु श्री.मामा सांगायचे की, ऋद्धी-सिद्धी साधकांना प्राप्त होतात; परंतु त्या प्रकट होत नाहीत, कारण त्या समाधीच्या मार्गातील अडथळे ठरतात.
पुढे प.पू.सद्गुरु श्री दादा म्हणाले, “रम्य काय ? तर भगवंत !” सदासर्वकाळ हरीचे चिंतन केल्याने भगवंतप्राप्ती होते. चिंतन म्हणजे केवळ विचार नव्हे, तर समजून घेऊन ते आचरणात आणणे हे होय. साधकांसाठी हाच भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सद्गुरुकृपेने प्राप्त झालेली साधना ही हरीच्या चिंतनाचीच साधना आहे. ती नियमितपणे केल्यास, या अभंगात सांगितलेले सर्व काही साधकांना प्रत्यक्ष अनुभवता येते. असे सांगून त्यांनी आपली सेवा श्रीसद्गुरुचरणी समर्पित केली !
प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज यांचा छत्तिसावा आणि प.पू.सद्गुरु मातु:श्री सौ.ताई महाराज यांचा सातवा एकत्रित पुण्यतिथी महोत्सव शनिवार दिनांक १४ मार्च आणि रविवार दिनांक १५ मार्च असे दोन दिवस अमेरिकेतील डॅलस, टेक्सास येथे अत्यंत उत्साहाने, भक्तिभावाने आणि मंगल वातावरणात साजरा झाला.
प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली होती. या महोत्सवासाठी अमेरिकेतील विविध शहरांमधून साधक मंडळी एकत्र जमली होती. प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज, प.पू.सद्गुरु मातु:श्री सौ.ताई महाराज आणि श्रीसद्गुरुपरंपरेच्या प्रतिमांभोवती केलेली ताज्या, सुगंधी फुलांची कमळाकृती सजावट लक्ष वेधून घेत होती. नाजूक, कोरीव लाकडी कमानींनी या सजावटीला विशेष देखणेपणा प्राप्त झाला होता.
शनिवारी दुपारी ठीक ४.०० वाजता सामुदायिक-साधनेने कार्यक्रमाच्या प्रथम सत्राची सुरुवात झाली. अल्पशा विश्रांतीनंतर प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताई महाराज यांचे ‘रात्र काळी घागर काळी ।’ या श्रीसंत नामदेव महाराजांच्या अभंगावरचे २००१ साली अमेरिकेत झालेले Recorded Video प्रवचन प्रक्षेपित करण्यात आले. त्या प्रवचनसेवेच्या व्हिडिओत प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंना बघून आणि ऐकून सर्वच उपस्थित साधक मंडळी अत्यंत भावुक झाली होती. ज्या अनेक साधकांना त्यांचे प्रवचन प्रत्यक्ष ऐकण्याचा योग कधीच लाभला नव्हता; त्यांच्यासाठी हा अनुभव एक अपूर्व पर्वणीच ठरला. या प्रवचन श्रवणानंतर आरती व मंत्रपुष्प झाले आणि तदनंतर उपस्थित सर्व साधकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.
या वर्षी प्रतिवर्षीप्रमाणे प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा या महोत्सवप्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित नसल्यामुळे सर्वांच्याच मनात एक प्रकारची हुरहुर दाटली होती. आरतीनंतर Virtual Meet च्या माध्यमातून प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी सर्व साधकांशी संवाद साधला. त्यांच्या दर्शनाने सर्वांच्याच आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सर्वांना मार्गदर्शन करताना प.पू.सद्गुरु श्री.मामांची एक आठवण सांगितली. एका साधकाने प.पू.श्री.मामांना प्रश्न केला की, ‘‘ ‘दीक्षा’ म्हणजे नक्की काय असते ?’’ त्यावर उत्तर देताना प.पू.श्री.मामा म्हणाले, ‘‘अरे; हा तर सगळा ‘कार’चा प्रवास आहे !’’ याचा अर्थ त्यांनी पुढे समजावून सांगितला की, ‘‘आधी जीवाचा अहं‘कार’ सुटतो आणि नंतर क्रमाक्रमाने सोऽहम्‘कार’, ॐ‘कार’ आणि निरा‘कार’ परब्रह्माची प्राप्ती होते !’’
पुढे प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी सांगितले की, ‘‘आपल्या संप्रदायात दीक्षा ही भक्ती आणि प्रेमाच्या कृपेची आहे !’’ ‘श्रीनारदभक्तिसूत्राणि’मधील ‘सा त्वस्मिन् परमप्रेमरूपा ॥ २ ॥’ ‘अमृतस्वरूपा च ॥ ३ ॥’ या सूत्रांचा आधार घेत त्यांनी सांगितले की, ‘‘ती भक्ती प्रेमस्वरूप आणि अमृतस्वरूप आहे !’’ प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंची सोप्या शब्दांत परमार्थ समजावून सांगण्याची हातोटी कशी होती आणि सद्गुरुकृपा ही अमृतस्वरूप कशी आहे हेही त्यांनी सांगितले.
प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या दर्शनाने आणि मार्गदर्शनामुळे महोत्सवास उपस्थित असणाऱ्या साधकांना फार आनंद झाला. वसंताच्या चाहुलीने जसा निसर्गात वृक्षवेलींना नवा बहर येतो तशीच सद्गुरुप्रेमाने सर्व साधकांची अंतःकरणे भक्तिभावाने बहरून गेली.
दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक १५ मार्च रोजी प्रथम सत्राची सुरुवात सकाळी ठीक ७.०० वाजता सामुदायिक साधनेने झाली. ठीक ९.०० वाजता सौ.वैजयंती जोशी आणि श्री.शिरीष जोशी यांच्या हस्ते प.पू.सद्गुरु श्री. मामा महाराज आणि प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताई महाराजांच्या पादुकांच्या पूजेला सुरुवात झाली. त्यानंतर अत्यंत भावपूर्ण वातावरणात पुण्यकालाचा नामजप आणि आरती संपन्न झाली. या वेळी उपस्थित सर्व साधकभक्तांनी परममंगल श्रीसद्गुरुपादुकांच्या दर्शनाचा, तीर्थप्रसादाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.
तदनंतर दुपारी २ ते ४ या विश्रांती कालावधी दरम्यान काही साधकांनी उत्स्फूर्तपणे अत्यंत रसाळ अशी गायनसेवा सादर केली. श्री.नंदन विंजमुरी, कु.बागेश्री जोशी, श्री.चिन्मय अथणीकर आणि श्री.अभिजित पंगु यांच्या आर्त आणि भावपूर्ण गायनाने सर्व वातावरण भारावून गेले आणि उपस्थितांची मने मंत्रमुग्ध झाली.
संध्याकाळच्या दुसऱ्या सत्रामध्ये प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताई महाराजांचे सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या साधना आणि भ्रामरीरहस्य प्रकटविणाऱ्या ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’ या अभंगावरील १९९८ साली अमेरिकेत झालेले Recorded Video प्रवचन प्रक्षेपित करण्यात आले.
उपरोक्त प्रवचनसेवेनंतर सर्व साधकांनी सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या श्रीहरिपाठ-गायनाची सेवा श्रीसद्गुरुचरणीं रुजू केली. वाद्यांच्या गजरात श्रीहरिपाठ म्हणताना सर्वजण तल्लीन झाले होते. संध्याकाळच्या आरती आणि महाप्रसादानंतर दीड दिवसांच्या या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता झाली.
सर्वांना प्रेमाने एकत्र आणणाऱ्या प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंच्या करुणाकृपेचा प्रत्यय या महोत्सवात प्रकर्षाने सर्वांच्या अनुभवाला आला. सर्व साधक बंधुभगिनी उत्स्फूर्तपणे आणि आनंदाने महोत्सवातील सेवाकार्यात सहभागी झाले होते. श्रीसद्गुरुकृपेने प्रस्तुत पुण्यतिथी महोत्सव अत्यंत नेटक्या रितीने सुसंपन्न झाला. महोत्सवातील आनंदाचे क्षण मनात जपून सर्वजण स्वस्थानी परतले.
